एकनाथ शिंदे : उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रिपदाचा पक्षाला फायदा झाला की तोटा?

उद्धव ठाकरे

फोटो स्रोत, Twitter

    • Author, नीलेश धोत्रे
    • Role, बीबीसी मराठी

महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना कमालीचा वेग आला आहे. शिवसेनेचे वरिष्ठ नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे नॉट रिचेबल असल्यामुळे सध्या राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. शिवसेनेतील 11 आमदारांसोबत त्यांनी सुरतच्या ल मेरेडिअन हॉटेलमध्ये तळ ठोकला आहे.

गेल्यावर्षी म्हणजे 2021 ला शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त बीबीसी मराठीनं 'मुख्यमंत्रिपदाचा शिवसेनेला पक्ष म्हणून फायदा झाला आहे की तोटा?' या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला होता. आता एकनाथ शिंदेंमुळे निर्माण झालेल्या राजकीय पेचावेळीही हाच प्रश्न पुन्हा एकदा विचारला जातोय. त्यामुळे 2021 ची बातमी पुन्हा इथे देत आहोत :

'शिवसेना ही कायम विरोधीपक्षात राहून वाढलीय', 'रस्त्यावर आंदोलन करून वाढलीय,' ही वाक्य शिवसेनेच्या नेत्यांनी वेळोवेळी वेगवेगळ्या कारणांनी वापरली आहेत. पण जसं पक्ष वाढवण्यासाठी विरोधात राजकारण करण्याची गरज असते, तसंच पक्ष आणि कार्यकर्ते टिकवण्यासाठी सत्तेचीसुद्धा गरज असते. त्या सत्तेच्या गरजेतूनच मग राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला. पण मग शिवसेनेला खरंच पक्ष म्हणून या मुख्यमंत्रिपदाचा फायदा होत आहे की तोटा?

कुठलाही पक्ष राजकारण करतो तोच मुळात सत्तेत येण्यासाठी. 19 जून 1966 रोजी स्थापन झालेल्या शिवसेनेला आज 55 वर्षं पूर्ण होत आहेत. या 55 वर्षांच्या काळात शिवसेना फक्त तीनवेळा राज्यात सत्तेत आली आहे.

तीसुद्धा इतर पक्षांच्या मदतीनं किंवा भाजपबरोबर सत्तेत सहभागी होऊन. आतापर्यंत शिवसेनेचे तीन मुख्यमंत्री झाले आहेत. पहिले 2 मुख्यमंत्री ( मनोहर जोशी, नारायण राणे) हे भाजपच्या पाठिंब्यावर झाले आहेत. तर तिसऱ्यांदा स्वतःचा मुख्यमंत्री बसवताना शिवसेनेच्या बदलेल्या राजकारणाची वेगळी चर्चा करण्याची गरज नाही.

पण या तिसऱ्यांदा मिळालेल्या संधीवेळी मुख्यमंत्रिपदी दुसरंतिसरं कुणी नसून पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे स्वतः आहेत आणि तेच सध्या पक्ष आणि सरकार या दोघांचा गाडा हाकत आहेत.

उद्धव ठाकरे

फोटो स्रोत, @CMOMaharashtra

आधीचे दोन मुख्यमंत्री असताना शिवसेना प्रमुख आणि मुख्यमंत्रिपद ही दोन्ही पदं वेगवेगळ्या व्यक्तींकडे होती. आता मात्र तसं नाही.

परिणामी पक्ष म्हणून वेगवेगळ्या मुद्द्यांवर निराळी भूमिका घेताना शिवसेनेला अडचणीचं जातंय की सोपं?

ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर आक्रमकपणा कमी झाला?

सत्तेत आल्यानंतर कुठल्याही पक्षाला समोपचाराची, सर्वांना एकत्र घेऊन पुढे जाण्याची, समस्या सोडवण्याचीच भाषा बोलावी लागते. वेळप्रसंगी आंगातला आक्रमकपण बाजूला ठेवावा लागतो.

त्याची पहिली प्रचिती आली ती 25 ऑक्टोबर 2020 रोजी. मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांचा हा पहिलाच दसरा मेळावा होता.

उद्धव ठाकरे

फोटो स्रोत, facebook

सुरुवातीपासूनच ठाकरे सरकार सतत वेगवेगळ्या प्रकरणांनी घेरलेलं आहे. पण यावेळी मात्र भाषण करताना, या मुद्द्यांचा समाचार घेताना उद्धव ठाकरे यांनी शब्द मात्र फार तोलून-मोजून-मापून वापरलेले दिसून आलं.

साहजिकच त्यांच्या आधीच्या आणि या दसरा मेळाव्यातल्या भाषणाची तुलना झाली.

YouTube पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त, 1

ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई याबाबत एक निरीक्षण नोंदवतात,

"कोरोनाच्या काळात शिवसेनेचं मोठं समाजकार्यही दिसून आलं नाही. जे आधीच्या काळात दिसत होतं. सत्तेत नसताना शिवसेना कायम मोठ्या प्रमाणावर रक्तदानाच्या मोहिमा राबवत होती. आताच्या काळात मुंबईत जसे मनसेचे कार्यकर्ते दिसले तसे शिवसैनिक दिसले नाहीत. इंधन दरवाढीविरोधात काँग्रेस आक्रमक दिसते, पण शिवसेना दिसत नाही. पक्ष फक्त सामनातून जिवंत आहे. पक्षाला शैथिल्य आलंय. "

पण मग प्रश्न उरतो तो म्हणजे हे नेमकं आताच का होतंय याआधीच्या पाच वर्षांतही शिवसेना सत्तेत होती. तेव्हा पक्षाला शैथिल्य आल्याचं कुणी बोलत नव्हतं. तेव्हाही पक्षाचा आक्रमकपण कमी झाला नव्हता. उलट स्वतःच्याच सरकारच्याविरोधात शिवसेना वेळोवेळी आक्रमक होत होती.

उद्धव ठाकरे

फोटो स्रोत, facebook

तर त्याचं उत्तर आहे - तेव्हा उद्धव ठाकरे पूर्णवेळ पक्ष सांभाळत होते. पक्षाला पूर्णवेळ नेतृत्व होतं. उद्धव ठाकरे पक्षाला वेगवेगळे कार्यक्रम देत होते. प्रसंगी पक्ष आणि सरकारच्या भूमिकांमध्ये फरकही दिसून आला आहे. पण गेल्या 2 वर्षांमध्ये फारसं तसं दिसून आलेलं नाही.

त्याचं उदाहरण देताना ज्येष्ठ पत्रकार राही भिडे सांगतात, "ओबीसी समाज हा शिवसेनेचा मोठा मतदार आहे. पण त्यांच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधल्या रद्द झालेल्या आरक्षणाविरोधात शिवसेनेला आक्रमक भूमिका घेता येत नाहीये, त्यांना आंदोलनं करता येत नाहीये. ते विरोध करू शकत नाहीत. आपल्याच मुख्यमंत्र्यांच्याविरोधात ते रस्त्यावर कसेकाय उतरणार?"

राजकीय विश्लेषकांना जरी असं वाटत असलं तरी शिवसेनेचा आक्रमकपण अजिबात कमी झाला नसल्याचं शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते अरविंद सावंत बीबीसी मराठीशी बोलताना सांगतात.

"उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर कोरोनाचं संकट आलं. काही काळ लॉकडाऊन होता. लोकांचा जीव धोक्यात आहे. अशा काळात आम्हाला सामाजिक भान आहे. अशा काळात रस्त्यावर उतरण्याचा दांभिकपणा आम्हाला जमत नाही. आमची आक्रमकता संपलेली नाही. त्याची झलक परवा शिवसेना भवनाबाहेर घडलेल्या घटनेत तुम्ही पाहिलीच असेल."

शिवसेनेची वाढ थांबली?

गेल्या 2 वर्षांच्या काळात शिवसेनेची वाढ थांबल्याचं ज्येष्ठ पत्रकार राही भिडे यांना वाटतं. पक्षवाढीसाठी मुख्यमंत्रिपदाचा शिवसेनेला काहीच फायदा झाला नाही, असं त्यांना वाटतं.

"पक्षवाढीसाठी मुख्यमंत्रिपदाचा शिवसेनेला काहीच फायदा झाला नाही, तो त्यांना करता येत नाहीये. कारण त्यांनी कायम रस्त्यावरचं राजकारण केलंय. शिवसैनिकांना तेच कळतं. पण आता मात्र उद्धव ठाकरेंना पक्ष वाढीसाठी वेगळा कार्यक्रम शिवसैनिकांना द्यावा लागेल.

"उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यामुळे शिवसैनिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. शिवसेनेत जो कडकपणा होता तो आता कुठे राहिला आहे? शिवसेना पक्ष म्हणून टिकणार की नाही अशी आता त्यांच्या मनात शंका आहे. कारण आता तीन पक्षांच्या राजकारणात पक्षाचं काय होणार, असा सवाल त्यांच्या मनात आहे. त्यांना कायम आक्रमक राजकारण करण्याची सवय आहे. पण आता आपलाच मुख्यमंत्री आहे, त्याला विरोध करता येत नाही, एवढे वर्ष त्यांचा टार्गेट मुख्यमंत्री असायचा. आता काय करणार. त्यामुळे पक्ष म्हणून टिकवण्याचं त्यांच्यासमोर मोठं आव्हान आहे," असं त्या सांगतात.

उद्धव ठाकरे

फोटो स्रोत, @CMOMaharashtra

सरकार सांभाळताना उद्धव ठाकरे यांच्याकडून पक्षाकडे दुर्लक्ष होत असल्याचं मत हेमंत देसाईसुद्धा नोंदवतात.

ते याबाबत सांगतात, "सध्याच्या काळात शिवसेनेला वेगवेगळे कार्यक्रम किंवा आंदोलनं हातात घेता आलेली नाहीत. पक्षाला 24 तासांचं नेतृत्व नसल्यामुळे हे घडत आहे. सरकार सांभाळताना उद्धव ठाकरेंचं पक्षाकडे दुर्लक्ष होत आहे. फडणवीसांच्या काळातसुद्धा शिवसेनेनं कर्जमुक्तीसाठी प्रभावी आंदोलनं केली तेव्हा बाळासाहेबांनंतरही पक्ष वाढला. त्याचा त्यांना निवडणुकीत फायदा झाला.

"आता मात्र तसं काही दिसत नाही. आदित्य ठाकरे म्हणावं तशी सक्रियता दाखवत नाहीत. पक्ष मुंबई सेंट्रीक आहे का, असं वाटण्याजोगी स्थिती आहे. विदर्भातल्या (जिथं त्यांना पक्ष वाढवण्याची इच्छा आहे.) समस्यांकडे लक्ष नाही. पक्षाची वाढ होताना दिसत नाही."

अरविंद सावंत मात्र देसाई आणि भिडे यांचे हे मुद्दे खोडून काढतात. उद्धव ठाकरे यांनी कोरोनाच्या काळात केलेल्या चांगल्या कामांचा पक्षाला फायदाच होईल असं त्यांचं ठाम मत आहे.

YouTube पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त, 2

ते सांगतात, "महाराष्ट्राला अनेक मुख्यमंत्री लाभले पण आजपर्यंत कुणालाही कुटुंब प्रमुख ही उपाधी लाभली नाही. हे उद्धव ठाकरे यांच्या कामामुळे शक्य झालं आहे. हे शिवसेनेचं भाग्य आहे. त्यांनी कोरोनाच्या संकटात उत्तम काम केलं. देशात सर्वोत्तम मुख्यमंत्री ते ठरले आहे. त्यामुळे त्यांच्या या यशाचा फायदा पक्षवाढीसाठी नक्कीच होत आहे."

कोरोना आणि आरक्षण

सध्याच्या घडीला हेही तेवढंच खरं आहे की महाराष्ट्रातले कोरोनाचे आकडे सतत सर्वांत जास्त राहीले आहेत. सर्वांत जास्त मृत्यूसुद्धा महाराष्ट्रात झाले आहेत.

त्याची अनेक कारणं सत्ताधारी आणि शिवसेना देऊ शकेल. पण ज्या ज्यावेळी शिवसेनेला सत्तेच्या मिळणाऱ्या फायद्या-तोट्याचं गणित मांडलं जाईल तेव्हा तेव्हा याचासुद्धा विचार होईल.

उद्धव ठाकरे

फोटो स्रोत, facebook

कोरोनाच्या आकड्यांचा विचार करताना शिवसेनेला त्याचा फारसा तोटा होणार नाही, असं ज्येष्ठ पत्रकार धनंजन लांबे यांना वाटतं.

ते सांगतात, "कोरोनाच्या स्थितीचा एकंदरच सरकारला फटका बसला आहे हे खरंय. पण सरकार तीन पक्षांचं आहे आणि कोरोना काही केवळ महाराष्ट्रातच आलेला नाही. केंद्रालासुद्धा ही परिस्थिती समाधानकारक हाताळता आलेली नाही. लसींचा तुटवडा, नादुरुस्त व्हेंटिलेटर्स यांसारखे मुद्दे राज्यांच्या गळ्यात मारता येणार नाहीत. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राची स्थिती फार वाईट नाही."

उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात सर्वांत जास्त राळ उडवून देणारा विषय ठरतोय तो आरक्षणांचा.

याच काळात मागासवर्गीयांचं पदोन्नतीतील आरक्षण गेलंय. ओबीसींच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधल्या आरक्षणाला सर्वोच्च न्यायालायाने रद्दबातल ठरवलंय. मराठा आरक्षणालासुद्धा निकालात काढलं. त्यामुळे शिवसेनेच्या फायदे-तोट्याच्या गणितात या मुद्द्यांचा आकडा नक्की किती असणार?

YouTube पोस्टवरून पुढे जा, 3
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त, 3

एकंदर आरक्षणाचा मुद्द्यांचा शिवसेनेच्या राजकारणावर फारचा परिणाम होणार नाही, असं लांबे सांगतात.

"शिवसेना स्थापनेपासूनच जातीपातींपासून दूर राहिली आहे. बाळासाहेब ठाकरेंनी कुठल्याही जातीबद्दल आपपरभाव बाळगला नव्हता. म्हणून उपेक्षित जातींमधून शिवसेनेनं लोकांना स्थानिक स्वराज्य संस्था ते विधीमंडळापर्यंत प्रतिनिधित्व दिलं. तसंच मराठा आणि ओबीसींच्या आरक्षणाचा निकाल सुप्रीम कोर्टातून आला आहे. त्यामुळे त्याचा शिवसेनेच्या राजकारणावर फारसा परिणाम होणार नाही," अशी कारणं ते सांगतात.

पण त्याचवेळी पदोन्नतीतील आरक्षणाच्या मुद्द्याचा मात्र शिवसेनेच्या राजकारणावर परिणाम होऊ शकतो, हे मात्र ते मान्य करतात.

मग शिवसेनेला फायदा काय झाला?

असं नाही की उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रिपदाचा शिवसेनेला तोटाच झालाय. त्यांना त्याचा फायदासुद्धा झाला आहे.

"शिवसेना सत्तेसाठी धडपडते असं चित्र कधीच नव्हतं, सत्ता हे साधन आहे. त्याचा उद्धव ठाकरे यांनी योग्य वापर केला आहे," असं शिवसेनेला होणाऱ्या फायद्यांचं विश्लेषण शिवसेना मुख्य प्रवक्ते अरविंद सावंत करतात.

सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे ठाकरे कुटुंबीय आतापर्यंत सत्तेच्या पदापासून कायम दूर राहत होते. आता मात्र उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या रुपानं ठाकरे घराण्यातल्या 2 व्यक्तींना प्रशासनाचा अनुभव मिळाला आहे. त्याशिवाय विधीमंडळाच्या राजकारणातले डावपेच, बारकावे यांचा प्रत्यक्ष अनुभव त्यांना घेता येत आहे.

उद्धव ठाकरे

फोटो स्रोत, facebook

शिवसेनेचा जरी मुख्यमंत्री झाला असला तरी पक्षची ताकद महाराष्ट्रात मर्यादित स्वरुपाचीच आहे. पण कोरोना काळात उद्धव ठाकरे यांनी सतत लोकांशी सधलेल्या संवादामुळे उद्धव ठाकरे लोकांपर्यंत पोहोचले आहेत.

याबाबात देसाई सांगतात, "उद्धव ठाकरेंची चांगली प्रतीमा कोरोनाच्या काळात फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून घराघरात पोहोचली. कोरोनाच्या काळात मी तुमच्याच कुटुंबातला एक आहे हे लोकांपर्यंत पोहोचवण्यात त्यांना यश आलं आहे. ते घरातच बसून असतात या विरोधकांच्या टीकेला लोकांनी बाजूला ठेवलेलं दिसून येत आहे."

शिवाय वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये केंद्रीय चौकशी यंत्रणांचा लागलेल्या ससेमिऱ्याच्या माध्यमातून केंद्र आम्हाला टार्गेट करत आहे आणि त्यातून सहानुभूती मिळवण्यातही त्यांना यश आल्याचं देसाई यांना वाटतं.

मुख्यमंत्रिपदाचा शिवसेनेनं चांगल्या कामांसाठी फायदा करून घेतल्याचं मत ज्येष्ठ पत्रकार धनंजय लांबे बीबीसी मराठीशी बोलताना नोंदवतात.

YouTube पोस्टवरून पुढे जा, 4
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त, 4

ते सांगतात, "मुख्यमंत्रिपदाच्या माध्यमातून शिवसेनेकडून विशेषअधिकार आलेला आहे. त्यामुळे शिवसेनेनं सरकारमधलं त्यांचं वजन वारंवार दाखवलेलं आहे. बराचकाळ विरोधीबाकांवर राहिलेल्या शिवसेनेनं सरकारमधल्या इतर पक्षांचा विरोध असूनही इतर चांगले निर्णय घेतले आहेत.

"शिवभोजनथाळी त्यापैकीच एक आहे. विरोधी बाकांवरून हे शक्य झालं नसतं. त्यामुळे राजकीयदृष्ट्या मुख्यमंत्रिपदाचा शिवसेनेला फायदाच झाला आहे."

शिवसैनिकांना किती फायदा झाला?

पुण्यात शिवसेनेचे फक्त 9 नगरसेवक आहेत, तर एकही आमदार नाही. अशावेळी पक्षाची बाजू लावून धरण्याची आणि पक्ष वाढवण्याची मोठी जबाबदारी शहर प्रमुख संजय मोरे यांच्यावर येऊन पडते. आधीची स्थिती आणि आताच्या स्थितीत मोठा बदल झाल्याचं मोरे बीबीसी मराठीशी बोलताना सांगतात.

"उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर पुण्यातल्या कारभारात मोठा बदल झाला आहे. इथल्या प्रशासनाला आता शिनसेनेचं ऐकून घ्यावं लागतं. आधी एककल्ली कारभार होता. आता तो तसा चालत नाही. आता सर्वसमावेशक धोरण आलं आहे. एखादं खातं जरी शिवसेनेकडे नसलं तरी अधिकारी ऐकून घेतात."

त्याचं उदाहरण देताना मोरे सांगतात, एक एसआरएस प्रकरण गेल्या अनेक वर्षांपासून रखडलं होतं. पण शिवसेनेनं ते हातात घेतल्यानंतर प्रशासनानं 5 दिवसांमध्ये ते तडीला नेलं. आधी अधिकारी दुर्लक्ष करत होते आता मात्र ते ऐकू घेतात.

पण शिवसेना हिंदुत्वाच्या मुद्द्यापासून दूर गेल्याची टीका सतत होतेय असं विचारल्यावर मात्र ते राममंदिरासाठी पहिला एक कोटीचा निधी शिवसेनेनच दिल्याची आठवण करून देतात.

गोपाळ खाडे मुंबईतल्या सातरस्ता भागातले शिवसेना शाखाप्रमुख आहेत. ते गेल्या 28 वर्षांपासून शिनसेनेचं काम करत आहेत. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यापासून चांगले अनुभव येत असल्याचं ते सांगतात,

"उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नव्हते तेव्हा कामं व्हायला वेळ लागायचा. आता कुठल्याही अधिकाऱ्याकडे गेल्यावर आम्हाला मानसन्मान मिळतो. आता कामं फास्ट होत आहेत. अधिकरी वर्ग समजावून सांगतात. कोऑपरेट करतात," खाडे त्यांचा अनुभव सांगतात.

लॉकडाऊनच्या काळात पोलिसांना मदत करताना गोपाळ खाडे

फोटो स्रोत, GopalKahde

फोटो कॅप्शन, लॉकडाऊनच्या काळात पोलिसांना मदत करताना गोपाळ खाडे

गेल्या 2 वर्षांमध्ये मातोश्रीकडून कुठला कार्यक्रम राबवण्याचे आदेश आले का, असा सवाल केल्यावर ते सांगतात.

"आम्ही कोरोनाच्या काळातसुद्धा रक्तदानाचे कार्यक्रम घेतले. तसे आदेश आम्हाला देण्यात आले आहेत. तसं आम्ही 24 तास 365 दिवस लोकांची कामं करत असतो. पण कोरोनाच्या काळात मी स्वतः पीपीई किट घालून रुग्णवाहिका चालवून लोकांना मदत केली," असं खाडे सांगतात.

शिवसेनेच्या आक्रमकपणाविषयी विचारल्यावर, शिवसेना आक्रमकपणा विसरूच शकत नाही असं ते सांगतात.

कोल्हापूरतले हर्षल सुर्वे गेले 15 वर्षं शिवसेनेसाठी काम करतात. ते सांगतात, "कोरोना काळात समाजिक उपक्रम रबवा, अवाजवी खर्च करू नका, असे आदेश पक्षानं दिले आहेत. शिवाय दोन लाटांच्या मधल्या काळात कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातमध्ये आम्ही 70 हजार सभासद नोंदणी केली."

पण गेल्या 2 वर्षांमध्ये शिवसेनेची आक्रमकता कमी झाली आहे का आणि शिवसेना हिंदुत्वापासून दूर जात आहे का, असं विचारल्यावर ते सांगतात,

"आक्रमकता कमी झालेली नाही, आम्ही फक्त संयम बाळगून आहोत. तसंच हिंदुत्वाची व्याख्या कुणी ठरवायची? विरोधकांनी सांगितलेलं हिंदुत्व म्हणजे हिंदुत्व नाही. आमचं हिंदुत्व हे प्रबोधनकार ठाकरेंचं हिंदुत्व आहे. आम्ही त्यावर आक्रमक आहोतच."

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा, 5
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त, 5

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)