अफगाणिस्तान : विरोधकांना ओळखण्यासाठी तालिबान वापरतंय 'ही' पद्धत - ग्राऊंड रिपोर्ट

अफगाणिस्तान, तालिबान

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, खुदा-ए-नूर नासिर
    • Role, बीबीसी, इस्लामाबाद

दक्षिण अफगाणिस्तानातील कंदहार प्रांताच्या कंदहार या राजधानीच्या शहरापासून देशाची राजधानी काबुलपर्यंत जाणाऱ्या मुख्य मार्गावरचा बहुतांश भाग तालिबान्यांच्या ताब्यात आहे.

या मार्गावरची तीन किंवा चार मोठी शहरंचं अफगाणिस्तान सरकारच्या नियंत्रणात आहेत. कंदहारचे रहिवासी असलेले दाऊद (नाव बदललेलं आहे) यांनी नुकताच कंदहार ते काबुल हा प्रवास केला. प्रवासाचा हा अनुभव त्यांनी बीबीसी ऊर्दूला सांगितला.

कंदहार शहरातून बाहेर पडताच तालिबान्यांचे पांढरे झेंडे दिसू लागतात. ठिकठिकाणी रस्त्याच्या दोन्ही बाजूला तालिबानी उभे असलेले दिसतात.

अनेक ठिकाणी अफगाण सैन्याशी झालेल्या चकमकीनंतर जप्त केलेल्या सैन्याच्या गाड्याही दिसतात. त्या गाड्यांवरही तीन रंगांच्या अफगाणी राष्ट्रध्वजाऐवजी तालिबान्यांचे पांढरे झेंडे फडकताना दिसतात.

कंदहार शहरापासून जाबुल प्रांताची राजधानी असलेल्या कलात शहरापर्यंत रस्त्याच्या आसपासचा सर्व परिसर तालिबान्यांच्या नियंत्रणात असल्याचं दिसलं. कंदहार शहरातून निघाल्यानंतर कलात शहराच्या आत पहिल्यांदा अफगाण सैन्य दिसलं.

कलातनंतर काबुलपर्यंत संपूर्ण रस्त्यात अफगाणिस्तान सरकारचं नियंत्रण केवळ शहरांमध्ये दिसलं. शहराच्या बाहेरील भागांपासून ते दुर्गम भागातील गावांपर्यंत सर्व परिसरात तालिबान्यांचं प्रभुत्व जाणवलं.

तालिबान

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक छायाचित्र

मार्गात तालिबानी अतिरेक्यांनी अफगाण सैन्याचे चेक पोस्ट असणाऱ्या सर्वच ठिकाणांवर पांढरे झेंडे फडकावले होते.

तालिबानी रस्त्यातल्या सर्वच गाड्या थांबवत नव्हते आणि सर्वच गाड्यांची झडतीही घेत नव्हते. मात्र, ज्या गाड्यांविषयी तालिबानी गुप्तहेरांच्या जाळ्याने आधीच सूचना दिलेली असेल त्यांना थांबवून गाडीतली प्रत्येकाची झडती घेतली जात होती.

तालिबानी गुप्तहेरांचं जाळं

दाऊदसह त्या मार्गावरून प्रवास करणाऱ्या इतर दोन प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार तालिबान्यांचे गुप्तहेर कंदहार आणि काबुलमध्ये तर आहेतच. शिवाय, मार्गातील सर्वच बसस्टॉप आणि महत्त्वाच्या ठिकाणीही आहेत आणि हे गुप्तहेर या मार्गावरून जाणाऱ्या प्रत्येकावर बारिक लक्ष ठेवतात.

अफगाणिस्तान, तालिबान

फोटो स्रोत, Getty Images

जिथे कुठे त्यांना एखाद्यावर जराही संशय आला त्याचा पाठलाग करतात आणि ज्या गाडीतून ती व्यक्ती जात असेल त्या गाडीचा नंबर आणि संबंधित व्यक्तींचं वर्णन मोबाईलवरून पुढे रस्त्यात उभ्या असलेल्या आपल्या सहकाऱ्यांना कळवतात.

प्रवासादरम्यान तालिबानी ज्यांना चौकशीसाठी गाडीबाहेर उतरवत होते त्यापैकी बहुतांश सरकारी कर्मचारी, अफगाण लष्कर किंवा पोलीस विभागाशी संबंधित व्यक्ती किंवा तालिबानविरोधी असण्याचा संशय असणारे असायचे, असं दाऊद यांचं म्हणणं होतं.

प्रवासात स्मार्टफोन का बाळगत नाहीत?

कंदहारहून काबुल किंवा काबुलहून कंदहारपर्यंत प्रवास करण्यासाठी या मार्गावरून जाणाऱ्या बहुतांश लोकांकडे स्मार्टफोन नसतो. दाऊदनेही आपला स्मार्टफोन सामानात लपवून ठेवला होता आणि एक साधा सेल फोन सोबत ठेवला.

अफगाणिस्तान, तालिबान

फोटो स्रोत, Getty Images

प्रवासात लोक स्मार्टफोन सोबत ठेवत नाहीत कारण तालिबान्यांनी झडती घेतली आणि स्मार्टफोन त्यांच्या हाती लागला तर ते मोबाईलमधला सगळा डेटा तपासतात. मोबाईलमधल्या सर्व फोटोंविषयीही प्रश्न विचारतात, असं दाऊद यांनी सांगितलं.

दाऊदने आपल्या एका मित्राचा अनुभव सांगितला. त्यांचा मित्र स्मार्टफोन घेऊन जात असताना तालिबान्यांनी त्याची झडती घेतली. स्मार्टफोनमधल्या एका महिलेचा फोटो कुणाचा आहे, अशी विचारणा त्याला (दाऊद यांच्या मित्राला) करण्यात आली.

मित्राने ती स्त्री पत्नी असल्याचं सांगितल्यावर तालिबान्यांनी त्याच्या कानशिलात तर लगावलीच शिवाय 'महिलांचे फोटो घेतल्याने अश्लिलता आणि नग्नता पसरत असल्याचं' म्हणत स्मार्टफोन फोडला.

इतकंच नाही तर मोबाईलमध्ये अफगाणी लष्कर किंवा पोलिसांपैकी कुणाचा फोटो आढळल्यास त्याचीही इंतभूत झाडाझडती घेतली जात असल्याचं दाऊद यांनी सांगितलं.

अशा व्यक्ती अफगाणी सैनिक किंवा पोलीस कर्मचारी असल्याचा त्यांना संशय असतो आणि यात थोडंही तथ्य आढळल्याास त्या व्यक्तीचं तिथेच अपहरण होतं. दाऊदने बीबीसीला तालिबान्यांची झडती घेण्याच्या अनोख्या पद्धतीचीही माहिती दिली.

अफगाणिस्तान, तालिबान

फोटो स्रोत, Getty Images

दाऊद यांच्या ओळखीतल्या एका व्यक्तीच्या मोबाईलमध्ये काही अफगाण अधिकाऱ्यांचे फोटो होते. तालिबान्यांनी त्या व्यक्तीला तिथेच गाडीतून उतरवलं आणि जवळच असलेल्या चौकीत घेऊन गेले.

बीबीसीला त्या घटनेची माहिती देताना दाऊद यांनी सांगितलं की त्या व्यक्तीच्या डायल लिस्टमधल्या एका नंबरवर तालिबान्यांनी कॉल केला. कॉल रिसिव्ह केल्यावर आपण अफगाण पोलीस अधिकारी बोलत असल्याचं त्या तालिबानी अतिरेक्याने सांगितलं आणि ज्या व्यक्तीच्या फोनवरून आपण बोलतोय त्याच्या गाडीचा अपघात झाला आहे. तेव्हा तुम्ही त्यांच्याविषयी अधिक माहिती दिल्यास त्यांना मदत करता येईल, असं सांगितलं.

समोरच्या व्यक्तीने जी माहिती दिली त्यात संबंधित व्यक्तीचा पोलीस किंवा सैन्याशी कसलाच संबंध नसल्याचं स्पष्ट झालं. त्यामुळे तालिबान्यांनी त्याला सोडलं खरं. पण, त्याचा स्मार्टफोन फोडून टाकला.

'विशिष्ट कंपनीचं सिमकार्ड आढळल्यास खायला सांगतात'

काबुल ते कंदहारच्या या मार्गावरून प्रवास करताना बहुतांश लोक जसे स्मार्टफोन सोबत ठेवत नाहीत. तसेच अफगाणिस्तानच्या सरकारी दूरसंचार कंपनीचं सिमकार्डही सोबत ठेवत नाहीत.

अफगाणिस्तान, तालिबान

फोटो स्रोत, Getty Images

कारण एखाद्याजवळ अफगाण दूरसंचार कंपनीचं सिमकार्ड आढळल्यास तालिबानी बळजबरीने ते सिमकार्ड चावून खायला सांगतात. अफगाणिस्तानातील सरकारी दूरसंचार कंपनी असलेली 'सलाम' ही कंपनी गेल्या अनेक वर्षांपासून तालिबान्यांच्या हिटलिस्टवर आहे.

याआधी तालिबान्यांनी अनेक प्रांतात सेवा पुरवणाऱ्या मोबाईल कंपन्यांना रात्री सिग्नल बंद करण्याच्या धमक्या दिल्या आहेत. अनेक कंपन्यांनी ही मागणी मान्य केली होती.

मात्र, सलाम टेलिकॉम सरकारी कंपनी असल्याने त्यांनी तालिबान्यांची ही मागणी कधीच मान्य केली नाही आणि याच कारणामुळे तालिबान आजही या कंपनीविरोधात असल्याचं बोललं जातं.

रात्रीच्या वेळी मोबाईल फोनच्या माध्यमातून तालिबानी अतिरेक्यांवर पाळत ठेवली जाते आणि याच माहितीच्या आधारे अफगाणिस्तानचं सैन्य त्यांच्या तळांवर हवाई किंवा जमिनीवरून हल्ले चढवतात, असं तालिबान्यांचं म्हणणं आहे आणि म्हणूनच रात्री मोबाईल सिग्नल बंद करण्यासाठी तालिबानी दबाव टाकतात.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)