तालिबानचा पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेवरील चौक्यांवर ताबा?

फोटो स्रोत, Twitter
तालिबानने पाकिस्तानच्या सीमेवरील अफगाण चौक्यांवर ताबा मिळवल्याचा दावा केला आहे.
बीबीसी पश्तो सर्व्हिसने दिलेल्या वृत्तानुसार, तालिबानने दक्षिण कंदाहार प्रांतातील डूरंड मार्गावरील स्पिन बोल्डक जिल्हा, स्थानिक व्यापार मार्ग आणि बाजारपेठा ताब्यात घेतल्या आहेत.
सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये कंदाहारजवळील स्पिन बोल्डर क्रॉसिंगवर पांढरा झेंडा फडकताना दिसत आहे.
अफगाणिस्तानच्या अधिका-यांनी मात्र पोस्ट आपल्या ताब्यात नसल्याचे वृत्त फेटाळलं आहे. सोशल मीडियावरील फोटोंमध्ये कट्टरतावादी पाकिस्तानी सीमेवरील सुरक्षा दलांशी संवाद साधताना दिसत आहेत.
तालिबानने कोणताही प्रतिकार न करताच सीमा ताब्यात घेतल्या असं बीबीसीला सांगण्यात आलं आहे.
तालिबानने 'सुरक्षेची हमी' दिली
बीबीसी स्वतंत्रपणे या वृत्ताची पुष्टी करू शकलेला नाही, परंतु आमच्या रिपोर्टरला सांगण्यात आलं की, पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी तालिबानने चौकी ताब्यात घेतल्याची पुष्टी केली आहे.

फोटो स्रोत, Reuters
पत्रकार आणि सामान्य जनतेला पाकिस्तानच्या मार्गाने सीमेवर येऊ नये असं आवाहन करण्यात आलं आहे, तसंच त्याठिकाणी एक सुरक्षा बैठक सुद्धा सुरू आहे.
या भागातील व्यापाऱ्यांनी सांगितलं की, रस्ते आणि बाजारपेठांवर आता तालिबानचा ताबा आहे.
तालिबानच्या झबिहुल्ला मुजाहिद यांनी एका निवेदनात रहिवाशांना आणि व्यापाऱ्यांना 'त्यांच्या सुरक्षिततेची हमी' देऊ असं म्हटलं आहे.
'पाकिस्तानसोबत करार झाल्यानंतर वाहतूक आणि मालाचा व्यवहार पूर्ववत होईल असं आश्वासन व्यापारी आणि स्थानिकांना देऊ इच्छितो,' असं तालिबानचे प्रवक्ते कारी युसूफ अहमदी यांनी सांगितलं.
अफगाणिस्तानच्या गृहमंत्रालयाचे प्रवक्ते तारिक एरियन यांनी एएफपीला सांगितले की, "सीमेजवळ काही कारवाया झाल्या आणि सुरक्षा दलांनी हल्ला हाणून पाडला आहे."
हा परिसर महत्त्वाचा का आहे?
पूर्व अफगाणिस्तानातील तोराखमनंतर स्पिन बोल्डक-चमन मार्ग हा पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील व्यापार आणि वाहतुकीच्या दृष्टीने सर्वात व्यस्त मार्गांपैकी एक आहे.

फोटो स्रोत, AFP
सीमेवरील या प्रदेशाच्या बाजारपेठेच्या दोन्ही बाजूंनी हजारो लोकांची घरंही आहेत.
अफगाण सरकारच्या अधिकृत आकडेवारीनुसार, इराणसह मध्य आशियातील इतर देशांमध्ये जाणाऱ्या पाकिस्तान आणि अफगाणिस्तान दरम्यान दररोज 900 ट्रक या सीमा चौकीतून जातात.
बीबीसीच्या रिपोर्टरने दिलेल्या माहितीनुसार, तालिबानचा ताबा कायम राहिल्यास ही गोष्ट त्यांच्यासाठी प्रतीकात्मक आणि धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाची ठरेल. यामुळे थेट सीमा शुल्कमहसूल ताब्यात घेतला जाईल आणि वर्षानुवर्षे तालिबानचे तळ समजल्या जाणाऱ्या पाकिस्तानातील भागात थेट प्रवेश मिळेल.
इतर चौक्यांवरही ताबा
तालिबान सीमेवरील अफगाण चौक्यांवर सतत ताबा मिळवत आहे जेणेकरून त्यांना आर्थिकदृष्ट्या फायदा होईल आणि यामुळे ते अफगाण सरकार कमकुवत करू शकतील.

फोटो स्रोत, Reuters
यापूर्वी अफगाणिस्तानच्या अधिका-यांनी इस्लाम कलान आणि तोरघुंडी यांना तालिबानच्या हाती गेल्याची पुष्टी केली होती.
इस्लाम कलान सीमा चौकी इराण आणि अफगाणिस्तान यांच्यातील व्यापाराचे केंद्र आहे. येथून सरकारला दरमहा सुमारे 2 कोटी डॉलर्सचा महसूल मिळतो. तसंच तोरघुंडी शहर तुर्कमेनिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील व्यापाराचा महत्त्वाचा दुवा आहे.
परदेशी सैन्य परतल्यानंतर अफगाणिस्तानातील परिस्थिती सातत्याने बदलत आहे. 2001 मध्ये सैन्य पाठवण्याचा निर्णय घेणारे अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू बुश यांच्यासह अनेकांना अफगाणिस्तानचे सुरक्षा दल तालिबानच्या विरोधात उभे राहू शकणार नाहीत, अशी भीती आहे.
या आठवड्यात जर्मन प्रसारक डॉईश वेले यांना दिलेल्या मुलाखतीत बुश म्हणाले की, मला असं वाटतं अफगाणिस्तानातील लोकांना "मरण्यासाठी मागे ठेवले आहे."
दोन आठवड्यात संपूर्ण देशावर ताबा मिळवू शकतो असा दावा तालिबानने केला आहे. या कट्टरतावादी संघटनेने आतापर्यंत अफगाणिस्तानचा एक तृतीयांश भाग ताब्यात घेतल्याचे समजते.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








