अफगाणिस्तानातल्या 1700 भारतीयांचं काय होणार? तालिबानचं वाढलं वर्चस्व

फोटो स्रोत, Anadolu Agency/Getty Images
- Author, अनंत प्रकाश
- Role, बीबीसी प्रतिनिधी
"मी रोज झोपायला जाताना एक बॅग भरुन खिडकीपाशी ठेवतो. या बॅगेत बुटांचा एक जोड, कपडे, पासपोर्ट, आवश्यक कागदपत्रं आणि रोख रक्कम असते. हे कदाचित एखाद्या रहस्यपटातल्या दृश्यासारखं वाटेल, पण अफगाणिस्तानात आम्ही असेच राहतोय. इथे कधीही काहीही होऊ शकतं आणि तुम्हाला बॅग घेऊन पळ काढावा लागू शकतो."
गेल्या अनेक वर्षांपासून अफगाणिस्तानात राहणाऱ्या भारतीयाचे हे उद्गार.
गेल्या काही आठवड्यांमध्ये अफगाणिस्तानातली परिस्थिती झपाट्याने बदलली आहे. तालिबानने एकामागून एक करत 24 पेक्षा जास्त जिल्हे ताब्यात घेतले आहेत. तर अनेक जिल्हे पुन्हा आपल्या ताब्यात आल्याचा दावा अफगाण सैन्याने केलाय.
पण या सगळ्यामध्ये स्थानिकांची परिस्थिती दिवसेंदिवस वाईट होतेय. अमेरिका, जर्मनी आणि पोलंडसह अनेक देशांच्या सैन्यांनी शांततापूर्ण मार्गाने अफगाणिस्तानातून माघार घेतली आहे.
11 सप्टेंबरपर्यंत अमेरिका आपलं सगळं सैन्य अफगाणिस्तानातून माघारी बोलावेल असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. पण अमेरिका आणि नाटोच्या सैन्यांनी त्याआधीच परतायला सुरुवात केली असून अफगाणिस्तानाच्या बागराम हवाई तळावरून अमेरिका आणि नाटोने आपलं सैन्य काढून घेतलंय.
'अंतर्गत यादवी सुरु होण्याची शंका'
अमेरिका आणि नाटोच्या सैन्याचं काबुलमधलं मुख्यालयं सध्या सुनसान आहे. अफगाणिस्तानात गृहयुद्ध सुरु होण्याची शंका या मुख्यालयातले अमेरिकेचे जनरल ऑस्टिन एस. मिलर यांनी व्यक्त केलीय.

फोटो स्रोत, Sumit/BBC
ते म्हणाले, "सध्या जी परिस्थिती आहे, ते असंच सुरु राहिलं तर गृहयुद्ध होण्याची शक्यता फेटाळता येणार नाही. हा जगासाठी काळजीचा विषयही ठरु शकतो."
अफगाणिस्तान हाय काऊन्सिल फॉर नॅशनल रिकन्सिलिएशनचे अध्यक्ष डॉ. अब्दुल्ला अब्दुल्ला म्हणाले, "आम्हाला शांतता हवीय. पण युद्ध हळुहळू दारापाशी येऊन ठेपतंय. लोकांचं संरक्षण करण्यासाठी अफगाण नेत्यांना एकत्र आणायला हवं."
पण सध्याची परिस्थिती पाहत लोकांनी घरात स्वतःसाठी हत्यारं गोळा करायला सुरुवात केलीय. हल्ला झालाच तर आपल्याला कुटुंबाचं संरक्षण करता यावं यासाठीची तयारी ते करतायत.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
कामानिमित्त गेली अनेक वर्षं अफगाणिस्तानात राहणाऱ्या परदेशी नागरिकांनी अफगाणिस्तान सोडून जायला सुरुवात केलीय. तर काबुलमधल्या भारतीय दूतावासाने अफगाणिस्तानात राहणाऱ्या भारतीयांना सुरक्षेविषयीच्या सूचना दिल्या आहेत.
कोणत्या परिस्थितीत राहतायत भारतीय नागरिक?
गेल्या काही वर्षांमध्ये भारत सरकारने अफगाणिस्तानाच्या पुनर्बांधणीसाठी विविध योजनांमध्ये जवळपास 3 अब्ज अमेरिकन डॉलर्सची गुंतवणूक केली आहे. संसदेपासून ते रस्ते आणि बंधारे बांधण्यापर्यंतच्या अनेक प्रकल्पांवर अनेक भारतीय काम करत आहेत.
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार अफगाणिस्तानात सध्या 1700 भारतीय राहात आहेत.
भारतीय दूतावासाने दिलेल्या 13 सल्ल्यांमध्ये म्हटलंय -
- अफगाणिस्तानात असणाऱ्या सगळ्या भारतीयांनी विनाकारण प्रवास करणं टाळावं.
- मुख्य शहरांमधून बाहेर जाणं टाळावं, जर जाणं गरजेचं असेलच तर विमान प्रवास करावा कारण हायवे सुरक्षित नाहीत.
- भारतीय नागरिकांचं अपहरण करण्यात येण्याचा धोका जास्त आहे.
गेल्या काही दिवसांमध्ये सैन्याच्या हालचाली कमी झाल्या असल्याचं अफगाणिस्तानात एका आंतरराष्ट्रीय संस्थेत काम करणाऱ्या एका भारतीय नागरिकाने नाव न जाहीर करण्याच्या अटीवर सांगितलं.

फोटो स्रोत, Sumit/BBC
सुमित (बदललेलं नाव) सांगतात, "सध्या काबुलमधली परिस्थिती अतिशय वाईट आहे. आम्ही अगदी एकेक दिवस जगतोय. मी कायम माझ्याजवळ एक बॅग ठेवतो. त्यात माझा पासपोर्ट, काही आवश्यक कागदपत्रं, रोख रक्कम, टॉर्च, स्विस नाईफ, एक बुटांचा जोड आणि कपडे असतात."
"झोपायला जाताना मी ही बॅग खिडकीजवळ ठेवतो. हे कदाचित एखाद्या रहस्यपटातल्या दृश्यासारखं वाटेल, पण अफगाणिस्तानात आम्ही असेच राहतोय. इथे कधीही काहीही होऊ शकतं आणि तुम्हाला बॅग घेऊन पळ काढावा लागू शकतो," ते सांगतात.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 1
अफगाणिस्तानात राहणारे भारतीय फार कडक सुरक्षा बंदोबस्त असणाऱ्या वस्त्यांमध्ये राहत नाहीत, पण भारतीय दूतावास या भारतीयांच्या सुरक्षेची काळजी घेतोय आणि त्यांना वेळोवेळी सूचना दिल्या जातात."
नितीन सोनावणे जगभरात फिरून महात्मा गांधींच्या विचारांचा प्रसार करतात. सध्या ते अफगाणिस्तानात आहेत. अफगाणिस्तानातल्या परिस्थितीविषयी आम्ही त्यांच्याशी बोललो.
नितीन सांगतात, "अफगाणिस्तानातली परिस्थिती दिवसेंदिवस वाईट होतेय. मी साधारण 3 दिवसांत 80 किलोमीटर्सचा प्रवास केला आणि अनेक लोकांनी मला 'इथून जाऊ नका, इथे अतिशय धोका आहे, तालिबानी वाळवंटातून येऊन हल्ला करु शकतात, अपहरण करु शकतात' असं सांगितलं. अजूनही तालिबान अतिशय वेगाने पुढे सरकतंय. काबुलमधली परिस्थितीही वाईट आहे. मी इथे असताना एका व्हॅनवर हल्ला करण्यात आला आणि त्यात माझ्या मित्राच्या सहकाऱ्याचा मृत्यू झाला. अशात आता लोक इथून कोणत्या ना कोणत्या प्रकारे बाहेर पडण्याचा प्रयत्न करतायत."

फोटो स्रोत, AFP
नितीन सोनावणे काबुलमधल्या भारतीय दूतावासात काम करतायत आणि भारतीय अधिकाऱ्यांना भेटून आले आहेत.
नितीन सांगतात, "मी नुकताच भारतीय दूतावासात गेलो होतो. त्याचं रुपांतर अगदी तुरुंगात झालंय. कोणताही अधिकारी बाहेर पडत नाही. असुरक्षिततेची भावना आहे. मलाही बाजारात जाऊ नये, असं सांगण्यात आलंय."
पाकिस्तानी समजलं जाण्याची भारतीयांना भीती
काही दिवसांपूर्वीच एका भारतीय प्राध्यापकाचं अपहरण करण्यात आल्याचं नितीन सोनावणे सांगतात.
तालिबानकडून असणाऱ्या धोक्यांची भीती तर अफगाणिस्तानातल्या भारतीयांना आहेच, पण अफगाण लोक आपल्याला चुकून पाकिस्तानी समजतील अशी भीतीही त्यांना वाटते.

फोटो स्रोत, WAKIL KOHSAR/AFP via Getty Images
नितीन सांगतात, "इथे अफगाण नागरिक भारतीयांशी अगदी चांगलं वागतात. पण मी भारतीय आहे असं रस्त्यावर जाऊन कोणाला सांगितलं, तर ते विश्वास ठेवणार नाहीत. हा माणूस पाकिस्तानी आहे, असंच त्यांना वाटेल. मी हिंदीत बोलायला लागल्यावर त्यांना मी पाकिस्तानचा आहे की भारताचा ते लक्षात येईल. पण बहुतेकांना तुम्ही पाकिस्तानीच वाटाल कारण इथे पाकिस्तानचा लोकांना तिटकारा असल्याने पाकिस्तानी लोक स्वतःची ओळख लपवतात."
सध्या अनेक कट्टरतावादी संघटना ज्या भागात कार्यरत आहेत त्या जलालाबाद पासून मजार - ए - शरीफ पर्यंतच्या अनेक भागांमध्ये नितीन यांनी प्रवास केलाय.
ते सांगतात, " जलालाबादमध्ये अनेक कट्टरतावादी गट सक्रिय आहेत. इथे एक 501 वर्षं जुना गुरुद्वारा आहे. गुरुनानक इथे आले होते. मी या गुरुद्वारामध्ये गेलो होतो पण तिथे असणारे लोक माझ्याशी बोललेही नाहीत. त्यांना वाटलं मी पाकिस्तानी आहे म्हणून ते माझ्याशी अजिबात बोलले नाहीत."
भारतीयांना एका विचित्र परिस्थितीचा सामना करावा लागत असल्याचं अफगाणिस्तानातल्या दुर्गम भागात काम केलेले सुमित (बदललेलं नाव) सांगतात.

फोटो स्रोत, Bhas Solanki / BBC
ते म्हणतात, "मी अफगाणिस्तानातल्या दूरवरच्या भागांमध्ये काम केलंय. अफगाणिस्तानच्या सीमेजवळची गावं, तालिबानच्या ताब्यात असण्या भागांजवळे परिसर आणि डोंगराळ भागांत जाऊनही काम केलंय. कुठे भारतीयांना पाकिस्तानी समजलं जाण्याची भीती वाटते, तर कुठे भारतीय समजलं जाण्याची भीती वाटते. एकदा काही लोकांनी माझ्याकडे चौकशी केली. मी एक भारतीय आहे आणि इथल्या विकासप्रकल्पांवर काम करतोय हे कळल्यावर ते खुश झाले आणि खुल्या मनाने त्यांनी माझं स्वागत केलं."
अफगाणिस्तानातली पायाभूत यंत्रणा उभी करण्यासाठीच्या अनेक प्रकल्पांचं काम भारताने आतापर्यंत पूर्ण केलंय. या प्रकल्पांमध्ये अनेक भारतीय इंजिनियर, टेक्निशियन आणि इतर क्षेत्रांशी संबंधित लोक काम करतायत. अनेक प्रकल्प येत्या काही वर्षांमध्ये पूर्ण होणार आहेत.
मानवीहक्कांसंबंधी काम करणाऱ्या अनेक संस्था अफगाणिस्तानातल्या दुर्गम भागांमध्ये काम करतायत. सोबतच अनेक भारतीय नागरिक संयुक्त राष्ट्रांसहन इतर अनेक आंतरराष्ट्रीय समाजसेवी संघटनांसोबत काम करतायत.
अशाच एका संस्थेमध्ये काम करणाऱ्या एका भारतीय नागरिकाने नाव न सांगण्याच्या अटीवर तिथली प्रत्यक्ष परिस्थिती सांगितली.
राहुल (बदललेलं नाव) सांगतात, "अफगाणिस्तानात राहणारे भारतीय मुख्यत्वे विकास कामांशी संबंधित संस्था, व्यापारी संस्था आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रांमध्ये काम करतायत. या तीन क्षेत्रांत काम करणाऱ्या भारतीयांसाठी करण्यात आलेली सुरक्षाव्यवस्था वेगवेगळी आहे.

फोटो स्रोत, EPA
"उदाहरणार्थ, आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये काम करणाऱ्यांच्या संरक्षणाची व्यवस्था अपेक्षेनुसारच चांगली आहे कारण त्यांचा परिसर सुरक्षित आहे, सुरक्षेसंबंधीचे नियम अतिशय कडक आहेत आणि संरक्षण व्यवस्था पाहणारी एक खास टीम आहे जी वेळोवेळी माहिती देत राहते.
"पण सेवा क्षेत्रात काम करण्यांची परिस्थिती काहीशी गंभीर आहे कारण त्यांना स्वतःच्या राहण्याची सोय स्वतः करावी लागते. त्यामुळे कोणावर किती विश्वास ठेवायचा हे समजत नाही. आपल्या येण्याजाण्याविषयीची माहिती लीक होईल याची भीती त्यांना वाटत राहते.
तिसऱ्या गटातले लोक हे भारत सरकारच्या हायवे आणि बंधारे बांधण्याच्या प्रकल्पांवर काम करणारे आहेत. त्यांची परिस्थिती वाईट आहे. पण मला वाटतं की या लोकांना गेल्या काही काळात माघारी पाठवण्यात आलंय.
अनेक लोक अशा योजना प्रकल्पांच्या ठिकाणी काम करतात जिथे दूरवरच्या भागात खुल्यावर तंबू ठोकून झोपावं लागतं. त्यांना या परिसराची फारशी माहिती नसेत आणि ते पूर्णपणे त्यांच्या अफगाण कॉन्ट्रॅक्टरवर अबलंबून असतात."
भारतीयांना भविष्यात तिथे राहता येईल का?
येत्या काही काळामध्ये भारतीयांना अफगाणिस्तानात काम करणं शक्य होईल का?

फोटो स्रोत, EPA
सुमित सांगतात. "सध्यातरी याचं उत्तर देता येणार नाही. आपल्याकडून परदेशी नागरिकांना धोका नसल्याचं तालिबानने जरी निवेदनाद्वारे म्हटलं असलं तर प्रत्यक्षात तालिबान हे कोणा एका सैन्याचं नाव नाही. स्वतःचे हेतू, भावना आणि संबंधांनुसार धोरण ठरवणाऱ्या सगळ्या सशस्त्र कट्टरवादी गटांचं हे एक एकत्रित नाव आहे."
यातले अनेक गट पाकिस्तानची गुप्तचर संस्था ISIच्या इशाऱ्यावर काम करत असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. अनेक गट त्यांचा पाकिस्तानशी संबंध लावल्यास त्यावर आक्षेप घेतात. या गटांचा वेगवेगळ्या प्रकारे हिंसाचारत सहभाग असतो.
सुमित सांगतात, "याशिवाय अनेक गट असे आहेत जे परदेशी ताकदींच्या इशाऱ्यानुसार हिंसक घटना घडवून आणतात आणि त्याचं खापर तालिबानवर फोडतात. अनेक लहान गटांचा तालिबानशी संबंध नाही. ते इतर कोणत्या एजन्सीच्या सूचनांप्रमाणेही वागत नाहीत. पण आपली ताकद दाखवण्यासाठी आणि महत्वं मिळण्यासाठी त्या मोठ्या घटना घडवून आणतात. थोडक्यात असं म्हणता येईल की अफगाणिस्तानात तालिबानने पुन्हा डोकं वर काढल्याने नवीन गुंतागुंत निर्माण झालेली आहे."
पण भारतासोबतच इतर सगळ्या यंत्रणा अफगाणिस्तानातून परतू शकतात का?
याविषयी राहुल सांगतात, "इथे काम करणं आव्हानात्मक असेल, हे खरं आहे. पण लोक परतणार नाहीत,असं नाही. पुढे काय होणार हे ऑगस्टपर्यंत स्पष्ट होईल. कारण 9/11 च्या दिवशी अमेरिकन सैन्य पूर्णपणे परत गेलेलं असेल आणि तोपर्यंत काय होईल याची आम्हाला कल्पना येईल."
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 2
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








