तालिबान काय आहे? अफगाणिस्तानमध्ये त्यांचा उदय असा झाला

फोटो स्रोत, Getty Images
अफगाणिस्तानात सत्तेवर असलेल्या तालिबान संघटनेला 2001 मध्ये अमेरिकेने बाहेरचा रस्ता दाखवला होता. पण अफगाणिस्तानातलं सरकार उलथवून टाकत काबूलचा ताबा तालिबानने स्वतःकडे घेतल्याला 100 दिवस पूर्ण झाले आहे. काय आहे ही संघटना?
ऑगस्ट 2021मध्ये तालिबानने काबूलसह अफगाणिस्तानातल्या महत्त्वाच्या शहरांवर ताबा मिळवला.
अमेरिका आणि नाटोमधील तिची मित्रराष्ट्रं यांनी गेल्या 20 वर्षांमधील बराच काळ अफगाणी सुरक्षा दलांच्या प्रशिक्षणावर आणि त्यांना शस्त्रसज्ज करण्यावर खर्च केला होता पण ज्या वेगानं तालिबानने महत्त्वाची शहरं ताब्यात घेतली त्याने सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला.
तालिबान संघटना नेमकी आहे काय? तिचा उदय कधी झाला? हे जाणून घेऊया...
तालिबानची सुरुवात कधी झाली?
पश्तो भाषेत विद्यार्थ्यांना तालिबान म्हणून संबोधलं जातं.
90 च्या दशकात सोव्हिएत संघ आपले सैनिक अफगाणिस्तानातून परत बोलवत होतं, त्याच दरम्यान देशात तालिबान संघटना उदयाला आली.

फोटो स्रोत, Getty Images
पश्तो आंदोलन सुरुवातीला धार्मिक मदरशांमधून सुरू झालं. या माध्यमातून कट्टर सुन्नी इस्लामचा प्रसार-प्रचार केला जायचा. त्यासाठी सौदी अरेबियाने आर्थिक पुरवठा केला.
याच दरम्यान दक्षिण-पश्चिम अफगाणिस्तानात तालिबानचा प्रभाव वेगाने वाढला. सप्टेंबर 1995 मध्ये त्यांनी इराणशी लागून असलेल्या हेरात प्रांतावर ताबा मिळवला. त्यानंतर एका वर्षाने तालिबानने अफगाणीस्तानची राजधानी काबुल शहरावरही नियंत्रण मिळवलं.
संपूर्ण अफगाणिस्तानवर तालिबानचा कब्जा
त्यावेळी अफगाणिस्तानाची सत्ता बुरहानुद्दीन रब्बानी यांच्या हाती होती. ते त्यावेळी सोव्हिएत सैनिकांचा विरोध करणाऱ्या अफगाण मुजाहिदीन संघटनेच्या संस्थापक सदस्यांपैकी एक होते.
तालिबानने सर्वप्रथम रब्बानी यांना सत्तेवरून हटवलं.
1998 येता-येता सुमारे 90 टक्के अफगाणिस्तानवर तालिबानने ताबा मिळवला.

फोटो स्रोत, Getty Images
सोव्हिएत संघाचे सैनिक परतल्यानंतर अफगाणिस्तानातील सर्वसामान्य नागरीक मुजाहिदीन सत्ताधाऱ्यांचे अत्याचार आणि अंतर्गत कलहाला कंटाळले होते. त्यामुळे सर्वसामान्यांनी सुरुवातीला तालिबानचं स्वागत केलं.
भ्रष्टाचारावर अंकुश, अराजकतेच्या परिस्थितीत सुधारणा, रस्तेबांधणी तसंच विशिष्ट पद्धतीची प्रशासन यंत्रणा उभारणं, लोकांना सुविधा पुरवणं यांसारख्या कामांमुळे सुरुवातीच्या काळात तालिबान संघटना लोकप्रिय झाली.
याच दरम्यान तालिबानने शिक्षा देण्यासाठी इस्लामिक पद्धतीचे कायदे देशात लागू केले.
यामध्ये हत्या आणि अत्याचाराचे आरोप असलेल्या दोषींना सार्वजनिकरित्या फासावर लटकवणे, चोरीच्या प्रकरणातील दोषींचे अवयव कापणे, अशा प्रकारच्या शिक्षांचा समावेश होता.
पुरुषांनी दाढी वाढवणं आणि महिलांनी संपूर्ण शरीर झाकणाऱ्या बुरख्याचा वापर करणं अनिवार्य करण्यात आलं.
तालिबानने टिव्ही, संगीत आणि सिनेमा यांच्यावर बंदी घातली. 10 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या मुलींनी शाळेत जाण्यावर बंदी घालण्यात आली.
तालिबान सरकारला मान्यता देणारे देश
त्यानंतर तालिबानवर मानवाधिकाराचं उल्लंघन आणि सांस्कृतिक गैरवर्तणुकीशी संबंधित अनेक आरोप होऊ लागले.
याचंच एक उदाहरण म्हणजे 2001 मध्ये पाहायला मिळालं.

फोटो स्रोत, Sumit/bbc
त्यावेळी तालिबानने आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठा विरोध होऊनसुद्धा अफगाणिस्तानातील बामियान येथील भगवान बुद्ध यांची प्रतिमा नष्ट केली.
तालिबानची स्थापना आणि त्याला बळकटी देण्याचे आरोप पाकिस्तानने नेहमीच फेटाळून लावले आहेत. पण सुरुवातीच्या काळात तालिबानी आंदोलनाशी संबंधित लोक पाकिस्तानातील मदरशांमधूनच निघाले होते, यात काहीही शंका नाही.
अफगाणीस्तानवर तालिबानचं नियंत्रण होतं, त्यावेळी त्यांना मान्यता देणाऱ्या तीन देशांमध्ये पाकिस्तानचा समावेश होता.
पाकिस्तानशिवाय सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरात यांनीही तालिबानला मान्यता दिली होती.
मलाला युसूफजईवर हल्ला
तालिबानसोबतचे आपले राजकीय संबंध तोडणाऱ्या देशांमध्ये पाकिस्तान सर्वात शेवटचा देश होता.
एक वेळ अशी आली की तालिबानने आपल्या नियंत्रणाखाली असलेल्या वायव्य भागातील क्षेत्रातून पाकिस्तान अस्थिर करण्याची धमकीही दिली होती.

फोटो स्रोत, Getty Images
याच दरम्यान तालिबानी कट्टरवाद्यांनी ऑक्टोबर 2012 मध्ये मिंगोरानगरमध्ये आपल्या शाळेतून परतत असलेल्या मलाला युसूफजई हिच्यावर गोळीबार केला.
तालिबानी प्रशासनाच्या अत्याचाराविरुद्ध आक्रमक लिखाण करणाऱ्या मलालावर तालिबानी नेते नाराज होते, असं म्हटलं जातं.
या गोळीबारात मलाला गंभीर जखमी झाली. पुढे केवळ पाकिस्तानच नव्हे तर जगभरातून या घटनेचा तीव्र निषेध झाला.
या घटनेच्या दोन महिन्यांनंतर तालिबानी कट्टरवाद्यांनी पेशावरच्या एका शाळेवरही हल्ला केला. त्यानंतर पाकिस्तानमधील तालिबानचा प्रभाव कमी होत गेला.
2013 मध्ये अमेरिकेने पाकिस्तानातील तालिबानच्या अड्ड्यावर ड्रोन हल्ला केला होता. या हल्ल्यात पाकिस्तानात तालिबानचं नेतृत्व करत असलेल्या हकीमुल्ला मेहसूदसह तीन प्रमुख नेते ठार झाले.
अल कायदाचा अड्डा
11 सप्टेंबर 2001 रोजी न्यूयॉर्क वर्ल्ड ट्रेड सेंटरवर कट्टरवाद्यांकडून हल्ला करण्यात आला होता. त्यानंतर संपूर्ण जगाचं लक्ष तालिबानकडे वेधलं गेलं.
हल्ल्याचा मुख्य आरोपी ओसामा बिन लादेन आणि अल कायदाच्या हल्लेखोरांना शरण दिल्याचा आरोप तालिबानवर लावला गेला.

फोटो स्रोत, Getty Images
7 ऑक्टोबर 2001 रोजी अमेरिकेच्या नेतृत्वाखालील संयुक्त सैन्याने अफगाणिस्तानवर हल्ला केला. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात तेथील तालिबानचं शासन संपुष्टात आलं.
पण जगातील सर्वात मोठ्या शोधमोहिमेदरम्यान ओसामा बिन लादेन आणि तालिबान प्रमुख राहिलेला मुल्ला मोहम्मद उमर तसंच इतर सहकारी अफगाणीस्तानातून पळून जाण्यात यशस्वी ठरले.
तालिबान संघटनेतील अनेक नेत्यांनी पाकिस्तानच्या क्वेट्टा शहरात आश्रय घेतला. तिथूनच ते आपला कारभार चालवू लागले.
मात्र, पाकिस्तान सरकारने क्वेटामधील तालिबानचं अस्तित्व कधीच मान्य केलं नाही.
असुरक्षितता आणि हिंसाचार
अफगाणिस्तानात मोठ्या संख्येने परदेशी सैन्य असूनसुद्धा तालिबानने हळू-हळू स्वतःला मजबूत बनवलं. संपूर्ण देशभरात त्यांनी आपला प्रभाव वाढवला.
त्यानंतर देशात असुरक्षितता, हिंसाचार आणि भयाचं वातावरण निर्माण होऊ लागलं होतं.
सप्टेंबर 2012 मध्ये तालिबानी हल्लेखोरांनी काबुलमध्ये अनेक ठिकाणी हल्ले केले. नाटोच्या तळावरही त्यांनी हल्ला केला.
2013 मध्ये तालिबानने कतारमध्येआपलं कार्यालय उघडण्याची घोषणा केली तेव्हा शांतीची उमेद पुन्हा जागी झाली होती. पण त्याचवेळी तालिबान आणि अमेरिकन सैन्याला एकमेकांवर काहीच विश्वास नव्हता, हे नाकारून चालणार नाही. याच कारणामुळे हिंसाचारही थांबला नाही.
तालिबानने मुल्ला उमरचा मृत्यू झाल्याची माहिती दोन वर्षांपेक्षा जास्त काळ लपवून ठेवली होती.
अखेर, ऑगस्ट 2015 मध्ये त्यांनी असं केल्याचं स्वीकारलं.
मुल्ला उमरचा मृत्यू कथितरित्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे पाकिस्तानमधील एका रुग्णालयात झाला होता.
याच महिन्यात तालिबानने मुल्ला मन्सूर याला आपला नवा नेता म्हणून निवडलं.
अमेरिका आणि तालिबानमधील करार
यादरम्यान, तालिबानने 2001च्या पराभवानंतर पहिल्यांदाच एखाद्या प्रांताच्या राजधानीवर नियंत्रण मिळवलं. सामरिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या कुंडूज शहरावर तालिबानने पुन्हा ताबा मिळवला.
पुढे मे 2016 मध्ये अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात मुल्ला मन्सूर ठार झाला. त्यानंतर संघटनेची कमान त्याचाच सहकारी राहिलेल्या मौलवी हिब्तुल्लाह अखुंजादा याच्याकडे सोपवण्यात आली. सध्या त्याच्याकडेच तालिबानचं प्रमुखपद आहे.
फेब्रुवारी 2020 मध्ये अमेरिका आणि तालिबान यांच्यात शांतता करार झाला. अनेक टप्प्यात चर्चा होऊन अखेरीस हा करार झाला होता.
सुरुवातीच्या काळात शहरं आणि लष्करी तळांवर हल्ले करणाऱ्या तालिबानने यानंतर विशिष्ट प्रकारच्या लोकांवर निशाणा साधण्यास सुरुवात केली.
या हल्ल्यांमुळे अफगाणिस्तानची जनता पुन्हा एकदा भयभित झाली.
अफगाणिस्तान सरकारला तालिबानकडून धोका
या हल्ल्यात तालिबानने पत्रकार, न्यायाधीश, शांतता कार्यकर्ते आणि मोठ्या पदावरील महिलांना निशाणा बनवलं.
म्हणजेच तालिबानने आपली कार्यपद्धती बदलली, पण कट्टरवादी विचारसरणी सोडली नाही, हे दिसून येतं.
अफगाणीस्तानातील सत्ताधाऱ्यांनी याबाबत गंभीर चिंता व्यक्त केली आहे. आंतरराष्ट्रीय मदतीविना अफगाणिस्तान सरकारसमोर अस्तित्वाचा प्रश्न उभा राहील, असं त्यांचं म्हणणं आहे.
पण अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी एप्रिल 2021 मध्ये सैन्य परत बोलावण्याची घोषणा केली. त्यानुसार, 11 सप्टेंबरपर्यंत सर्व अमेरिकन सैन्य अफगाणिस्तानातून परत बोलवलं.
दोन दशक चाललेल्या या युद्धात तालिबानने अमेरिकन महासत्तेला त्रस्त केलं. त्यानंतर आता एका मोठ्या क्षेत्रावर पुन्हा नियंत्रण मिळवण्याच्या दिशेने त्यांचा प्रवास सुरू झाला. आणि ऑगस्ट 2021ला त्यांना काबूलवर ताबा मिळवला.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








