अलेक्झांडर कोण होता? त्यानं 32 व्या वर्षी सर्वात विशाल साम्राज्याची स्थापना कशी केली?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, हुसेन असकरी
- Role, बीबीसी उर्दू
बालपणीच त्याच्यामध्ये असे काही गुण आणि क्षमता होत्या ज्यामुळं अनेकांना माहिती होतं की, इतिहासात त्याला असामान्य व्यक्तिमत्व म्हणून ओळखलं जाईल.
वयाच्या अवघ्या 12 व्या वर्षी त्यानं एका रानटी पिसाळलेल्या घोड्यावर नियंत्रण मिळवलं होतं. ब्युसिफेलस नावाचा हा घोडा आकारानं अत्यंत मोठा होता. पुढं जवळपास आयुष्यभर हा घोडा या मुलाबरोबर राहिला.
याच मुलानं मोठा झाल्यांनतर 'अलेक्झांडर द ग्रेट' अशी ओळख मिळवली आणि प्राचीन इतिहासातील सर्वाधिक प्रसिद्ध व्यक्तिमत्त्वांमध्ये त्यानं स्थान मिळवलं.
मॅसेडोनियामध्ये राहणाऱ्या अलेक्झांडरचा जन्म इसवीसनपूर्व 356 मध्ये झाला होता.
मॅसेडोनियाचा परिसर उत्तर युनान (ग्रीस) पासून बाल्कनपर्यंत पसरलेला होता. त्यांच्या वडिलांच्या सुरक्षा रक्षकानंच त्यांची हत्या केली होती, त्यानंतर नवीन राजा बनण्याच्या मुद्द्यावरून संघर्ष सुरू झाला होता.
या संघर्षामध्ये अलेक्झांडरनं सर्व विरोधकांचा खात्मा केला आणि वयाच्या 20 व्या वर्षी राजा बनला. त्यानंतर अलेक्झांडरनं 12 वर्षे राज्य केलं. त्यांनं सैनिकांसह 12 हजार मैलांचा प्रवास करत दिग्विजय मिळवला.
मध्य आशियापर्यंत ग्रीक संस्कृतीचा विस्तार
अलेक्झांडरनं त्याकाळी फारस (इराणी) साम्राज्याचा राजा डेरियस तृतीय याचा पराभव केला आणि युनानी संस्कृतीचा मध्य आशियापर्यंत विस्तार केला.
अलेक्झांडर यशाच्या शिखरावर असतानं त्याचं साम्राज्य पश्चिमेतील युनान (आताचे ग्रीस) पासून पूर्वेला आजच्या पाकिस्तान, अफगाणिस्तान, इराण, इराक आणि इजिप्तपर्यंत पसरलेलं होतं. अलेक्झांडरला इतिहासातील सर्वात कुशल नेता आणि लष्करी अधिकारी म्हणूनही ओळखलं जात होतं.

अलेक्झांडरपूर्वी मॅसेडोनिया हे केवळ जगातील इतर भौगोलिक ठिकाणांसारखं एक होतं. त्यांचं फार मोठं असं साम्राज्य नव्हतं. अलेक्झांडरचे पिता फिलिप द्वितीय यांनी या भागाला एक संयुक्त राज्याची ओळख मिळवून दिली होती.
अलेक्झांडरची आई ऑलिंपियस ही त्याचे वडील फिलिप द्वितीय यांची तिसरी किंवा चौथी पत्नी होती. पण कुटुंबात पहिल्या पुत्राला जन्म दिल्यामुळं तिचं वेगळं महत्त्व होतं. म्हणजेच अलेक्झांडरच्या रुपानं त्यांनी राज्याला वारसदार दिला होता.
अॅरिस्टॉटलकडून ज्ञानार्जन
अलेक्झांडरला त्या काळामध्ये सर्वोत्तम शिक्षण देण्यात आलं होतं असं, ब्रिटनच्या रीडिंग युनिव्हर्सिटीमध्ये क्लासिक्सच्या प्राध्यापिका असलेल्या रेचल मायर्स यांनी म्हटलं आहे. अलेक्झांडर 13 वर्षांचा असताना त्याच्या शिक्षकांमध्ये अॅरिस्टॉटल साररख्या महान तत्वज्ञांचा समावेश होता.
"अलेक्झांडरनं अॅरिस्टॉटलकडून ग्रीक संस्कृतीवर आधारित ज्ञान मिळवलं. त्यासाठी त्याला तत्वज्ञानाचे धडे देण्यात आले होते आणि सर्व सुशिक्षित ग्रीकांप्रमाणेच अलेक्झांडरनेही, इलियड आणि ओडिसी अशी महाकाव्यं लिहिणाऱ्या प्राचीन ग्रीक कवी होमर यांच्या कवितांचा अभ्यास केला होता."
"होमर यांची इलियड कविता अलेक्झांडरसाठी अत्यंत महत्त्वाची होती. युद्धाच्या दरम्यान, तो या कवितेचे काही भाग उशीखाली ठेवून झोपायचा."

फोटो स्रोत, Getty Images
इलियड हे एक महाकाव्य आहे, त्यात ट्रॉय शहर आणि ग्रीक यांच्यातील युद्धाच्या अंतिम वर्षाबाबत वर्णन करण्यात आलं आहे. अलेक्झांडर आणि या कथेचा नायक असलेल्या अॅक्लेस यांच्यात एक दृढ असं मानसिक नातं तयार झालं होतं.
त्याशिवाय अलेक्झांडरवर ग्रीकमधील दैवी पात्र असलेल्या हर्क्युलसचाही प्रचंड प्रभाव होता, युद्धादरम्यान या पात्रांचा विचार त्याच्या मनात सुरू असायचा.
उत्तम राज्यकर्ता
अॅरिस्टॉटलचा शिष्य असल्याचा प्रभाव अलेक्झांडरवर आयुष्यभर राहिला. रिचेल मायर्स म्हणतात की, "तुम्हाला असं वाटत असेल की, अॅरिस्टॉटल यांच्याकडं ग्रीक साम्राज्यातील अभिजात वर्गातील एका अवखळ मुलाला उत्तम राज्यकर्त्या बनवण्याची मोठी संधी होती."
"पूर्णपणे तसं काही घडलं नाही, पण अलेक्झांडर ज्या पद्धतीनं ग्रीक राज्यांशी वर्तन करत होता, त्यात अॅरिस्टॉटल यांच्या शिकवणीचा मोठा प्रभाव होता. एका घटनेवरून या शिकवणीचा अंदाज येतो." असं त्यांनी सांगितलं.

फोटो स्रोत, Getty Images
"अलेक्झांडर ग्रीसच्या कोरिन्थ शहरात प्रसिद्ध तत्वज्ञानी डायोजनीज यांना भेटायला गेले होते. त्यांना कामासाठी शुभेच्छा देण्यासाठी अलेक्झांडर पोहोचला तेव्हा, डायोजनीज बसलेले होते.
अलेक्झांडरने डायोजनीज यांना विचारलं की, मी तुमच्यासाठी काय करू शकतो. त्यावर डायोजनीज म्हणाले की, "समोरून बाजुला हो, कारण तुझ्यामुळं सूर्यप्रकाश माझ्यापर्यंत पोहोचत नाही."
अशा प्रकारचं उत्तर सहन करणं हादेखील अॅरिस्टॉटलच्या शिकवणीचाच परिणाम किंवा प्रभाव होता.
अलेक्झांडरसमोरील अडचणी
अलेक्झांडरनं सत्ता कशी मिळवली याबाबत, बर्मिंघम युनिव्हर्सिटीतील क्लासिक्सच्या प्राध्यापिका डायना स्पेंसर यांनी माहिती दिली. "आपल्या सर्वांना माहिती आहे की, अलेक्झांडरचे पिता फिलिप द्वितीय यांच्या अनेक पत्नी होत्या. त्यापैकी एक. क्लियोपेट्रा नावाचीदेखील होती. तिनं अलेक्झांडर आणि त्याच्या आईसमोर अनेक अडचणी निर्माण केल्या होत्या," असं डायना सांगतात.

फोटो स्रोत, AFP
"अलेक्झांडर आणि त्याची आई दोघांनाही असं वाटायला लागलं होते की, ते पूर्णपणे मॅसेडोनियाचं रक्त नाहीत. या गोष्टीमुळं त्यांच्या स्वाभिमानालाही धक्का पोहोचत होता आणि राजकीयदृष्ट्यादेखिल ते त्यांना नुकसान पोहोचवणारं होतं. सिंहासनापर्यंत पोहोचण्याच्या लढ्यामध्ये अलेक्झांडरसाठी हा अडथळा बनला होता,'' असंही त्यांनी म्हटलं आहे.
डायना स्पेंसर यांच्या मते, फिलिप द्वितीय यांची नवी पत्नी असलेली क्लियोपेट्रा, नवी राणी बनू सकत होती. तसं झालं असतं तर, फिलिप यांच्यानंतर राजा बनण्याच्या स्पर्धेत असलेल्यांसाठी ते फायद्याचं ठरलं असतं. त्यामुळं क्लियोपेट्रा अलेक्झांडरच्या राजा बनण्याच्या मार्गात अडथळा ठरू शकत होती.
राजकीय सत्य
मॅसेडोनियाशी पूर्णपणे संबंध असलेला एखादा पुरुष वारसदार समोर येताच, अलेक्झांडरसाठी अडचणी निर्माण होऊ शकल्या असत्या, हे राजकीय सत्य होतं. अनेक इतिहासकारांनी या संपूर्ण परिस्थितीच्या मानसिक पार्श्वभूमीचंही वर्णन केलं आहे.
अलेक्झांडर सहा महिन्यांसाठी स्वतः राज्याच्या बाहेर निघून गेला, त्याची आईदेखील काही महिने राजदरबारात आली नाही.
काही काळ गेल्यानंतर पिता-पुत्रांमधला वाद काहीसा कमी झाला त्यानंतर अलेक्झांडर परतला. पण नात्यात आलेला हा दुरावा अलेक्झांडर वारसदार बनण्याच्या मार्गातील अडथळा बनला होता, असं डायना स्पेंसर सांगतात.

फोटो स्रोत, Getty Images
"या सर्व परिस्थितीमध्ये एक अशी घटना घडली, ज्यामुळं अलेक्झांडरला सत्ता मिळाली. त्यावळी अलेक्झांडरनं, पूर्णपणे मॅसेडोनियाचं रक्त असलेला वारसदार आपल्याला आव्हान देऊच शकणार नाही, अशी परिस्थिती निर्माण केली होती."
इराणी साम्राज्यावर नजर
डायना स्पेंसर सांगतात की, अलेक्झांडर यांची सावत्र बहीण म्हणजे क्लियोपेट्रो यांच्या मुलीच्या लग्नामध्ये एका सुरक्षा रक्षकानं राजा फिलिप द्वितीय यांची हत्या केली होती. तो पळून जात होता तेव्हा त्यालाही ठार करण्यात आलं. त्यामुळं या हत्येमागं नेमकं कारण काय होतं, हेही समजू शकलं नाही.
मात्र, या हत्येमागं अलेक्झांडर आणि त्याच्या आईचा हात असू शकतो, असंही म्हटलं जातं. या हत्येनंतर अलेक्झांडरनं कशाचीही वाट पाहिली नाही. त्याच्या वारसदार बनण्याच्या मार्गात जे कोणी अडथळा ठरण्याची शक्यता होती, त्या सर्वांना त्यानं ठार केलं.

फोटो स्रोत, Alamy
फिलिप एरिडाईस या एका सावत्र भावाला सोडून त्यांनं सर्व भाऊ, चुलत भाऊ यांच्यासह त्याच्या राजा बनण्याच्या मार्गातील अडथळा ठरतील अशा सर्वांना ठार केलं. त्यापैकी काही जणांची तर अत्यंत क्रूरपणे हत्या केली होती.
अखेर गादीवर बसल्यानंतर अलेक्झांडरची नजर फारस (इराणी) साम्राज्यावर होती. भूमध्य सागराशी संबंधित भागामध्ये 200 वर्षांपेक्षा अधिक काळ इराणी साम्राज्य होतं. इतिहासातील खऱ्या अर्थानं सुपरपावर म्हणता येईल असं हे साम्राज्य होतं.
युद्धनिती आखण्यात प्रभुत्व
या इराणी साम्राज्याची सीमा भारतापासून इजिप्तपर्यंत आणि उत्तर ग्रीसच्या सीमेपर्यंत पसरलेली होती. पण या महान साम्राज्याचा अंत अलेक्झांडरच्या हातानं झाला.
इराणी साम्राज्याच्यास तुलनेत लहान पण तेवढ्याच प्रभावी अशा सैन्यानं डेरीयस राजाचा केलेला पराभव ही इतिहासाला वळण देणारी एक अत्यंत महत्त्वाची घटना आहे.

फोटो स्रोत, AFP
या युद्धाच्या निकालानंतर एका प्राचीन आणि सुपरपावर असलेल्या साम्राज्याचा अस्त झाला आणि दुसऱ्या एका नव्या आणि विशाल अशा साम्राज्याचा उद्य झाला. त्याद्वारे ग्रीक संस्कृतीचाही प्रसार झाला.
अलेक्झांडरच्या विजयाचं श्रेय त्यांच्या वडिलांनाही द्यावं लागेल. कारण त्यांनी एक उत्तम असं सैन्य निर्माण केलं होतं आणि त्याचं नेतृत्वही तशाच अनुभवी आणि प्रामाणिक सेनापतींकडं दिलं होतं, असं इतिहासकारांनी लिहून ठेवलं आहे.
पण त्याचबरोबर, एका हुशार आणि कुशल शत्रूला त्याच्याच भागात जाऊन पराभूत करणं, हे अलेक्झांडरच्या नेतृत्वाचं, बुद्धीमत्तेचं आणि युद्धनिती आखण्यामध्ये असलेल्या प्रभुत्वाचंही यश होतं.
अलेक्झांडरचं सैन्य
मॅसेडोनिया हे पूर्वीपासूनच लष्करी प्राबल्य असलेलं असं राज्य नव्हतं. ग्रीसमध्ये अथेन्स, स्पार्टा आणि थेब्स ही राज्य ऐतिहासिकदृष्ट्या शक्तीचा स्त्रोत होती. या राज्यांमधले नेते हे मॅसेडोनियाच्या लोकांना जंगली किंवा रानटी म्हणायचे.

फोटो स्रोत, AFP
अलेक्झांडर यांचे वडील फिलिप द्वितीय यांनी एकट्यानं मॅसेडोनियाच्या सैन्याला एवढं कुशल बनवलं होतं की, त्याची भीती त्या काळामध्ये दूर-दूरपर्यंत पसरली होती. फिलिप यांनी मॅसेडोनियाच्या संपूर्ण समाजाला एका कुशल सैन्याच्या रुपानं पुन्हा एकदा एकत्र आणलं.
उत्तम दर्जाचं पायदळ, घोडदळाची पथकं, भाला चालवणारे आणि धनुर्धारी हे या सैन्याचा महत्त्वाचा भाग होते. फिलिप यांच्या मृत्यूनंतर हेच सैन्य अलेक्झांडरला वारसाहक्कानं मिळालं. अलेक्झांडर कायम अत्यंत चातुर्यानं युद्धाचं नियोजन करायचा.
त्याला माहिती होतं की, भीती दाखवून किंवा शक्तीच्या जोरावर राज्य करता येणार नाही. त्यानं जवळपास शंभर वर्षापूर्वी इराणी साम्राज्यानं ग्रीसवर केलेल्या हल्ल्याचा राजकीय वापर केला. त्यामुलं अलेक्झांडरनं इराणी साम्राज्यावर जो हल्ला केला, त्याचा संबंध शंभर वर्षापूर्वीच्या घटनेशी जोडत देशभक्तीच्या भावनेला हात घालत तो हल्ला त्यानं योग्य ठरवला.
इराणी साम्राज्याची रेजिमेंट
मॅसेडोनियाचे लोक संपूर्ण ग्रीसच्या वतीनं इराणी साम्राज्यावर हल्ला करत आहेत, असा प्रचार अलेक्झांडरनं सुरू केला. प्रत्यक्षात शंभर वर्षांपूर्वी इराणी साम्राज्य आणि ग्रीस यांच्यामध्ये जे युद्ध झालं होतं, त्यात मॅसेडोनियाचा समावेशच नव्हता.
ईसवीसनपूर्व 334 मध्ये अलेक्झांडरचं सैन्य इराणी साम्राज्यात दाखल झालं. अलेक्झांडरच्या 50 हजारांच्या सैन्याला या युद्धात, त्या काळीतील जगातील सर्वात मोठ्या आणि सर्वाधिक प्रशिक्षित अशा सैन्याचा सामना करायचा होता.

फोटो स्रोत, FINE ART IMAGES/HERITAGE IMAGES/GETTY IMAGES
एका अंदाजानुसार, राजा डेरियस तृतीयच्या एकूण सैन्याचा आकडा हा 25 लाख होता आणि ते संपूर्ण इराणी साम्राज्यात पसरलेलं होतं. या सैन्याचं हृद्य अशी ओळख असलेल्या पथकाला किंवा तुकडीला 'अमर सेना' म्हटलं जात होतं. ही 10 हजार सैनिकांची एक खास रेजिमेंट (तुकडी) होती.
या तुकडीतील सैनिकांची संख्या कधीही 10 हजारांपेक्षा कमी होऊ दिली जात नव्हती. युद्धाच्या दरम्यान या तुकडीचा सैनिक मारला गेला, तर लगेचच त्याजागी दुसरा सैनिक यायचा आणि ही संख्या कायम राहायची.
इराणी साम्राज्यावर अलेक्झांडरचा विजय
मात्र एवढं मोठं आणि शक्तिशाली सैन्य असूनही अलेक्झांडरचं बुद्धीचातुर्य आणि आणि अनोख्या युद्धनितीमुळं इराणी साम्राज्याला पराभवाचा सामना करावा लागला.
इतिहासकारांच्या मते, इराणी साम्राज्याच्या पराभवाचं आणखी एक कारण होतं, ते म्हणजे, या युद्धाच्यापूर्वीच त्यांचं पतन सुरू झालं होतं आणि इसवीसनपूर्व पाचव्या शतकात सातत्यानं ग्रीसमध्ये होणाऱ्या पराभवामुळं त्यांचा विस्तारही थांबला होता.
ईसवीसनपूर्व 324 मध्ये, अलेक्झांडर सूसा शहरात पोहोचला. इराण आणि मॅसेडनियाच्या लोकांना एकत्र आणून त्यातून केवळ आपल्याप्रती प्रामाणिक असेल अशी एक पिढी तयार करायची, अलेक्झांडरची इच्छा होती.

फोटो स्रोत, Getty Images
त्यासाठी अलेक्झांडरनं त्याच्या अनेक सेनापती आणि अधिकाऱ्यांना इराणमधील राजकन्यांबरोबर विवाह करण्याचे आदेश दिले. यादरम्यान एका सामूहिक विवाह सोहळ्याचंही आयोजन करण्यात आलं. अलेक्झांडरनं स्वतःदेखील त्याच्यासाठी आणखी दोन पत्नी निवडल्या.
अलेक्झांडरचं सत्तेत येणं, विजय मिळवणं आणि पुन्हा पतन हे अत्यंत कमी कालावधीमध्ये घडलं होतं.
डायना स्पेंसर म्हणतात की, अनेक रोमन इतिहासकारांच्या मते, अलेक्झांडरला कधी-कधी नशेमध्ये कशाचंही भान राहिलेलं नसायचं. एकदा त्यानं रात्रीच्या जेवणाच्या वेळी त्याच्या एका अत्यंत जवळच्या मित्रालाच ठार मारलं होतं.
रोमन इतिहासकारांनी, दारुच्या (मद्य) नशेमध्ये अलेक्झांडर राग येऊन अनेकदा विचित्र वर्तन करायचा, अशा अनेक घटना लिहून ठेवल्या आहेत. मात्र त्यांच्या सत्यतेवर आजही शंका आहेत.

"अलेक्झांडरच्या हातून मारला गेलेला त्याचा मित्र क्लेटियस होता. तो अलेक्झांडर आणि त्याच्या कुटुंबाचा अत्यंत जवळचा होता. अनेकदा तो अलेक्झांडरला प्रामाणिकपणे सल्ला देत होता. प्रत्येक लढाईत तो जणू अलेक्झांडरचा उजवा हात असायचा. घटनेच्या दिवशी अलेक्झांडर जास्त मद्य प्यायला होता. त्यावेळी क्लेटियसनं त्याला म्हटलं की, तुमचं व्यक्तिमत्त्व दिवसेंदिवस बदलत आहे, तुम्ही स्वतःवर नियंत्रण ठेवायला हवं. तुम्ही इराणच्या लोकांसारखे बनत चालले आहात, जणू तुम्ही आमच्यातले नाहीच. पण हे सर्व बोलण्यासाठी क्लेटियसनं निवडलेली वेळ चुकीची होती. कारण लगेचच अलेक्झांडर उठला आणि क्लेटियसच्या छातीतून त्यानं भाला आरपार केला."
गूढ आजार
अलेक्झांडर ज्या पद्धतीनं विजय मिळवत होता आणि त्याचं व्यक्तिमत्त्व ज्या पद्धतीचं होतं, त्यामुळं प्राचीन ग्रीक लोक हे त्याला माणूस नव्हे तर देव समजू लागले होते. एवढंच काय अलेक्झांडरलाही असा विश्वास वाटू लागला होता की तो देवताच आहे.
इराणी साम्राज्यावर ताबा मिळवल्यानंतर त्याच्या लष्करानं पूर्वेच्या दिशेनं कूच केलं. त्यानंतर ते भारतापर्यंत पोहोचले. पण नंतर अलेक्झांडर मॅसेडोनियाच्या परतीच्या वाटेवर निघाला. मात्र पुन्हा मायदेशी परतनं त्याच्या नशिबी नव्हतं.
इसवी सन पूर्व 323 मध्ये वयाच्या 32 व्या वर्षी बॅबिलोन (सध्याचे इराक) च्या परिसरात पोहोचल्यानंतर अचानक एक गूढ आजार हे अलेक्झांडरच्या मृत्यूचं कारण ठरलं.

फोटो स्रोत, Getty Images
काही इतिहासकारांच्या मते, अलेक्झांडरच्या मृत्यूचं कारण त्याच्या जखमांना झालेलं इन्फेक्शन हे होतं. तर काहींच्या मते मलेरियानं त्याचा मृत्यू झाला होता.
भारतापर्यंत पोहोचण्याचं कारण
इराणी साम्राज्यावर विजय मिळवल्यानंतर अलेक्झांडरला भारतात येण्याची गरज का वाटली? तर, याची अनेक कारणं असू शकतात, असं ग्रीक संस्कृतीचे प्राध्यापक पॉल कार्टिलेज म्हणतात. अलेक्झांडरला हे दाखवून द्यायचं होतं की, त्याच्या साम्राज्याची सीमा अशा ठिकाणापर्यंत पोहोचली आहे, जिथपर्यंत त्याचे वडील फिलिप द्वितीय यांना पोहोचता आलं नव्हतं.
"साम्राज्यांसाठी सीमा या गरजेच्या असतात. तसंच आपल्या सीमांच्या पलिकडं काय आहे या चिंताही कायम या साम्राज्यांना सतावत असतात. याचं उदाहरण म्हणजे रोमन साम्राज्य. कैंसर-ए-रूम (सीझर) ने ब्रिटनवर जेव्हा हल्ला केला होता, त्यावेळी अलेक्झांडरही साम्राज्याच्या विस्तारानंतर सीमा निश्चित करत होता. पण रोमन साम्राज्याच्या दृष्टीकोनानुसार, अलेक्झांडरच्या मनात असा विचार होता की, दैवी पात्र असलेल्या हर्क्युलस आणि डायोनिसस तिथपर्यंत पोहोचले होते, म्हणून मीही तिथं पोहोचेल."

फोटो स्रोत, Getty Images
अलेक्झांडरला मिळत चाललेल्या विजयांमुळं त्याचा असा ठाम विश्वास झाला होता की, तो जिथपर्यंत प्रयत्न करेल तिथपर्यंत पोहोचू शकतो. पण जीवनाच्या या वळणावर अलेक्झांडर सत्य परिस्थितीपासून दूर गेला होता का? हा महत्त्वाचा प्रश्न असल्याचं रीडिंग यूनिव्हर्सिटीमधील क्लासिक्सच्या प्राध्यापिका रेचल मायर्स यांनी म्हटलं आहे.
"भारतावर विजय मिळवण्यासाठी अलेक्झांडरला स्थानिकांच्या विरोधाबरोबरच त्याच्याच सैन्यातूनही विरोधाचा सामना करावा लागला. आता खूप झालं अशी सैन्याचीही भावना बनली होती. मध्य आशियामध्ये तीन वर्ष घालवल्यानंतर आता सैन्याला तिथं राहणं नकोसं झालं होतं. त्यात भारतातील युद्धाच्यादरम्यान अलेक्झांडर मारला गेला अशी अफवा पसरली. त्यावेळी मध्य आशियातील त्याच्या सैन्यामध्ये एकप्रकारे बंड व्हायला सुरुवात झाली. सैन्य मागं सरकायला लागलं होतं. पण प्रत्यक्षात अलेक्झांडर फक्त जखमी झाला होता.
अलेक्झांडरच्या एकापाठोपाठ एक सुरू असलेल्या मोहिमा थांबणं आणि त्याच्या परतण्यामागं तीन कारणं होती. सैन्याचा अंतर्गत विरोध, साहित्य आणि रसद पुरवठ्यामधील अडचणी आणि मोहिमा असलेल्या भागातील अडचणी तसेच हवामान ही प्रमुख कारणं असल्याचं रिचेल मेयर्स यांचं म्हणणं आहे.
काही इतिहास अभ्यासकांच्या मते, अलेक्झांडरचं यानंतरचं लक्ष्य हे अरब पट्टा हे होतं, पण वेळ आणि परिस्थितीनं त्याला ती संधीच दिली नाही.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








