अफगाणिस्तान: तालिबान खरंच बदललं आहे की नाटक करत आहे?

अफगाणिस्तान
    • Author, सरोज सिंह
    • Role, बीबीसी हिंदी प्रतिनिधी

(शरिया कायद्यानुसार महिलांना हक्क मिळतील असं वक्तव्य तालिबानने केलं आहे. अनेक जण म्हणत आहे नवं तालिबान वेगळं आहे. हे सत्य आहे की केवळ देखावा. )

ही 1996 ची गोष्ट आहे.

मरियम तेव्हा फक्त 19 वर्षांची होती. अफगाणिस्तानातील मजार-ए-शरीफ मध्ये मेडिकलचा अभ्यास करत होती.

अचानक एका दिवसात तिच्या आसपासचं पूर्ण जग बदललं. तालिबानने मजार-ए-शरीफवर ताबा मिळवल्यानंतर तिला आपलं शिक्षण अर्धवट सोडावं लागलं.

तालिबानची सत्ता आल्यावर त्यांनी स्त्रियांच्या शिक्षणावर बंदी घातली. जर महिला घराबाहेर निघाल्या तर पोलीस त्यांना मारहाण करायचे.

त्यांना फक्त वडील, भाऊ, आणि नवऱ्याबरोबर जायची परवानगी होती. त्यादरम्यान सार्वजनिक मृत्यूदंड देण्याची, सार्वजनिकरित्या दगड मारण्याची, हात पाय कापण्यासारखी शिक्षा अगदीच नेहमीची होती.

या सर्वांची भीती मनात बसल्यामुळे तिला शिक्षण सोडावं लागलं. ती घरातच कैद झाली. मात्र जेव्हा 2001 मध्ये अमेरिका आणि नाटो देशांनी अफगाणिस्तानवर हल्ला केला तेव्हा तिचं शिक्षण पूर्ण झालं.

रविवारी तालिबानने काबूलवर ताबा मिळवला आणि या सगळ्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या.

आता 17 ऑगस्ट 2021 कडे येऊया..

काबूलवर तालिबानने ताबा मिळवल्यानंतर दोन दिवस मी ज्या हॉटेलमध्ये थांबलो आहे तिथल्या कर्मचाऱ्यांनी दोन दिवस दाढीसुद्धा केली नाही.

हॉटेल मधल्या महिला कर्मचारी आता रिसेप्शन, रुम सर्व्हिस, आणि सफाईचं काम करत नाही. त्या हॉटेलमधून गायब आहेत.

हॉटेलमध्ये बॅकग्राऊंडमध्ये जे संगीत सुरू होतं ते आता बंद झालं आहे. हे असं का झालं असं मी जेव्हा विचारलं तेव्हा त्यांचं उत्तर होतं की तालिबानशी निगडीत आमचे मित्र इथे आहेत.

तालिबान 2.0 विरुद्ध तालिबान 1.0

1996 आणि 2021 मधल्या या दोन घटना आहेत. हे तेव्हाचे आणि आताच्या तालिबानच्या स्थितीचं वर्णन करतात.दोन्हीमध्ये फारसा फरक आहे असं काही नाही.

या दोन घटनांच्या मते तालिबानचा एक तिसरा चेहरा मंगळवारी रात्री जगासमोर आला.

अफगाणिस्तानवर पुन्हा नियंत्रण मिळाल्यावर मंगळवारी पत्रकार परिषद घेतली.

तालिबानचा प्रवक्ता जबिबुल्लाह मुजाहिद पत्रकार परिषदेत म्हणाले, "आम्ही आंतरराष्ट्रीय समुदायाला भरवसा देऊ इच्छितो की त्यांच्याबरोबर कोणताही भेदभाव केला जाणार नाही. अफगाणिस्तान आता संघर्षाची भूमी राहणार नाही.

आम्ही ज्यांच्या विरुद्ध लढलो त्यांना आम्ही माफ केलं आहे. आता आमचं त्यांच्याशी शत्रुत्व नाही. आम्ही शरिया कायद्यानुसार महिलांना त्यांचे हक्क देण्यास कटिबद्ध आहोत. महिला आमच्याबरोबरीने काम करतील."

तालिबान

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, तालिबानची पत्रकार परिषद

आज तालिबान महिलांना कॅमेऱ्यासमोर काम करण्याची सूट देण्याची चर्चा करत असतात मात्र प्रत्यक्षात तशी परिस्थिती नाही.

त्यामुळे चर्चा अशी आहे की 1996 आणि 2021 मधल्या तालिबानमध्ये काहीतरी फरक आहे का? हा फक्त देखावा आहे की काळाची गरज?

तालिबान खरंच बदलतो आहे का?

आंतरराष्ट्रीय संबंधांच्या तज्ज्ञ आणि टाइम्स ऑफ इंडियाच्या ज्येष्ठ पत्रकार इंद्राणी बागची सांगतात, "आजचा तालिबान बदलला आहे हे आताच स्पष्टपणे सांगता येणार नाही.

आतापर्यंत आम्ही त्यांना जितकं ओळखतो त्यानुसार त्यांची विचारसरणी अजुनही तितकीशी बदललेली नाही. मंगळवारीसुद्धा त्यांनी शारिया कायद्यानुसारच महिलांना हक्क देण्याबदद्ल ते बोलले.

मात्र प्रश्न नक्कीच उपस्थित होत आहेत.

गेल्या 20 वर्षांत अफगाणिस्तान आणि एकूणच जग बरंच बदललं आहे त्यामुळे तालिबान बदललं आहे का?

अफगाणिस्तानमध्ये आता मुली आधीपेक्षा मोठ्या प्रमाणात शिक्षण घेत आहेत. बऱ्याच महिला नोकरी करत आहेत. आता तालिबान या महिलांना पुन्हा बुरखा घालून घरी बसायला सांगणार आहे का? या प्रश्नांची उत्तरं सध्यातरी कुणाकडेच नाहीत."

तालिबान, अफगाणिस्तान

फोटो स्रोत, EPA

त्या पुढे म्हणतात, "मंगळवारी झालेली पत्रकार परिषद जेव्हा संपूर्ण जगाने ऐकली तेव्हा त्यांचा वेगळा चेहरा आहे. मात्र काही बातम्यांमध्ये असा दावा केला आहे की महिलाचं तालिबानी कमांडरबरोबर लग्न लावून देण्यात येत आहेत.

अफगाणिस्तानवर तालिबानची सत्ता प्रस्थापित झाल्यावर सहा महिन्यानंतर याबद्दलचं चित्र अधिक स्पष्ट होईल.

त्यासाठी आधी त्यांनी सत्तेची सूत्रं हातात घेऊ देत. त्यांचा नेता कोण असेल? त्यांचं सरकार कसं काम करतं हे पाहणं अधिक महत्त्वाचं ठरेल. ते त्यांचा देश सौदी अरेबिया सारखा करतात की युएई सारखा करतात हे येत्या काळात स्पष्ट होईलच.

त्यामुळे सध्या इतकीच आशा करू शकतो की अफगाणिस्तानप्रमाणे तेही लोक 20 वर्षांनंतर बदलले असतील."

गेल्या 20 वर्षांत अफगाणिस्तानात काय काय बदललं?

इंद्राणी यांनी गेल्या 20 वर्षात काय बदललं याची माहिती आम्हाला दिली. त्या आधारावर आम्ही काही आकडेवारी काढली.

गेल्या 20 वर्षांत जगात आणि अफगाणिस्तानात अनेक गोष्टी बदलल्या ही गोष्ट सत्य आहे. वर्ल्ड बँकेच्या एका अहवालानुसार 2001 पर्यंत प्राथमिक शाळेत जाण्याची मुलींना परवानगी नव्हती. त्यावेळी केवळ 10 लाख मुलं प्राथमिक शाळेत जात असत.

2012 च्या अहवालानुसार मात्र 80 लाख मुलं प्राथमिक शाळेत जातात. त्यात 30 लाख मुलींचा समावेश आहे. या मुली माध्यमिक शाळेपर्यंतही जाऊ शकायच्या नाहीत आणि त्या शिक्षण अर्धवट सोडत असत.

52 टक्के मुलींचे लग्न 20 वर्षांपर्यंत होऊन जातात ही गोष्टसुद्धा नाकारून चालणार नाही.

तालिबान, अफगाणिस्तान

युनिसेफच्या 2010-11 च्या एका अहवालानुसार 15 ते 24 या वयोगटातील महिलांचा साक्षरतेचा दर 22 टक्के आहे. तोही फारसा उत्साहजनक नाही. मात्र तालिबानची सत्ता गेल्यावर हा एक मोठा बदल तिथे झाला आहे.

सेंट्रल स्टॅटिस्टिक्स ऑर्गनायझेशन च्या 2009 च्या अहवालानुसार महिला पुरुषांपेक्षा जास्त प्राधान्य दिलं जात आहे. 2020 पर्यंत असंच सुरू राहिलं तर 40 टक्के महिला नोकरी करत असतील.

9/11 नंतर बदललं जग

दिल्लीतील ऑब्झर्व्हर रिसर्च फांउडेशनच्या Strategic studies programme चे प्रमुख प्रा. हर्ष.वी. पंत याबद्दल आपली भूमिका मांडतात.

जगात झालेल्या बदलांमुळे तालिबानचा सूर बदलला असं त्यांना वाटतं. ते म्हणतात, "अमेरिकेवर 9/11 ला झालेल्या हल्ल्यानंतर दहशतवादाकडे पाहण्याचा जगाचा दृष्टिकोन बदलला आहे. त्यांची सहनशक्तीसुद्धा कमी झाली आहे. तालिबानकडे पाहताना आपल्याला हेही लक्षात ठेवण्याची गरज आहे."

"1996 ते 2021 च्या अफगाणिस्तानच्या स्थितीबाबत पंत म्हणतात, "त्यावेळी तालिबानकडे प्रशासनाचं कोणत्याही प्रकारचं प्रारुप नव्हतं.

पाश्चिमात्य देशांमध्ये अमेरिकेलाही अफगाणिस्तानशी फार घेणं देणं नव्हतं. अमेरिका तेव्हा तालिबानवर सगळं सोडून निघून गेला होता.

शरिया कायदा अस्तित्वात होता. त्यांच्या राज्यात अल्पसंख्यांकांनाही भरपूर त्रास दिला जायचा."

तालिबान प्रवक्ते शाहीन

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, तालिबान प्रवक्ते शाहीन

"9/11 नंतर अफगाणिस्तानात जे होतंय त्यावर संपूर्ण जगाचं लक्ष लागलं आहे. अमेरिकेचं अर्थसहाय्य आता बंद झालं आहे. काबूलवर आता अफगाणिस्तानचा ताबा असला तरी जेव्हा काबूल विमानतळावर अफरातफरीचं वातावरण होतं तेव्हा अमेरिकेच्या सैन्यानेच विमानतळावर ताबा मिळवला होता.

तालिबानला आजही अमेरिकेच्या ताकदीचा अंदाज आहे. अमेरिकेच्या एका इशाऱ्यावर आंतरराष्ट्रीय पातळीवर मतमतांतरं कशी बदलतात याची तालिबानला कल्पना आहे." पंत सांगतात.

त्यामुळे तालिबानला तिथे राज्य करण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्यता लागेल.

चीन आणि पाकिस्तान ची वक्तव्यं तालिबानचा उत्साह वाढवू शकतात. मात्र रशियाने आतापर्यंत तालिबानला समर्थन देण्याबाबत काहीच भूमिका घेतलेली नाही. म्हणून जगासमोर इंग्रजी बोलणाऱ्या प्रवक्त्याची मदत तालिबान घेत आहे.

तालिबानला बदलण्याची गरज का आहे?

तालिबानला बदलण्याची गरज आहे किंवा नाही याबद्दल इंद्राणी दोन मुद्दे उपस्थित करतात.

तालिबान, अफगाणिस्तान

फोटो स्रोत, AFP via Getty Images

"तालिबानलाही अफगाणिस्तानमध्ये आलेल्या बदलांचा अंदाज आला असेल. बदललेल्या अफगाणिस्तानात ते महिलांना पुन्हा घरात कैद करून मुलांना जन्म घालायला सांगू शकतील का हेही पाहण्याची गरज आहे."

तालिबानला विरोध करणाऱ्या महिलांचे फोटो मंगळवारी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले होते. त्यांच्या धैर्याची लोक खूप स्तुती करत होते."

"एक दुसरी गोष्ट अशी आहे की 21 व्या शतकात मानवी हक्क महिलांचे अधिकार लिंग समानता याबद्दल पाश्चिमात्य देश अतिशय गंभीर आहे. तालिबानला सत्ता टिकवून ठेवण्यासाठी त्यांचं मतही लक्षात घ्यावं लागेल.

त्यांना आर्थिक आणि तांत्रिक मदत लागेल. त्यामुळे थोडा उदार चेहरा तालिबानला दाखवणं भाग आहे."

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)