अजिंठा लेणी : 2000 वर्षांपूर्वीच्या भित्तीचित्रांचं साकारतंय नवं रूप
- Author, राहुल रणसुभे
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
जागतिक वारसास्थळ असलेल्या अजिंठा लेण्यांतील भित्तीचित्रं काळाच्या ओघात नष्ट होत चालली आहेत. लेण्यांतील केवळ हाताच्या बोटांवर मोजता येतील एवढीच चित्रं आता शिल्लक राहिली आहेत.
अनेक चित्रं दिसत नाहीत, धूसर झाली आहेत. तर काही चित्रांची मोडतोड झाली आहे. ही चित्रं कशी असतील याचा अभ्यास करून ती पूर्ण करण्याचा ध्यास काही चित्रकारांनी घेतला आहे. त्यापैकीच आहेत एम. आर. पिंप्रे आणि विजय कुलकर्णी हे दोन चित्रकार. त्यांनी अजिंठ्यातील अनेक चित्रं पुनरुज्जीवित केली आहेत.
औरंगाबादपासून सुमारे 100 किमी अंतरावर असलेल्या अजिंठा लेण्यांचा परिसर अत्यंत रमणीय आणि घोड्याच्या नालीच्या आकाराचा आहे. येथील लेणींकडे बौध्द वास्तूशास्त्र, भित्तीचित्रं आणि शिल्पकृतीचा आदर्श नमुना म्हणून पाहिलं जातं.
1899मध्ये जॉन स्मिथ या ब्रिटिश अधिकाऱ्याला वाघाच्या शिकारीदरम्यान या लेण्यांचा शोध लागला होता. पुढच्या वर्षी म्हणजेच 2019मध्ये ही लेणी जगासमोर येण्याच्या घटनेस 200 वर्षं पूर्ण होत आहेत. युनेस्कोने 1983मध्ये या लेण्यांना जागतिक वारसास्थळाचा दर्जा दिला.

सुमारे 2000 वर्षांपूर्वींचा चित्रकलेचा हा एक उत्तम नमुना आहे. या चित्रांमधील शरीररचना, केशरचना, वास्तूकला, कपड्यांवरील नक्षीकाम, दागदागिने, शिल्पकला आदी अनेक गोष्टींमधून तो काळ आपल्यासमोर उलगडत जातो.
येथील विहार, चैत्यगृह, स्तूप आदी गोष्टी रसिकांना आकर्षित करतात. या लेण्यातील शिल्प आपल्याला बरंच काही सांगत असतात, आपल्याशी बोलत असतात मात्र सामान्य माणूस त्याचा अर्थ लावू शकत नाही. बौध्दांच्या जीवनातील अनेक प्रसंग या लेण्यांमध्ये चित्रित केले आहेत.
चित्रांचा अर्थ
ही लेणी चित्रांमध्ये सर्वश्रेष्ठ समजली जातात. जवळपास 500पेक्षा जास्त जातककथा या लेण्यांमध्ये चित्रित केल्या आहेत. मात्र त्यापैकी बरीचशी चित्रं आता नष्ट होत चालली आहेत. या चित्रांचा नेमका काय अर्थ आहे हे सांगणारी फारच थोडी माणसं आज आहेत. त्यापैकी दोन नाव म्हणजे एम.आर. पिंप्रे आणि विजय कुलकर्णी ही चित्रकारद्वयी.

पिंप्रे यांची 350 चित्रं
एम. आर. पिंप्रे गेली 55 वर्षें अजिंठ्यावरील चित्रांचा अभ्यास करत आहेत. त्यांनी आतापर्यंत अजिंठ्यातील 350 चित्रं काढली आहेत.
या चित्रांबद्दल पिंप्रे सांगतात, "अजिंठ्याची फोटोग्राफी खूप झाली, लिखाण भरपूर झालं. मात्र 2000 वर्षांपूर्वीचं जे अजिंठ्याचं चित्रं आहे ते अजून लोकांसमोर आलेलं नाही. जगाच्या कानाकोपऱ्यातून इथं लोकं येतात. हजारो लाखो रुपये खर्च करतात. प्रत्यक्षात लेण्यांमध्ये गेल्यानंतर त्यांना काहीच चित्रं दिसत नाही. लेण्यांमधल्या सुमारे 70% पेंटिंग्ज्सची दुर्दशा झालेली आहे. जी चित्रं शिल्लक आहेत. ती सहज दिसतही नाहीत."

चित्रं फक्त अजिंठ्याचीच
औरंगाबादमधील ताज विवांता या हॉटेलमध्ये एका भागात अजिंठ्याच्या चित्रांचं प्रदर्शनच भरलंय असं दिसतं. ती आहे आर्ट गॅलरी चित्रकार विजय कुलकर्णी यांची.
मुंबईच्या जे.जे. स्कूल ऑफ आर्ट्समधून शिक्षण घेतलेले कुलकर्णी हे अबस्ट्रॅक्ट पेंटींग्ज करायचे. त्यांनी त्याची अनेक प्रदर्शनं देखील भरवली आहेत. मात्र अजिंठ्याच्या चित्रांचा त्यांच्या मनावर असा प्रभाव पडला की त्यांनी इतर चित्रं काढायचं बंद केलं. याबदद्ल ते सांगतात...

"मी जवळजवळ 40 वर्षांपासून अजिंठा पेटिंग करतो. आम्हाला पुरातत्व खात्याकडून परवानगी मिळाली होती. अजिंठ्यात बसून चित्रं काढण्याची संधी ही एक अनोखी गोष्ट आहे. कारण साधारणतः तिथे बसून कोणालाच पेंटिंग करण्यास परवानगी नाही. मात्र आम्हाला ती मिळाली होती. त्यामुळे ही चित्रं काढत असताना मला अजिंठ्याची इतकी गोडी निर्माण झाली की लक्षात आलं आयुष्यभर हेच पेंटिंग करायचं No other painting. Only Ajintha."
अजिंठ्यातील अनेक चित्रं आता नाहीशी झाली आहेत. अशी काही चित्रंसुध्दा पिंप्रे यांनी पूर्ण केली आहेत. त्याबद्दल ते सांगतात की, "10व्या क्रमांकाच्या लेणीमध्ये एक चित्रं आहे जे केवळ 5 ते 10 टक्केच दिसतं. ते चित्र मी 100 टक्के पूर्ण केलं आहे."
"हे चित्र अजिंठ्यातलं सर्वांत जुनं म्हणजे इसवी सन पूर्व दुसऱ्या शतकातील आहे. मात्र हे चित्र काढताना लक्षात येतं की त्याकाळचे हे कलाकार किती आधुनिक विचारांचे होते. त्यांची केशरचना, कपडे, वास्तूस्थापत्य अशा अनेक बारीक-बारीक गोष्टी त्यांनी त्यांच्या चित्रात टिपल्या आहेत. मात्र आज लेण्यांमधील चित्रात या गोष्टी काहीच दिसत नाही आणि अजून काही वर्षांनंतर तर हे पूर्णपणे नष्ट होणार आहे. तर अशा प्रकारची चित्रं दृश्य स्वरूपात आणण्याचं काम मी करतोय."

मूळ चित्र कधीची?
अजिंठ्यातील ही चित्रं कशाप्रकारे काढली असतील असा प्रश्न तिथे गेलेल्या प्रत्येकाला पडतो. 2000 वर्षांपूर्वीचे रंग अजूनही इतके टवटवीत कसे आहेत असाही प्रश्न पडतो.
त्या तंत्राबद्दल विजय कुलकर्णी सांगतात, "अजिंठ्यातली जी चित्रं आहेत त्या संपूर्ण चित्रांना, पूर्ण यलो ऑकर रंगाचा वॉश असायचा. त्या यलो ऑकर रंगावर हे सगळं लाईन ड्रॉईंग केलं जायचं. त्यानंतर मग त्याच्यामध्ये वेगवेगळ्या रंगांचे थर दिले गेले. अजिंठ्याच्या चित्रशैलीमध्ये तपकिरी, गेरू, ऑकर, ऑलिव्ह ग्रीन, सॅप ग्रीन यांचा वापर दिसतो. त्यावेळी नीळा रंग उपलब्ध होत नव्हता. तो परदेशातून मागवावा लागायचा. त्यामुळेच त्याचा वापर फार थोड्या ठिकाणी करण्यात आलेला आहे."

चित्रांचं हवं संग्रहालय
पिंप्रे यांची अशी इच्छा आहे की, त्यांनी काढलेल्या सर्व चित्रांचं सरकारतर्फे एक संग्रहालय बनवावं जिथे ही सर्व चित्रं लोकांना पाहाता येतील. याबद्दल ते आवर्जून सांगतात की, "मी काढलेली ही सर्व चित्रं जर जगासमोर आली तर सरकारला तसेच अजिंठा या विषयावर संशोधन करणाऱ्यांना ती फार उपयुक्त ठरू शकेल. तसेच जी माणसं लेण्यांमध्ये चित्रं पाहण्यासाठी येतात. ते लेण्यातील चित्र पाहतील त्यानंतर ते ही चित्रं पाहतील तेव्हा त्यांना लगेच ती चित्रं कशी होती याचाही अंदाज येईल. त्यामुळे पर्यटनाला याचा फायदा होईल."
पुरातत्व खात्यातर्फे अजिंठा लेणीतील चित्रं संवर्धनाचं काम वेळोवेळी करण्यात येतं. सरकारतर्फे त्यावर मोठा निधीही खर्च करण्यात येतो.
"पिंप्रे सरांचं काम खूपच चांगलं आहे. आज आपण जी अजिंठाची चित्र पाहतो तेव्हा आपल्याला ती मूळ स्वरूपात कशी असतील याची कल्पना येत नाही. आजही आपल्याला ती सुंदर दिसतात. मात्र ती मूळ रुपात पाहता आली तर आणखी समाधान मिळेल. ती इच्छा पिंप्रे यांच्या पेंटींग्जमधून पूर्ण होते," असं आयटीडीसीच्या विभागीय संचालक निला लाड म्हणतात.
ही चित्रं जतन करणं हे मोठ आव्हान आहे. काही चित्रकार, शिल्पकार आणि छायाचित्रकार त्यांच्या परीने नेटानं हे काम करत आहेत. सरकारनंही आणखी पुढाकार घ्यावा असं या मंडळींना वाटतं. त्यातून हा ठेवा जगासमोर तर येईलच आणि पर्यटनालाही फायदा होईल.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)









