अफगाणिस्तानमध्ये पंधरा वर्षांत 26,000 लहानग्यांचा मृत्यू

युद्धप्रवण अफगाणिस्तानमध्ये गेल्या पंधरा वर्षांत दररोज सरासरी पाच मुलं जीव गमावत आहेत किंवा जखमी होत आहेत.
'सेव्ह द चिल्ड्रन' अभ्यास पाहणीतून ही धक्कादायक बाब समोर आली आहे.
संयुक्त राष्ट्रंच्या अभ्यासातून हे स्पष्ट झालं आहे की अफगाणिस्तानमध्ये 2005 ते 2019 या कालावधीत 26,025 चिमुरड्यांनी जीव गमावला आहे किंवा ते गंभीररीत्या जखमी झाले आहेत.
2005 ते 2019 या 14 वर्षांच्या कालावधीत अफगाणिस्तानमध्ये 26,025 लहान मुलांनी जीव गमावला आहे. देशातील अस्थिर परिस्थितीचा मोठा फटका या निरासग चिमुरड्यांना बसला आहे. सेव्ह द चिल्ड्रन चॅरिटी संस्थेने यासंदर्भात पाहणी करून अहवाल सादर केला. त्यातून ही गोष्ट स्पष्ट झाली आहे.
जिनिव्हामध्ये झालेल्या महत्त्वाच्या बैठकीत या संस्थेने अफगाणिस्तानमधल्या लहानग्यांचं भवितव्य चांगलं असावं यासाठी सहभागी देशांनी प्रयत्न करावेत असं आवाहन केलं आहे.
जगभरात लहान मुलांसाठी अतिशय धोकादायक देशांमध्ये अफगाणिस्तानचा अकरावा क्रमांक आहे. 2019 मध्ये जगभरातील संघर्षमय घटनांपैकी सर्वाधिक अफगाणिस्तानमध्ये झाल्या. गेल्या वर्षी 874 अफगाण मुलांचा मृत्यू झाला तर 2,275 मुलं जखमी झाली आहेत.
जीव गमावलेल्यांपैकी दोन तृतीयांश मुलं आहेत. सरकारविरोधी आणि सरकारवतीने लढणाऱ्यांमध्ये या मुलांनी जीव गमावला. अत्याधुनिक शस्त्रास्त्रांद्वारे केलेले आत्मघातकी हल्ले यामध्ये या मुलांनी जीव गमावले आहेत.
अमेरिकेच्या फौजांचा पाठिंबा असलेलं अफगाणिस्तान सरकार आणि तालिबान यांच्यात प्रदीर्घ काळ सुरू असलेल्या संघर्षादरम्यान शाळांना नियमितपणे लक्ष्य करण्यात येतं.

फोटो स्रोत, Getty Images
'सेव्ह द चिल्ड्रन' संस्थेच्या अहवालानुसार 2017 आणि 2019 दरम्यान शाळांवर तीनशेहून अधिक हल्ले करण्यात आले.
आत्मघातकी बाँब हल्ल्यात तुमच्या लाडक्या मुलाचा किंवा मुलीचा जीव जाऊ शकतो, ही भीती सातत्याने अफगाणिस्तानमधल्या पालकांच्या मनात असते.
हजारो अफगाण पालकांची हीच मनस्थिती आहे आणि हेच वास्तव आहे. सेव्ह द चिल्ड्रन संस्थेचे अफगाणिस्तानमधील संचालक ख्रिस न्यामंडी यांनी सांगितलं.
'2020 अफगाणिस्तान परिषदेच्या' पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय देणगीदारांची बैठक सोमवारपासून सुरू झाली आहे. अफगाणिस्तानमधील मुलांचा, त्यांच्या भविष्याचा माणुसकीच्या दृष्टिकोनातून विचार करावा, असं आवाहन या संस्थेने सहभागी देशांना केलं आहे.
दाट लोकसंख्येच्या भागात स्फोटकांनी भरलेली क्षेपणास्त्रं दागण्यात येऊ नयेत, असं आवाहन या संस्थेने यूके तसंच मित्रराष्ट्रांना केलं आहे.

फोटो स्रोत, Reuters
अफगाणिस्तानमध्ये गेली काही दशकं सुरू असलेल्या नागरी युद्धात हजारो नागरिकांचा बळी गेला आहे. न्यूयॉर्कमध्ये झालेल्या 9/11 हल्ल्यानंतर अमेरिकेच्या फौजा अफगाणिस्तानमध्ये तळ ठोकून आहेत. तालिबानचा बीमोड करण्याचा त्यांचा निर्धार आहे.
तालिबानची सत्ता उलथवण्यात आली मात्र काही काळानंतर तालिबानने अनेक प्रदेशांमध्ये कब्जा मिळवला. अमेरिकेच्या फौज लढत असलेलं हे सगळ्यांत प्रदीर्घ काळ चाललेलं नागरीयुद्ध आहे.
फेब्रुवारी महिन्यात अमेरिकेने करारानंतर आपलं सैन्य हळूहळू माघारी बोलवायला सुरुवात केली. मात्र तालिबानने पुन्हा एकदा हिंसक कारवायांना सुरुवात केली आहे. अफगाणिस्तान सरकार आणि तालिबान यांच्यात पुन्हा वाटाघाटी सुरू आहेत.
वीकेंडला काबूल शहरात विध्वंसक अशा रॉकेट हल्ल्यात काबुल शहरात आठजणांचा मृत्यू झाला. या हल्ल्यात तीसहून अधिकजण जखमी झाले.
गेल्या वर्षी बीबीसीच्या शोधमोहिमेत, हिंसक संघर्षाचा फटका संपूर्ण अफगाणिस्तानला बसत असल्याचं स्पष्ट झालं होतं. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यातील प्रत्येक हल्ल्याचं वृत्तांकन बीबीसीने केलं होतं.
परदेशी फौजांनी माघार घेतल्यानंतर, तालिबान्यांचा मुकाबला करू शकेल एवढी अफगाणिस्तान लष्कराची ताकद नसल्याचं तज्ज्ञांना वाटतं.
गेल्याच आठवड्यात अमेरिकेने आणखी फौजांना माघारी बोलावलं आहे. जानेवारीच्या मध्यापर्यंत 2,000 फौजा परत येतील, असं अमेरिकेने निश्चित केलं आहे. त्यानंतर अफगाणिस्तानमध्ये केवळ 2,500 अमेरिकेचे सैनिक बाकी राहतील.
एक तपापेक्षा म्हणजेच जवळपास तेरा वर्षं सुरू असलेल्या (2001-2014) कालावधीत सुरू असलेल्या संघर्षात तालिबान आणि अल कायदा यांच्याविरुद्धच्या लढाईत अफगाणिस्तानबरोबर यूकेही सहभागी आहे. 2014 मध्ये यूकेच्या कॉम्बॅक्ट ट्रूप्सनी अफगाणिस्तान सोडलं होतं.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








