अफगाणिस्तानात अमेरिका-ब्रिटनच्या सैन्यानं 20 वर्षं राहून काय साध्यं केलं?

अफगाणिस्तान

फोटो स्रोत, Reuters

    • Author, फ्रँक गार्डनर
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

वीस वर्षे अफगाणिस्तानात राहिल्यानंतर अमेरिका आणि ब्रिटनच्या सैन्यानं अफगाणिस्तान सोडलं आहे. अफगाणिस्तानात असलेले उर्वरीत 2500-3500 अमेरिकन सैनिक 11 सप्टेंबरपर्यंत परत येतील, अशी घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी केली आहे. ब्रिटननेही त्यांच्या उर्वरीत 750 सैनिकांना मायदेशी परत बोलावलं आहे.

ही तारीख महत्त्वपूर्ण आहे. अल-कायदा संघटनेनं अमेरिकेवरील 9/11 च्या हल्ल्याला अफगाणिस्तानच्या धरतीवरून पूर्णत्वास नेलं होतं. त्यानंतर अत्यंत नियोजनबद्धपणे अफगाणिस्तानातून तालिबानला सत्तेतून हटवण्यात आलं आणि अल-कायदाला बाहेर काढण्यात आलं.

वीस वर्षांपर्यंत अमेरिकेच्या सैन्याला मोठी किंमत यासाठी मोजावी लागली. पैसे आणि आयुष्य अशा दोन्ही स्वरूपात. अमेरिकेच्या सैन्यातील 2300 हून अधिक पुरुष आणि महिला सैनिकांना आपला जीव गमवावा लागला, तसंच 20 हजारांहून अधिक सैनिक जखमी झाले. त्याशिवाय, ब्रिटनच्या 450 सैनिकांसह इतर देशांचे शेकडो सैनिकही मृत्युमुखी पडले, जखमी झाले.

मात्र, सर्वात जास्त नुकसान अफगाणी सैनिकांचंच झाला. त्यांचे 60 हजारांहून अधिक सुरक्षारक्षक यादरम्यान मृत्युमुखी पडले आणि या संख्येच्या दुप्पट नागरिकांचा जीव गेला.

अमेरिकेच्या करदात्यांच्या डोक्यावर या सगळ्यामुळे 1 ट्रिलियन डॉलर इतकं ओझं वाढलं.

चांगलं की वाईट - नेमकं काय आणि कसं ठरवायचं?

आता प्रश्न असा उपस्थित होतो की, हे सर्व योग्य नि आवश्यक होतं? याचं उत्तर यावर अवलंबून आहे की, तुम्ही या सगळ्या गोष्टींचे अर्थ कसे काढता आणि तुलना कशी करता.

काही क्षणांसाठी आपण थोडं मागे जाऊ आणि पाश्चिमात्य जगतातील या फौजा तिथं का गेल्या आणि काय मिळवू पाहत होत्या?

मैराब इथं अमेरिकन दुतावासावर झालेला हल्ला

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन, मैराब इथं अमेरिकन दुतावासावर झालेला हल्ला

1996 ते 2001 या पाच वर्षात ओसामा बिन लादेन याच्या नेतृत्त्वात कट्टरतावादी अल-कायदा संघटनेनं अफगाणिस्तानात पाय रोवलं होतं. कट्टरतावादाचं प्रशिक्षण देणारी शिबिरं उघडली होती. कुत्र्यांवर विषप्रयोग करण्यासारख्या गोष्टी तिथं केल्या जात असत.

त्यानंतर जगभरातील जवळपास 20 हजार जिहादींची भरती केली गेली आणि त्यांना प्रशिक्षण दिलं गेलं. त्यांनी 1998 साली केनिया आणि तंजानियामधील अमेरिकेच्या दूतावासांवर हल्ला केला. या हल्ल्यात 224 लोकांचा जीव गेला. या हल्ल्यात अधिकाधिक आफ्रिकन नागरिक बळी ठरले होते.

अल-कायदा अफगाणिस्तानात सहज काम करू शकत होता. कारण त्यावेळी तालिबानी सरकार त्यांना संरक्षण देत होतं. सेव्हिएत रेड आर्मी परतल्यानंतर, तसंच गृहयुद्धाच्या नंतरच्या वर्षात तालिबाननं 1996 साली पूर्ण देशावर नियंत्रण मिळवलं होतं.

अमेरिकेनं सौदी मित्रांच्या माध्यमातून अल-कायदाला बाहेर काढण्यासाठी तालिबानला समजावण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, सौदी मित्रानंही त्यास नकार दिला.

तालिबानला सत्तेतून हटवलं

सप्टेंबर 2001 मध्ये 9/11 च्या हल्ल्यानंतर आंतरराष्ट्रीय समूहाने तालिबानला हल्ल्यास जबाबदार लोकांना सोपवण्यास सांगतिलं होतं. मात्र, तालिबानने यास नकार दिला.

त्यानंतर पुढच्याच महिन्यात अफगाणिस्तानातील तालिबान-विरोधी गट, ज्याला 'नॉर्थ अलायन्स' सुद्धा म्हटलं जातं, अमेरिका आणि ब्रिटनच्या मदतीनं काबुलच्या दिशेनं चालू लागलं.

अमेरिका आणि ब्रिटनच्या सैन्यानं तालिबानला सत्तेतून हटवून, पाकिस्तानच्या सीमेवर जाण्यास अनिवार्य केलं.

याच आठवड्यात संरक्षण क्षेत्रातील सूत्रांनी बीबीसीला दिलेल्या माहितीनुसार, त्यावेळीपासून अफगाणिस्तानच्या धरतीवर एकही यशस्वी आंतरराष्ट्रीय कट्टरतावादी हल्ला झाला नाही.

दोन दशकांनंतरही अशांतता

मात्र, निश्चितपणे याचं एका बाजूनं मोजमाप करणं योग्य होणार नाही. किंबहुना, अफगाणिस्तानचे सैन्य आणि तेथील सर्वसामान्य जनता, ज्यांनी या काळात आपला जीव गमावला, त्यांना दुर्लक्षित केल्यासारखं होईल.

20 वर्षांनंतरही अफगाणिस्तानात शांतता नाही.

अॅक्शन ऑन आर्म्ड फोर्सेस व्हॉयलन्स या संशोधन गटानुसार, 2020 साली जगातील कोणत्याही देशाच्या तुलनेत स्फोटकांमध्ये मारले गेलेले सर्वाधिक लोक अफगाणिस्तानातील आहेत होते.

अल-कायदा, इस्लामिक स्टेट (आयसिस) आणि इतर कट्टरतावादी संघटना संपल्या नाहीत, पाश्चिमात्या सैन्याच्या परतण्याच्या वृत्तांमुळे त्या उत्साहित झाल्यात आणि पुन्हा संघटित होण्याचे प्रयत्न करू लागल्यात.

दोहामध्ये शांती वार्ता

मी 2003 मध्ये अमेरिकन सैन्याच्या 10 माऊंटन डिव्हिजनसोबत पक्तिका प्रांतातल्या एका फायबर बेसवर 'एंबेडेड' पत्रकार म्हणून उपस्थित होतो. मला आठवतंय, बीबीसीचे वरिष्ठ सहकारी फिल गुडविनच्या मनात शंका होती की, अलायन्सचं सैन्य काय मागे ठेवून जाईल.

ते म्हणाले होते, "20 वर्षांदरम्यान दक्षिणेतील अधिक भागात तालिबान पुन्हा परतेल."

अफगाणिस्तान

फोटो स्रोत, Reuters

आजच्या घडीला दोहातील शांती वार्ता आणि सैन्यांच्या परतण्यानंतर ते पूर्ण देशात निर्णायक भूमिका निभावण्यासाठी तयार आहेत.

असं असूनही ब्रिटनचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल सर निक निक्टर म्हणतात की, आंतरराष्ट्रीय समूहाने एका सभ्य समाजाची निर्मिती केलीय.

त्यांच्या म्हणण्यानुसार, "अफगाणिस्तान 2001 च्या तुलनेत चांगल्या स्थितीत आहे आणि तालिबान अधिक मुक्त विचारांचे झाले आहे."

भविष्य कसं असेल?

एशिया पॅसिफिक फाऊंडेशनचे डॉ. सज्जन गोहेल यांचं वेगळं मत आहे. ते म्हणतात, "सर्वात मोठा काळजीचा विषय आहे म्हणजे अफगाणिस्तानात 1990 च्या दशकातील स्थिती पुन्हा निर्माण होऊ शकते. तेव्हा कट्टरतावाद अगदी शिखरावर पोहोचला होता."

डॉ. गोहेल म्हणतात, "पाश्चिमात्य देशांमधून कट्टरतावाद्यांच्या प्रशिक्षणासाठी येणाऱ्यांची एक नवी लाट येईल. मात्र, पाश्चिमात्य देश याच्या लढण्यासाठी असमर्थ असतील. कारण अफगाणिस्तानला त्यांनीच आधीच सोडलं असेल."

असंही होऊ शकतं की, त्यांना रोखणं कठीण होऊन बसेल. हे दोन गोष्टींवर अवलंबून आहे : पहिली म्हणजे, तालिबान आपल्या नियंत्रण क्षेत्रात अल-कायदा आणि आयसिस यांच्या कारवायांना परवानही देईल? आणि दुसरी गोष्ट म्हणजे, आंतरराष्ट्रीय समूह तेव्हा त्यांच्याशी लढण्यासाठी यशस्वी होईल का, जेव्हा तिथं त्यांची उपस्थितीतच नसेल?

9/11 नंतर

ज्या देशाला या पाश्चिमात्य देशांच्या फौजा सोडून जात आहेत, त्या देशाची स्थिती सध्या सुरक्षित नाही. या देशांच्या फौजा 2 दशकं तिथंच राहातील असं अनुमान काही लोकांनी 9/11च्या नंतर लगेचच वर्तवलं होतं.

मी रिपोर्टिंगच्या निमित्त अमेरिका, ब्रिटिश आणि अमिरातीच्या सैनिकांबरोबर अनेकवेळा अफगाणिस्तानला भेट दिली. या दौऱ्यांमधली एक भेट फारच विशेष आहे.

त्यावेळेस अमेरिकन सैन्य पाकिस्तानच्या सीमेपासून फक्त 3 मैल अंतरावर लढत होतं.

चांदणं पडलेल्या आकाशाखाली एका मातीच्या किल्ल्यामध्ये दारुगोळ्याच्या डब्यांवर आम्ही बसलो होतो. काही वेळाने तालिबानची रॉकेट्स तेथे येऊन आदळू शकतात अशी कल्पनाही नव्हती.

न्यूयॉर्कमधून आलेल्या एका 19 वर्षांच्या सैनिकानं आपल्या अनेक मित्रांना यामध्ये गमावल्याचं सांगितलं. तो म्हणाला, 'आता माझी वेळ आली असेल तर खरंच माझी वेळ आली असेल.'

तेवढ्यात त्यानं एक गिटार काढली आणि रेडिओहेड बँडचं क्रीप हे गाणं तो गाऊ लागला. 'हे मी काय करतोय, मी इथला आहे की नाही' अशा शब्दांवर ते गाणं संपलं.

'नाही, कदाचित आपण इथे अस्तित्वातच नाही' असा विचार माझ्या डोक्यात येऊन गेला.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)