कोंबड्यांमुळे सापडलं 20 हजार लोकांसाठी वसवलेलं जमिनीखालचं प्राचीन शहर

टेकड्या

फोटो स्रोत, Getty Images

मी कापादोशियाच्या लव्ह व्हॅलीमधली चढण चढत असतानाच सोसाट्याच्या वाऱ्यामुळं धूळ उडत होती. गुलाबी-पिवळसर रंगाच्या छटा टेकड्यांवरून पसरल्या होत्या.

हवा कोरडी, उष्ण होती. वारं वाहत होतं. एकूणच वातावरण जीवघेणं सुंदर होतं.

हजारो वर्षांपूर्वी झालेल्या ज्वालामुखीच्या उद्रेकातून माझ्या भोवती असलेल्या या त्रिकोणी, मशरुमच्या आकाराच्या टेकड्या तयार झाल्या होत्या. मध्य टर्कीमधला हा भाग आता पर्यटकांचं आकर्षण बनला आहे. हाइकिंग किंवा हॉट एअर बलून राइडची मजा लुटण्यासाठी लोक इथं येतात.

पण कापादोशियाच्या या सुंदर भूभागाखाली अनेक शतकांपासून तितकंच देखणं रहस्य दडलं होतं...एक असं भूमिगत शहर जिथं वीस हजार लोक काही महिन्यांसाठी राहू शकत होते.

एलेन्ग्बू हे प्राचीन शहर जे सध्या डेरिन्क्यू या नावानंही ओळखलं जातं, जमिनीच्या पृष्ठभागापासून 85 मीटर खोल आहे. तिथपर्यंत पोहोचण्यासाठी 18 भुयारं ओलांडून जावं लागायचं.

उत्खननात सापडलेलं जगातलं सर्वांत मोठं असलेलं हे शहर जवळपास हजारो वर्षं टिकून होतं...पर्शियन, ख्रिश्चन, बायझन्टाईन अशा वेगवेगळ्या राजवटी आल्या आणि गेल्या. पण हे शहर तसंच होतं. अखेरीस 1920 मध्ये कापादोशियन ग्रीकांनी ग्रीको-टर्किश युद्धात पराभवानंतर हे शहर सोडलं. ते तिथून पळाले.

इथे गुफांसारख्या लांबच लांब पसरलेल्या खोल्या तर होत्याच, पण एकमेकांपासून वेगळी असलेले 200 पेक्षा जास्त कसबे पण होते. हे छोटेछोटे भाग भुयारांनी एकमेकांशी जोडले होते. त्यातून गुंतागुंतीचं भूमिगत जाळंच तयार झालं होतं.

कसं सापडलं हे शहर?

माझा गाईड सुलेमान सांगत होता की, डेरिन्क्यू 1963 साली जगासमोर आलं. एका स्थानिकाला अतिशय योगायोगानं हे शहर सापडलं. झालं असं...त्याच्या कोंबड्या अचानक हरवायला लागल्या.

त्याच्या घराचं दुरुस्तीचं काम सुरू असताना त्याला दिसलं की, जिथं भेगा पडल्या होत्या तिथून त्या कोंबड्या गायब होत होत्या. त्याने जवळ जाऊन पाहिलं आणि थोडंस खोदकामही केलं. तेव्हा त्याला एक भुयारी मार्ग सापडला. डेरिन्क्यूकडे जाणारे तब्बल 600 भुयारी मार्ग होते, त्यातला हा पहिला मार्ग त्या तुर्की माणसाला सापडला होता.

कापोदेशिया

फोटो स्रोत, Getty Images

त्यानंतर या भागाचं खोदकाम केल्यावर जमिनीच्या खाली घरं, अन्नधान्याची गोदाम, गुराढोरांचे गोठे, शाळा, वायनरी, चॅपेल्स अशी एक संस्कृती जगासमोर आली. 1985 मध्ये युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत डेरिन्क्यूचा समावेश करण्यात आला. या शहराची निर्मिती कधी झाली याच्या तारखांवर वाद आहेत. मात्र इसवीसन पूर्व 370 मध्ये अथेन्सच्या झेनोफोनच्या अॅनाबॅसिस या हस्तलिखितात डेरिन्क्यूचा उल्लेख सापडतो. या हस्तलिखितात झेनोफोनने म्हटलंय की, कापादोशियन प्रदेशात राहणारे अनाटोलियन लोक उंच कडे असलेल्या घरांमध्ये राहण्याऐवजी भूमिगत घरांमध्ये राहतात. फ्लोरिडा स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये क्लासिकल स्टडीजचे प्राध्यापक असलेले आंद्रेया डी जिओर्गी यांच्या मते, कापादोशियाच्या मातीत पाण्याची कमतरता असल्याने तिथले खडक सहज ढासळत असतील. त्यामुळे इथे भूमिगत घरे बांधण्याची पद्धत सुरू झाली असेल.जमिनीच्या पोटात घरं बांधण्यासाठी इथला भाग सुद्धा अनुकूल असल्याचं जिओर्गी सांगतात. कुदळ आणि फावड्याच्या जोरावर या प्रदेशात असलेला दगड कोरणं तुलनेनं सोपं झालं असतं. जमिनीत पाण्याची असलेली कमतरता तसेच सहज आकार देता येतील असे खडक या सर्व गोष्टींमुळे कापादोशियन लोक भूमिगत बांधकाम करू शकले. पण डेरिन्क्यूची निर्मिती कोणी केली, त्याच श्रेय नेमकं द्यायचं कोणाला हे प्रश्न मात्र अनुत्तरितच राहतात.

पण हे शहर बांधलं कोणी?

पण डेरिन्क्यू हे भूमिगत शहर कोणी बांधलं हे एक गूढच आहे. भूमध्यसागरीय तज्ञ ए बर्टिनी सांगतात की, "हत्तींच्या इतिहासात या शहराचा उल्लेख सापडतो. इसवीसन पूर्व 1200 च्या आसपास फ्रिगियन लोकांनी या शहरावर हल्ला केला. तेव्हा त्यांना इथं काही खडक खोदलेले आढळले. हे खोदकाम हत्तींनी केलं असण्याची शक्यता आहे."

कोंबड्यांमुळे सापडलं गाव

फोटो स्रोत, Getty Images

बर्टिनी यांनी मांडलेल्या कल्पनेला बळकटी देण्यासाठी तेरिंग्यूमध्ये हिटाइट कलाकृती सापडल्याचा उल्लेख त्यांनी त्यांच्या अभ्यासात केला आहे.पण डी जियोर्गी यांच्या मते या शहराची रचना फ्रिगियन लोकांनी केली असावी. ते म्हणतात की, "फ्रीगियन्स हे अनाटोलियातील सर्वात महत्वाच्या साम्राज्यांपैकी एक होतं."डी जियोर्गी पुढं सांगतात की, इसवीसन पूर्वच्या अखेरीस फ्रिगियन साम्राज्य पश्चिम अॅनाटोलियापर्यंत पसरलं होतं. या फ्रिगियन्स लोकांकडे खडकांमध्ये स्मारक कोरण्याची हातोटी होती.डेरिन्क्यूचा वापर साठवणुकीसाठी केला जायचा. पण परकीय आक्रमण वाढायला लागल्यावर तिथल्या स्थानिकांनी यात तात्पुरत्या स्वरूपाचा आश्रय घ्यायला सुरुवात केली. कापादोशियावर बऱ्याच शतकांपासून परकीय आक्रमण होत राहिली.7 व्या शतकात जे इस्लामिक आक्रमण झालं तेव्हा तर कापादोशियाचं मोठ्याप्रमाणात शोषण करण्यात आलं. फ्रिगियन, पर्शियन, सेल्जुक अशी बरीच परदेशी लोक इथे येऊन स्थायिक झाले. त्यानंतर या शहराचा विस्तार होऊ लागला. बायझंटाईन काळात या शहराची लोकसंख्या 20,000 च्या घरात पोहोचली होती.

कशी आहे इथली रचना?

या भूमिगत शहराला भेट देऊन तुम्ही तुर्कीतील भूमिगत जीवन अनुभवू शकता. अर्धवट जळलेल्या, अर्धवट कोसळलेल्या भिंतींच्या गुहेत उतरताना मला भीती वाटली. पण या शहरावर हल्ला होऊ नये यासाठी इथं राहणाऱ्यांनी गुहेत जी कल्पकता वापरली आहे त्याला तोड नाही. हल्लेखोरांना आत येता येऊ नये अशा पद्धतीने अरुंद रस्ते बनवण्यात आले आहेत.दरवाजापर्यंत पोहोचण्यासाठी अर्धवर्तुळाकार दगडांनी बनवलेले अडथळे तयार करण्यात आले आहेत जे फक्त आतूनच हलवता येतील. आक्रमण करणाऱ्यांवर हल्ले करण्यासाठी दाराच्या मध्यभागी लहान लहान छिद्रं करण्यात आली आहेत, जेणेकरून यातून बाण सोडता येतील.माझा टूर गाईड सुलेमान सांगतो, "असं भूमिगत जीवन जगणं खूप कठीण असावं."इथं राहणारे लोक मातीच्या भांड्यांमध्ये आराम करायचे आणि उजेडासाठी दिव्यांवर अवलंबून असायचे. मृतदेहांची विल्हेवाट लावण्यासाठी काही ठिकाणं निश्चित करण्यात आली होती.

भूमिगत शहर

फोटो स्रोत, Getty Images

या शहराची रचना अत्यंत काळजीपूर्वक करण्यात आल्याचं समजतं. उदाहरण म्हणून घ्यायचं झालंच तर गोठयांमध्ये गुरांचं जे मलमूत्र असायचं त्याची दुर्गंधी पसरू नये म्हणून वरच्या भागात गुरांचे गोठे असायचे. दुसऱ्या मजल्यावर एक पारंपारिक बायझेंटाईन मिशनरी शाळा दिसली. या शाळेचं छत बॅरल-वॉल्टेड पद्धतीचं असल्यामुळे ते ओळखणं सोपं झालं. इथल्या तळघरांमध्ये तेलाचे पुरावेही सापडले आहेत. त्यामुळे या भूमिगत शहरांत अनेक महिने राहण्याची सोय केल्याचं दिसतं.शहराला शुद्ध हवा आणि पाणी मिळावं असा दृष्टिकोन समोर ठेवून या शहराची रचना करण्यात आली आहे. इथं असलेली विहीर 55 मीटर खोलीपर्यंत खोदण्यात आलीय.हे बांधकाम आपल्याला कल्पक वाटत असलं तरी कापादोशियामध्ये हे एकमेव भूमिगत शहर नव्हतं. इथं 200 हून जास्त भूमिगत शहर होती. पण 445 चौरस किमी एवढं पसरलेले हे शहर इतर शहरांच्या तुलनेत मोठं होतं. काही शहर तर जमिनीच्या खाली तिप्पट खोल वसली आहेत. अशी एकूण 40 शहरं आहेत.कधी आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली तर इथून बाहेर पडण्यासाठी अनेक मार्ग तयार करण्यात आले आहेत. कापादोशियामध्ये जी काही भूमिगत रहस्य आहेत त्याचा अजून पूर्णपणे उलगडा झालेला नाही. अद्यापही काही भागांत उत्खनन झालेलं नाही. 2014 मध्ये नेवसेहिर इथं आणखीन एक भूमिगत शहर सापडलं.इथले कापादोशियन ग्रीक लोक निघून गेल्यावर इथल्या शहारांचा इतिहास संपल्यात जमा जात. मात्र 1923 मध्ये म्हणजे तब्बल 2000 वर्षांनंतर ही शहर उजेडात आली. लोक गेले, शहरं आहे त्याच ठिकाणी होती, मात्र लोकांच्या नजरेतून दूर. त्या तुर्काच्या कोंबड्या तिथं गेल्या नसत्या तर कदाचित हे शहर उजेडात आलं नसतं.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)