मोहम्मद इस्माइल खान : तालिबानला भिडणारा अफगाणिस्तानात 'म्हातारा सिंह'

फोटो स्रोत, MASSOUD HOSSAINI/AFP VIA GETTY IMAGES
- Author, बीबीसी मॉनिटरिंग
- Role, बातम्यांचं वृत्तांकन आणि विश्लेषण
अफगाणिस्तानात युद्धाच्या मैदानातलं एक जुनं नाव म्हणजे मोहम्मद इस्माइल खान. तिथल्या हेरात प्रांतातील युद्धातही हे एक मोठं नाव म्हणून समोर आलंय.
गेल्या दोन आठवड्यात खान यांनी शस्त्र हाती घेत तालिबानविरोधात सैन्य कारवाईचं नेतृत्त्व केलं. परिणामी अनेक अफगाणी वृत्त संस्थांनी हेरात शहर शत्रूच्या हाती न जाण्याचं श्रेय खान आणि त्यांच्या जवानांना दिलं.
अरमान-ए-मेली या एका खाजगी वृत्तपत्राच्या अग्रलेखात म्हटलं आहे, "आमीर इस्माइल खान आणि त्यांच्या नेतृत्त्वात काम करणारे त्यांचे निष्ठावान जवान नसते तर हेरात तालिबानच्या ताब्यात गेला असता. इस्माइल खान आणि 'सार्वजनिक बंडखोर दला'ने केलेल्या धाडसी कारवाईमुळे धोका टळला आणि तालिबानचे मोठे नुकसान झाले."
मोहम्मद इस्माइल खानना त्यांचे समर्थक आता 'म्हातारा सिंह' (बूढा शेर) म्हणतात. खान ताजिक (तजाकिस्तानशी संबंधित) आहेत आणि या समूहाच्या लोकांचं त्यांना समर्थन आहे.

फोटो स्रोत, AREF KARIMI/AFP VIA GETTY IMAGES
1946 साली हेरात प्रांतातील शिंदांद जिल्ह्यात त्यांचा जन्म झाला. दीर्घकाळापासून ते जमीयत-ए-इस्लामी या राजकीय पक्षाचे प्रमुख सदस्य आहेत.
1978 साली अफगाण सैन्यात कॅप्टन पदावर असताना त्यांनी काबूलमध्ये कम्युनिस्ट सरकारविरोधात सर्वात मोठ्या बंडाची योजना आखली होती आणि 1979 साली अफगाणिस्तानावर सोव्हियत यूनियनने केलेल्या आक्रमणानंतर ते एक प्रमुख मुजाहिद्दीन कमांडर बनले.
1980 च्या दशकापासून ते सोव्हियत सैन्य माघारी जाईपर्यंत बहुतांश पश्चिम अफगाणिस्तानात त्यांनी एक मोठ्या मुजाहिद्दीन सैन्याचं नेतृत्त्व केलं.
इराणला पलायन
1992 ते 1995 पर्यंत खान हेरात प्रांताचे गव्हर्नर होते. हेरातवर तालिबान्यांनी कब्जा केल्यानतंर त्यांना इराणला पलायन करणं भाग पडलं.
मात्र त्यांना तालिबान्यांनी बंदी बनवलं. 2000 साली ते पळून जाण्यात यशस्वी झाले. यानंतर ते तालिबानविरोधी उत्तरी आघाडीत सहभागी झाले.
2001 साली अमेरिकेने अफगाणिस्तानवर चढाई करत तालिबान्यांची सत्ता उलथून लावली. त्यानंतर इस्माइल खान पुन्हा एकदा हेरात प्रांताच्या गव्हर्नरपदी विराजमान झाले.

फोटो स्रोत, AREF KARIMI/AFP VIA GETTY IMAGES
त्यांच्या कार्यकाळात खान यांचे समर्थक सार्वजनिक पायाभूत सुविधा आणि सरकारी सेवांमध्ये झालेल्या सुधारणांचं कौतुक करत. तर विरोधक सीमा शुल्काच्या रुपाने मिळवलेला पैसा केंद्र सरकारपर्यंत पोहोचवण्यात अपयशी ठरल्याचा ठपका ठेवून खान यांच्या नेतृत्त्वावर टीका करत.
2005 साली हामीद करझई सरकारच्या काळात मोहम्मद इस्माईल खान यांना जल आणि ऊर्जा मंत्रीपद देण्यात आलं. 2013 सालापर्यंत ते या पदावर होते.
2014 साली खान आणि अब्दुल रब रसूल सय्यफ यांनी एकाच तिकीटावर राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढवली. मात्र, या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला.
पाकिस्तानच्या भूमिकेवर टीका
गेल्या काही वर्षात आणि विशेषतः अफगाणिस्तानात तालिबान्यांकडून हिंसाचारात वाढ झाल्यानंतर खान अफगाणिस्तानात पाकिस्तानच्या भूमिकेवर टीका करतात.

फोटो स्रोत, Getty Images
4 ऑगस्ट रोजी एका स्थानिक खाजगी न्यूज चॅनलला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले होते, "मी अफगाणिस्तानच्या जनतेला स्पष्टपणे सांगू इच्छितो की हे युद्ध तालिबान आणि अफगाणिस्तान सरकार यांच्यातलं युद्ध नाही. तर हे अफगाणिस्तान राष्ट्राविरोधात पाकिस्तानने छेडलेलं युद्ध आहे. तालिबान एक उपकरण आहे आणि ते भाड्याच्या सैनिकांप्रमाणे काम करतात."
त्याचप्रमाणे मार्च 2017 साली एरियाना न्यूज चॅनलशी बोलताना खान म्हणाले होते, "जोवर सर्व अफगाण एकत्रितपणे संयुक्त अफगाणिस्तान निर्माण करण्याचा निर्णय घेत नाही तोवर चीन, रशिया, इराण, पाकिस्तान आणि इतर कुठल्याही देशाचा पाठिंबा मिळवून काहीच उपयोग होणार नाही, हे तालिबान्यांना कळायला हवं."
जुलै 2021 मध्ये तालिबान हेरात शहराजवळ पोहोचताच त्यांनी या प्रांतातील जनतेच्या शौर्याचं कौतुक केलं. ते म्हणाले, "आमच्या लोकांचं म्हणणं खरंच आहे की त्यांनी (तालिबान) शहराजवळ यायला नको होतं. जिल्ह्यांच्या झालेल्या हानीमुळे युद्ध शहराजवळ येऊन ठेपलं आहे. मात्र, आमची जनता, बंधू-भगिनींनी उचलेलल्या पावलांमुळे (तालिबान्यांविरोधात बंड) मोठी मदत झाली."
हेरातमध्ये तालिबान्यांविरोधात लढणाऱ्यांना पुरेसा पाठिंबा देण्यात अपयशी ठरल्याबद्दल केंद्र सरकारवर टीका करताना खान यांनी 4 ऑगस्ट रोजी एरियाना न्यूज चॅनलला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं, "ते (सरकार) दिलेली आश्वासनं योग्य पद्धतीने पूर्ण करत नाहीत. उदाहरणार्थ त्यांनी आम्हाला शस्त्रास्त्र आणि इतर सुविधा देण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र, आम्हाला अजूनही ते मिळालेलं नाही. हजारो तरुण हेरात शहराच्या सुरक्षेसाठी सज्ज आहेत."
इतरांचं काय म्हणणं आहे?
हेरातमध्ये तालिबान्यांविरोधात सैन्य मोहिमेचं केंद्र सरकार आणि प्रमुख अफगाण राजकीय नेत्यांनी उघडपणे स्वागत केलं आहे.
हाई काउंसिल ऑफ नॅशनल रिकन्सिलिएशनचे अध्यक्ष अब्दुल्ला अब्दुल्ला यांनी म्हटलं होतं, "आम्हाला आमचे मुजाहिद बंधू आमिर मोहम्मद इस्माइल खान, जनता आणि सैन्य अधिकाऱ्यांच्या युद्ध नेतृत्त्वाचा आणि धाडसाचा अभिमान आहे. या मुद्द्यावर आम्ही आपल्या नागरिकांसोबत पूर्ण ताकदीनिशी उभे आहोत."
जमीयत-ए-इस्लामीचे नेते सलाहुद्दीन रब्बानी म्हणाले, "हल्ली नायक आमीर इस्माईल खान यांच्या नेतृत्त्वाखाली हेरातमध्ये शूर जनतेकडून सुरू असलेला प्रतिकार गर्वाची बाब आहे आणि याचा आम्हाला अभिमान आहे. या संवेदनशील वळणावर जनता स्वतःचं, स्वतःच्या प्रतिष्ठेचं आणि मूल्यांचं रक्षण करतात."
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








