बिहार : सुरक्षेच्या नावाखाली मुलींना पिंजऱ्यात नाचायला लावणारी ही अमानुष पद्धत काय आहे?

उत्तर प्रदेश नर्तिका

फोटो स्रोत, NEERAJ PRIYADARSHI. KOILWAR

    • Author, चिंकी सिन्हा
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

रेकॉर्डिंग रूम लहान आहे. काही महिला प्रतीक्षेत आहेत. त्यांना आपली गोष्ट रेकॉर्ड करायची आहे. त्यांना सांगण्यात आलंय की हे त्यांच्यासाठी उपयुक्त ठरू शकतं. कोणीतरी त्यांची गोष्ट वाचून अथवा ऐकून त्यांच्या मदतीला येऊ शकतं. त्यांच्यासाठी हा आशेचा किरण आहे.

तिशीतली एक महिला या मुलींची ओळख करून देते. या मुली बिहारमधल्या काही भागांमध्ये लग्न तसंच पार्टी अथवा तत्सम कार्यक्रमातील ऑर्केस्ट्रात नाचगाण्याचं काम करतात. मनोरंजनासाठी असलेल्या या कार्यक्रमात त्यांच्याबरोबर मोठ्या प्रमाणावर गैरवर्तन होतं.

त्यांच्या शरीराला स्पर्श केला जातो. त्यांची छाती पकडली जाते. काही वेळेला त्यांच्यावर बलात्कारही केला जातो.

लग्नात होणारा गोळीबार तर आता रुढ झाला आहे. अशा गोळीबारात ऑर्केस्ट्रात नाचणाऱ्या मुलींच्या मृत्यूच्या बातम्या समोर येतात. 24 जून 2020ला नालंदा इथे झालेल्या लग्न सोहळ्यादरम्यान झालेल्या गोळीबारात स्वाती नावाच्या मुलीचा मृत्यू झाला. गोळी तिच्या डोक्यात घुसली होती. एका पुरुष नर्तकालाही गोळी लागली होती.

ही कहाणी आहे परिस्थितीमुळे ऑर्केस्ट्रा बँडमध्ये नाचावं लागणाऱ्या महिलांची. बीबीसीनं यावर जून महिन्यात सविस्तर रिपोर्ट केला आहे, तो आता पुन्हा शेयर करत आहोत.

कोरोनामुळे महिला नर्तिकांची स्थिती दयनीय

कोरोना परिस्थितीने त्यांना अतिशय दयनीय स्थितीत ढकललं आहे असं या मुलींचं म्हणणं आहे. लॉकडाऊनमुळे काम मिळणं अवघड झालं आहे. कुठून घरभाडं देणार आणि कुटुंबाची गुजराण कशी करणार असा प्रश्न आहे. ऑर्केस्ट्रात गाणाऱ्या रेखा वर्माने सांगितलं की काही मुलींना शरीरविक्रय करावा लागत आहे.

नृत्य, महिला, मुली, ऑर्केस्ट्रा बँड, संस्कृती, उत्तर प्रदेश, बिहार

फोटो स्रोत, CHINKI SINHA

फोटो कॅप्शन, रेखा वर्मा

रेखा राष्ट्रीय कलाकार महासंघाची अध्यक्ष आहे. ऑर्केस्ट्रात काम करणाऱ्या महिला तसंच पुरुष कलाकारांच्या हक्कांसाठी 2008 मध्ये ही संघटना तयार करण्यात आली.

या महिलांपैकी एक आयुष्याची व्यथा सांगताना भावुक होते. अश्रूंनी चेहरा डबडबला आहे. मस्कारा गालांपर्यंत ओघळला आहे. काही केस पिकले आहेत. निळ्या रंगाचा लायक्रा कुर्ता आणि सलमे सितारेवाली सलवार परिधान केलेल्या या महिलेकडे गोल्डन पर्स आहे.

मोठे डोळे, एका हातात फुलपाखराचा टॅटू आहे. दिव्या नाव सांगत असली तरी हे खरं नाव नाही. या महिलेला दिव्या भारती आवडायची. तिला दिव्याप्रमाणे व्हायचं होतं. त्यामुळे तिने दिव्या नाव ठेवलं. पण आयुष्य खडतर आहे.

दिव्या परफॉर्मन्स तयार करण्यात आलेल्या स्टेजवर डान्स करते. दारू पिऊन नशेत असलेल्या पुरुषांच्या घोळक्यात तिला नाचावं लागतं. यातले काही जण तिची छाती पकडण्याचा प्रयत्न करतात. तिच्यावर दगडही फेकले जातात. तिच्यावर बंदुकाही रोखल्या जातात. ऑर्केस्ट्रा म्हणवल्या जाणाऱ्या या व्यवस्थेचा दिव्या एक भाग आहे.

पतीकडून शोषण ते स्टेजवर परफॉर्मन्स

दिव्या बिहारच्या पूर्णियाची. ती लहान असताना घरचे कामाच्या शोधार्थ पंजाबमध्ये गेले. तेराव्या वर्षी तिचं लग्न लावून देण्यात आलं. तिचं नवं आयुष्य सुरू झालं.

पती ड्रायव्हर होता, नेहमी मारहाण करायचा. शिव्या द्यायचा. एकेदिवशी नवऱ्याने घरातून बाहेर काढलं तेव्हा दिव्या मुलांना घेऊन पाटण्याच्या ट्रेनमध्ये बसली. एका ऑनलाईन मुलाखतीदरम्यान एका माणसाने शूटिंगचं काम देईन असं आश्वासन दिलं.

त्या माणसाने गर्लफ्रेंडच्या बरोबर दिव्याला मीठापूरच्या फ्लॅटमध्ये ठेवलं. स्टेज शो मध्ये नृत्य करून ती पैसे कमावू शकते असं त्याने सांगितलं. सतरा वर्ष मी नवऱ्याची मारहाण सहन केली.

अखेर दिव्याने यंदाच्या फेब्रुवारीत डान्सलाईन जॉईन केली. तिचं वय 28 आहे. तिच्या मनात ज्या आशाआकांक्षा होत्या ते हे काम नाही याची तिला जाणीव होती. पण कोरोना संकटाने तिचा नाईलाज झाला.

नृत्य, महिला, मुली, ऑर्केस्ट्रा बँड, संस्कृती, उत्तर प्रदेश, बिहार

फोटो स्रोत, NEERAJ PRIYADARSHI. KOILWAR

फोटो कॅप्शन, पिंजऱ्यातील नर्तिका

बिहार आणि उत्तर प्रदेशात लग्नसोहळे तसंच वाढदिवसाच्या पार्ट्यांमध्ये महिला नर्तकांनी छोट्या कपड्यांमध्ये नाचणं आता रूढ झालं आहे. गेल्या काही वर्षात या महिलांचं होणारं शोषण वाढलं आहे. नृत्य बघायला येणारे लोक त्यांना जबरदस्तीने स्पर्श करतात, काहीवेळेला त्यांच्यावर बलात्कारही करतात.

या परिस्थितीचं वर्णन करताना दिव्या रडू लागते. कुठलाही आत्मसन्मान नाही. मी काय होऊ पाहत होते पण इथे येऊन पोहोचले आहे. इथे येऊन अडकले आहे.

मला सगळ्यात काय आवडत नाही तुम्हाला माहिती आहे का? मला पिंजऱ्यात नाचावं लागतं. तो पिंजरा अख्ख्या गावात फिरवला जातो. लोक आमचे व्हीडिओ काढतात. आमच्यावर शेरेबाजी करतात. शिव्याही देतात.

पिंजऱ्यातलं नृत्य आणि गिधाडंरुपी जनता

या महिलांना, मुलींना नाचावं लागतं तो पिंजरा म्हणजे चालती ट्रॉलीसारखी असते. महिला नर्तिकांना लोकांनी स्पर्श करू नये म्हणून ही व्यवस्था केली जाते. ऑर्केस्ट्रा मालकांच्या मते ही व्यवस्था महिलांच्या सुरक्षेसाठी आहे. पण पिंजऱ्यात नाचणं आमच्या खाजगी आयुष्यावर आक्रमण केल्यासारखं आहे. दिव्या सांगते की, शेवटी पिंजरा तो पिंजराच

स्टेजवर नाचताना मला काही क्षण मला जे करायचं होतं ते अनुभवता येतं. मी स्टेजवर नृत्य सादर करते. थोडी मोकळीक असते. पिंजऱ्यात तसं नसतं. काही पुरुष पिंजऱ्याभोवती जमा होतात आणि आमचे व्हीडिओ काढतात. ट्रॉली लग्नसोहळ्याच्या ठिकाणी जात होती.

तिथे पोहोचेपर्यंत वाटेत अनेकदा ट्रॉली थांबायची. लाऊडस्पीकवर प्रचंड आवाजात भोजपुरी गाणी लावलेली असतात. पिंजऱ्यात बंद केलेल्या मुली चांदीची चकमक असणाऱ्या कपड्यातल्या बाहुल्या वाटतात. ऑर्केस्ट्रा बँडमध्ये कशाप्रकारे नाच केला जातो- मुली आपले नितंब हलवत असतात, छाती इकडून तिकडे करत असतात.

माजी फोटोपत्रकार नीरज प्रियदर्शी यांनी घरातून हा प्रकार पाहिला. त्यांनी या प्रकाराबद्दल ट्वीटरवर लिहिलं. बघता बघता व्हीडिओ व्हायरल झाला. लग्नसोहळे तसंच पार्टीत नाचणाऱ्या महिलांच्या चारित्र्यहनन करण्याचा प्रयत्न असल्याचं अनेकांनी म्हटलं.

नीरज म्हणाले, आपण प्राण्यांशीही अशा पद्धतीने वागत नाही. मी असं दृश्य कधीच पाहिलं नव्हतं.

मुलींसाठी ही पिंजरा व्यवस्था काही वर्षांपूर्वी अस्तित्वात आली. लग्नसोहळे, पार्टी अशा ठिकाणी मुलींचं होणारं शोषण रोखण्यासाठी पिंजरा व्यवस्थेचा उपाय करण्यात आला. या व्यवसायात झालेली घसरण, अराजकता आणि शोषणाचं प्रतीक म्हणजे हा पिंजरा आहे.

कोरोना आणि त्यामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे लग्नसोहळे आणि त्यावर आधारित कामं ठप्प झाली. या परिस्थितीमुळे मुलींना नाईलाजास्तव हे काम करावं लागत आहे. त्यांना शरीरविक्रयही करावा लागत आहे. कोणाशी भांडायची ताकद त्यांच्यात राहिली नाही. पिंजऱ्यात नृत्य करताना त्यांना प्राणीसंग्रहालयातल्या प्राण्यांप्रमाणे वाटतं असं त्यांनी सांगितलं.

दिव्या सांगते आमची अवस्था प्राण्यांपेक्षा वाईट आहे. लोक आमची शिकार करतात. हा नाचाचा पिंजरा नाहीये.

गरिबीपासून वाचण्यासाठी डान्सलाईनचा पर्याय

आकांक्षाच्या बहिणीला एका रात्री अशा कार्यक्रमात गोळी लागली. गोळी तिच्या डोक्यात लागली, मार लागला पण ती वाचली. आता ती धोक्यातून बाहेर आली आहे. मात्र या घटनेनं आकांक्षा हादरून गेली आहे. ऑर्केस्ट्रा मालक मनीषने सांगितलं की त्याने एफआयआर दाखल करण्याचा प्रयत्न केला परंतु पोलिसांनी दाखल केला नाही.

या नर्तिकांसाठी कॉन्ट्रॅक्ट मिळवून देण्याचं काम करणारे राहुल सिंह यांनी सांगितलं की, या कलाकारांची ही मोठी समस्या आहे. त्यांचं ऐकणारं कुणीही नाही. त्याने सगळे पिटाळून लावतात. जिथे हा प्रसंग घडला तिथे मी हजर नव्हतो असं त्यांनी सांगितलं. तिथे गोळीबार झाला नाही.

आकांक्षा आणि तिची बहीण गेल्या तीन वर्षांपासून बिहारमध्ये ऑर्केस्ट्रा बँडबरोबर काम करतात. अशा कार्यक्रमात मुलींवर गोळीबार होतो असं त्या ऐकून होत्या. मुलींची छेड काढली जाते हेही त्यांना ठाऊक होतं. दारु पिऊन लोक स्टेजवर येतात आणि त्यांच्यावर झडप घालतात.

आकांक्षा सांगते, आम्ही हेही ऐकलेलं की बंदूक मानेवर ठेवली जाते आणि बलात्कारही केला जातो.

मात्र या बहिणींसमोर दुसरा काही मार्ग नव्हता. वडिलांचं निधन झाल्यानंतर पैसे कमावण्याचे सगळे उपाय थकले होते. दोन्ही बहिणी ग्वाल्हेरच्या आहेत.

त्यांची आई लोकांच्या घरी धुणीभांड्याचं काम करते. कुटुंबाकडे उत्पन्नाचा दुसरा स्रोत नाही. त्यामुळे शाळेची फी भरणंही कठीण झालं होतं. शिक्षण नाईलाजास्तव सोडावं लागलं.

नृत्य, महिला, मुली, ऑर्केस्ट्रा बँड, संस्कृती, उत्तर प्रदेश, बिहार

फोटो स्रोत, CHINKI SINHA

फोटो कॅप्शन, ऑर्केस्ट्रा बँड

आकांक्षाने शेजारच्या डान्स स्कूलमध्ये कंटेपररी डान्स शिकायला सुरुवात केली. एखाद्या समारंभात नाचण्यासाठी पैसे मिळत असत. तिथूनच त्यांचा बिहारला जाण्याचा मार्ग सुकर झाला. डान्स स्कूल चालवणाऱ्या व्यक्तीने तिची ओळख कोमल नावाच्या महिलेशी करून दिली.

चांगले पैसे मिळवून देते असं आश्वासन आकांक्षाला दिलं. बिहारला आलात तर टेलिव्हिजन परफॉर्मन्स आणि स्टेज शो साठी ऑडिशन देता येईल असं सांगण्यात आलं. निवड झाली तर परफॉर्मन्स करून त्यांना आणखी पैसे मिळतील, तुमचं काम लोकांसमोर येईल असंही सांगण्यात आलं.

आईने या प्रस्तावात स्वारस्य दाखवलं नाही मात्र दोघी बहिणी उत्साहात होत्या. आकांक्षाला आईसाठी घर उभं करायचं होतं. एक असं घर जिथे टाईल्स असतील. तेव्हा त्या झोपडीत राहायच्या. घराचं स्वप्न पूर्ण होण्यासाठी खूप वेळ लागला असता. नव्या प्रस्तावामुळे घराचं स्वप्न काही वर्षात पूर्ण झालं असतं. आकांक्षाची आणखीही काही स्वप्नं होती. तिला आईसाठी चांदीचा दागिना करायचा होता.

दोघी बहिणी बिहारमध्ये दाखल झाल्या. कोमलने त्यांना पावापुरी भागातल्या एका घरात ठेवलं. तुम्हाला नाचावं लागेल आणि कमावल्यानंतर काही पैसे आम्हाला द्यावे लागतील असं सांगण्यात आलं. अगदीच आवश्यक असेल तर कोमल त्यांना घराबाहेर जाऊ देत असे.

आपण चुकीच्या ठिकाणी आलोय असं आकांक्षाने आपल्या बहिणीला सांगितलं. दोघी बहिणींनी पैसा कमवायचा होता पण अनेक तास नाचूनही त्यांना दिवसाकाठी 1700 रुपयेच मिळत असत. त्यांनी हिशोब केला. जागरणमध्ये नाचलो तर यापेक्षा जास्त कमाई होईल आणि घरीही थोडे पैसे पाठवता येतील.

आपण काही वर्ष नाचत राहिलो तर परिस्थिती सुधारेल असं त्यांना वाटत होतं. यादरम्यानच आकांक्षाची बहीण स्वातीला गोळी लागली.

नृत्य, महिला, मुली, ऑर्केस्ट्रा बँड, संस्कृती, उत्तर प्रदेश, बिहार

फोटो स्रोत, CHINKI SINHA

फोटो कॅप्शन, बिहारमधील दृश्य

ऑर्केस्ट्रा बँडमध्ये लोक दारू पिऊन येतात. ही नित्यनेमाची गोष्ट झाली आहे. दारू पिऊन आलेल्या लोकांनी हवेत गोळीबार करायला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी मुलींबरोबर नाचायला सुरुवात केली. त्यांनी मुलींवर झडप घालून त्यांना छेडायला सुरुवात केली. दोघी बहिणींना वाटलं की गोष्टी नियंत्रणात राहतील. त्याचवेळी नाच बघणाऱ्या लोकांमध्ये भांडण झालं आणि गोळीबाराला सुरुवात झाली.

याच गोंधळात स्वातीला गोळी लागली. कसंतरी करून तिला पाटण्याच्या एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं. खाजगी रुग्णालयात उपचार घेणं त्यांना परवडणारं नव्हतं. अखेर स्वातीला रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं.

दिल्ली विद्यापीठात प्राध्यापक मुन्ना कुमार पांडे सांगतात, भांडवलशाही वातावरणात नवं तंत्रज्ञान येणं आणि त्यातच उद्भवलेलं कोरोनाचं संकट यामुळे ऑर्केस्ट्रा बँडमध्ये काम करणाऱ्या महिलांची अवस्था शोचनीय झाली आहे.

याआधीही अशा कार्यक्रमांमध्ये महिलांचं शोषण होतच असे. पण या महिला कलागुणांच्या बळावर पायावर उभ्या राहतील असं वाटलं होतं. पण तसं झालं नाही. या महिलांना असं काम करण्यासाठी भाग पाडण्यात आलं. हे अतिशय भीषण आहे.

पार्टी आणि लग्नांमध्ये नाचणाऱ्या रेखा वर्मा सांगतात की, या महिलांची आर्थिक आणि सामाजिक पार्श्वभूमी दुर्बळ स्वरुपाची आहे. या कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याआधीही त्यांच्या आयुष्यात सन्मान नव्हताच. रेखा यांनी महिला कलाकारांची सुरक्षा आणि अधिकारांसाठी संघटना स्थापन केली आहे. सरकारने या महिला कलाकारांना कोणतीही मान्यता दिलेली नाही. त्यामुळे त्यांच्या कल्याणासाठी कोणतीही योजना राबवली जात नाही.

नृत्य, महिला, मुली, ऑर्केस्ट्रा बँड, संस्कृती, उत्तर प्रदेश, बिहार

फोटो स्रोत, CHINKI SINHA

फोटो कॅप्शन, खडतर आयुष्य

रेखा सांगतात की या महिला सुरक्षित असाव्यात यासाठी मी प्रयत्न करते आहे. आम्हाला कलाकार म्हणून मान्यताही दिली जात नाही.

स्वत:ची कहाणी सांगताना रेखा वर्मा यांचा आवाज कातर होतो. आयुष्यातले अनुभवलेले कटू प्रसंग आणि अपमान यांच्या आठवणी सांगताना त्यांना भडभडून येतं. लहान वयात पोलीस परीक्षेसाठी त्या पास झाल्या होत्या. आर्थिक चणचण असल्यामुळे त्यांची निवड होऊ शकली नाही.

घरी पैसे नसल्यामुळे त्यांना ऑर्केस्ट्रात बँडमध्ये काम करावं लागलं. सुरुवातीला जागरण मध्ये गायला सुरुवात केली. मग लग्नसमारंभात गाऊ लागल्या. एका चांगल्या गायकाकडे शिकवणीही सुरू केली. परंतु पैसेअभावी हे शिक्षण अर्धवटच राहिलं.

त्या सांगतात, आम्हीच सतत गाणी गाऊन या कलाकारांना मोठं करतो. नाहीतर कोणाला त्यांची नावं माहिती असतात. आम्ही नेहमीच पडद्यामागे राहतो.

मानवी तस्करीच्या बळी

ऑर्केस्ट्रा बँडमध्ये काम करणाऱ्या बहुतांश मुली तस्करीची शिकार ठरलेल्या असतात. देशातल्या विविध राज्यांमधून बिहारजवळच्या सीमेवरून नेपाळल्या नेलं जातं. गेल्या वर्षी 10 डिसेंबरला रक्सौल इथे ऑर्केस्ट्रात काम करणाऱ्या एका मुलीला गोळी मारण्यात आली.

23 सप्टेंबर 2020 रोजी समस्तीपूर इथे एका तरुणाने नर्तिकेला गोळी मारली. अशा बऱ्याच घटना बातम्यांमध्ये येत नाहीत. पोलीस कधीतरीच तक्रार दाखल करतात. कारण अशा प्रकरणांमध्ये पुरावे मिळत नाहीत. या महिलांकडे समाजाला कलंक म्हणून पाहिलं जातं. समाजाची या महिलांकडे बघण्याची दृष्टी चांगली नसते. या महिला लपूनछपून राहतात. या महिलांना समाजाची साथ मिळत नाही. त्यामुळे कोणत्याही संस्था-संघटनेवरचा त्यांचा विश्वास उडाला आहे.

नृत्य, महिला, मुली, ऑर्केस्ट्रा बँड, संस्कृती, उत्तर प्रदेश, बिहार

फोटो स्रोत, CHINKI SINHA

फोटो कॅप्शन, ऑर्केस्ट्रा बँड

राष्ट्रीय कलाकार महासंघाचे संस्थापक अखलाक खान सांगतात, मुद्दा सन्मानाचा आहे. बिहारमध्ये ऑर्केस्ट्रा बँडची संख्या वाढते आहे कारण त्याद्वारे बेकायदेशीर कामं केली जातात. असे बँड नोंदणी करत नाहीत. ते मनोरंजनासाठी नसतात, त्यांची भलतीच कामं सुरू असतात.

ते सांगतात, समाजात या महिलांप्रती, मुलींबाबत जो दृष्टिकोन आहे त्यामुळे त्यांच्या हक्कांसाठी लढायला कोणी पुढाकार घेत नाही. बँडचे मालक काहीच करत नाहीत. ते या महिलांचं शोषण करून सोडून देतात. बिहार आणि उत्तर प्रदेशात मनोरंजनाच्या आड भलत्याच गोष्टी करणारे हजारो बँड आहेत. महिलांच्या शोषणाचं हे बँड केंद्र बनले आहेत.

प्राध्यापक मुन्ना पांडे यांच्या मते, गेल्या काही वर्षात लग्नसमारंभात, पार्टीला मुलींना नाचण्यासाठी बोलावणं स्टेटस सिम्बॉल झालं आहे. अशा समारंभात वादविवाद होतात, गोळीबार होतो. ही बिहारची शोकांतिका आहे. तिथे दारुवर बंदी आहे पण लग्न आणि पार्टीत सहजपणे उपलब्ध होते.

आजकाल टेलिव्हिजन, वेबसीरिजमध्ये लैगिंकता उत्तेजित करणारी दृश्यं मोठ्या प्रमाणावर दाखवली जातात. त्याचा परिणाम लोकांच्या मानसिकतेवर, अभिरुचीवर पडतो. अशी दृश्यं पाहिल्यानंतर लोक ऑर्केस्ट्रा बँडमध्ये लाईव्ह परफॉर्मन्सची मागणी करू लागले आहेत. अनेक मुलींना याचा फटका बसला आहे.

बहुतांश मुली अल्पवयीन असतात. त्यांना पैशाची आवश्यकता असते. त्या प्रशिक्षित नर्तिका नसतात.

दिव्यासाठी प्रशिक्षित नर्तिका होणं तितकंसं महत्त्वाचं नाही. मुलींनी छोटे कपडे घालून नाचावं अशी अपेक्षा असते. दिव्याला हे आवडत नाही पण आपल्या हातात फार वर्ष नाहीत हे तिला माहिती आहे. संयोजकांनी त्यांचे पैसे दिले आहेत. त्यांना जागेचं भाडं द्यायचं आहे. मुलांच्या शाळेची फी भरायची आहे.

दिव्या सांगतात, वाटाघाटी करण्याची ताकद आम्ही गमावून बसलो आहोत.

नजर उंचावून आपले कपडे ठीकठाक करतात. लोक आमच्याकडे गिधाडासारखे पाहतात. आमचे कपडेही फाडतात.

स्टेजपासून पिंजऱ्यापर्यंत सगळीकडे या महिलांची शिकारच होत असते. हेच त्यांचं आयुष्य झालं आहे. पिंजऱ्यात बंद चिमण्यांप्रमाणे त्यांचं आयुष्य बंदिस्त झालं आहे.

दिव्या तरीही स्वप्नं पाहतात. त्यांना चित्रपटाची किती आवड होती ते सांगतात.

एखाद्या रात्री नाचगाण्याचा कार्यक्रम सुरू होतो, गिधाडंरुपी माणसं त्यांच्या अंगावर झेपावू लागतात. तेव्हा त्या सुंदर अभिनेत्रीचा चेहरा आठवतात. जिच्या वरून तिने दिव्या हे नाव धारण केलं होतं.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)