तालिबान : 'ते येताच मी झेंडा उतरवला आणि पुस्तकं - टीव्ही लपवला'

- Author, खुदा - ए - नूर नासिर
- Role, बीबीसी प्रतिनिधी, इस्लामाबाद
"रात्रभर भीषण युद्ध सुरु होतं. तालिबानने गजनी शहरावर ताबा मिळवल्याचं सकाळी समजताच मी घराच्या गच्चीवरून डिश अँटिना काढून घेतला. नंतर मी घरातला टीव्ही, पुस्तकं आणि लॅपटॉप लपवला."
गजनी शहरातल्या गेल्या काही तासांतल्या घडामोडी तिथले रहिवासी सालहुद्दीन बीबीसीला सांगत होते.
गजनी प्रांताची राजधानी असणाऱ्या गजनी शहरावर ताबा घेतल्याचा दावा तालिबानने केलाय. अफगाण सैन्यासोबत रात्रभर चाललेल्या घनघोर युद्धानंतर तालिबानी योद्धे सकाळी शहरात दाखल झाल्याचं स्थानिकांनी म्हटलंय.
तालिबानने गजनी शहराचा ताबा घेतल्याच्या वृत्ताला दुजोरा देताना 'शत्रूने (शहरावर) ताबा मिळवल्याचं' अफगाण गृह मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी सांगितल्याचं AFP वृत्तसंस्थेने म्हटलंय.
गजनी शहरावर तालिबानने वर्चस्व मिळवल्यानंतर गजनीचे गव्हर्नर, पोलीस प्रमुख आणि इतर अधिकाऱ्यांच्या गाड्यांचा ताफा गजनीहून काबुलच्या दिशेने जात असल्याचं अफगाणिस्तानात सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या काही फोटोंमध्ये पहायला मिळतं.
आत्मसमर्पण केलेल्या अफगाण अधिकाऱ्यांना एका ताफ्यातून सुरक्षितपणे काबुलला पाठवण्यात आल्याचं तालिबानच्या मीडिया विंगने सांगितलं आहे. पण या सरकारी अधिकाऱ्यांनी वाहनांमध्ये हत्यारे वा पैसे तर लपवले नाहीत ना, हे तपासण्यासाठी तालिबानच्या योद्ध्यांनी गजनी शहराच्या बाहेर या ताफ्याची झडती घेतली.
सोशल मीडियावर काही अफगाण नागरिकही गजनीच्या अधिकाऱ्यांवर टीका करतायत. अधिकाऱ्यांनी शहरातून बाहेर पडणं हे पळ काढण्यासारखं असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे.

तालिबानचे योद्धे आणि अफगाण सैन्यामध्ये रात्री घनघोर युद्ध झालं आणि सरकारी सैन्याने तालिबानच्या तळांवर हवाई हल्लेही केल्याचं सलाहुद्दीन सांगतात.
सलाहुद्दीन म्हणाले, "रात्रभराच्या युद्धानंतर सकाळी सगळीकडे शांतता पसरली आणि नंतर तालिबान शहरात दाखल झाल्याचं समजलं."
"तालिबान दाखल होताच घरं आणि दुकानांवरून अफगाणिस्तानाचा राष्ट्रीय ध्वज उतरवण्यात आले."
अफगाणिस्तानच्या इतर शहरांप्रमाणेच गजनीमध्येही बहुतेक लोकांनी काही काळापासून आपल्या घर आणि दुकानांवर अफगाणिस्तानचा झेंडा फडकवला होता. पण तालिबान आल्याचं समजताच घाबरलेल्या नागरिकांनी हे झेंडे उतरवल्याचं सलाहुद्दीन सांगतात.
गजनीमध्ये तालिबानचे झेंडे
गजनी शहरात आता सगळीकडे तालिबानचे पांढरे झेंडे दिसत असून तालिबानचे योद्धे स्वतः ठिकठिकाणी हे झेंडे लावत असल्याच सलाहुद्दीन सांगतात.

फोटो स्रोत, Getty Images
रात्रभर युद्ध सुरू राहिल्याने सकाळी शांतता होती, म्हणूनच लोक घरातून बाहेर पडले आणि आता भीतीचं वातावरण असलं तरी शहरातली परिस्थिती जवळपास सामान्य झाल्याचं ते सांगतात.
गजनी शहरातलं गव्हर्नर कार्यालय आणि इतर अनेक प्रमुख सरकारी इमारतींवर तालिबानने ताबा मिळवल्याचे व्हिडिओही प्रसिद्ध करण्यात आले आहेत. तालिबानचे योद्ध या महत्त्वाच्या ठिकाणांवर पहारा देताना यात दिसतात.
गजनी शहराला गेल्या अनेक महिन्यांपासून वेढा होता आणि दोन महिन्यांपूर्वी तालिबानी योद्धे शहराच्या बाहेरच्या भागापर्यंत पोहोचले होते. पण शहरावर ताबा मिळवण्यासाठी गुरुवारी रात्री तालिबानने जोरदार हल्ला चढवला आणि सकाळपर्यंत शहरात दाखल होत महत्त्वाच्या इमारतींवर कब्जा मिळवला.
'पुस्तकं, टीव्ही आणि लॅपटॉप लपवला'
गजनी शहरातले बहुतेक लोक डिश अँटिना वापरून टीव्ही चॅनल्स पाहत असल्याचं सलाहुद्दीन सांगतात. शहरात तालिबान आल्याचं समजताच अनेकांनी रात्रीतच आपल्या घराच्या गच्चीवरून डिश अँटिना काढून टाकला.
आपणही गच्चीतून डिश अँटिना काढल्यानंतर घरातला टीव्ही, पुस्तकं, लॅपटॉप लपवल्याचं सलाहुद्दीन यांनी सांगतिलं.

फोटो स्रोत, Getty Images
तालिबानची सत्ता असतानाच्या काळात टीव्ही, डिश अँटिना आणि इतर गोष्टी जाळून टाकल्या जात. मग सलाहुद्दीन यांनी पुस्तकंही का लपवली? ते सांगतात, "माझ्याकडची काही पुस्तकं इंग्रजी होती. यामध्ये नेल्सन मंडेला आणि इतर अनेक प्रसिद्ध व्यक्तींची पुस्तकं होती. तालिबानच्या नजरेला ही पुस्तकं पडून त्यांना याचा राग येऊ नये, म्हणून आम्ही ही पुस्तकं लपवली."
आपल्या शेजाऱ्यांच्या घरात तालिबानी आले असून त्यांच्या घराच्या वरच्या मजल्यावर चढून त्यांनी अफगाण सैन्याच्या विरुद्ध लढायला सुरुवात केल्याचं सलाहुद्दीन यांनी सांगितलं. बहुतेक भागांमध्ये तालिबानचे योद्धे लोकांच्या घरात घुसतात आणि तिथूनच अफगाण सैन्याविरुद्ध लढायला सुरुवात करतात.
सलाहुद्दीन पुढे सांगतात, "सामान्यांच्या घरांवर लष्कर हवाई हल्ले करू शकत नाही, म्हणून तालिबान सामान्याच्या घरांतच आसरा घेतात."
'घरातल्या बायकांना पैसे दिले'
खर्चासाठी घरात ठेवलेले पैसे आपण आपल्या घरातल्या महिलांकडे सोपवत त्यांना ते पैसे स्वतःसाठी सांभाळून ठेवण्यास सांगितल्याचं सलाहुद्दीन यांनी सांगितलं.
"माझ्या घरात दोन महिला आहे. माझी पत्नी आणि माझी वहिनी. दोघींना वैयक्तिकपणे पैसे देऊन ते स्वतःसोबतच ठेवायला सांगितले आहेत. हवाई हल्ल्यात वा गोळी लागून एकीचा मृत्यू झाला तर दुसरीकडच्या पैशांनी कफन आणि दफनाचा खर्च करता येईल."
आता पुढे काय होणार हा प्रश्न त्यांच्या कुटुंबातल्या महिला आणि मुलं घाबरून वारंवार विचारत असल्याचं सलाहुद्दीन सांगतात.
रात्रभर सुरू असलेलं युद्ध आणि हवाई हल्ल्याच्या भीतीमुळे कुटुंबातलं कोणीही रात्रभर झोपलं नसल्याचं ते सांगतात. सकाळीही कोणालाच झोप लागली नाही. पण किमान गोळीबाराचा आवाज येणं बंद झाल्याने घरातलं वातावरण काहीसं निवळल्याचं ते सांगतात.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








