तालिबानकडून अफगाणिस्तान सीमा बंद, भारतातील व्यापारावर काय परिणाम होईल?

अफगाणिस्तान-पाकिस्तान सीमा

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, अफगाणिस्तान-पाकिस्तान सीमा
    • Author, अभिजित श्रीवास्तव
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

तालिबानने काबूलवर ताबा मिळवल्यानंतर व्यापाराबाबत सर्वाधिक चिंता व्यक्त केली जात होती. ती आता खरी होताना दिसत आहे. तालिबानबरोबर व्यवहार बंद केल्याचं भारताने सांगितलं आहे.

अफगाणिस्तान चारी बाजुंनी मैदानी प्रदेशांनी वेढलेला देश आहे. भारताबरोबर व्यापार करायचा असेल तर तो पाकिस्तानमधून जातो. दोन्ही देशात रस्त्यावाटे होणारा व्यापार आता ठप्प झाला आहे.

Federation of Indian exports organisation चे महासंचालक अजय सहाय बीबीसीशी बोलताना म्हणाले, "तालिबानने अफगाणिस्तानहून पाकिस्तानची सीमा बंद केली आहे. अफगाणिस्तानमधून होणारी आयात पाकिस्तानच्या ट्रांझिट रूटमधून होते. सध्या हा मार्ग बंद आहे. जोपर्यंत हा मार्ग बंद आहे तोपर्यंत सीमेकडून होणारा व्यापार बंद आहे. निर्यातदार सध्या चिंतेत आहेत. सध्या गुंतागुंतीची आणि चिंताजनक परिस्थिती झाली आहे. आम्ही यावर लक्ष ठेवून आहोत."

अफगाणिस्तान मधील निर्यात

अफगाणातील सकल राष्ट्रीय उत्पादनात निर्यातीचा वाटा 20 टक्के आहे. म्हणजे अर्थव्यवस्थेचा एक पंचमांश भाग निर्यातीवर अवलंबून आहे. त्यांच्या निर्यातीत मोठा वाटा ब्लँकेट आणि रजयांचा आहे. नंतर सुका मेवा(31 टक्के) आणि औषधी वनस्पती (12 टक्के) आहे.

अफगाणिस्तान सर्वांत जास्त निर्यात पाकिस्तानात (48 टक्के) करतो. त्यानंतर भारत (19 टक्के) आणि तिसऱ्या क्रमांकावर रशिया (9 टक्के). इतर देशांमध्ये इराण, इराक आणि तुर्कस्तानाचा समावेश आहे.

10 हजार कोटीपेक्षा द्विपक्षीय व्यापार

गेल्या 20 वर्षांत भारत आणि अफगाणिस्तान यांचे संबंध चांगले होते. तिथे धरणं, शाळा, रस्ते यांच्या विकासासाठी भारताने लाखो रुपये गुंतवले आहेत. अफगाणिस्तानच्या संसदेची इमारत उभारण्यात भारताचा सिंहाचा वाटा आहे.

निर्यातीच्या बाबतीत बोलायचं झालं तर पाकिस्ताननंतर सगळ्यांत जास्त निर्यात भारतात केली जाते.

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात गेल्यावर्षी 10,387 कोटींचा व्यापार झाला तर 2019-20 मध्ये 11,131 कोटींचा व्यापार झाला.

अन्नपदार्थ

फोटो स्रोत, Getty Images

2020-21 मध्ये भारताने अंदाजे 6,129 कोटींची निर्यात केली होती, तर 3,783 कोटींची आयात केली होती. तर 2019-20 यावर्षात अफगाणिस्तानने भारतात 7,410 कोटींची निर्यात केली होती तर भारताने 3,936 कोटींची आयात केली होती.

2001 मध्ये तालिबान सरकार पडल्यावर अफगाणिस्तान आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी खुला झाला. त्यानंतर गेली 20 वर्षं अर्थव्यवस्थेच्या सक्षमीकरणासाठी इतर देशांवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून होता. भारताचा त्यात मोठा वाटा होता.

अनेक योजनांबरोबर दोन्ही देशामध्ये मोठे करारही झाले.

अफगाणिस्तानकडून भारत काय विकत घेतो?

जगभरात आयात होणाऱ्या सुक्या मेव्यात अक्रोड आणि बदामचा 80 टक्के भाग युरोप आणि आशियात जातो. 2006-2016 या काळात जगाकडून होणाऱ्या आयातीत दुपटीने वाढ झाली.

आशियामध्ये सगळ्यांत मोठे आयातदार चीन, भारत आणि व्हिएतनाम आहेत. तिथे गेल्या दीड दशकात आर्थिक विकासात मोठी वाढ झाली आहे.

अफगाणिस्तान ड्राय फ्रुटचा सगळ्यांत मोठा निर्यातदार नसला तरी भारत अफगाणिस्तानकडून ड्रायफ्रुटचा सगळ्यांत मोठा आयातदार आहे.

अफगाणिस्तान- भारत व्यापार

फोटो स्रोत, Getty Images

अजय सहाय सांगतात, "आम्ही अफगाणिस्तानातून जे आयात करतो त्यात सगळ्यांत मोठा वाटा ड्रायफ्रुटचा आहे. काही फ्रेश फ्रुटचा आहे. काही मसाले आहेत, काही प्रमाणात कांदाही खरेदी केला जातो. सीमा बंद केल्यामुळे ड्राय फ्रुटवर सगळ्यांत जास्त परिणाम होणार आहे."

अफगाणिस्तानमधून विकत घेतल्या जाणाऱ्या पदार्थांची यादी मोठी आहे. तिथून भारत बदाम अक्रोड, किसमिस, अंजीर, पिस्ता, पाईन नट, जर्दाळूची आयात करतो.

अक्रोड

फोटो स्रोत, Getty Images

तसंच फळांमध्ये जर्दाळू, डाळिंब, सफरचंद,चेरी, खरबूज आणि अनेक औषधी जडीबुटींचा समावेश आहे. त्याशिवाय हिंग, केशर यांचीही आयात होते.

निर्यातीवर परिणाम

भारत ज्या गोष्टी अफगाणिस्तानला विकतो त्यात औषधं, चहा, कॉफी यांचा समावेश आहे. भारताकडून काळीमिरी आणि कापसाची निर्यात होते.

अजय सहाय म्हणतात, "आपली बहुतांश निर्यात इराणहून जाते. काही दुबईहून जाते. निर्यातदार सध्या चिंतेत आहेत. काही जण वाट पाहत आहे. तर काही निर्यातदारांना वाट पाहण्यास सांगितलं आहे."

व्यापाऱ्यांना क्रेडिट इन्शुरन्स घ्यायला सांगण्यात येत आहे, कारण येत्या काही दिवसात याचा परिणाम नक्कीच होणार आहे.

तालिबान

फोटो स्रोत, Reuters

ते सांगतात, "अफगाणिस्तानातील सध्याची स्थिती पाहता पैशांच्या व्यवहारावर काय बंधनं येतील ते सांगता येत नाही. आम्ही या परिस्थितीवर नजर ठेवून आहोत. मात्र अशी परिस्थिती निर्माण झाली की निर्यातीवर परिणाम होतोच."

"भारताच्या निर्यातीचा एक भाग अफगाणिस्तानात जातो मात्र बाजारावर परिणाम होण्याइतपत तो मोठा नाही. एखाद्या निर्यातदारावर याचा परिणाम होईल, पण अगदी एखाद्या क्षेत्रावर त्याचा परिणाम होणार नाही."

आयात थांबली की अफवांमुळेच किंमती वाढतात आणि व्यापार बंद झाला तर ड्रायफ्रुटच्या किंमतीवर नक्कीच परिणाम होईल.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)