वेरुळच्या कैलास मंदिराबाबत तुम्हाला माहिती आहे का?

- Author, राहुल रणसुभे
- Role, बीबीसी मराठी
वेरूळचं कैलास लेणं हे संपूर्ण जगाला पडलेलं कोडं आहे. एकसंध खडकातून कोरण्यात आलेलं हे लेणं इ. स. 757 मध्ये राष्ट्रकूट राजवंश नरेश कृष्ण (प्रथम) यांच्या राजवटीत कोरण्यात आलं.
युनेस्कोच्या भारताच्या जागतिक वारसास्थळाच्या यादीत वेरूळचं नाव हे पहिल्या पाच स्थळांमध्ये येतं.
या मंदिराची निर्मिती ही 'आधी कळस मग पाया', या तत्त्वावर केली गेली आहे. भारतातील सगळ्या लेणी या एकतर खालून वर, नाही तर डोंगरफोडून समोरून आत अशा कोरलेल्या आहेत.
मात्र कैलास मंदिराची निर्मिती अतिशय नियोजनबद्धपणे कळसापासून पायापर्यंत करण्यात आली आहे.

हे मंदिर बनवण्यासाठी साधारण 150 वर्षं लागली असावी असं संशोधकांना वाटतं. हिमालयातील पांढऱ्या शुभ्र बर्फामध्ये कैलास पर्वतावर महादेवाचे वास्तव्य आहे, असं हिंदू पुराणांमध्ये म्हटलंय. त्यानुसार हे मंदिर जेव्हा पूर्ण झालं तेव्हा त्याला पांढऱ्या रंगाचा लेप लावण्यात आला होता. मात्र आता हा लेप काळाच्या ओघात निघून गेला आहे. तरीही काही ठिकाणी आपल्याला याचे अंश बघायला मिळतात.
इतिहास संशोधक डॉ. दुलारी कुरेशी सांगतात, "कैलास मंदिर निर्माण करताना एका मोठ्या शिळेला तीन भागांमध्ये वरून खालपर्यंत खोदण्यात आलं. या खोदकामात जवळपास 20 हजार टन दगड फोडून वेगळा करण्यात आला. लेणीच्या मध्यभागी जे मुख्य मंदिर आहे त्यामध्ये वरच्या बाजूला एक मोठे शिवलिंग आहे.
"या शिवलिंगाच्या समोर मोठा महामंडप आहे. या महामंडपात अनेक मोठमोठे, सुंदर कोरीवकाम असलेले स्तंभ आहेत. तर मंदिराच्या छताच्या आतल्या बाजूस भगवान शिवाचं तांडव नृत्य करणारं शिल्प कोरण्यात आलं आहे.

तसंच मंदिराच्या शिखरावर पाच सिंह कोरण्यात आले आहेत. आपण महाबलीपुरम येथे पाहिलं तर तिथेही सिंह, हत्ती कोरलेले आहेत. मात्र इथे कैलास मंदिरात या हे प्राणी पूर्णाकृती रूपात पाहायला मिळतात. या संपूर्ण मंदिराची बांधणी एखाद्या रथाप्रमाणे असून हे मंदिर व्याळ आणि हत्ती यांसाख्या प्राण्यांनी डोक्यावर उचललेलं आहे.
हे मंदिर म्हणजे दक्षिण आणि उत्तर वास्तु स्थापत्यशैलीचा उत्कृष्ट नमुना आहे. इथे समोरच्या बाजूला पाहीलं तर तुम्हाला गोपुरं दिसतात, तर पाठीमागच्या बाजूला शिखर दिसतात. तसंच या मंदिराच्या समोरील दोन्ही बाजूस दोन हत्ती आणि दोन ध्वजस्तंभ कोरलेले आहेत."
20 हजार टन दगडांचं काय केलं?
डोंगर फोडून जेव्हा कैलास मंदिर बनवण्यात आलं, तेव्हा जवळपास 20 हजार टन खडक फोडून बाहेर काढण्यात आला. पण कैलास मंदिराच्या आसपासच्या परिसरात कुठेही या दगडाचे अंश दिसत नाहीत.

त्यामुळे एवढ्या मोठ्या खडकांचं नेमकं काय झालं, याबद्दल माहिती देताना डॉ. कुरेशी सांगतात की, "आपण पाहिलं तर कैलास मंदिराच्या जवळपास अनेक मंदिरं आहेत. तसंच मराठवाड्यातही अनेक मंदिरं आहेत, जी चालुक्य आणि राष्ट्रकूट काळात बांधण्यात आलेली आहेत. या मंदिरांचे बांधकाम कैलास मंदिर ज्या खडकामध्ये आहे त्याच खडकांत आहेत.
मात्र त्या मंदिरांच्या जवळपास कुठेही उत्खनन केलेलं नाही अथवा डोंगरही नाहीत. त्यामुळे कैलास मंदिराच्या निर्मितीमधून निघालेला खडक या मंदिराच्या निर्माणात वापरला असावा अशी शक्यता आहे. मात्र हे ठाम पणे सांगता येत नाही."
कैलास मंदिराखाली एक पुरातन शहर आहे का?
कैलास मंदिराबाबात अनेक गोष्टी बोलल्या जातात. मंदिराच्या चारही बाजूस गुहेप्रमाणे काही जागा आहेत. ज्या अतिशय खोलवर गेलेल्या आहेत. काही परदेशी संशोधकांच्या मते या मंदिराच्या जमीनीखाली एक पुरातन शहर असण्याची शक्यता आहे. तर काही संशोधक हे मंदिर परग्रहवासीयांनी उभारल्याचं सांगतात.

याबद्दल डॉ. दुलारी यांना विचारले असता त्या म्हणाल्या, "मला नाही वाटत असं काही असेल. पावसाचं पाणी मंदिर परिसरात थांबू नये म्हणून ड्रेनेज सिस्टिम बनवण्यात आलेली आहे. त्यामुळे या भागात कितीही पाऊस पडला तरी या मंदिरात पाणी थांबत नाही. ते सर्व पाणी या नाल्यांमधून जमिनीच्या आत निघून जातं.
"अजून एक गोष्ट आहे की, विदेशी संशोधकांना वाटतं की, इतकं सुंदर, इतकी अद्भूत वास्तू निर्मिती भारतीय कसे करू शकतात. त्यामुळे ते हे चमत्काराने अथवा परग्रहवासीयांनी बनवलं आहे असे सांगतात. मुळात त्या काळात म्हणजे इ.स. 600-800 या काळात भारतीयांकडे जे तंत्र होते, जे विज्ञान अवगत होतं, ते आजच्या काळापेक्षा फार पुढचं होतं. त्यामुळे हिडन सिटी अथवा एलियन हे काही नाही. हे आपल्या लोकांनी बांधलेलं आहे."
औरंगजेबाने कैलास मंदिर तोडण्याचा प्रयत्न केला का?
औरंगजेब आणि कैलास मंदिर यांच्याबद्दल एक किस्सा इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतो. तो म्हणजे, औरंगजेबाने हिंदूंची अनेक मंदिरं नष्ट केली. मात्र ते जेव्हा कैलास मंदिर नष्ट करण्यासाठी आले तेव्हा त्यांच्या 1000 सैनिकांनी 3 वर्षांपर्यंत मंदिर तोडण्याचे प्रयत्न केले मात्र ते या कामात यशस्वी होऊ शकले नाहीत.

या बद्दल सांगताना डॉ. कुरेशी म्हणतात, "जेव्हा तुम्ही औरंगजेबचा इतिहास वाचतात. तेव्हा कळतं की, जेव्हा औरंगजेब इ.स. १६३६ ते इ.स. १६४४ औरंगाबादला वास्तव्यास होते आणि यानंतर पुढेही बराच काळ ते औरंगाबादला होते. तेव्हा ते वेरूळला नेहमी जायचे.
जेव्हा त्यांनी पहिल्यांदा कैलास मंदिर पाहिलं, तेव्हा ते म्हणाले 'अशी वास्तू मी जगात कुठेही पाहिली नाही. हे कदाचित एखाद्या 'जीन'नेच बनवलं असावं, मनुष्य एवढं सुंदर बांधूच शकत नाही... याचं वर्णन करायला माझी लेखणीही असमर्थ आहे.' हे त्यांचे त्यावेळचे उद्गार होते, असं तात्कालिक लोकांनी लिहून ठेवलेल्या माहितीत मिळतं. त्यानंतर औरंगजेब कित्येकवेळा आपल्या आमिर-उमराव यांच्यासोबत, त्यांच्या कुटुंबीयांसोबत येथे यायचे.
"औरंगजेबाबद्दल अनेक अफवा आहेत की त्यांनी या मंदिराची नासधूस केली वगैरे... मात्र ते सत्य नाही. औरंगजेबाने जी काही मंदिरं उद्ध्वस्त केली, त्याची यादी आहे. त्या यादीत वेरूळच्या कैलास मंदिराचा कुठेही उल्लेख नाही," असंही डॉ. दुलारी आवर्जून सांगतात.

मात्र असं असलं तरी हिंदू मंदिरांबद्दल औरंगजेबचं वर्तन हे परस्पर विसंगत आणि विरोधी असल्याची नोंद इतिहासात असल्याचं इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत सांगतात.
ते म्हणाले, "औरंगजेबाच्या मनावर जेव्हा जिहाद स्वार होता त्यावेळेस त्याने काशी विश्वेश्वराचं मंदिर पाडल्याचे पुरावे इतिहासात नोंद आहे. औरंगजेब त्याकाळी स्वतःला पीर समजायचा. स्वतःला जिंदा पीर म्हणवून घ्यायचा. ज्या वेळी औरंगजेबाने मराठाविरोधी लष्करी मोहीम सुरू केली, तेव्हा मराठ्यांच्या किल्ल्यांवरची मंदिरं पाडायला सुरुवात केली. विशेष म्हणजे या कामासाठी त्याने विशेष अधिकाऱ्यांची नेमणूक केली होती. मराठ्यांच्या ताब्यातील गड जिंकल्यानंतर तिथली दगडी बांधकामं असलेली मंदिर पाडण्याची जबाबदारी या अधिकाऱ्यांवर देण्यात आली होती.
"अशा प्रकारे औरंगजेबाने मंदिरं पाडण्याचे दिलेल्या आदेशांची इतिहासात नोंद आहे. तर दुसऱ्या बाजूला काही मंदिरांना औरंगजेबानं इनाम देण्याचे देखील पुरावे इतिहासात उपलब्ध आहेत. ज्या बहादूरगडावर संभाजी महाराजांचे डोळे काढण्याचे क्रूर आदेश दिले होते त्या ठिकाणी औरंगजेबाचा मुक्काम होता.
त्या मुक्कामाच्या ठिकाणी असलेल्या भिंतीला लागून असलेलं विष्णू मंदिर आजही सुस्थितीत आहे. नैसर्गिकरित्या या मंदिराची अवस्था खराब झाली असली तरी ज्या ठिकाणी संभाजी महाराजांवर क्रूर अत्याचार करण्यात आले, त्या ठिकाणच्या मंदिराला हातही लावण्यात आला नव्हता हा विरोधाभास म्हणावा लागेल," असं इंद्रजीत सावंत यांनी सांगितलं.

तर कोल्हापूर मधील अंबाबाई मंदिरात खजिना असल्याची माहिती औरंगजेबाला झाली होती. मात्र हे मंदिर आजही सुस्थितीत आहे, असंही सावंत सांगतात.
दौलताबादचे राजे हसन गंगू बहामनी यांनीदेखील कैलास मंदिराला भेट दिल्याचं डॉ. कुरेशी सांगतात. "दौलताबादच्या किल्ल्यावर जेव्हा हसन गंगु बहामनी यांची ताजपोशी झाली, तेव्हा त्यांना कोणी तरी सांगितले की, इथून जवळच काही लेणी आहेत. ज्या तुम्ही पाहून नक्कीच आश्चर्यचकीत व्हाल. तेव्हा बहामनी यांनी त्या पाहाण्याचा निर्णय घेतला. त्यांच्यासाठी दौलताबाद ते वेरूळ रस्ता बांधण्यात आला. तसंच सर्व लेण्यांची स्वच्छता करण्यात आली.

"हसन गंगु बहामनी यांनी आपल्यासोबत काही ब्राह्मण पंडित नेले. ते तिथे जवळपास आठ दिवस राहिले. त्यामध्ये त्यांनी तेथील १२ लेण्या पाहिल्या. त्या ब्राह्मण पंडितांनी तिथे असलेल्या सर्व शिलालेखांची नोंद घेतली. या शिलालेखांचे हैदराबाद येथील एक लेखक जब्बार खान यांनी भाषांतर केलं होतं.
त्यामधली काही भाग असा आहे की, '...जर एखाद्या राजाला वाटलं की, असं मंदिर बनवावं, तर त्यांना 20,000 सर्वोत्तम कारागीर, तसंच मंदिर बनवण्यासाठी 1000 वर्षं लागतील. तसंच एवढा काळ त्यांना त्यांच्या खजिन्याचं तोंड उघडं करून ठेवावं लागेल. तेव्हा कुठे अशी वास्तू निर्माण करता येईल. अन्यथा असे मंदिर बनणं शक्यच नाही."
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)









