अफगाणिस्तानातून परतत आहेत भारतीय, काही वाणिज्य दूतावासही केले बंद

तालिबान

फोटो स्रोत, Reuters

अफगाणिस्तानात तालिबानचा वाढता प्रभाव पाहता तिथले भारतीय मायदेशी परतत असल्याचं पाहायला मिळत आहे.

भारत मझार-ए-शरिफमधील वाणिज्य दुतावासातील कर्मचाऱ्यांना लवकरच स्थलांतरित करणार असल्याचं मंगळवारी (10 ऑगस्ट) एका अधिकाऱ्यानं सांगितल्याचं इंग्रजी वृत्तपत्र 'द हिंदू' च्या वृत्तात म्हटलं आहे.

त्यापूर्वी भारत सरकारनं भारतीय नागरिकांसाठी एक आपत्कालीन विमान पाठवण्याचा निर्णय घेतला होता.

अफगाणिस्तानात संघर्ष वाढत असल्यानं व्यावसायिक विमानांची उड्डाणं बंद होण्याआधी भारतीयांनी तत्काळ तिथून निघण्यासाठी व्यवस्था करावी, असं काबूलमधील भारतीय दुतावासानं म्हटलं आहे. तालिबानी सैनिक मझार-ए-शरीफच्या जवळपास पोहोचले आहेत.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

त्यापूर्वी तालिबाननं ताझिकिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या कुंदुझ शहरावर ताबा मिळवला होता.

''मझार-ए-शरीफहून नवी दिल्लीसाठी एक विशेष विमान येत आहे. मझार-ए-शरीफ आणि त्याच्या आसपास राहणाऱ्या सर्व भारतीयांनी या विमानानं दिल्लीला परतण्यासाठी तयारी करावी ही विनंती आहे. ज्या भारतीय नागरिकांना या विशेष विमानानं निघायचं असेल त्यांनी 0785891303, 0785891301 या क्रमांकावर त्यांचं पूर्ण नाव, पासपोर्ट क्रमांक आणि एक्सपायरी डेट व्हाट्सअॅप द्वारे पाठवावी,'' असं आवाहन मझार-ए-शरीफमधील भारताच्या वाणिज्य दुतावासाच्या अधिकाऱ्यांनी ट्विटरवर पोस्ट करत केलं आहे.

अजित डोवाल अफगाणी अधिकाऱ्यांसोबत

फोटो स्रोत, Getty Images

लष्कराच्या एका विमानाद्वारे भारतीय अधिकारी आणि नागरिकांना मझार-ए-शरीफमधून भारतात आणलं जाईल, असं 'हिन्दू'च्या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.

एका महिन्यापूर्वीच भारतानं कंदाहारच्या वाणिज्य दुतावासातून कर्मचाऱ्यांना परत आणलं होतं. त्यानंतर आता मझार-ए-शरीफ मधील वाणिज्य दूतावासही तात्पुरत्या स्वरुपात बंद करण्यात आला आहे.

कंदाहारमधील वाणिज्य दूतावासही तात्पुरता बंद करण्यात आला आहे. ''आम्ही मझार-ए-शरीफमधून सर्व भारतीयांना परत आणत आहोत. याठिकाणचा वाणिज्य दुतावास स्थानिक कर्मचाऱ्यांच्या नियंत्रणात असेल,'' असं मझार-ए-शरीफमधील एका भारतीय अधिकाऱ्यानं 'द हिन्दू' शी बोलताना सांगितलं.

अफगाणिस्तानात राहणाऱ्या भारतीयांनी स्वतःच्या सुरक्षेसंबंधी तत्काळ पावलं उचलावी असं काबूलमधील भारतीय दुतावासानं म्हटलं आहे. वाढता हिंसाचार पाहता भारत आणि अफगाणिस्तानदरम्यानची विमान सेवा बंद होण्यापूर्वी, तत्काळ परतण्याची तयारी करण्याचं आवाहन एका सार्वजनिक नोटिसद्वारे देण्यात आलं आहे.

प्रोजेक्ट साईटवर असलेल्या भारतीय कामगारांनाही तत्काळ तिथून जाण्यास सांगावं असं अफगाणिस्तानातील भारतीय कंपन्यांनाही सांगण्यात आलं आहे.

भारतीय पत्रकारांनाही वाढता संघर्ष पाहता सुरक्षेच्या नियमांचं पालन करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. कुंदुझ शहर तालिबानच्या ताब्यात आल्यानं आता परिस्थिती अत्यंत वेगानं बदलली आहे.

तालिबान

फोटो स्रोत, Getty Images

यापूर्वी एप्रिल 2020 मध्ये भारत सरकारनं जलालाबाद आणि हेरातमधील वाणिज्य दुतावासाचं कामकाज थांबवलं होतं आणि कर्मचाऱ्यांना परत बोलावलं होतं.

''अफगाणिस्तानातील सुरक्षेसंदर्भातील चिंताजनक स्थितीवर भारताची नजर आहे. आमच्या कर्मचाऱ्यांची सुरक्षा सर्वात महत्त्वाची आहे. कंधहारमधील वाणिज्य दुतावास बंद झालेला नाही. पण कंदाहार शहराच्या जवळ वाढलेल्या हिंसाचारामुळं भारतीय कर्मचाऱ्यांना परत आणण्यात आलं आहे. ही तात्पुरती व्यवस्था आहे,'' असं महिनाभरापूर्वी कंदाहारच्या वाणिज्य दुतावासातील कर्मचाऱ्यांना परत बोलवण्यासंदर्भात परराष्ट्र मंत्रालयानं सांगितलं होतं.

''वाणिज्य दुतावासाचं काम स्थानिक कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून सुरू राहील. अफगाणिस्तान आमचा महत्त्वाचा मित्र देश आहे. याठिकाणचं सार्वभौमत्व, शांतता आणि लोकशाहीसाठी भारत कटिबद्ध आहे.''

कंदाहारमधून भारताच्या वाणिज्य दुतावासाचे कर्मचारी परतल्याच्या मुद्द्यावरून पाकिस्तानातूनही प्रतिक्रिया आल्या होत्या. भारताला अफगाणिस्तानमध्ये लज्जास्पद परिस्थितीचा सामना करावा लागल्याचं पाकिस्तानचे गृहमंत्री शेख रशीद म्हणाले होते.

भारताकडे अफगाणिस्तानातून कर्मचारी परत बोलवण्याशिवाय दुसरा पर्याय नसल्याचं त्यांनी म्हटलं होतं.

अफगाणिस्तानात सुरक्षेबाबत केवळ भारताला चिंता आहे, असंही नाही. जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच रशियानंही अफगाणिस्तानच्या मझार-ए-शरीफमधील वाणिज्य दूतावास बंद करण्याची घोषणा केली होती. गेल्या महिन्याच्या सुरुवातीला चीननंही अफगाणिस्तानातून 210 नागरिकांना परत बोलावलं होतं.

दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडन यांनी 31 ऑगस्टपर्यंत अमेरिकेचे सर्व सैनिक परत येतील, असं म्हटलं आहे. जुलै महिन्यातच अफगाणिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष हमीद करझई यांनी अमेरिका अफगाणिस्तान मिशनमध्ये अपयशी ठरल्याचं 'द हिन्दू' ला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)