पर्यटन : 'रिव्हेंज टूरिझम' देशातल्या पर्यटनासाठी असं ठरतंय फायदेशीर

पर्यटन

फोटो स्रोत, Getty Images

गेल्या दोन वर्षांपासून कोरोना साथीमुळे जगभरातील पर्यटन क्षेत्र ठप्प पडलं होतं. भारताच्या पर्यटन आणि आदरातिथ्य उद्योगालाही त्याचा प्रचंड मोठा फटका बसला.

पण, कोरोनाचा प्रादुर्भाव थांबवल्यानंतर आता हा उद्योग पूर्ववत होईल, याबाबत मुक्त पत्रकार रुबिना ए. खान आशावादी आहेत.

भारताच्या GDP मध्ये पर्यटनाचा वाटा सुमारे 3 टक्के इतका आहे. 2019 मधील आकडेवारीनुसार, देशात सुमारे 10 कोटी रोजगार हे पर्यटनक्षेत्राशी संबंधित आहेत.

इतर देशांप्रमाणे भारतालाही कोरोना लॉकडाऊनमुळे नुकसान सोसावं लागलं. 2020 या वर्षी भारताला केवळ 27 लाख परदेशी पर्यटकांनी भेट दिली. त्यापूर्वीच्या वर्षी हा आकडा 1 कोटी 10 लाखांच्या जवळपास होता.

अजूनही कोरोनापूर्व काळातील हा टप्पा गाठणं भारताला शक्य झालेलं नाही. मात्र, दुसरीकडे, देशांतर्गत पर्यटन करणाऱ्या नागरिकांच्या संख्येत वाढ झाल्याचं दिसून येतं.

दोन वर्षे कोंडून ठेवल्याप्रमाणे आयुष्य जगणारे भारतीय नागरिक आता सूड घेतल्याप्रमाणे पर्यटन करत आहेत. यालाच 'रिव्हेंज टूरिझम' किंवा 'सूड पर्यटन' असं संबोधलं जात आहे.

या संकल्पनेमुळे पर्यटन व्यावसायिक कंपन्या, हॉटेल उद्योगांमधील मंडळी मात्र सुखावल्याचं पाहायला मिळतं.

तज्ज्ञांच्या मते परदेशात अधिक महागड्या पर्यटनस्थळावर जाण्याऐवजी पर्यटक देशातच प्रवास करणं पसंत करत आहेत.

ताज महाल

फोटो स्रोत, Getty Images

याशिवाय, मायक्रो-हॉलिडे (छोट्या कालावधीची सुटी) आणि वर्केशन (पर्यटन स्थळी फिरण्यास जाऊन तिथून काम करणे) या नव्या संकल्पनांचा फायदाही पर्यटन उद्योगाला होत आहे.

मेक माय ट्रीप या पर्यटन वेबसाईटचे संस्थापक दीप कालरा याविषयी म्हणतात, "2020 वर्षाच्या शेवटच्या तिमाहीपासून परिस्थिती सुधारण्यास सुरुवात झाली आहे. इतकंच नाही तर गेल्या तीन तिमाहींमध्ये आमच्या कंपनीला उल्लेखनीय असा नफाही झालेला आहे."

केल्याने देशाटन...

तज्ज्ञांच्या मते, कोरोना साथीनंतर भारताच्या नागरीकांना स्वतःच्या देशातील कानाकोपरा पालथा घालण्याची संधी प्राप्त झाली.

जगभरात भारत हा नेहमीच एक लोकप्रिय पर्यटन स्थळ राहिला आहे. ऐतिहासिक किल्ले, दिमाखदार राजवाड्यांपासून घनदाट जंगलं, बर्फाळ प्रदेश अशा पर्यटकांना पाहाव्याशा वाटणाऱ्या सगळ्या गोष्टी भारतात आढळून येतात.

अनेक दिवस आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद असल्यामुळेच पर्यटकांना देशांतर्गत ठिकाणांना भेटी देण्याची कल्पना सुचली, असं विशाल सुरी यांनी सांगितलं. सुरी हे SOTC पर्यटन कंपनीचे संचालक आहेत.

पर्यटन

फोटो स्रोत, Getty Images

त्यांच्या मते, कोरोना साथीने भारतीयांना आपल्या देशाची नव्याने ओळख करून दिली.

ते पुढे सांगतात, "आतापर्यंत फारसे न पाहिली गेलेली पर्यटनस्थळे यामुळे प्रकाशझोतात आली. स्थानिक संस्कृती आणि अन्नपदार्थांचा आस्वाद घेत तीर्थक्षेत्रांचं पर्यटन करणं, यांचा वेगळा अनुभव लोकांना मिळाला."

कोरोना साथीने स्टेकेशन अथवा वर्केशन यांसारख्या नव्या कल्पनाही निर्माण केल्या आहेत. याचा अर्थ आपलं काम एखाद्या पर्यटनस्थळी जाऊन निवांतपणे करणं होय.

फेडरेशन ऑफ हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ इंडियाचे (FHRAI) वरीष्ठ अधिकारी प्रदीप शेट्टी म्हणतात, "पर्यटकांना आता गोपनीयता राखून आपल्या घरापासून दूर असलेल्या ठिकाणी राहणं अतिशय सोईस्कर बनलं आहे."

मेक माय ट्रीपचे कालरा यांच्या मते, लोक शक्य त्या वेळी देशांतर्गत प्रवास करण्याला प्राधान्य देत आहेत. शिवाय, पर्यटनाला जाण्याचं प्रमाणही वाढलं आहे. म्हणजे, वर्षातून एकच लांबलचक सुटी घेण्याऐवजी लोक छोट्या-छोट्या कालावधीच्या अनेक सुट्ट्या घेऊन फिरणं पसंत करत आहेत."

आदरातिथ्य उद्योगावर परिणाम

लोकांच्या पर्यटन सवयी बदलण्याचा परिणाम हॉटेल व्यवसायांवरही झाल्याचं पाहायला मिळतं.

साधारणपणे आंतरराष्ट्रीय पर्यटनासाठी वाचवून ठेवला जाणारा पैसा लोक खर्च करण्यास तयार असल्याने त्यांना देशातच चांगल्या सुविधा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

सर्व सोयीसुविधा उपलब्ध असलेल्या काही हॉटेल्सनी कोरोना साथीनंतर आपले दर कमी केले आहेत. याचा त्यांना व्यवसायात फायदा होत असल्याचं दिसून येतं.

पर्यटन

फोटो स्रोत, Getty Images

भारतातील हॉटेल उद्यागात आघाडीवर असलेले ताज हॉटेलचं कामकाज इंडियन हॉटेल कंपनीचे (IHCL) सांभाळते. IHCL चे व्यवस्थापकीय संचालक पुनीत छतवाल म्हणतात, "भारतात प्रत्येक कोव्हिड लाटेनंतर पर्यटन व्यवसायाला मिळालेली उभारी ही तुलनेने आणखी मजबूत आणि आश्चर्यकारक अशीच होती."

"IHCL कंपनीचा व्यवसाय कोरोनापूर्व काळापेक्षाही जास्त वाढला असून त्यात मुख्य वाटा हा देशांतर्गत पर्यटनाचाच आहे," असंही त्यांनी सांगितलं.

उदयपूर येथील रॅफल हॉटेल हे एका खासगी बेटावर वसलेलं आहे. गेल्या वर्षी कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर ऑगस्ट महिन्यात ते सुरू करण्यात आलं होतं.

पण या हॉटेलचा व्यवसाय गेल्या एका वर्षांत उत्तम पद्धतीने वाढल्याचं पुनीत धवन यांनी सांगितलं. ते या हॉटेल कंपनीत उपाध्यक्ष म्हणून काम पाहतात.

आम्ही नवे असल्याने आमच्याकडे कोरोनापूर्व काळातील आकडेवारी उपलब्ध नाही. पण आम्हाला मिळणारा प्रतिसाद दिवसेंदिवस वाढत असल्याचं दिसून आलं आहे, असं ते म्हणतात.

धवन यांच्या मते, आगामी काळ हा हॉटेल व्यावसायिकांसाठी आखणी व्यस्त असणार आहे. आगामी हिवाळा आणि लग्नसराईमध्ये पर्यटकांच्या संख्येत चांगली वाढ पाहायला मिळेल, असं त्यांना वाटतं.

आव्हाने

पण वरील सकारात्मक बाबी पर्यटन व्यावसायिकांना दिसत असल्या तरी त्यांच्यासमोर आव्हानेही तितकीच असणार आहेत.

कारण, पर्यटन व्यवसाय अद्याप कोरोनापूर्व काळातील टप्प्यापर्यंत अद्याप पोहोचलेला नाही. सप्टेंबर महिन्यात भारताच्या पर्यटन मंत्र्यांनी सांगितलं होतं की सरकार पर्यटन उद्योगाला उभारी देण्याचा प्रयत्न करत आहे.

पण परदेशी पर्यटकांच्या संख्येत झालेली घट हा अजूनही चिंतेचा विषय आहे. परदेशी पर्यटकांच्या संख्येत कोरोना पूर्व काळाच्या तुलनेत 44.5 टक्के घट झाल्याचं दिसून येतं.

शिवाय, भारत सरकारने परदेशी पर्यटकांची संख्या वाढवण्याच्या दृष्टीने विशेष असे प्रयत्न अद्याप केलेले नाहीत. परदेशी पर्यटकांना भारतात बोलावण्यासाठी आपल्याला काही खास अशी मार्केटिंग युक्ती वापरावी लागेल. कारण 6 कोटी पर्यटक दरवर्षी चीनला भेट द्यायचे. पण बदलेल्या परिस्थितीमुळे त्यांना भारत पर्यटनासाठी बोलावण्याची संधी आपल्यासमोर आहे, असं मत दीपक देवा यांनी व्यक्त केलं.

ते ट्रॅव्हल कॉर्पोरेशन ऑफ इंडियचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून काम पाहतात.

ते सांगतात, "युकेसारख्या अनेक देशांमधून नागरीक पर्यटनासाठी भारतात येत असतात. त्यांना सरकारने ई-व्हीसा सुविधा पुरवल्या पाहिजेत. कारण, सध्याची ही प्रक्रिया अत्यंत वेळखाऊ आहे."

कालरा यांच्या मते, देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पर्यटन एकमेकांविरोधी पद्धतीने न वाढता समांतरपणे वाढलं पाहिजे. आगामी काळात आंतरराष्ट्रीय पर्यटनही पुन्हा पूर्वस्थितीत येईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)