स्वतःच्या रक्षणासाठी 15 वर्षांच्या नूरियानं उचलली बंदूक, पण कोणाला ठार केलं?

- Author, कावुन खामूश
- Role, बीबीसी फारसी सेवा
घरावर अतिरेक्यांनी हल्ला केला तेव्हा 15 वर्षांच्या नूरियाने स्वतःच्या संरक्षणासाठी एके-47 उचलली आणि दोन अतिरेक्यांना गोळ्या घालून ठार केलं, तर तिसरा अतिरेकी जखमी झाला. ही घटना जुलैच्या शेवटच्या आठवड्यातली होती.
या धाडसासाठी अफगाणिस्तान सरकारने नूरियाचं कौतुक केलं. मात्र, या घटनेच्या दोन आठवड्यांनंतर हल्लेखोरांची जी ओळख आधी सांगण्यात आली होती त्यावरच संशय व्यक्त होऊ लागला.
नूरियाने अतिरेक्यांवर गोळ्या झाडल्या की स्वतःच्या नवऱ्यालाच ठार केलं, असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत. त्या रात्री काय घडलं, याची कहाणी जेवढी थरारक तेवढीच गुंतागुंतीची आहे आहे.
नूरियाने तालिबानी अतिरेक्यांना ठार केलं की स्वतःच्या नवऱ्याला? की मग दोघांनाही?
या घटनेशी संबंधित असलेल्या सर्व व्यक्तींची नावं त्यांच्या सुरक्षेसाठी बदलण्यात आली आहेत.
ते रात्रीच्या अंधारात गावात शिरले. नूरियाने दिलेल्या माहितीनुसार रात्रीचा एक वाजला होता. तिच्या आई-वडिलांच्या घराच्या मुख्य दारावर जोरदार आवाज झाला.
या आवाजाने नूरियाला जाग आली. मात्र, ती शांत होती. तिच्या मनात तेव्हा दुसऱ्या खोलीत झोपलेल्या तिच्या भावाचा विचार आला.
यानंतर जे लोक घरात शिरले त्यांनी तिच्या आई-वडिलांना घराबाहेर काढल्याचा आवाज ऐकला. बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत नूरियाने संपूर्ण घटनाक्रम सांगितला.
यानंतर नूरियाला गोळीबाराचा आवाज ऐकू आला. अतिरेक्यांनी तिच्या आई-वडिलांना ठार केलं होतं. सतत दहशतीच्या छायेखाली असणाऱ्या या गावातच ती लहानाची मोठी झाली.
नूरिया तशी कमी बोलणारी मुलगी. मात्र, बंदूकीनं अचूक नेम कसा धरायचा, हे तिला माहिती होतं. स्वसंरक्षणासाठी बंदूक कशी चालवायची, हे नूरियाच्या वडिलांनी तिला लहानपणीच शिकवलं होतं.
त्या रात्री लपण्याऐवजी नूरियाने वडिलांची एके- 47 गन उचलली आणि बाहेर उभ्या लोकांवर गोळ्या झाडल्या. गोळ्या संपेपर्यंत फायरिंग केल्याचं नूरिया सांगते. जवळपास तासाभरानंतर ते सर्व निघून गेल्याचं नूरियानं सांगितलं.

फोटो स्रोत, Getty Images
घराबाहेर पाच मृतदेह पडले होते. यात एक तिच्या वडिलांचा आणि एक आईचा होता. शेजारी राहणाऱ्या वृद्ध गृहस्थांचाही मृत्यू झाला होता, तर दोन मृतदेह अतिरेक्यांचे होते.
नूरियाने सांगितलं, "तो सगळा प्रसंग खूप भीतीदायक होता. ते खूप क्रूर होते. माझे वडील अपंग होते. आई निर्दोष होती आणि तरीही त्यांनी त्यांना ठार केलं गेलं."
अफगाणिस्तानात लहानाचे मोठे झालेल्या तरुणांनी युद्धाव्यतिरिक्त काहीच बघितलेलं नाही.
सरकार समर्थक सुरक्षा दलं आणि तालिबान यांच्यातल्या संघर्षाला आता 25 वर्षं लोटून गेली आहेत. सरकार समर्थक दलं मोठी शहरं आणि मोठ्या गावांची सुरक्षा करतात. तालिबानच्या ताब्यात अतिदुर्गम असलेला मोठा परिसर आहे.
नूरियाच्या गावासारखी अनेक गावं कायम या दोघांच्या संघर्षात भरडली जातात.
नूरियाच्या घोर या ग्रामीण भागात तालिबान अतिरेकी कायमच सरकारी फौजांच्या ठाण्यांवर हल्ले चढवतात. अतिरेक्यांनी आपल्या वडिलांना ठार केलं कारण ते कबिल्याचे सरदार आणि सरकार समर्थक नेते होते, असं नूरिया आणि तिचे सावत्र बंधू जे सध्या लष्करात मोठ्या पदावर अधिकारी आहेत यांचं म्हणणं आहे
अफगाणिस्तानात का सुरू आहे युद्ध?
मात्र, घटनेच्या तीन आठवड्यांनंतर लोक घटनेचं वेगवेगळं चित्र रंगवतात. यात नूरिया, तिचे वडीलबंधू, ठार झालेल्या अतिरेक्यांचे कुटुंबीय, स्थानिक पोलीस, स्थानिक वडीलधारी मंडळी, तालिबान प्रतिनिधी आणि अफगाणिस्तान सरकार अशा सर्वांचाच समावेश आहे.

फोटो स्रोत, Getty Images
या घटनेसंबंधी लोकांनी बीबीसीकडे वेगवेगळी माहिती दिली आहे. त्यातल्या काहींचं म्हणणं आहे की, ठार झालेल्या व्यक्तींपैकी एक जण नूरियाचा पती होता आणि हा तालिबान विरुद्ध फौज असा संघर्ष नव्हता तर एक कौटुंबिक वाद होता.
या वक्तव्यांमधून नूरियासोबत नेमकं काय घडलं ते सत्य दडवण्याचा प्रयत्न होत आहे. यामधून ग्रामीण अफगाणिस्तानचं एक वास्तवही समोर येत आहे, ज्यामध्ये तरुण महिला त्यांना नियंत्रित करणाऱ्या कबिलाई-पितृसत्ताक संस्कृती आणि पारंपरिक रुढीत अडकलेल्या असतात.
नूरियाप्रमाणे इतर मुलींकडे कुठलीच ताकद नसते. त्यांना शिक्षण मिळत नाही आणि यांना कधी हिंसेत ओढलं जाईल, याची त्यांना स्वतःलाही कल्पना नसते.
त्या रात्री नेमकं काय झालं, यावरून वाद होण्याचं मूळ कारण आहे की, एवढ्या रात्री ते लोक तिथे का आले होते? त्या रात्री गावात हल्ला झाल्याचं सगळे मान्य करतात.
नूरियाने दिलेल्या माहितीनुसार त्या अनोळखी इसमांनी आपण मुजाहिद्दीनचे बंडखोर असल्याचं सांगितलं होतं आणि तिच्या वडिलांसाठी ते तिथे गेले होते.
या किशोरवयीन मुलीसोबत जी चकमक झाली त्यात आपला सहभाग नसल्याचं तालिबानने स्पष्ट केलं आहे. मात्र, त्या रात्री गावात हल्ला झाल्याचं तालिबान्यांचंही म्हणणं आहे. एका स्थानिक पोलीस चेक पॉइंटला लक्ष्य करण्यात आलं होतं आणि या चकमकीत दोन तालिबानी जखमी झाले. मात्र, कुणीच ठार झालं नाही, असं तालिबानचं म्हणणं आहे.
मात्र, अफगाणिस्तानातल्या स्थानिक आणि राष्ट्रीय अधिकाऱ्यांनी तालिबान्यांविरोधातल्या एका मोठ्या लढाईत यश मिळाल्याचा दावा केला आहे आणि नूरिया खरी 'हिरो' असल्याचं म्हटलं आहे.
नूरिया आणि तिच्या धाकट्या भावाला हेलिकॉप्टरने गावातून जवळच्याच एका सेफहाऊसमध्ये ठेवण्यात आलं आहे. मात्र, एका लहान मुलीने स्वसंरक्षणासाठी कशाप्रकारे शस्त्र उचललं, याची सोशल मीडियावर बरीच चर्चा झाली.
तालिबानी हल्ले परतवून लावण्याऱ्या नागरिकांचं सरकारकडून कौतुक होणं, अफगाणिस्तानात नवीन नाही. मात्र राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी यांनी नूरियाला काबुलला बोलावलं, तेव्हा त्यावर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या.
काहींनी तिला 'हिरो' म्हटलं तर काहींनी तिला 'दोन युद्धखोर पक्षांमध्ये भरडली जाणारी निर्दोष तरुणी' असल्याचं म्हटलं. यातल्या एका पक्षाने तिच्यावर हल्ला केला तर दुसऱ्याने तिचा पीआर स्टंटसाठी वापर केला.

फोटो स्रोत, LOCAL AFGHAN AUTHORITIES
एका ट्वीटर यूजरने लिहिलं आहे, "एक गोष्ट कळत नाही की, अशा एका देशात जिथे लोकांनी आयुष्य आणि शांततेची किंमत कळावी एवढे मृत्यू आणि हिंसा बघितली आहे तिथे हिंसेचं कौतुक कसं होऊ शकतं आणि शस्त्र उचलण्याला प्रोत्साहन कसं दिलं जाऊ शकतं?"
'हिंसेचं उत्तर हिंसा नाही'
एका यूजरने नूरियाला 'स्वतःचं आयुष्य वाचवण्यात यशस्वी ठरलेल्या अफगाण महिलांचं प्रतीक' म्हटलं.
"अनेक असे अफगाण नागरिक आहेत जे काहीच करू शकले नाही. तालिबान्यांच्या जिहादमुळे ते घायाळ झाले आहेत."
अधिकाऱ्यांनी बीबीसीला सांगितलं की, दुसऱ्या दिवशी पोलिसांना घटनास्थळावरून दोन मृतदेहांकडून त्यांची ओळखपत्रं मिळाली. ते दोघंही तालिबान समर्थक मानले जात होते.
जखमी झालेला आणि पळून जाण्यात यशस्वी ठरलेली तिसरी व्यक्ती तालिबान्याचा उच्च पदस्थ कमांडर मासूम कामरान होता.
बीबीसीनेदेखील ठार झालेले दोघे कोण होते हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. दोघंही विशीतले तरूण होते. त्यांनी पारंपरिक अफगाणी कपडे घातले होते. त्यांचे कुडते रक्ताने माखले होते.
तालिबान्यांशी संबंधित सूत्रांनी सांगितलं की, पोलिसांनी पळून गेलेल्या ज्या जखमी कमांडरचं नाव सांगितलं तो कमांडर खरंच जखमी झाला आहे. तो कुठे आणि कधी जखमी झाला, हे मात्र सूत्रांकडून कळू शकलेलं नाही.
नूरिया आणि तिच्या धाकट्या भावाला राष्ट्राध्यक्षांनी राजधानी काबूलला आमंत्रित केलं, त्यावेळी त्यांच्या आई-वडिलांचा मृत्यू एक दुःखद मात्र उघड उघड घटना वाटत होती.
मात्र, हल्ल्याच्या आठवड्याभरानंतर अशा काही बातम्या येऊ लागल्या की, मृतांमधला एक कोणी अनोळखी व्यक्ती नसून स्वतः नूरियाचा पती होता.

कुटुंबातले इतर सदस्य आणि स्थानिक सूत्रांनी बीबीसीला सांगितलं, की नूरियाचे पती रहीम तिला घेऊन जाण्यासाठी गावात आले होते. एका कौटुंबिक वादामुळे नूरियाचे वडील तिला माहेरी घेऊन आले होते.
नूरियाचे पती तालिबान्यांच्या गोटात सामिल झाले होते आणि तालिबानी अतिरेक्यांना घेऊन मध्यरात्री नूरियाच्या घरी गेल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे.
मात्र, आपलं लग्नच झालं नसल्याचं नूरियाचं म्हणणं आहे.
इतर काही लोकांच्या मते नूरियाची 'मोखी' डील झाली होती. या प्रथेनुसार दोन कुटुंबातल्या स्त्रियांची लग्न लावून दिली जातात. नूरिया रहिमची दुसरी पत्नी होती, तर नूरियाच्या वडिलांचं रहिमच्या किशोरवयीन पुतणीशी दुसरं लग्न झालं होतं. मात्र, दोन्ही मुलींचं वय कमी असल्यामुळे काही वर्षं या दोन्ही मुली आपापल्या माहेरीच राहतील, असं ठरलं होतं. ग्रामीण अफगाणिस्तानात अशा प्रकारच्या घटनांची सत्यता पडताळणं सोपं नाही.
नूरियाचं गाव एका मोठ्या मैदानी परिसरात आहेत. गावाच्या चहुबाजूंनी मोठे डोंगर आहेत. फोन सिग्नलसाठीसुद्धा गावकऱ्यांना डोंगरावर जावं लागतं.
रहीम खरंच नूरियाचा पती होता का, हे जाणून घेण्यासाठी बीबीसीने रहीमच्या आई शफिका यांना शोधून काढलं. शफिका निमरूज प्रांतात मुलाची पहिली पत्नी आणि त्याच्या दोन मुलांसोबत राहते.
नूरियाचं लग्न तीन वर्षांपूर्वी 'मोखी' प्रथेनुसार झाल्याचं त्यांनी कबूल केलं. रहीमच्या एका पुतणीचं नूरियाच्या वडिलांशी दुसरं लग्न झाल्याचंही त्यांनी सांगितलं. मात्र, दोन वर्षांपूर्वी रहीम हेलमंडमध्ये काम करत असताना एक दिवस नूरियाचे वडील घरी आले आणि रहीमच्या पुतणीला घरी सोडून नूरियाला घेऊन गेल्याचं त्यांचं म्हणणं आहे.
हा वाद मिटवण्यासाठी गावातल्या प्रतिष्ठित लोकांची मदत घेण्याचा आपण प्रयत्न केला. पण आम्ही गरीब असल्यामुळे आम्हाला ते करता आलं नाही, असंही शफिका यांनी सांगितलं.
त्या रात्री रहीम नूरियाला घ्यायला तिच्या माहेरी गेला होता. मात्र, कुणाला ठार करण्याचा त्याचा इरादा नव्हता, असंही त्यांचं म्हणणं आहे.
त्यांचा मुलगा तालिबानी अतिरेकी असल्याचाही त्या इनकार करतात. मात्र, दोन वर्षांपूर्वी रहीम कामानिमित्त हेलमंडला गेल्याची ही कहाणी तालिबानी सूत्रांनी सांगितलेल्या टाईमलाईनशी मॅच होते. रहीम दोन वर्षांपूर्वी हेलमंडमधल्या तालिबान्यांच्या नेटवर्कचा भाग होता आणि त्यानंतर त्याने नूरियाशी लग्न केल्याचं तालिबानी सूत्रांचं म्हणणं होतं.
मात्र, शफिकाचं म्हणणं आहे, "माझा मुलगा तालिबानचा सदस्य नाही. तो बांधकामावर जातो. आयुष्यात त्याने कधीच बंदूक हातातसुद्धा घेतलेली नाही. आम्ही गरीब आहोत. आमचं कुणीच ऐकत नाही."

12 वर्षापूर्वी रहिमचा एक भाऊ जो पोलीस अधिकारी होता त्याचा निमरुजच्या आत्मघातकी बॉम्बस्फोटात मृत्यू झाल्याचंही शफिका सांगतात.
शफिका यांच्या घरात आता एकही कर्ता पुरूष नाही. शफिकासुद्धा हिंसेच्या दुष्टचक्रात अडकलेल्या अऩेक अफगाणी महिलांपैकी एक आहेत.
मात्र, नूरियाच्या प्रांतातले स्थानिक पोलीस, आसपासच्या गावचे सरपंच आणि अफगाणिस्तानच्या केंद्रिय अधिकाऱ्यांच्या म्हणणाऱ्यानुसार नूरियाचं लग्नच झालेलं नाही.
नूरियाच्या घरावर झालेला हल्ला अतिरेक्यांचा एक रुटीन हल्ला होता आणि नूरियाच्या वडिलांना त्यांनी लक्ष्य केलं होतं, असं त्यांचं म्हणणं आहे.
त्या रात्री नेमकं काय झालं, हे खूपच कमी लोकांना माहिती आहे. कदाचिक नूरिया आणि तिच्या धाकट्या भावालाच त्या रात्रीची खरी कहाणी माहिती असावी.
हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी नूरियाच्या आई-वडिलांवर अंत्यसंस्काराची तयारी सुरू होती, त्याच वेळी दुसरीकडे अफगाणिस्तान सरकार आणि तालिबानी यांच्यातल्या पहिल्या थेट शांतता चर्चेची तयारी सुरू होती.
या चर्चेतून सामान्य अफगाणी नागरिकांना खूप आशा आहेत. कारण हजारो निष्पाप अफगाणी दर महिन्याला मारले जात आहेत.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








