सिनेमासाठी वसवलं अख्खं शहर, नंतर वाळूखाली पुरून टाकलं, शंभर वर्षांनी ते आलं समोर...

वाळूखाली पुरलेलं शहर

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, कर्टनी लिचरमन
    • Role, बीबीसी ट्रॅव्हल

मूकपटांच्या काळातील महान निर्मिती असलेल्या चित्रपटांसाठी वापरलेल्या कलाकृतींचे अवशेष मध्य कॅलिफोर्नियाच्या किनाऱ्यावर जमिनीखाली पुरले होते. रोमांचक गोष्टींच्या शोधात असलेल्या एका लहान गटानं याठिकाणी उत्खनन केल्यानंतर हे रहस्य समोर आलं.

प्रशांत महासागर आणि कॅलिफोर्नियाच्या ग्वाडालूप या शांत शहराच्या मध्यभागी असलेले वाळूचे ढिगारे आणि सरकत जाणाऱ्या वाळूकडं मी पाहिलं. त्यावेळी 1923 मध्ये काही आठवड्यांसाठी हा भाग हजारो कलाकार, क्रू मेंबर्स आणि प्राण्यांनी गजबजलेला होता, याची कल्पनाही करणं मला कठीण गेलं.

ते सगळे त्याठिकाणी मूकपटांच्या काळातील एका मोठ्या चित्रपटाच्या निर्मितीसाठी त्याठिकाणी एकत्र जमले होते. पण ते चित्रपटाचं चित्रीकरण नव्हतं किंवा सांता बार्बरा काऊंटीतील या अवघ्या 1.3 चौरस मैलाच्या शहराला प्रसिद्ध किंवा कुप्रसिद्ध बनवणारा तो चित्रपटही नव्हता असं त्यांनी म्हटलं.

या सर्वाचा अधिक संबंध हा या ठिकाणी गेल्या 100 वर्षांपासून जमिनीखाली जे काही होतं, त्याच्याशीच अधिक संबंध होता.

एका अर्थानं प्रसिद्धीपासून दूर असलेलं हे स्थळ मध्य कॅलिफोर्नियाच्या किनाऱ्यासह प्राचीन इजिप्त किंवा किमान सर्वसामान्य पाश्चिमात्य विचारांशी साधर्म्य असलेलं असू शकतं, असा विचार करणंही चुकीचं ठरणार नाही.

याठिकाणी कायम थंडी आणि धुकं असतं. तरीही मी ग्वाडालूपमध्ये गिझाप्रमाणं एक प्रखर उन्ह असलेल्या दिवसाची कल्पना करू शकत होते. त्यात सुंदर सजवलेले उंटांचे कळप त्यांचा मार्ग काढत पुढं चालले होते. त्यांच्या लांबच लांब सावल्या वाळूवरून आणि त्यावर तयार झालेल्या तांबड्या रंगांच्या पिरॅमिडवरून पुढं सरकरत होत्या.

महान दिग्दर्शक सेसिल बी. डेमिल यांनी 1923 मध्ये त्यांच्या बहुचर्चित 'द टेन कमांडमेंट्स' या मूकपटाच्या चित्रिकरणासाठीचं लोकेशन म्हणून ग्वाडालूप-निप्पो ड्युन्सचा वापर केला होता.

सेसिल यांच्याशी तुलना करता हे ठिकाणी तेवढंही विस्मृतीत गेलेलं नाही. पुढे 30 वर्षांनंतर याच कथेची आणखी उत्तम आणि चर्चा होणारी अशी निर्मिती ते तयार करू शकले, पण तरीही पुरातत्वशास्त्रज्ञ, चित्रपट रसिक आणि सहज उत्सुकता असणाऱ्यांच्या कल्पनांना चालना देणाऱ्या पहिल्या आवृत्तीचे ते अवशेष होते.

वरीलपैकी तिसऱ्या गटामध्ये माझा समावेश होतो. त्यामुळं उत्सुकतेपोटी मी उत्तरेला लॉस एंजल्सपासून ते ग्वाडालूप आणि तिथून ड्युन्स सेंटरला पोहोचले. याठिकाणी एक लहानसं पण आकर्षक असलं संग्रहालय आहे.

तिथं तुम्हाला चित्रपटाचं चित्रिकरण आणि त्यानंतर जे काही घडलं त्याची कहाणी समजते. याठिकाणी गेल्यानंतर मला समजलं की, या प्रसिद्ध निर्मात्यांनी सुरुवातीला इजिप्तमध्ये किंवा तेथील लोकेशनमध्ये बायबलवर आधारित चित्रपट बनवण्याची योजना आखली होती.

पण स्टुडिओनं या महागड्या कल्पनेला स्पष्टपणे नकार दिला त्यावेळी डेमिल यांनी या छोट्याशा सागरी किनाऱ्यावर त्याची प्रतिकृती तयार करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी ही जागा युनियन शुगर कंपनीच्या मालकीची होती.

त्यांच्याकडून 10 डॉलर एवढं भाडं देऊन त्यांनी हे ठिकाण मिळवलं होतं. ज्या स्थितीमध्ये हे ठिकाण डेमिल यांना मिळालं होतं, त्याच स्थितीत काम पूर्ण झाल्यानंतर सोडून जाताना ते असेल या अटीवर हा करार झाला होता.

वाळूखाली पुरलेलं शहर

फोटो स्रोत, Getty Images

ठिकाण ठरल्यानंतर डेमिल यांनी सेट उभारायला सुरुवात केली. त्या काळाच्या दृष्टीनं सेट अत्यंत खास आणि वेगळे होते. डेको स्टाईल कलेतील विशारद समजले जाणारे डिझायनर फ्रेंचमन पॉल इरीब यांच्या कल्पकतेचा वापर त्यासाठी करण्यात आला.

इरीब यांनी तयार केलेला मुख्य सेट इजिप्तमधील एका महाकाय मंदिराचा होता. तो तयार करताना इजिप्तमधील शिल्पकलेची, आकारांची प्रेरणा आणि 1920 च्या काळातील आकर्षक सौंदर्याचा वापर करून आणि ऐतिहासिक स्वातंत्र्याचा वापर केला होता.

अंदाजे 120 फूट उंच आणि 720 फूट रूंद ही रचना होती. त्यात प्लास्टरच्या 21 स्फिन्क्सचा (स्फिन्क्स हा इजिप्तमधील मानवी शीर आणि सिंहाचे शरीर असलेल्या एका पौराणिक प्राणी होता) वापर करण्यात आलेला होता. त्या प्रत्येकाचे वजन शेकडो पाऊंड होते. "सिटी ऑफ द फॅरो" नावाने ओळखला जाणारा हा सेट तोपर्यंत उभारला गेलेला सर्वात मोठा चित्रपटाचा सेट होता.

त्यात भर म्हणजे डेमिल यांनी चित्रपटातील कलाकार आणि क्रू मेंबर्ससाठी कॅम्प डेमिल नावानं एक छोटेखानी तात्पुरत्या स्वरुपाचं तंबूंचं छावणीवजा शहरही उभारलं होतं. हा कॅम्पदेखील अत्यंत खास होता, असं ड्युन्स सेंटरमधील संग्रहालयातील गाईड कॅरल श्रोएडर यांनी सांगितलं.

"याठिकाणी त्यांनी रसत्यावर संकेत चिन्हं आणि 24 तास सुरू असलेलं कँटिनदेखील तयार केलं होतं," असं ते म्हणाले. हा चित्रपट प्रोहिबिशन पिरियड(प्रतिबंध किंवा निर्बंधाचा काळ) मध्ये चित्रित करण्यात येत होता.

त्यामुळं चित्रपटातील कलाकार आणि इतर क्रू मेंबर्स असे सुमारे 3500 जण चित्रपटासाठीचे 200 उंट भाड्यानं घ्यायचे आणि शहरामध्ये फिरण्यासाठी जात होते. त्याठिकाणी ते अनेकदा स्थानिक भाषेमध्ये बोलायचे.

चित्रपटाची निर्मिती पूर्णपणे संपली तेव्हा डेमिल यांच्यासमोर एक समस्या उभी राहिली. युनियन शुगरबरोबर हे ठिकाण चित्रीकरणाच्या काहीही खुणा न ठेवता, पूर्वी होतं तसं तयार करून जाणार असा करार झाला होता. ते वचन कसं पूर्ण करता येईल ही समस्या होती.

स्थानिक लोकांनी या सेटमधील काही तुकडे आणि इतर प्रॉप्स सजावटीसाठी चोरून नेले होते. (यापैकी दोन स्फिन्क्सचे शीर जवळच्या गोल्फ कोर्समध्ये तर एक रथ सध्याच्या शहराच्या जुन्या गाड्यांचे अवशेष असलेल्या ठिकाणापर्यंत पोहोचले होते.) पण तरीही मंदिर आणि अनेक स्फिन्क्ससह इतर काही साहित्य, शिल्प अजूनही उरलेली होती.

हे सर्वकाही आकारानं अत्यंत मोठं असल्यानं लॉस एंजल्सला घेऊन जाणं खर्चाच्या दृष्टीनं परवडणारं नव्हंत. शिवाय ते असंच सोडून जाणं म्हणजे प्रतिस्पर्धी निर्मात्यांसाठी मौल्यवान खजाना सोडण्यासारखं होईल, असंही डेमिल यांना वाटत होतं. त्यामुळं त्यांनी हे सर्व अवशेष वाळूखाली पुरण्याचे आदेश देऊन टाकले, असं सांगितलं जातं. त्याठिकाणी वाळूखाली हे सर्व अवशेष 1980 पर्यंत सर्वांच्या नजरेपासून दूर होते. पण या दरम्यान हौशी संशोधकांच्या एका जोडीनं याठिकाणी अगदी 'द टेन कमांडमेंट्स' सारखाच एक नवा प्रवास सुरू केला होता.

सप्टेंबर 1982 मध्ये अमेरिकेतील लेखक आणि चित्रपट निर्माते असलेले पीटर ब्रॉसनन यांच्या घराला आग लागली होती. त्या आगीत त्यांच्या लेखन आणि चित्रपटविषयक कलाकृती जळून खाक झाल्या होत्या. आगीतून कसेबसे निसटून ते त्यांच्या मित्राच्या घरी गेले. त्यांचा मित्र ब्रूस कार्डोझोदेखील चित्रपट निर्माता आणि डेमिल यांचा चाहता होता.

वाळूखाली पुरलेलं शहर

फोटो स्रोत, Getty Images

एका रात्री गप्पांमध्ये कार्डोझोनं डेमिल यांच्या 1959 मध्ये लिहिलेल्या आत्मचरित्रातील एक छोटीशी गोष्ट ब्रॉसनन यांना सांगितली. त्यात डेमिल यानी कलाकृतींच्या प्रतिकृतींचे अवशेष वाळूखाली गोपनीय पद्धतीनं पुरल्याची कबुली दिली होती.

"जर 1000 वर्षांनंतर पुरातत्व शास्त्रज्ञांनी याठिकाणी ग्वाडालूपच्या वाळूखाली खोदकाम केलं तर, इजिप्तमधील संस्कृती सापडल्याची आणि ती उत्तर अमेरिकेत प्रशांत महासागराच्या किनाऱ्यापर्यंत पसलेली असल्याची बातमी प्रसिद्ध करण्याची घाई ते करणार नाही, अशी मी आशा करतो. याठिकाणी त्यांना जे स्फिन्क्स सापडतील ते काम संपल्यानंतर आम्हीच पुरले होते," असं त्यात लिहिलं होतं.

जिद्दी आणि वेडा असं स्वतःचं वर्णन करणारे ब्रॉसनन यांनी यातून प्रेरणा घेतली नसती तरच नवल. पुरातत्वीय कामाचा काहीही अनुभव नसताना, अनेक दशकांपूर्वी वाळूखाली पुरलेलं ते शहर खोदून काढण्याचा निर्णय त्यांनी घेतला. हे धाडसी काम जवळपास दशकभर चाललं आणि त्याची नोंद त्यांनी 'द लॉस्ट सिटी ऑफ सेसिल बी डेमिल' नावाच्या माहितीपटात करून ठेवली.

याठिकाणी त्यांना लवकरच त्यांची पहिली कलाकृती आढळली. मंदिराच्या एका भागातील घोड्याचं ते डिझाईन होतं. "आम्ही त्याठिकाणी थंड, धुकं पसरलेल्या एका सकाळी बाहेर पडलो आणि तिथं प्लास्टरचा हा एक तुकडा वाळूतून डोकावत असलेला आम्हाला दिसला," असं ब्रॉसनन सांगतात.

"आम्ही ते बाहेर काढण्यास सुरुवात केली. त्यावेळी मी म्हटलं थांबा हा डोळ्याचा भाग आहे. आम्ही मागे सरकलो आणि पाहिलं तर तो घोडा होता. आमच्यापैकी एकानं सेटचा फोटो आणला त्या फोटोमध्ये असलेला घोडा तोच होता."

हे अत्यंत उत्साहवर्धक आणि चमत्कारिक होतं. पहिल्यांदा काहीतरी सापडलं तेव्हा, ट्रॉयचा शोध घेणाऱ्या श्लीमनचा उत्साहदेखील आमच्यापेक्षा जास्त नसेल, असं ब्रॉसनन त्या पहिल्या शोधाबाबत म्हणाले.

याचा एक उत्तम माहितीपट तयार होऊ शकतो याचा अंदाज ब्रॉसनन यांना आला होता. त्यामुळं त्यांनी चित्रपटाच्या कलाकार आणि क्रूमधील जे कोणी वाचलेले होते त्यांच्या मुलाखती घ्यायला सुरुवात केली. त्याच्या आधी त्यांनी खोदकाम करणाऱ्या स्वयंसेवकांमध्ये सहभागी होत तिथंही मदत केली.

अधिकृतरित्या खोदकाम करण्यासाठी म्हणून त्यांनी सांता बार्बरा शहरात परवानगीसाठी अर्ज केला होता. त्यानंतर जे काही घडलं ती आशा आणि निराशेचा खेळ असलेली 30 वर्षांची अगदी दीर्घ अशी कहाणी आहे. पण शेवटी त्यांना खोदकामाची परवानगी मिळाली एवढं सांगणं इथं पुरेसं आहे.

यावेळी म्हणजे 1990 मध्ये ब्रॉसनन यांनी पुरातत्व शास्त्रज्ञ डॉक्टर जॉन पार्कर यांच्या नेतृत्वातील पथकाच्या मदतीनं मंदिराच्या समोरच्या भागाचे काही तुकडे, काही चित्रलिपीचे अवशेष आणि पोशाखांचे काही अवशेष गोळा केले. ड्युन्स सेंटरच्या कार्यकारी संचालक एल एरिका वेबर यांनी त्याठिकाणी चित्रिकरणाच्या काळातील दैनंदिन जीवनाचे संकेत देणाऱ्या काही गोष्टी सापडल्याचीही माहिती दिली.

"त्यांना काही कफ सिरपच्या बाटल्या सापडल्या. त्यांची संख्या खूप जास्त होती. कारण त्यात 7 ते 12 टक्के असल्कोहोल असायचं आणि इतर मार्गानं त्यांना ते मिळणं शक्य नव्हतं. प्रतिबंधाच्या काळात शोधलेला हा पर्याय होता, असं ब्रॉसनन यांनी म्हटलंय.

त्यानंतर काही काळातच ब्रॉसनन यांनी माहितीपटाचा एक रफ कट (प्रदर्शनापूर्वीची कच्ची प्रत) तयार केला आणि त्याच्या विक्रीसाठी प्रयत्न केले. पण या माहितीपटाच्या विक्रीसाठी हॉलिवूडप्रमाणं हॅपी एंडिंग असणं गरजेतं असल्याचं वितरकांनी त्यांना सांगितलं. खोदकामात स्फिन्क्सचं एक शीर शोधा आणि त्यातून तुम्हाला हा चित्रपट विक्री करण्यासाठी आवश्यक असलेला शॉट मिळेल, असा सल्ला त्यांनी दिला.

ब्रॉसनन यांनी यासाठी एका पुरातत्व संस्थेबरोबर भागीदारी करत त्यांची मदत घेतली. सुमारे 10 वर्षांपूर्वी त्यांच्या टीमला या वाळूखाली एका स्फिन्क्सच्या डोक्याचे अवशेष आढळले.

कलाकृतींचं जतन करणाऱ्या अॅमि हिग्गिन्स यांनी अवशेष पुन्हा जोडून चेहरा तयार करण्यासाठी मदत केली. आजच्या काळात ड्युन्स सेंटरला भेट देणारे प्रेक्षक ही कलाकृती त्याठिकाणी पाहू शकतात. त्या कलाकृतीला अनधिकृतपणे नोरा असं नाव देण्यात आलंय. नोरा या सेंटरचे पूर्वीचे व्यवस्थापकीय संचालक यांच्या आजी होत्या, असं सांगितलं जातं.

वाळूखाली पुरलेलं शहर

फोटो स्रोत, Getty Images

ब्रॉसनन यांनी 30 वर्षांच्या या धाडसी मोहिमेनंतर त्यांचा माहितीपट पूर्ण केला. पण त्यानंतर 2017 मध्ये काही पुरातत्व संशोधक, कलाकृतींचं जतन करणारे आणि ड्युन्स सेंटरचे कर्मचारी यांचं एक पथक पुन्हा एकदा काही अवशेष शोधण्यासाठी खोदकाम करण्यासाठी निघालं. त्यांना सापडलेल्या काही गोष्टी सध्या याठिकाणी संग्रहालयात ठेवण्यात आलेल्या आहेत. त्यात आणखी एका स्फिन्क्सचं शीर आहे.

या संग्रहालयाला भेट दिली तेव्हा मी काहीसं त्रिकोणी आकारातील ते शीर पाहिलं. त्यावेळी आज जर एवढ्या मोठ्या पातळीवर चित्रपट तयार करण्यात आला तर अशी शिल्पं किंवा कलाकृती या ग्राफिक्सच्या माध्यमातूनच दाखवल्या जातील, असा विचार सहजच मनात येऊन गेला.

लॉस एंजिलेसला परतण्यापूर्वी खोदकाम केलेलं स्थळ पाहायला हवं असं मला, संग्रहालयाच्या कर्मचाऱ्यांनी सांगितलं. काही प्लास्टरचे तुकडे आणि ढिगाऱ्यांशिवाय तिथं काहीही नसलं, तरी नेमकं खोदकाम कुठं आणि कसं झालं याचा अंदाज त्यावरून येतो, असं त्यांनी मला सांगितलं.

त्यामुळं मी सागरी किनाऱ्याच्या दिशेनं गेले. वाळूवर प्लास्टरचे लहान-लहान तुकडे सापडेपर्यंत आम्ही पुढं जात होतं. पाण्याच्या जवळ हवा अत्यंत थंड होती आणि धुकंदेखील पसरलेलं होतं.

त्यामुळं पुढं आणखी काही स्पष्टपणे दिसत नव्हतं. पण मला थंडी वाजत होती आणि जणू मी पोम्पेई, पेत्रा किंवा राजा तूत यांची कबर प्रत्यक्षात पाहत आहे, असंच मला वाटत होतं. याठिकाणी वापरलेल्या सर्व कलाकृतींचे अवशेष गोल्फ सेंटर किंवा अॅटो पार्ट सेंटर किंवा ड्युन्स सेंटरपर्यंत पोहोचले नसावेत, असं मला त्याठिकाणी जाणवलं.

वाळूखाली पुरलेलं शहर

याठिकाणी वाळूच्या खाली अजूनही कितीतरी नोरा, घोडे आणि कफ सिरपच्या बाटल्यांच्या श्वास कोंडलेला असेल? असा विचार माझ्या मनात आला. ब्रॉसनन यांच्या मते डेमिल यांनी याठिकाणी वाळूखाली एवढ्या कलाकृती पुरल्या होत्या की अनेक संग्रहालयं त्यानं भरून जातील. त्यामुळं माझ्या प्रश्नाचं उत्तर खूप साऱ्या गोष्टींचा श्वास या वाळूखाली कोंडलेला असेल असंच होतं.

इथं, आता काय शिल्लक राहिलं असेल? याबाबत ब्रॉसनन म्हणतात की, वाळू या सर्वाच्या संग्रहाच्या दृष्टीनं चांगली असली तर निसर्गाचं मात्र तसं नाही. त्यामुळं काळ अत्यंत महत्त्वाचा आहे. "या ठिकाणी पुरण्यात आलेल्या मोठ्या आकाराच्या कलाकृती, अवशेष या अत्यंत वेगानं नष्ट होत असल्याचं, पुरातत्व अभ्यासकांनी स्पष्ट केलंय," असं त्यांनी मला सांगितलं.

हे काम आता व्यावसायिक लोकांनी करणं गरजेचं आहे. कारण आता इथं हौशी लोकांना खोदकाम करण्याची परवानगी नाही, असं ते म्हणाले. तोपर्यंत या वाळूखाली डेमिल यांची "लॉस्ट सिटी" वाळूखाली मुक्त होण्याच्या प्रतिक्षेत तशीच असणार आहे.

बीबीसी इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर
फोटो कॅप्शन, बीबीसी इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहि61890597ले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)