तालिबानी राजवटीच्या आधीपासून अफगाणिस्तानच्या कैदेत असलेल्या भारतीय महिलेची कहाणी

फोटो स्रोत, Sreekesh r
- Author, इम्रान कुरेशी
- Role, बीबीसी हिंदीसाठी
"मुलगी अफगाणिस्तानच्या तुरुंगात कैद होती, तेव्हा बरं होतं. पण आता तिची स्थिती आगीतून फुफाट्यातप्रमाणे होईल की काय, याची भीती वाटते."
केरळच्या तिरुअनंतपुरममध्ये राहणाऱ्या बिंदू संपत यांनी बीबीसी हिंदीशी बोलताना काही गोष्टी सांगितल्या.
अफगाणिस्तानातून काबूलमधून एका पत्रकाराने फोन केला होता. तिथल्या तुरुंगांमध्ये कैद असलेल्या पुरुषांना सोडण्यात आलं आहे. पण महिलांविषयी कोणतीच माहिती उपलब्ध नाही, असं त्यांनी सांगितलं. या गोष्टीला आता चार दिवस उलटून गेले आहेत."
त्या आपली मुलगी निमिशा उर्फ फातिमा ईसा आणि पाच वर्षीय नात उम्मू कुलूसू यांच्याविषयी बोलत होत्या.
2016 मध्ये इस्लामिक स्टेटमध्ये सहभागी होण्यासाठी केरळमधून गेलेल्या 21 जणांमध्ये निमिशा आणि तिचे पती बेक्सेन विन्सेंट उर्फ ईसा यांचा समावेश होता. त्यासाठी ते केरळमधून श्रीलंकेला गेले होते.
मुलीला परत आणण्याच्या प्रयत्नात आई
तेव्हापासून बिंदू आपली मुलगी आणि नात यांना भारतात परत आणण्यासाठी खूप संघर्ष करत आहेत. पण इस्लामिक स्टेटकडून लढत असताना अमेरिकेच्या बॉम्बहल्ल्यात विन्सेंट यांचा मृत्यू झाला. त्यानंतर बिंदू यांचा संघर्ष आणखीनच वाढला.

फोटो स्रोत, SREEKESH R
निमिशा आणि उम्मू अफगाणिस्तानच्या तुरुंगात कैदेत होते, तोपर्यंत बिंदू परराष्ट्र मंत्रालयासह केंद्र सरकारमध्ये इतर अनेक ठिकाणी पत्र लिहून आपली मुलगी आणि नात यांना सोडवण्याचा प्रयत्न करत होत्या.
बिंदू यांनी आपल्या मागणीसाठी दोनवेळा केरळ हायकोर्टाचा दरवाजा ठोठावला आहे.
निमिशा यांना इस्लामिक स्टेटसारख्या संघटनेत सहभागी होण्यासाठी भारतीय कायद्यानुसार शिक्षा मिळावी, तर नात उम्मू हिला आपल्यासोबत राहण्याची परवानगी मिळावी, अशी विनंती बिंदू यांनी केली आहे.
हायकोर्टात त्यांच्या याचिकेवर आता 24 ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे. पण आता ही सुनावणी सुरू ठेवावी की नाही, याबाबत बिंदू संभ्रमावस्थेत आहेत.
बीबीसीशी बोलताना बिंदू यांनी म्हटलं, "मला हे प्रकरण पुढे न्यायचं नाही. त्याआधी त्या कुठे आहेत, याची माहिती मला हवी आहे."
हे सांगताना बिंदू खूप त्रस्त झाल्याचं दिसून येत होतं. बिंदू यांनी बीबीसीसोबत 2016 मध्येही संवाद साधला होता. पण तेव्हापेक्षा आता त्या जास्त त्रस्त वाटत होत्या.
निमिशा यांच्यात अचानक झाला बदल
बिंदू यांनी सांगितलं होतं की कशा प्रकारे निमिशाच्या स्वभावात अचानक बदल झाला होता.
निमिशा यांनी 2015 च्या नोव्हेंबर महिन्यापासून आईला फोन करणं बंद केलं.
निमिशा त्यावेळी कासरगोडच्या एका डेंटल कॉलेजमध्ये शिक्षण घेत होत्या. तर त्यांची आई बिंदू तिरुअनंतपुरम येथे राहायची.

फोटो स्रोत, Reuters
मुलीशी संपर्क होत नसल्याने बिंदू चिंताग्रस्त झाल्या. चौकशी केल्यानंतर त्यांना कळलं की तिने लग्न केलं. तेव्हापासूनच निमिशा गायब झाल्या होत्या.
9 नोव्हेंबर 2015 रोजी निमिशाच्या सावत्र वडिलांनी कासरगोड पोलिसांत बेपत्ता तक्रार दाखल केली. पोलिसांनी वेगाने कारवाई करत निमिशा यांना न्यायालयात हजर केलं. तिथं त्यांना सोडून देण्यात आलं.
बिंदू यांनी केरळ हायकोर्टात हिबियस कॉर्पस पीटिशन दाखल केली. निमिशा तिचे पती बेक्सन यांना हजर होण्याची आणि त्यांच्या धर्मांतराची चौकशी करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली.
यानंतर 25 नोव्हेंबर 2015 रोजी हायकोर्टाने ही याचिका फेटाळून लावली. निमिशा एक प्रौढ व्यक्ती आहे. तिला आपल्या मर्जीने लग्न करण्याचा अधिकार आहे, असं कोर्टाने म्हटलं.
बिंदू यांनी आपल्या मुलीचं धर्मांतर शांततेने स्वीकारलं. त्यांनी आपली मुलगी आणि जावई यांना आपल्यासोबत राहण्याची विनंती केली.
बेक्सन यांनी ख्रिश्चन धर्माचा त्याग करून इस्लाम धर्म स्वीकारला होता. त्यानंतर निमिशा अनेकवेळा आपल्या आईला भेटण्यासाठी तिरुअनंतपुरमला आल्या होत्या.
इस्लामिक स्टेटमध्ये सहभागी होण्यासाठी गेले
2016 च्या मे महिन्यात आपण श्रीलंकेला जात असल्याचं बेक्सन यांनी बिंदू यांना सांगितलं.
त्यावेळी निमिशा गरोदर होत्या. त्यामुळे बिंदू यांनी त्यांना प्रवास करण्यास टाळायला लावण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी निमिशा यांचा सातवा महिना सुरू होता.
दोन दिवसांनी म्हणजेच 17 मे 2016 रोजी बेक्सन आणि निमिशा श्रीलंकेला निघून गेले.
पण जुलै 2017 मध्ये बिंदू यांना आपल्या आयुष्यातला सर्वात मोठा धक्का बसला.
केरळमधून इस्लामिक स्टेटमध्ये सहभागी होण्यासाठी अफगाणिस्तानला गेलेल्या 21 जणांच्या यादीत आपली मुलगी आणि जावई यांचा समावेश असल्याचं बिंदू यांना कळालं.
सुरुवातीला बिंदू यांचा या बातमीवर विश्वासच बसला नाही.
अफगाणिस्तानात कैदेत
राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) 2016 मध्ये दहशतवादी संघटनेत सहभागी होणाऱ्या बेपत्ता लोकांसंदर्भात तपास सुरू केला होता.

फोटो स्रोत, Getty Images
दोन वर्षांपूर्वी अफगाणिस्तानातून एक बातमी आली होती. त्यामध्ये निमिशासह 10 महिलांनी अफगाणिस्तान सरकारसमोर आत्मसमर्पण केल्याचं म्हटलं होतं.
याचा अर्थ बिंदू यांच्यासाठी ही नव्या संघर्षाची सुरुवात होती.
त्यावेळी भारताने इस्लामिक स्टेटमध्ये सहभागी होण्यासाठी गेलेल्या नशीदुल हमजफर या तरुणाला भारतात आणलं होतं. त्यामुळे निमिशाही भारतात परतू शकते, असं बिंदू यांना वाटू लागलं.
याबाबत त्यांनी हीबियस कॉर्पस पीटिशन दाखल केली. पण निमिशा जेलमध्ये असल्यामुळे ते शक्य नसल्याचं त्यांना सांगण्यात आलं.
निमिशा एका तुरुंगात कैदेत असल्याचं मला एका पत्रकाराने सांगितलं होतं, असं बिंदू म्हणतात.
हायकोर्टाने ही याचिका मागे घेऊन दुसरी याचिका दाखल करण्याची परवानगी दिली. त्या याचिकेवर आता 24 ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे.
दरम्यान, तालिबानने काबूलवर हल्ला करून अफगाणिस्तानची सत्ता आपल्या ताब्यात घेतली आहे. यामुळे बिंदू यांच्या अपेक्षा वाढल्या होत्या. पण आता त्यांची कोणतीच माहिती उपलब्ध नसल्याने त्या पुन्हा निराश झाल्या आहेत.
एका महिला पत्रकाराशी नुकतंच त्यांचं बोलणं झालं. अफगाणिस्तानातील तुरुंगांमधून पुरुषांना सोडण्यात आलं आहे. पण महिला कैद्यांबाबत काहीच माहिती नाही, असं पत्रकाराने त्यांना सांगितलं.
तरीही बिंदू यांनी अद्याप उमेद सोडली नाही.
त्या सांगतात, माझा देवावर विश्वास आहे. देव सत्यासाठीच काम करतो. राजकारण, जात किंवा धर्मासाठी नाही. अशा स्थितीत वाट पाहणं हेच माझ्या हातात आहे."
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








