अफगाणिस्तान : काबुल विमानतळाच्या ताब्यासाठी तुर्कस्तान आणि तालिबान उभे ठाकणार एकमेकांसमोर

फोटो स्रोत, Getty Images
अफगाणिस्तानातून परदेशी सेना परत गेल्यानंतर तालिबान झपाट्याने पुढे सरकतंय. पण असं असूनही तुर्कस्तानला काबुल विमानतळाच्या सुरक्षेची जबाबदारी स्वतःकडे घेऊन विमानतळ चालवायचा आहे.
काबुल विमानतळ सुरू राहणं तुर्कस्तानच्या फायद्याचं असून येत्या काही दिवसांत याबाबतचा निर्णय घेण्यात येणार असल्याचं तुर्कस्तानचे संरक्षण मंत्री हुलुसी अकर यांनी सांगितलं.
काबुल विमानतळ चालवण्यासाठी तुर्कस्तान चर्चा करत असल्याचंही ते म्हणाले. पाकिस्तानातल्या इस्लामाबादमधल्या दूतावासात ते बोलत होते.
काबुल विमानतळ बंद झाल्यास अफगाणिस्तानात कोणतीही धोरणात्मक कारवाई करता येणार नसल्याने तो विमानतळ सुरू राहावा आपली इच्छा असल्याचं तुर्कस्तानच्या मंत्र्यांनी म्हटलंय.
अफगाणिस्तानातली परिस्थिती हाताबाहेर जात असूनही तुर्कस्तानला काबुल विमानतळ आपल्या ताब्यात ठेवायचं असल्याचं रॉयटर्स वृत्तसंस्थेने म्हटलंय.
नेटोच्या सेना परत गेल्यानंतर काबुल विमानतळावर आपले सैनिक तैनात करण्याचा प्रस्ताव अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्यासमोर तुर्कस्तानचे राष्ट्राध्यक्ष अर्दोआन यांनी ठेवला होता.
तुर्कस्तानच्या एका अधिकाऱ्याने रॉयटर्सशी बोलताना सांगितलं, "काबुल विमानतळ तुर्कस्तानच्या सुरक्षा यंत्रणांच्या ताब्यात घेण्याच्या प्रयत्नांमध्ये कोणताही बदल झालेला नाही. याबाबतची चर्चा सुरू आहे. अफगाणिस्तानातल्या सध्याच्या परिस्थितीवरही आमचं लक्ष आहे."

फोटो स्रोत, Getty Images
CNN तुर्कला दिलेल्या मुलाखतीमध्ये तुर्कस्तानचे राष्ट्राध्यक्ष अर्दोआन यांनी म्हटलं होतं, "अफगाणिस्तानातल्या वाढत्या हिंसाचाराबाबत तालिबानची भेट घेतली जाऊ शकते. आमच्या संबंधित यंत्रणा तालिबानसोबतच्या बैठकीबद्दल काम करत आहेत. मी देखील तालिबानच्या एखाद्या नेत्याला भेटू शकतो."
पण काबुल विमानतळावर सैन्य पाठवू नये अशी धमकी तालिबानने टर्कीला दिली आहे.
तुर्कस्तान आणि तालिबानला एकत्र आणण्याचा इमरान खान यांचा प्रयत्न
तालिबान आणि तुर्कस्तानमध्ये चर्चा घडवून आणण्याचा आपला प्रयत्न असल्याचं पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी म्हटलं होतं.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
ते म्हणाले, "तुर्कस्तान आणि तालिबानने समोरासमोर चर्चा केल्यास चांगलं होईल. काबुल विमानतळ सुरक्षित राहणं का महत्त्वाचं आहे याबद्दलच्या कारणांवर चर्चा केली जाऊ शकते.
तालिबानने तुर्कस्तानशी चर्चा करावी यासाठी आम्ही त्यांच्याशी बोलणी करत आहोत.
अफगाण सरकारच्या मनात पाकिस्तानबद्दल अनेक पूर्वग्रह आहेत. त्यांना वाटतं की पाकिस्तानकडे तालिबानला समजावण्यासाठीची जादुची कांडी आहे. पण आता तालिबानला राजी करणं अधिक कठीण झालंय कारण त्यांना असं वाटतंय की त्यांनी अमेरिकेला हरवलंय."
तुर्कस्तानला काबुल विमानतळ का हवा आहे?
अफगाणिस्तानच्या राष्ट्रपती भवनासह अनेक राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या वास्तू काबुल विमानतळाजवळच आहेत.
विमानतळाच्या माध्यमातून काबुल शहर जगाशी जोडलं गेलं आहे. युद्धग्रस्त भागांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी सुरक्षित माध्यम म्हणून विमानतळाचा उपयोग होतो.

फोटो स्रोत, Getty Images
तुर्कस्थानातील डेली सबाह वेबसाईटनुसार, आपात्कालीन परिस्थितीत विदेशी नागरिकांना देशाबाहेर नेण्याच्या दृष्टीने विमानतळ अतिशय उपयोगी ठरतो. काबुल विमानतळावर तालिबानने कब्जा केला की काबुलचा आणि पर्यायाने अफगाणिस्तानचा जगाशी असलेला संपर्क तुटेल. जून महिन्यात तुर्कस्तान इथे झालेल्या नाटो परिषदे दरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन आणि अर्दोआन यांच्यात ताळमेळ असल्याचं जाणवलं. या प्रस्तावामागे अर्दोआन यांचे दोन उद्देश आहेत. पाश्चिमात्य देशांच्या मदतीने खराब झालेले संबंध पूर्ववत करणं आणि जीवनोपयोगी वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी मार्ग खुला करून निर्वासितांच्या संकटापासून बचाव करणं. जर्मन फाऊंडेशन फ्रेडरिक एबर्ट स्टिफटंग च्या अफगाणिस्तानमधील संचालक मेगडालेना क्रिच यांनी एएफपी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं की, अफगाणिस्तान स्थिर असण्यात टर्कीचं हित आहे. तुर्कस्तानचे अधिकारी राजकीय पैलूंवर भर न देता अफगाणिस्तानमधील लोकांच्या समस्या कशा दूर करता येतील यावर भर देत आहेत. तुर्कस्तानच्या एका राजनियक अधिकाऱ्याने एएफपीला सांगितलं की अफगाणिस्तानचा जगाशी संपर्क तुटू न देणं तसंच या देशाला एकाकी पडू न देणं हे आमच्यासमोरचं उद्दिष्ट आहे. संयुक्त राष्ट्र संघटनेने याच महिन्यात 1.8 कोटी अफगाण जनतेला मदतीची आवश्यकता आहे. पाच वर्षांहून कमी वयाची मुलं अतिकुपोषित आहेत. अमेरिकाही तुर्कस्तानकडे या प्रदेशातील महत्त्वपूर्ण सहकारी म्हणूनच पाहतं.
तालिबान तयार नाही
अमेरिकेच्या सैन्याने माघार घेतल्यानंतर काबुल विमानतळावर नियंत्रण मिळवण्याचा तुर्कस्तानने प्रयत्न केला तर त्याचे परिणाम गंभीर असतील असं तालिबानने म्हटलं आहे.

फोटो स्रोत, Getty Images
अमेरिकेच्या सैन्याने माघार घेतल्यानंतर काबूल विमानतळावर नियंत्रण मिळवण्याचा तुर्कस्तानने प्रयत्न केला तर त्याचे परिणाम गंभीर असतील असं तालिबानने म्हटलं आहे. ब्लूमबर्ग या अमेरिकेच्या वृत्तसमूहाशी बोलताना तालिबानचे प्रवक्ते जबीउल्लाह मुजाहेद यांनी सांगितलं की, चुकीचा सल्ला, आमची सार्वभौमता आणि अखंडतेचं उल्लंघन आणि आमच्या राष्ट्रीय हितविरोधी असा हा प्रस्ताव आहे. विमानतळाला सुरक्षा पुरवणं हे आमचं काम असल्याचं अफगाणिस्तान सरकारने म्हटलं आहे. मात्र मित्र देशांची याकामी मदत मिळाल्यास तर त्यांचं स्वागतच आहे असं अफगाणिस्तानने म्हटलं आहे. अफगाणिस्तानातून अमेरिकेचं सैन्य माघारी गेल्यानंतर काबूल विमानतळाच्या सुरक्षेत टर्की महत्त्वपूर्ण भूमिका निभावेल यावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन आणि तुर्कस्तानचे राष्ट्राध्यक्ष रेचेप तैय्यप अर्दोआन यांच्यात सहमत झालं होतं असं अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सालिवन यांनी रॉयटर्स वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं.
अर्दोआन आणि तालिबान समोरासमोर
काबुल विमानतळावर नियंत्रणाचा प्रस्ताव हा घृणास्पद असल्याचं तालिबानने म्हटलं आहे. आमच्या देशात कोणत्याही विदेशी सेनेची उपस्थिती हा हस्तक्षेप आहे. दुसरीकडे तालिबानचा दृष्टिकोन चुकीचं असल्याचं टर्कीच्या राष्ट्राध्यक्षांनी म्हटलं आहे. एका मुसलमान देशाचं दुसऱ्या मुसलमान देशाशी जसं नातं हवं तसं तालिबानचा टर्कीप्रती दृष्टिकोन नाही.
अफगाणिस्तानमध्ये शांतता आहे हे तालिबानने जगाला दाखवून द्यावं. आपल्याच भावांच्या जमिनीवरचा कब्जा तालिबानने सोडून द्यायला हवं असं अर्दोआन म्हणाले.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








