40 वर्षं मुलगा बनून घरात राहिला आणि दोन कोटींची जमीन विकत गंडा घातला

फोटो स्रोत, NIRAJ SAHAI/BBC
- Author, नीरज सहाय
- Role, बीबीसी हिंदीसाठी, पाटण्याहून
विश्वासघात, एका कुटुंबाची फसवणूक आणि संपत्तीची हाव यातून एखाद्या माणसाचं अध:पतन होऊ शकतं याचं हे जिवंत उदाहरण होतं. एखाद्या चित्रपटाची किंवा वेबसीरिजची कहाणी होऊ शकेल असं हे प्रकरण आहे.
40हून अधिक वर्ष एक माणूस घरातला मुलगा बनून राहत होता. 40 वर्ष चाललेल्या सुनावणीचा निर्णय समोर आला तेव्हा लोक अचंबित झाले.
संपत्ती आणि वारशाच्या या 40 वर्षांच्या लढतीत न्यायालयाचा निर्णय आला आणि या प्रकरणी कुटुंबाला फसवणाऱ्या थंड डोक्याच्या गुन्हेगाराला केवळ तीन वर्षांची शिक्षा झाली.
नालंदा जिल्ह्याच्या अप्पर मुख्य न्यायदंडाधिकारी मानवेंद्र मिश्र यांनी शिक्षा ठोठावली. 16 व्या वर्षी बेपत्ता झालेल्या मुलाच्या जागी घरात प्रवेश करत 41 वर्ष घरात राहून दयानंद गोसाईला फसवणुकीसाठी शिक्षा सुनावण्यात.
नालंदा जिल्ह्यातल्या सिलाव थाना परिसरातल्या मोरगाव इथली ही घटना होती. गावातल्या दीडशे बिघा जमिनीचे मालक दिवंगत कामेश्वर सिंह यांच्या संपत्तीशी निगडीत हे प्रकरण.
कामेश्वर सिंह यांच्या आयुष्यात दुख:द क्षण आला. त्यांचा एकुलता एक मुलगा कन्हैया सिंह मॅट्रिकच्या वर्षादरम्यान बेपत्ता झाला. वर्ष होतं 1977. मुलाचा खूप शोध घेण्यात आला. सिलाव पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
एकुलता एक मुलगा बेपत्ता होऊन चार वर्ष उलटली होती.
1981 मध्ये शेजारच्या गावात साधू म्हणून एक तरुण आला. स्थानिकांच्या मते, हा साधू 'मीच तो बेपत्ता कन्हैया' असं सांगत होता. हे तो सातत्याने सांगत राहिला.

फोटो स्रोत, Getty Images
ही गोष्ट सगळीकडे पसरली. कन्हैयाचे वडील कामेश्वर सिंह त्यावेळी हयात होते.
हा साधू आणि काही अन्य लोकांच्या म्हणण्यावर कामेश्वर यांनी विश्वास ठेवला. यातूनच त्याला ते घरी घेऊन गेले.
पण कामेश्वर यांच्या पत्नी रामसखी देवी यांनी या मुलाला मुलगा मानण्यास नकार दिला. त्यांनी कधीच या साधूला मुलगा मानलं नाही.
दयानंद गोसाई एकमेव वारस कन्हैया सिंह बनून घरात राहू लागला. पण रामसखी देवी यांनी या साधूला कधीच कन्हैया मानलं नाही. त्यांनी नेहमीच अविश्वास राखला.
नोव्हेंबर 1981 मध्ये अखेरीस त्यांनी दयानंदविरुद्ध सिलाव पोलीस स्थानकात गुन्हा दाखल केला.
नोव्हेंबर 1991 मध्ये पाटणा जिल्हा न्यायालयात मालकी हक्काचा दावा दाखल करण्यात आला. 1995 मध्ये कामेश्वर आणि त्यांची पत्नी रामसखी देवी यांचं निधन झालं.
आईच्या मृत्यूनंतर मुलीने सांभाळली आघाडी
आईवडिलांच्या मृत्यूनंतर पुढची लढाई गुम कन्हैया सिंह यांची बहीण विद्या देवी यांनी लढली. याबाबत त्यांची भूमिका जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी संपर्क केला. पण त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. त्यांचे वकील राजेश कुमार यांच्या मते हे सगळं जमीन आणि संपत्ती हडपण्यासाठीच करण्यात आलं.

फोटो स्रोत, NEERAJ SAHAI/BBC
राजेश कुमार यांनी बीबीसीला सांगितलं की, कामेश्वर सिंह यांच्या घरी जवळपास 40 वर्ष राहताना दयानंदने 50 ते 55 बिघा जमीन विकली. पाईपलाईन उभारण्यासाठी त्याला नुकसानभरपाईही मिळाली. त्याने लग्नही केलं.
कन्हैयाच्या आईने खटला दाखल केला होता. आईने सांगितलं होतं की, कन्हैयाच्या डोक्यावर जखमेची खूण होती. दयानंदच्या डोक्यावर तशी कोणतीही खूण नव्हती. डीएनए टेस्टसाठी तो तयार झाला नाही.
खोटं प्रमाणपत्र
दयानंद जमुई जिल्ह्यातील ज्या गावचा होता त्या गावातील एका माणसाने सांगितलं की, हा प्रभू देसाईंचा तिसरा मुलगा आहे. या सगळ्याप्रकरणी चक्रावून टाकणारी गोष्ट म्हणजे न्यायालयात दाखल करण्यात आलेलं दयानंद गोसाई यांचं मृत्यूचं प्रमाणपत्र.
प्रमाणपत्रानुसार दयानंद गोसाईंचा मृत्यू 1981 लिहिण्यात आला. पण हे प्रमाणपत्र 2014 मध्ये रद्द करण्यात आलं. न्यायालयाच्या आदेशानुसार या प्रमाणपत्राची शहानिशा तपासण्यात आली. ते नकली निघालं.

फोटो स्रोत, Getty Images
जिल्हा न्यायालयातून हे प्रकरण पटणा उच्च न्यायालयात गेलं आणि त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर नव्याने सुनावणी झाली.
नालंदा जिल्हा न्यायालयाने दयानंद गोसाईंना तीन वर्षांच्या कारावासाची आणि दंडाची शिक्षा ठोठावली.
नालंदा जिल्हा अभियोजन राजेश कुमार पाठक सांगतात, 2014 पासूनच आरोपीची डीएनए टेस्ट करावी अशी मागणी करण्यात येत होती. 2022 न्यायालयाला लेखी आवेदन देऊन टेस्ट करायला नकार देण्यात आला. 1977 ते 1981 या कालावधीत कुठे होतो हे आरोपीला सांगता आलेलं नाही.
न्यायालयाच्या निर्णयानंतर दयानंद गोसाई यांनी स्थानिक प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं की, हे सगळं संपत्तीसाठी केलं गेलं. बहिणींची नजर संपत्तीवर आहे. त्यासाठी हे करण्यात आलं.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








