तालिबानला अफगाणिस्तानात इतक्या वेगाने विजय कसा मिळत गेला?

तालिबान

फोटो स्रोत, EPA

    • Author, जोनाथन बीएल,
    • Role, संरक्षणविषयक प्रतिनिधी, बीबीसी न्यूज.

अफगाणिस्तानातील तालिबानच्या चढाईचा वेग अनेकांना आश्चर्यचकित करून गेल्याचं दिसतं. प्रादेशिक राजधान्या पत्त्यांच्या बंगल्यांसारख्या कोसळत आहेत.

घटनांचा वेग स्पष्टपणे तालिबानी बंडखोरांच्या बाजूने आहे, तर अफगाणी सरकार सत्तेवरील पकड टिकवण्यासाठी खटपट करतं आहे.

या आठवड्यात अमेरिकी गुप्तचर विभागाच्या एका फुटलेल्या अहवालात असा अंदाज वर्तवण्यात आला होता की, काही आठवड्यांमध्ये काबूलवर हल्ला होईल आणि सरकार 90 दिवसांमध्ये कोसळेल.

ताज्या घडामोडी

1) तालिबानने आतापर्यंत अफगाणिस्तानच्या उत्तरेकडील बहुतांश भागावर ताबा मिळवला आहे आणि काही प्रांतीय राजधान्यांवर ताबा मिळवला आहे.

2) तालिबान काबूलच्या दिशेने सरकत असून ते आता राजधानीपासून 25 मैलांवर आहेत.

3) चार अस्याब जिल्ह्यात ते फक्त सात मैल अंतरावर येऊन ठेपल्याचं स्थानिक अधिकाऱ्यांनी असोसिएट प्रेस या वृत्तसंस्थेला संगितलं.

4) मझार-ए-शरीफ हे शहर सरकारच्या ताब्यात आहे, तेथेही संघर्ष होत असल्याचं दिसत आहे.

5) अमेरिकेने आपल्या दुतावासातील लोकांची सूटका करण्यासाठी आपली दलं पाठवली आहेत. 600 ब्रिटिश सैनिकही अफगाणिस्तानच्या दिशेने निघाले आहेत.

मग प्रत्यक्षात घडामोडी त्याहून वेगाने कशा काय घडल्या?

अमेरिका आणि नाटोमधील तिची मित्रराष्ट्रं यांनी गेल्या 20 वर्षांमधील बराच काळ अफगाणी सुरक्षा दलांच्या प्रशिक्षणावर आणि त्यांना शस्त्रसज्ज करण्यावर खर्च केला.

असंख्य अमेरिकी व ब्रिटिश सेनाधिकाऱ्यांनी अधिक शक्तिशाली व सक्षम अफगाणी सैन्य उभारल्याचे दावे केले. पण त्यांनी दिलेली आश्वासनं पोकळ असल्याचं आज दिसून येतं आहे.

तालिबानचं सामर्थ्य

अफगाणी सरकारकडे अधिक मोठं सैन्य दिमतीला आहे, त्यामुळे तत्त्वतः त्यांचा अजूनही वरचष्मा राहायला हवा.

किमान कागदोपत्री तरी अफगाणी सुरक्षा दलांची संख्या तीन लाखांहून अधिक आहे. यामध्ये अफगाणी लष्कर, हवाई दल व पोलस यांचा समावेश होतो.

अफगाणिस्तान लष्कर

फोटो स्रोत, EPA

पण वास्तवात या देशाला सैन्यभरतीची उद्दिष्टं गाठण्यासाठी कायमच झगडावं लागलं आहे.

अफगाणी सैन्य व पोलीस दलांमध्ये मोठ्या प्रमाणात जीवितहानी झालेली आहे, अनेक जण नोकरी सोडून गेले आहेत आणि भ्रष्टाचाराचेही आरोप या दलांवर होत राहिले आहेत. अस्तित्वातच नसलेल्या काही जवानांचे पगार भ्रष्ट सेनाधिकारी घशात घालत असल्याचंही समोर आलं आहे.

अमेरिकी काँग्रेसच्या ताज्या अहवालामध्ये अफगाणिस्तानसाठीच्या विशेष महानिरीक्षकांनी 'अफगाणी दलांच्या प्रत्यक्ष सामर्थ्यावर भ्रष्टाचाराचा व संशयास्पद डेटाचा विध्वंसक परिणाम झाल्याबद्दल तीव्र चिंता' व्यक्त केली.

प्रत्यक्षात आपल्या जवानांची संख्या किती आहे याची खात्रीशीर माहिती अफगाणी सैन्याकडेही नाही, असं रॉयल युनायटेड सर्व्हिस इन्स्टिट्यूटचे जॅक वॉटलिंग म्हणतात.

शिवाय, सामग्री व मनोबळ टिकवणं, हीसुद्धा एक समस्या राहिल्याचं ते सांगतात.

सैनिकांना अनेकदा अशा प्रदेशांमध्ये पाठवलं जातं जिथून त्यांचा त्यांच्या जमातीशी किंवा कुटुंबाशी कोणताही संपर्क उरत नाही. त्यामुळे काही जण फारशी लढाई न करताच आपला तळ सोडत असण्याची शक्यता आहे.

तालिबानच्या सामर्थ्याचं मोजमाप करणं याहून कठीण आहे.

वेस्ट पॉइन्टमधील यूएस कॉम्बाटिंग टेररिझम सेन्टरने नोंदवलेल्या अंदाजे आकडेवारीनुसार, तालिबानमध्ये प्रमुख 60 हजार योद्धे आहेत. शिवाय, इतर सशस्त्र बंडखोर गट व समर्थक यांना एकत्र करून ही संख्या दोन लाखांपेक्षा अधिक होते.

पण तालिबानकडे एक एकसंध गट म्हणून पाहणं धोक्याचं ठरेल, असा इशारा पश्तू भाषा येणारे माजी ब्रिटिश अधिकारी डॉ. माइक मार्टिन देतात. त्यांनी हेल्मंडमधील संघर्षाच्या इतिहासावर अॅन इन्टिमेट वॉर हे पुस्तक लिहिलं आहे.

ते म्हणतात, "तालिबान ही स्वतंत्र शाखा चालवणाऱ्यांची एक ढोबळ आघाडी आहे आणि या शाखा बहुदा तात्पुरत्या एकमेकांशी संलग्न आहेत."

अफगाण सरकारही स्थानिक गटातटाच्या प्रेरणांनी ग्रासलेलं आहे. कुटुंबं, जमाती व अगदी सरकारी अधिकारीही स्वतःचा जीव तगवण्यासाठी कशा रितीने बाजू बदलतात, याचा दाखला अफगाणिस्तानच्या चेहरामोहरा बदलणाऱ्या इतिहासावरून मिळतो.

शस्त्रांची उपलब्धता

वित्तपुरवठा व शस्त्रं याबाबतीतसुद्धा अफगाणिस्तान सरकारचा वरचष्मा राहायला हवा होता.

सैनिकांचे पगार व साधनसामग्री यांचा खर्च भागवायला अफगाणी सरकारला अब्जावधी डॉलर मिळले होते- विशेषतः अमेरिकेने हा खर्च केला होता. जुलै 2021 मधील अहवालात अफगाणिस्तानविषयी महानिरीक्षकांनी नमूद केल्यानुसार, अफगाणिस्तानच्या सुरक्षेवर 88 अब्ज डॉलरहून अधिक खर्च झालेला आहे.

अफगाणिस्तान

फोटो स्रोत, Reuters

महानिरीक्षक पुढे म्हणतात: "हा पैसा सुयोग्य रितीने खर्च झाला की नाही, याचं उत्तर प्रत्यक्ष जमिनीवरील लढाईच्या निष्पत्तीवरून मिळेल."

अफगाणिस्तानातील हवाई दलाने युद्धभूमीवर कळीची भूमिका निभावणं अपेक्षित होतं.

पण 211 विमानांचा ताफा टिकवण्यात हे दल सातत्याने अडळखळताना दिसलं (तालिबानने हेतूतः वैमानिकांना लक्ष्य केल्यामुळे ही समस्या आणखी गंभीर झाली आहे). प्रत्यक्ष लढणाऱ्या सेनाधिकाऱ्यांच्या मागण्याही त्यांना पूर्ण करताआलेल्या नाहीत.

त्यामुळे अलीकडे तालिबानने हल्ला केलेल्या लष्कर गाहसारख्या शहरांच्या बचावामध्ये अमेरिकी हवाई दलाने सहभाग घेतला. अशी मदत अमेरिका आणखी किती काळ देऊ इच्छिते, हे स्पष्ट नाही.

तालिबान ही संघटना बऱ्याच वेळा अंमली पदार्थांच्या व्यापारातून महसूल कमावत आली आहे, पण त्यांना बाहेरूनही- विशेषतः पाकिस्तानकडून- सहाय्य मिळतं.

अलीकडे तालिबानने अफगाणी सुरक्षा दलांकडून काही शस्त्रं व सामग्री काबीज केली. हमवीस, मशीन गन, मोर्टार व तोफखाना अशी यातील काही शस्त्रसामग्री अमेरिकेने पुरवलेली होती.

सोव्हिएत फौजांनी केलेल्या आक्रमणानंतर अफगाणिस्तानात शस्त्रांचा मुबलक वावर सुरू झाला होता आणि अतिशय प्रगत दलांनाही अगदी अपक्व शस्त्रांनी हरवता येतं, हे तालिबानने दाखवून दिलं आहे.

'इम्प्रोव्हाइज्ड एक्स्प्लोझिव्ह डिव्हाइस' (आयईडी) या स्फोटकांचा अमेरिकी व ब्रिटिश फौजांवर किती प्राणघातक परिणाम झाला होता, याचा विचार करा. त्याचसोबत स्थानिक भूप्रदेशाचं ज्ञान व आकलन तालिबान्यांच्या पथ्यावर पडलं.

उत्तर व पश्चिम भागांवर लक्ष केंद्रित केलं

तालिबानचं स्वरूप विखुरलेलं असलं, तरी त्यांच्या अलीकडच्या चढाईत सुनियोजित आराखडा असल्याचं काहींना वाटतं. ब्रिटिश सैन्यातील माजी ब्रिगेडिअर व इन्सिट्यूट ऑफ स्ट्रॅटेजिक स्टडीजमधील वरिष्ठ फेलो बेन बॅरी म्हणतात की, तालिबानला मिळालेलं यश संधिसाधू असेलही कदाचित, पण "मोहिमेची योजना आखायला सांगितली, तर त्यांच्या मोहिमेहून चांगली योजना आखणं मला तरी अवघड जाईल."

अफगाणिस्तान

तालिबान्यांनी उत्तर व पश्चिम भागांवर लक्ष केंद्रित केलं आहे, त्यांच्या दक्षिणेकडील बालेकिल्ल्यांवर नाही, त्यामुळे एका पाठोपाठ एक प्रादेशिक राजधान्या त्यांच्या हाती येत गेल्या, याकडे ते निर्देश करतात.

काही महत्त्वाच्या सीमावर्ती छावण्या तालिबानने काबीज केल्या, त्यामुळे आधीच रोकडीची चणचण भासणाऱ्या सरकारला जकातशुल्क मिळणं कमी होत गेलं.

तालिबानने महत्त्वाचे अधिकारी, मानवाधिकार कार्यकर्ते व पत्रकार यांच्या हत्या करण्याचं प्रमाणही वाढवलं आहे. गेल्या 20 वर्षांमध्ये मिळालेलं थोडथोडकं यशही ते उद्ध्वस्त करत आहेत.

अफगाणी सरकारच्या व्यूहरचनेचा अदमास बांधणं मात्र अधिकाधिक अवघड झालं आहे.

तालिबानने काबीज केलेला सर्व प्रदेश परत मिळवण्याची आश्वासनं आता पोकळ ठरू लागली आहेत.

मोठ्या शहरांवरील ताबा टिकवून ठेवण्याची योजना असल्याचं दिसतं. हेलमन्डमधील लष्कर गाह टिकवण्यासाठी अफगाणी कमांडो तैनात केले गेले आहेत, असं बॅरी सांगतात.

पण हे किती काळ सुरू राहील?

अफगाणी विशेष दलांची संख्या तुलनेने कमी आहे. या दलांकडे सुमारे 10 हजार जवान आहेत.

प्रचारामध्ये व कथनयुद्धामध्येही तालिबानने विजय मिळवल्याचं दिसतं आहे.

तालिबान

फोटो स्रोत, Getty Images

युद्धभूमीवरील गतीमुळे त्यांचं मनोबळ उंचावलं आहे आणि त्यांच्यात ऐक्यभावना निर्माण झाली आहे, असं बॅरी सांगतात.

याउलट, अफगाणी सरकार माघार घेतं आहे, सेनाधिकाऱ्यांशी क्षुल्लक कारणांवरून भांडतं आहे आणि त्यांना कामावरून काढूनही टाकलं जातं आहे.

शेवट काय होईल?

अफगाणी सरकारचं भवितव्य निश्चितपणे अंधारलेलं आहे.

पण रॉयल युनायटेड सर्व्हिस इन्स्टिट्यूटचे जॅक वॉटलिंग सांगतात की, अफगाणी सैन्याचं भवितव्य निराशाजनक वाटत असलं तरी, "राजकारणाद्वारे परिस्थिती सावरणं अजूनही शक्य आहे."

सरकारने जमातीय नेत्यांना आपल्या बाजूने आणण्यात यश मिळवलं तर अजूनही परिस्थिती आहे तिथे थोपवण्याची संधी हे, असं ते सांगतात.

माइक मार्टिन यांनीही असंच मत व्यक्त केलं. पूर्वी 'वॉरलॉर्ड' राहिलेले अब्दुल रशिद दोस्तम मझर-इ-शरीफला परतले, ही लक्षणीय घटना असल्याचं ते म्हणतात. दोस्तम यांनी वाटाघाटी सुरू केल्या आहेत.

अफगाणिस्तानमध्ये आता लवकरच हिवाळा सुरू होईल, त्यामुळे उन्हाळ्यातल्याप्रमाणे युद्धभूमीवरील डावपेच लढवणं अवघड होणार आहे.

वर्षअखेरीला परिस्थिती जैसे-थे ठेवण्यासाठीची तडजोड होण्याची शक्यता अजूनही आहे. अशा वेळी अफगाणी सरकार काबूलवर आणि काही मोठ्या शहरांवर ताबा टिकवून ठेवेल.

तालिबान मोडून पडल्यास ही लाट ओसरेण्याचीही शक्यता आहे.

पण अफगाणिस्तानात शांतता, सुरक्षितता व स्थैर्य आणण्याचे अमेरिकेचे व नाटो फौजांचे प्रयत्न सोव्हिएट संघाच्या प्रयत्नांप्रमाणेच निष्फळ ठरल्याचं सध्या तरी दिसतं आहे.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)