तालिबान आणि अफगाणिस्तान सरकारमध्ये सत्ता हस्तांतरणाबाबत चर्चा सुरू

फोटो स्रोत, Getty Images
तालिबानचे सैनिक काबूल शहराच्या सीमेवर येऊन थांबले आहेत. अद्याप ते शहरात आले नाहीत. अशी माहिती तालिबानने आपल्या प्रसिद्धी पत्रकात दिली आहे.
तालिबान आणि अफगाणिस्तान सरकारमध्ये सत्ता हस्तांतरणाबाबत चर्चा सुरू असल्याचे या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 1
ज्या नागरिकांना काबूल सोडून जायचे आहेत त्यांना शांततेनी जाता यावे यासाठी मार्ग देण्यात यावा असे सैनिकांना आदेश आहेत, ही माहिती रॉयटर्सच्या प्रतिनिधींना तालिबानच्या नेत्यांनी दिली.
बीबीसी प्रतिनिधी यादा हकीम यांनी म्हटले आहे की तालिबानला काबूलमध्ये प्रतिकार होताना दिसत नाहीये.
याआधी, अफगाणिस्तानात आता राजधानी काबूल वगळता बाकीच्या सर्व महत्त्वाच्या शहरांवर तालिबाननं ताबा मिळवला आहे. आतापर्यंत सरकारच्या नियंत्रणात असलेलं मजार-ए-शरीफ हे उत्तर अफगाणिस्तानातलं मोठं शहर आता तालिबानच्या ताब्यात गेलं आहे.
बाल्ख प्रांताची राजधानी असलेलं हे शहर उझबेकिस्तान आणि ताजिकिस्तानच्या सीमेजवळ असून ते तालिबानविरोधी गटाचा गड मानलं जात होतं.
तालिबानला विरोध करणारे उझबेक सेनानी अब्दुल रशीद दोस्तूम आणि ताजिक नेता अट्टा मोहम्मद नूर यांनी या प्रांतातून पलायन करून सुरक्षित स्थळी आश्रय घेतल्याचं वृत्त आहे.
जलालाबाद शहर ताब्यात
रविवारी सकाळी मिळालेल्या माहितीनुसार तालिबाननं बंदुकीची एकही गोळी न झाडता जलालाबाद शहरावर नियंत्रण मिळवलं. जलालाबादमधील एका अफगाण अधिकाऱ्याने रॉयटर्स या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं, की "सामान्य नागरिकांचे प्राण वाचवण्याचा हाच एकमेव मार्ग होता."
अफगाणिस्तानला पाकिस्तानशी जोडणारा मुख्य रस्ता जलालाबादमधून जातो. आणि हा मार्ग आता तालिबानच्या ताब्यात आहे. तालिबाननं आता अफगाणिस्तानातील 34 पैकी 23 प्रांतीय राजधान्यांवर नियंत्रण मिळवलं असून, मोठया शहरांपैकी केवळ काबूलच अफगाण सरकारच्या नियंत्रणात आहे.

फोटो स्रोत, EPA
मात्र तालिबानची आगेकूच सुरू असून ते काबूलच्या अगदी जवळ पोहोचले आहे. त्यामुळे काबूल शहरात तणाव वाढतोय. लाखो लोक आपापलं शहर सोडून काबूलच्या आश्रयाला आले आहेत. मात्र अनेक जण हे शहर सोडून सुरक्षित स्थळी जाण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.
बॅंकांमधले पैसेही संपले
अनेक पाश्चिमात्य देशांनी आपापल्या दूतावासातील अधिकाऱ्यांना आणि नागरिकांना काबूलमधून बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू केल्यामुळे काबूल विमानतळावरही शनिवारी मोठी गर्दी उसळेली दिसली. अमेरिकेनं आपल्या नागरिकांची सुटका करण्यासाठी पाच हजार सैनिकांना काबूलमध्ये पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.
शहरातही अनेकजण बँकांमधून पैसे काढण्यासाठी मोठ्या रांगा लावत आहेत. अनेक ठिकाणी बँकांमध्येही पैसे संपल्याचं वृत्त आहे.
तालिबानसमोर अफगाण सरकारच्या या पडझडीमुळे राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी यांच्यावर राजीनाम्यासाठी दबाव वाढतोय. घनी यांच्यासमोर दोनच पर्याय आहेत. तालिबानला शरण जाणं किंवा मग राजधानी काबुलला वाचवण्यासाठी निकराचा लढा देणं.
राष्ट्राध्यक्ष अश्रफ घनी यांनी शनिवारी प्रसारीत झालेल्या भाषणात देशातील घडामोडींबद्दल स्थानिक नेते आणि आंतरराष्ट्रीय नेत्यांशी चर्चा करत आहेत असं स्पष्ट केलं.
गेल्या वीस वर्षांमध्ये आम्ही जे मिळवलं आहे ते आता गमावू देणार नाही, अफगाण लोकांच्या हत्या होऊ देणार नाही आणि सार्वजनिक संपत्ती नष्टही होऊ देणार नाही असं घनी म्हणाले.दरम्यान काबुलमध्ये शरणार्थींची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढली असून शहरात अभूतपूर्व गोंधळाची स्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जाते आहे.
मजार ए शरीफ पडले
बाल्ख प्रांताची राजधानी आणि अफगाणिस्तानातील चौथं मोठं शहर असलेल्या मजार-ए-शरिफवरही फारसा संघर्ष न करता तालिबान्यांनी कब्जा मिळवला. त्यानंतर काही तासातच जलालाबादलही त्यांच्या ताब्यात गेलं.
सर्वप्रथम राष्ट्रीय लष्कराने आत्मसमर्पण केलं. त्यानंतर सरकार समर्थक सैन्य आणि नागरी सैन्यानेही पराभव मान्य केल्याचं बल्ख प्रांताचे लोकप्रतिनिधी अबास इब्राहिमजादा यांनी असोसिएट प्रेस या वृत्तसंस्थेला दिलेल्या प्रतिकेत म्हटलं आहे.
रविवारच्या कारवाईनंतर तालिबानी बंडखोरांनी अफगाणिस्तानातील 34 पैकी 23 प्रांतीय राजधान्यांवर नियंत्रण मिळवलं आहे.
याआधी काय घडलं?
- तालिबानने आतापर्यंत अफगाणिस्तानच्या उत्तरेकडील बहुतांश भागावर ताबा मिळवला आहे आणि काही प्रांतीय राजधान्यांवर ताबा मिळवला आहे.
- तालिबान काबूलच्या दिशेने सरकत असून ते आता राजधानीपासून अत्यंत जवळ आहेत.
- चार अस्याब जिल्ह्यात ते फक्त सात मैल अंतरावर येऊन ठेपल्याचं स्थानिक अधिकाऱ्यांनी असोसिएट प्रेस या वृत्तसंस्थेला संगितलं.
- अमेरिकेने आपल्या दुतावासातील लोकांची सूटका करण्यासाठी आपली दलं पाठवली आहेत. 600 ब्रिटिश सैनिकही अफगाणिस्तानच्या दिशेने निघाले आहेत.
तालिबानचा हा मोठा विजय मानला जात आहे. कारण लोगारपासून काबुल फक्त 11 किलोमीटर अंतरावर आहे. इथून तालिबान केवळ दोन तासात काबुलमध्ये दाखल होऊ शकतं.
राष्ट्राध्यक्ष घनी यांचं भाषण
राष्ट्राध्यक्ष अश्रफ घनी यांनी एक लहानसे भाषण शनिवारी प्रसारित केले. अफगाणिस्तानात होत असलेल्या घडामोडींबद्दल ते स्थानिक नेते आणि आंतरराष्ट्रीय नेत्यांशी चर्चा करत आहेत असं त्यांनी स्पष्ट केलं.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 2
गेल्या वीस वर्षांमध्ये आम्ही जे मिळवलं आहे ते आता गमावू देणार नाही.
अफगाण लोकांच्या हत्या होऊ देणार नाही आणि सार्वजनिक संपत्ती नष्टही होऊ देणार नाही असं घनी म्हणाले.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 3
एकीकडे तालिबान अफगाणिस्तानच्या राजधानी काबुलकडे चाल करून येत असताना, दुसरीकडे काबुलमध्ये शरणार्थींची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढत आहे.
काबुलमध्ये अभूतपूर्व गोंधळाची स्थिती उद्भवण्याची भीती वर्तवण्यात येतेय. ज्या आक्रमकतेनं तालिबानं काबुलच्या दिशेनं येत आहे, त्यामुळे आधीच अफगाणिस्तानमध्ये गोंधळाचं वातावरण आहे.

फोटो स्रोत, Getty Images
बऱ्याच लोकांना ठाऊक आहे की, पुढे काय वाढून ठेवलं आहे. तालिबानपासून वाचण्यासाठी लोक आपापल्या शहर, तालुका आणि घरांच्या दिशेनं धावत आहेत.
मात्र, या सर्व लोकांचं अंतिम स्थान काबुल आहे. तिथेच त्यांचा जीव वाचू शकतो. अशा स्थितीत काबुलमध्ये मोठी गर्दी होताना दिसतेय.
संयुक्त राष्ट्राने अफगाणिस्तानच्या शेजारी देशांना आपापल्या सीमा उघडण्यासाठी आग्रह केला आहे.
कंदहार तालिबानच्या ताब्यात
तालिबाननं 12 ऑगस्ट रोजी कंदहार शहरावर ताबा मिळवला. कंदहार हे अफगाणिस्तानातील दुसरं सर्वात मोठं शहर आहे. कंदहारवर एकेकाळी तालिबानचं वर्चस्व होतं. रणनितीच्या दृष्टीनं कंदहार अत्यंत महत्त्वाचं शहर मानलं जातं.
तालिबाननं गुरुवारी (12 ऑगस्ट) अफगाणिस्तानातील आणखी काही शहरांवर ताबा मिळवल्याचा दावा केला होता. हेरत, गजनी आणि काला-ए-नाव ही शहरं आपल्या नियंत्रणात असल्याचा दावा तालिबाननं गुरुवारी (12 ऑगस्ट) केला.
तालिबान वेगानं अफगाणिस्तानची राजधानी काबुलच्या दिशेनं येतील, याची भीती तीव्र झालीय.
बीबीसीचे दक्षिण आशिया संपादक अनबरासन एथिराजन सांगतात की, "तालिबान ज्या वेगानं एक एक शहर ताब्यात घेतंय, ते पाहून लष्करी कारवायांचं विश्लेषण करणाऱ्यांनाही धक्का बसलाय."
दुसरीकडे, अमेरिकेनं अफगाणिस्तानातील आपल्या दूतावासातील कर्मचाऱ्यांना सुखरूप मायदेशी आणण्यासाठी जवळपास 3000 सैनिक पाठवण्याचा निर्णय घेतलाय. तसंच, यूकेनं सुद्धा त्यांच्या नागरिकांना मायदेशी आणण्यासाठी 600 सैनिक पाठवण्याचा निर्णय घेतलाय.
अमेरिकन आणि परदेशी सैनिकांनी अफगाणिस्तानातून 20 वर्षांनंतर माघार घेतल्यानंतर तालिबाननं वेगानं पुढे जात आहे. अफगाणिस्तानातील एक एक शहर ताब्यात घेतल्याचे दावे तालिबान करत आहे.
कंदहार का महत्त्वाचं आहे?
तालिबानचा जन्म कंदहारमध्येच झाला आणि इथेच तालिबानने स्वतःला बळकट केलं. या शहरावर कब्जा करणं तालिबानी कट्टरतावाद्यांसाठी मोठं यश असेल.
शहराचे बाह्य भाग तालिबानने फार आधीच व्यापले होते, आता त्यांनी मध्यवर्ती भागात हल्ला करून शहर ताब्यात घेतलं आहे.
बुधवारी तालिबान्यांनी कंदहारच्या मध्यवर्ती तुरूंगावर हल्ला केला आणि गुरुवारी शहराच्या मध्यवर्ती भागात बंडखोर पोहचले आहेत याचे फोटो व्हायरल झाले.
कंदहारच्या एका रहिवाशाने AFP वृत्तसंस्थेला सांगितलं की इथल्या सरकारी सैन्याने मोठ्या प्रमाणावर माघार घेतली आहे. या शहराबाहेरच्या एका सैन्य तळावर त्यांनी आश्रय घेतला आहे.

फोटो स्रोत, EPA
गुरुवारी तालिबान्यांनी अफगाणिस्तानातलं गझनी हे शहर ताब्यात घेतलं. गझनी तालिबानच्या ताब्यात गेल्याने कट्टरतावाद्यांना फार फायदा होणार आहे. या शहराचं स्थान काबुल-कंदहार महामार्गावर आहे त्यामुळे या भागात त्यांचं वर्चस्व प्रस्थापित होणार आहे.
दरम्यान, अफगाणिस्तानातलं आणखी एक जूनं शहर हेरातवर अनेक आठवडे आक्रमण होत होतं. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हीडिओमध्ये बंडखोर शहराच्या मध्यवर्ती भागात गोळीबार करत चाललेत आणि पोलीस मुख्यालयावर तालिबानचा झेंडा फडकतोय असं दिसतंय.
कंदहारविषयी बोलायचं झालं तर असं म्हणतात की ज्याच्या ताब्यात कंदहार असतं त्याच्या ताब्यात अफगाणिस्तान असतो.
कंदहार अफगाणिस्तानाली सगळ्यात मोठी जमात पश्तून लोकांचं माहेरघर आहे. तालिबानचा जन्मही इथेच झालाय आमि सध्याचे अफगाणिस्तानेच राष्ट्राध्यक्ष हमीद करझाईंचा जन्मही इथलाच.
या शहरात असलेला आंतरराष्ट्रीय विमानतळ, शेती आणि उद्योगधंद्यांमुळे कंदहारला विशेष महत्त्व आहे. देशातल्या प्रमुख व्यापार केंद्रापैकी कंदहार एक आहे.
कंदहारची स्थापना चौथ्या शतकात सिंकदराने केली होती, असं म्हटलं जातं पण इथे मानव गेल्या 7000 वर्षांपासून राहातोय.
कंदहार एका महत्त्वाच्या व्यापारी रस्त्यावर पडतं त्यामुळे या शहरावर कब्जा करण्यासाठी अनेकदा युद्ध झालीयेत.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








