एकनाथ शिंदे : शिवसेना भवनाबद्दल तुम्हाला या 5 गोष्टी माहिती आहेत का?

शिवसेना भवनाबद्दल तुम्हाला या 5 गोष्टी माहिती आहेत का?

फोटो स्रोत, Getty Images

शिवसेना भवन हे या पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये अत्यंत महत्त्वाचं केंद्र आहे. या भवनाचं दुसऱ्यांदा उद्घाटन झालं तेव्हा भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडेही उपस्थित होते. आज या दोन्ही पक्षांचे नेते याच भवनासमोर भांडताना दिसून आले. शिवसैनिकांच्या मनात ही इमारत इतकी का महत्त्वाची आहे हे या बातमीत पाहू.

1) 1974 साली पहिलीनिर्मिती

शिवसेनेची स्थापना 19 जून 1966 रोजी झाली. 1974 साली दादरमध्ये शिवसेनाभवन झाले. मधली दोन वर्षं शिवसेनेचे कार्यालय पर्ल सेंटरच्या दोन खोल्यांमध्ये होते. तिथंच शिवसेनाप्रमुख सर्वांना भेटत असत. सेनाभवन होण्यापूर्वी शिवसेनाप्रमुखांचे निवासस्थान हे सुद्धा कार्यालयासारखंच वापरलं जाई.

2) सांस्कृतिक केंद्र व्हावे अशी बाळासाहेब ठाकरे यांची इच्छा

शिवसेना भवनाचे समारंभपूर्वक उद्घाटन 19 जून 1977 रोजी झाले. या पहिल्या वास्तूच्या उद्घाटनाच्यावेळेस शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते, "शिवसेना भवन ही शिवसैनिकांची हक्काची वास्तू आहे. तिचे आम्ही केवळ राखणदार आहोत. या वास्तूचं पावित्र्य प्रत्येकानं राखलं पाहिजे. हे भवन महाराष्ट्रातील राजकारणाची दिशा बदलायला लावीलच पण त्याचबरोबर हे एक सामाजिक आणि सांस्कृतिक केंद्र बनलं पाहिजे असा माझा आग्रह आहे."

3) बॉंबस्फोटावेळी नुकसान

1993 साली सेना भवनाच्या जवळ असणाऱ्या पेट्रोल पंपावर बाँब फुटला त्यामुळे सेना भवनचेही नुकसान झाले होते. 27 जुलै 2006 रोजी नव्या सेना भवनचं उद्घाटन करण्यात आलं. याच दिवशी उद्धव ठाकरे यांचा वाढदिवसही होता.

या उद्घाटनाच्या कार्यक्रमाप्रसंगी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते, "जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, मातांनो आणि भगिनींनो, आज उद्धवचा वाढदिवस, रामदासचाही वाढदिवस, आणखी किती जणांचे आहेत माहिती नाही. त्या साऱ्यांना माझ्या शुभेच्छा. एवढं काही भव्यदिव्य उभे राहिल असं वाटलं नव्हतं. पण हे सारं शिवसैनिकांच्या अथक मेहनतीमुळे घडलं आङे. शिवसेना भवनाची ही नवी वास्तू छान आहे. ही वास्तू शिवसेनेला चांगले दिवस आणील. शिवसेना भवनाची वास्तू विजयाचे दिवस पाहिल. हे विजयाचे दिवस आणण्याचं काम तुमचं आहे. आज ही जबाबदारी मी तुमच्यावर सोपवतो."

4) उमर नावाच्या व्यक्तीची जागा

शिवसेना समज गैरसमज या पुस्तकाचे लेखक योगेंद्र ठाकूर लिहितात, "शिवसेनेच्या कारभाराचा व्याप वाढला आणि शिवाजी पार्कच्या नाक्यावर ऐन मोक्याच्या जागेवर 1974 मध्ये संघटनेला आपले हक्काचे घर मिळाले. उमर या मुसलमान माणसाची ही जमीन. आधी तेथे काही दुकानांच्या शेड होत्या. त्या सर्वांना पुढे सेना भवनात जागा मिळाली. गोरे या आर्किटेक्टच्या संकल्पनेतून किल्ल्याच्या धरतीवरची सेनाभवनाची दगडी मजबूत इमारत उभी राहिली."

5) शिवसैनिकांनी फेऱ्या मारुन, देणगी मिळवून उभारली इमारत

योगेंद्र ठाकूर लिहितात, "हे भवन उभं राहाण्यासाठी शिवसैनिकांनी सांस्कृतिक कार्यक्रम घेतले. ऑफिसांमध्ये जाऊन पावत्या फाडल्या, देणगीदारांकडे खेटे घातले. त्यातून पैसा उभा केला. नंतरही कोणी फरशी लावण्याची जबाबदारी घेतली तर कोणी फर्निचरची. या भवनासाठी जागा मिळवण्यापासून ते या भवनाच्या उभारणीच्या कामापर्यंत दिवाकर रावते यांनी अथक मेहनत घेतली. या भवनाला किल्ल्याचा इफेक्ट देण्याचे काम ख्यातनाम आर्किटेक्ट गोरे यांनी केले. तर या भवनातील छ. शिवाजी महाराजांचा पुतळा स्वतः शिवसेनाप्रमुखांच्या देखरेखीखाली आणि मार्गदर्शनाखाली श्री. सहस्रबुद्धे यांनी तयार केला."

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)