तालिबान : अफगाणिस्तानला 'साम्राज्यांचं कब्रस्तान' असं का म्हटलं जातं?

फोटो स्रोत, Print Collector
- Author, नॉरबेर्टो परेडेस
- Role, बीबीसी
अफगाणिस्तानला जगभरात 'साम्राज्यांचं कब्रस्तान' म्हणून ओळखलं जातं. पण इथं नेमकं असं काय आहे? अमेरिकेपासून ते ब्रिटन आणि सोव्हिएत संघापर्यंत जगभरातील मोठ्या शक्तींना यावर विजय मिळवण्यात अपयश येण्यामागचं नेमकं कारण काय?
हा असा प्रश्न आहे ज्याचं उत्तर अफगाणिस्तानच्या इतिहास आणि भूगोलात मिळतं.
19 व्या शतकात त्याकाळी जगातील सर्वात शक्तिशाली असलेल्या ब्रिटन साम्राज्यानं संपूर्ण ताकदीसह यावर विजय मिळवण्याचा प्रयत्न केला. पण 1919 च्या अखेरीस ब्रिटिशांना अफगाणिस्तान सोडावा लागला आणि त्यांना स्वतंत्र जाहीर करावं लागलं.
त्यानंतर सोव्हिएत संघानं 1979 मध्ये अफगाणिस्तानवर आक्रमण केलं. 1978 मध्ये सत्तापालट करून स्थापन केलेल्या डाव्या सरकारचं पतन होण्यापासून वाचवणं हा त्यामागचा उद्देश होता. पण हे युद्ध जिंकणं शक्य नाही, हे समजण्यासाठी त्यांना दहा वर्षे लागली.
ब्रिटिश आणि सोव्हिएत साम्राज्य या दोघांमध्ये एक अशी बाब आहे, जी दोघांवरही लागू होते. ती म्हणजे दोन्ही साम्राज्यांनी अफगाणिस्तावर हल्ला केला तेव्हा ते सर्वाधिक शक्तिशाली होते. पण या हल्ल्यानंतर हळूहळू दोन्ही साम्राज्याचं पतन सुरू झालं.

फोटो स्रोत, Getty Images
2001 मध्ये अमेरिकेच्या नेतृत्वातील हल्ला आणि त्यानंतर अनेक वर्षांपर्यंत चाललेल्या युद्धात आतापर्यंत लाखो लोकांनी प्राण गमावले आहेत. या हल्ल्याच्या 20 वर्षांनंतर आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी अफगाणिस्तानातून लष्कर परत बोलावण्याचा निर्णय घेतला.
हा एक वादग्रस्त निर्णय होता आणि त्यावर जगभरातून टीका करण्यात आली. या एका निर्णयामुळं अफगाणिस्तानची राजधानी काबूलवर तालिबाननं एवढ्या वेगानं ताबा मिळवला.
''अफगाण लोकांनाच जे युद्ध लढण्याची इच्छा नाही, त्यात अमेरिकेच्या नागरिकांचा मृत्यू होता कामा नये,'' असं बायडन यांनी त्यांच्या या निर्णयावर स्पष्टीकरण देताना म्हटलं आहे.
"कितीही शक्ती खर्च केली तरी स्थिर, एकत्रित आणि सुरक्षित अफगाणिस्तान मिळवणं शक्य नाही," असं बायडन यांनी 'साम्राज्यांचं कब्रस्तान' अशी अफगाणिस्तानची ओळख असल्याचं स्मरण करत म्हटलं.
गेल्या काही शतकांमध्ये अफगाणिस्तानवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करणाऱ्या जगातील सर्वात शक्तिशाली सैन्यांसाठी अफगाणिस्तान कब्रस्तानच ठरलं आहे.
सुरुवातीला या लष्करांना थोडं यश मिळालं असलं तरीही, अखेर त्यांना अफगाणिस्तान सोडून पळावंच लागलं आहे.

फोटो स्रोत, Getty Images
"अफगाणिस्तान खूप शक्तिशाली आहे असं काही नाही. तर अफगाणिस्तानात जे काही घडलं ते आक्रमण करणाऱ्यांच्या चुकांमुळं घडलं," असं अफगाणिस्तानच्या इतिहासावर आधारित 'अफगाणिस्तान: साम्राज्यों की कब्रगाह' नावाचं पुस्तक लिहिलेल्या संरक्षण आणि परराष्ट्र धोरण समीक्षक डेवीड इस्बी यांनी बीबीसी मुंडोशी बोलताना सांगितलं.
बड्या शक्तींचा पराभव का झाला?
इस्बी यांच्या मते, तटस्थपणे विचार करता अफगाणिस्तान हा कठीण भूभाग आहे. हा एक गुंतागुंतीचा देश असून याठिकाणी पायाभूत सुविधा अगदी तोकड्या आणि विकास अगदी मर्यादीत आहे. चारही बाजुंनी जमीनीनं वेढलेला देश आहे.
"पण सोव्हिएत संघ, ब्रिटन, अमेरिका किंवा कोणत्याही साम्राज्यानं अफगाणिस्तानबाबत लवचिक धोरण दाखवलं नाही. सर्वांना त्यांच्या पद्धतीनं पुढं जायचं होतं. त्यांनी तसं करावंही लागलं, पण अफगाणिस्तानमध्ये असलेली गुंतागुंत त्यांच्या लक्षातच आली नाही," असं इस्बी म्हणतात.
अफगाणिस्तानवर विजय मिळवणं अशक्य आहे, असं नेहमी म्हटलं जातो. पण हे वक्तव्य पूर्णपणे चूक आहे. कारण इराणी, मंगोल आणि सिकंदर यांनी अफगाणिस्तानवर विजय मिळवला होता.

फोटो स्रोत, Getty Images
पण या धाडसाची किंमत मोजावी लागते, हे मात्र ठरलेलं आहे. त्यात यापूर्वी काबूलवर हल्ला करणाऱ्या तीन साम्राज्यांचे प्रयत्न पूर्णपणे फसले आहेत.
ब्रिटनचे साम्रज्य आणि तीन आक्रमणं
19व्या शतकात बहुतांश काळ अफगाणिस्तान हे ब्रिटन आणि रशियाच्या साम्राज्यांमध्ये मध्य आशियावर ताबा मिळवण्याच्या प्रयत्नातील एक महत्त्वाचा भाग होता.
ब्रिटन आणि रशिया यांच्यात अनेक दशकं राजकीय आणि द्विपक्षीय संघर्ष चालला. त्यात अखेर ब्रिटनचा विजय झाला. पण ब्रिटनला त्याची मोठी किंमत चुकवावी लागली.
ब्रिटननं 1839 ते 1919 दरम्यान तीन वेळा अफगाणिस्तावर हल्ला आणि त्या तिन्ही वेळा ब्रिटनला अपयश आलं असं म्हणता येईल.
आधी अँग्लो-अफगाण युद्धानं ब्रिटननं 1839 मध्ये काबूलवर ताबा मिळवला. कारण त्यांनी हे पाऊल उचललं नाही तर रशिया काबूलवर ताबा मिळवेल असं ब्रिटनला वाटत होतं.
पण त्यात ब्रिटनला ऐतिहासिक पराभवाचा सामना करावा लागला. काही जमातींनी अत्यंत साध्या शस्त्रांच्या सहाय्यानं जगातील सर्वात शक्तीशाली देशाच्या लष्कराला पराभूत केलं.
मोठा पराभव
तीन वर्षांच्या आक्रमणानंतर अफगाणिस्ताननं अखेर हल्लेखोर लष्कराला पळून जाण्यास भाग पाडलं.
6 जानेवारी 1842 ला ब्रिटिश कॅम्पमधून जलालाबादकडं निघालेल्या 16 हजार सैनिकांपैकी ब्रिटनचा केवळ एक नागरिक जिवंत परतला होता.
"या युद्धानं उपखंडात ब्रिटिशांची शक्ती कमी झाली. तसंच ब्रिटिश अजेय असल्याचा समजही त्यामुळं दूर झाला," असं इस्बी म्हणतात.

फोटो स्रोत, Getty Images
त्याच्या चार दशकांनंतर ब्रिटननं पुन्हा एकदा प्रयत्न केला. यावेळी त्यांना काहीसं यश मिळालं.
1878 ते 1880 दरम्यान झालेल्या दुसऱ्या अँग्लो-अफगाण युद्धात अफगाणिस्तान ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली आलं. पण ब्रिटनला काबूलमध्ये निवासी मंत्री ठेवण्याच्या धोरणाचा त्याग करावा लागला.
त्याऐवजी ब्रिटिश साम्राज्यानं एका नवीन अमीर (प्रमुख) निवडला आणि त्यांना तैनात करून लष्कराला परत बोलावून घेतलं.
पण 1919 मध्ये या नवीन अमीरनं अफगाणिस्तान ब्रिटिशांकडून स्वतंत्र झाल्याचं जाहीर केलं आणि तिसरं अँग्लो-अफगाण युद्ध सुरू झालं.
एकिकडं बोल्शेविक क्रांतीनं रशियाचा धोका कमी केला आणि पहिल्या महायुद्धामुळं ब्रिटिश लष्कराचा खर्च प्रचंड वाढल्याचा हा काळ होता. त्यामुळं ब्रिटिशांचा अफगाणिस्तानातील रस कमी होत गेला.

फोटो स्रोत, DEA PICTURE LIBRARY
त्यामुळंच अखेर चार महिने चाललेल्या युद्धानंतर ब्रिटननं अखेर अफगाणिस्तानला स्वतंत्र घोषित केलं.
ब्रिटनची प्रत्यक्षरित्या अफगाणिस्तानात उपस्थिती नव्हती. पण त्यांचा प्रभाव अनेक वर्ष राहिला असं म्हटलं जातं.
सोव्हिएत संघाचं युद्ध
1920 च्या दरम्यान अमीर अमानुल्लाह खान यांनी देशात सुधारणांसाठी प्रयत्न केला. त्यात बुरखा प्रथा बंद करण्याचा समावेश होता. पण या सुधारणांमुळं काही जमाती आणि धार्मिक नेत्यांची नाराजी झाली आणि त्यातून गृहयुद्धाला सुरुवात झाली.
या संघर्षामुळं अनेक दशकं अफगाणिस्तानात तणावाची स्थिती होती. त्यानंतर 1979 मध्ये सोव्हिएत संघानं अफगाणिस्तानवर आक्रमण केलं. पूर्णपणे विखुरलेल्या डाव्या सरकारवर नियंत्रण ठेवण्यासाठी त्यांनी हल्ला केला.
पण अनेक मुजाहिदीन संघटनांनी (मुस्लीम योद्धे) सोव्हिएत संघाचा विरोध करत त्यांच्या विरोधात युद्ध पुकारलं. या युद्धात मुजाहिदीन संघटनांनी अमेरिका, पाकिस्तान, चीन, ईराण आणि सौदी अरबकडून पैसे आणि शस्त्रं घेतली.

फोटो स्रोत, Getty Images
रशियानं या भागातील गावं आणि पिकं नष्ट करण्यासाठी जमिनीवरून आणि हवाई हल्ले केले. कारण त्यांच्या मते हाच सर्वात मोठा अडथळा होता. त्यामुळं स्थानिकासमोर घरं सोडणं किंवा मरणं हेच पर्याय होते.
या हल्ल्यात प्रचंड मानवी हानी झाली. जवळपास 15 लाख लोक या युद्धात मारले गेले आणि 50 लाख निर्वासित बनले.
सोव्हिएत संघाच्या लष्कराला मोठ्या शहरांमध्ये किंवा मोठ्या गावांमध्ये ताबा मिळवण्यात यशं आलं होतं. पण ग्रामीण भागांमध्ये मुजाहिदीन बिनधास्तपणे फिरायचे.
सोव्हिएत संघाच्या लष्करानं अनेक प्रकारे कट्टरतावाद संपवण्याचा प्रयत्न केला. पण मुजाहिदीन संघटनांचे योद्धे बहुतांश वेळा या हल्ल्यांमधून बचावले जायचे.
या युद्धात देश पूर्णपणे उध्वस्त झाला
त्याचवेळी तत्कालीन सोव्हिएत नेते मिखाइल गोर्बाचेव्ह यांना रशियाची अर्थव्यवस्था बदलण्याचा प्रयत्न करताना गृहयुद्ध सुरू ठेवणं शक्य नसल्याची जाणीव झाली. त्यांनी 1988 मध्ये सैनिकांना परत बोलावण्याचा निर्णय घेतला.
पण त्यामुळं सोव्हिएत संघाची प्रतिमा कधीही सुधारू शकली नाही. सोव्हिएत संघासाठी अफगाणिस्तान 'व्हिएतनामचं युद्ध' ठरलं. ही अत्यंत खर्चिक आणि लज्जास्पद लढाई होती आणि त्यात सोव्हिएत संघाचा सथानिक योद्ध्यांनी पराभव केला होता.

फोटो स्रोत, Getty Images
"सोव्हिएत संघानं अफगाणिस्तानात सत्तेचा दावा केला. पण त्याचवेळी सोव्हिएत यंत्रणेत त्यांचं सरकार आणि लष्कर यांच्यात अंतर्गत विरोध समोर आला होता," असं इस्बी सांगतात.
"सोव्हिएत संघाच्या सर्वात मोठ्या चुकांपैकी ही एक होती." त्यानंतर सोव्हिएत संघाचं विघटन झालं.
अमेरिकेची मोहीम आणि विनाशकारी माघार
अफगाणिस्तानात ब्रिटन आणि सोव्हिएत संघाच्या अपयशी प्रयत्नांनंतर अमेरिकेनं 9/11 हल्ल्यानंतर अफगाणिस्तानात लोकशाहीला पाठिंबा आणि अल कायदाला संपलण्यासाठी अफगाणिस्तानवर हल्ला केला.
आधीच्या दोन साम्राज्यांप्रमाणेच अमेरिकेलाही लवकरच काबूलवर विजय मिळवण्यात आणि तालिबानला शरण यायला भाग पाडण्यात यश मिळालं.
तीन वर्षांनी अफगाणिस्तानात सरकार सत्तेत आलं. पण तरीही तालिबानचे हल्ले सुरुच होते. माजी राष्ट्रपती बराक ओबामांनी 2009 मध्ये सैन्याच्या संख्येत वाढ केली होती. त्यामुळं तालिबान मागं हटलं. पण तशी स्थिती फार दिवस राहिली नाही.
2001 मध्ये युद्धाची सुरुवात झाल्यानंतर 2014 मध्ये सर्वाधिक रक्तपात पाहायला मिळाला. नाटोच्या लष्करांनी मोहीम संपवली आणि अफगाणी सैन्यावर जबाबदारी सोपवली.
त्यामुळं तालिबाननं अधिक भागांवर ताबा मिळवला. त्याच्या दुसऱ्या वर्षापासून सलग आत्मघातकी बॉम्ब हल्ले झाले. त्यात काबूलमधील संसद आणि विमानतळाच्या जवळ झालेल्या हल्ल्यांचा समावेश आहे.
इस्बी यांच्यामते, अमेरिकेच्या हल्ल्यात अनेक बाबी या चुकीच्या पद्धतीनं करण्यात आल्या.
लष्कर आणि दुतावासांच्या माध्यमातूनही अनेक प्रयत्न करण्यात आले. पण अमेरिका आणि आंतराष्ट्रीय समुदायही पाकिस्ताला छुपं युद्ध छेडण्यापासून रोखू शकलं नाही. ही अनेक समस्यांपैकी एक समस्या होती.
"इतर शस्त्रांच्या तुलनेत हे अधिक यशस्वी ठरलं."
अधिक खर्चिक युद्ध
सोव्हिएत संघाच्या युद्धात जास्त रक्तपात झाला पण अमेरिकेनं केलेलं आक्रमण हे अधिक खर्चिक ठरलं.
सोव्हिएत संघानं अफगाणिस्तानात दरवर्षी जवळपास 2 अब्ज अमेरिकन डॉलर खर्च केले. तर अमेरिकेला 2010 ते 2012 दरम्यान झालेल्या युद्धासाठी दरवर्षी जवळपास 100 अब्द अमेरिकन डॉलर खर्च झाला.
पण काबूलच्या पतनाची तुलना दक्षिण व्हिएतनामच्या घटनांशी करण्यात आली.
रिपब्लिकन पार्टीच्या काँग्रेसच्या सदस्य स्टेफनिक यांनी ट्वीट केलं. त्यात त्यांनी "हे बायडन यांचं साइगॉन आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर विचार करता, हे विनाशकारी अपयश कधीही विसरता येणार नाही," असं त्यांनी म्हटलं.
अमेरिकेचे सैनिक माघारी परतल्यानंतर तालिबाननं मिळवलेल्या ताब्यामुळं अफगाणिस्तानात एक मानवी संकट निर्माण झालं आहे. त्यामुळं हजारो लाखो लोक बेघर झाले आहेत.
"आता दरम्यानच्या काळात तालिबान सरकारला आंतरराष्ट्रीय समुदायाची मंजुरी मिळणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मला मात्र याबाबत शंका आहे," असं इस्बी म्हणाले.
जागतिक समुदायासाठी तालिबानचा सामना करणं अशक्य ठरलं तर इतर एखाद्या शक्तीकडून जगात 'साम्राज्यांचं कब्रस्तान' अशी ओळख असलेल्या अफगाणिस्तानवर आक्रमणाचा धोका पत्करला जाणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








