चहा-समोशांच्या मोबदल्यात रंगवून घेतलं मधुबनी रेल्वे स्टेशन!

फोटो स्रोत, Seetu tewari/bbc
- Author, सीटू तिवारी
- Role, मधुबनीहून बीबीसी हिंदीसाठी
मधुबनीचं नाव ऐकल्यावर पहिल्यांदा डोळ्यासमोर काय येतं? तिथली सुंदर चित्रं. या चित्रांमुळेच या शहराची ओळख आहे.
ही चित्रं आता मधुबनी रेल्वे स्टेशनच्या भिंतीवर काढण्यात आली आहेत. स्थानिक कलाकारांनी रात्रीचा दिवस करून ही चित्रं काढली खरी, पण त्याबदल्यात त्यांना काय मिळालं? या प्रश्नाची चर्चा सध्या मधुबनीत सुरू आहे.
बिहारमध्ये असलेलं मधुबनी स्टेशन 14 ऑक्टोबरनंतर अतिशय सुंदर दिसत आहे. पण या सौंदर्याची निर्मिती करणारे कलाकार मात्र नाराज आहेत. आपली फसवणूक झाली अशी त्यांची भावना आहे.
हे स्टेशन रंगवणाऱ्या कलाकारांपैकी एक असलेले अशोक कुमार म्हणतात, "आम्ही रात्रंदिवस मेहनत केली. आम्हाला त्याचा ठरलेला मोबदलासुद्धा मिळाला नाही."

फोटो स्रोत, Seetu tewari/bbc
"रोजचे 100 रुपये मिळतील असं आम्हाला सांगितलं होतं. गिनीज बुकमध्ये नाव येईल असं देखील सांगण्यात आलं होतं. पण यापैकी काहीच झालं नाही. आमचं शोषण झालं आहे," असं अशोक कुमार म्हणतात.
समस्तीपूरच्या रेल्वे मंडळाचे डीआरएम रवींद्र जैन यांनी मात्र या आरोपांत तथ्य नसल्याचं म्हटलं आहे.
रवींद्र जैन म्हणाले, "कलाकारांनी स्वेच्छेनं हे काम केलं आहे. रेल्वेनं त्यांना प्रशस्तीपत्रक, प्रोत्साहनपर कॅश अॅवॉर्ड म्हणून 500 रुपये आणि पेंटिंगसाठी लागणारं सारं साहित्य पुरवलं. याशिवायची प्रशस्ती म्हणून या कलाकारांची नावं त्यांच्या कलाकृतींवर चितारण्यात आली आहेत."
याच विषयावर प्रकल्पाचे नोडल ऑफिसर गणनाथ झा यांना विचारलं तेव्हा यांनी बीबीसीला सांगितलं, "ज्या कलाकारांनी सर्व दिवस काम केलं त्यांना 1300 रुपये देण्यात आले. ज्यांनी थोडे कमी दिवस काम केलं त्यांना त्यानुसार पैसे दिले आहेत."
मधुबनी पेंटिंगनं रंगवलं पूर्ण स्टेशन
हे स्टेशन रंगवण्याचं काम मधुबनीतील 180 कलाकारांनी हातात घेतलं. मिथिला चित्रकला किंवा ज्याला सामान्य लोक मधुबनी पेंटिंग म्हणून ओळखतात त्या शैलीचे हे कलाकार आहे.
त्यांनी स्टेशन रंगवण्याच्या या कामाची सुरुवात महात्मा गांधी जयंतीला म्हणजेच 2 ऑक्टोबरला केली. पुढील 12 दिवस त्यांनी अथक परिश्रम करून हे काम पूर्ण केलं. स्थानिक कलाकारांनी जीव ओतून 7,005 स्क्वे. फूट भिंतीवर चित्रं काढली.

फोटो स्रोत, Seetu tewari/bbc
त्या चित्रकारांची नावं देखील बोर्डावर लिहिण्यात आली आहेत. या कलाकारांचं श्रमदान आणि अथक प्रयत्नांमुळेच हे शक्य झालं, असंही फलकावर लिहिलेलं आहे.
कलाकाराचं कौतुक करण्यात आलं, पण त्यांना ठरवलेला मोबदला न मिळाल्यामुळे त्यांच्यात नाराजी पाहायला मिळत आहे.
'दिवसाला 100 रुपये मिळणार होते'
मधुबनीतील एक स्थानिक संस्था 'क्राफ्ट वाला'या वतीने या कलाकारांना एकत्र केलं गेलं होतं आणि या प्रकल्पाविषयी माहिती दिली होती.
"हे काम करण्याचा तुम्हाला मोबदला मिळणार नाही पण चहा पाण्याच्या खर्चासाठी दिवसाला 100 रुपये मिळतील असं त्यांनी स्पष्ट केलं असल्याचं कलाकार सांगतात.
हे पैसेही काही कलाकारांनाच मिळाले आणि काहींना मिळाले नाहीत, हे या कलाकारांच्या नाराजीमागचं एक कारण.
कलाकारांच्या नाराजीचं दुसरं कारण म्हणजे त्यांना असं सांगण्यात आलं होतं, "तुमचं नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये येईल," पण त्यांना देण्यात आलेलं हे वचन पूर्ण झालेलं नाही.

फोटो स्रोत, Ssetu tewari/bbc
स्थानिक पत्रकार अभिजीत कुमार यांनी बीबीसीला सांगितलं, "कलाकारांना अशी आशा वाटत होती की त्यांचं नाव गिनीज बुकात येईल. म्हणून त्यांनी केवळ चहा-पाण्यावर हे काम करण्याचं ठरवलं."
पण रेल्वेनं हा विक्रम नोंदवण्यासाठी आवश्यक ती प्रक्रिया वेळेत पूर्ण न केल्यामुळं त्यांचं नाव गिनीज बुकमध्ये येऊ शकलं नाही, असं अभिजीत कुमार म्हणतात.
"रेल्वेच्या बेपर्वाईमुळे असं झालं. आपल्याला फसवलं गेल्याची भावना या कलाकारांच्या मनात निर्माण झाली आहे," असं कुमार म्हणाले.
स्थानिक पत्रकारांना आता गिनीज बुकमध्ये पुढे या संदर्भात काही होईल याची आशा वाटत नसली तरी रेल्वे अधिकाऱ्यांनी अजून आशा सोडल्या नाहीत.
समस्तीपूर रेल्वे मंडळाचे डीआरएम रवींद्र जैन म्हणतात, "कलाकारांनी स्टेशन खूप सुंदर बनवलं आहे. त्यांचं नाव गिनीज बुकमध्ये यावं यासाठी आम्ही झटत आहोत."
रेल्वेकडून काही सुविधा नाहीत
राज्य पुरस्कारप्राप्त कलाकार उमा झा यांच्या नेतृत्वाखाली 12 कलाकारांनी स्टेशनवर रामायणाच्या कथेचं चित्रण केलं आहे.
"हेच काम आम्ही दिल्लीत केलं असतं तर आम्हाला लाखो रुपये मिळाले असते. आमचं नाव गिनीज बुकात नोंदवलं गेलं असतं. पण इथं तर आमच्या हातात काहीच आलं नाही," अशी खंत उमा यांनी बीबीसीशी बोलताना व्यक्त केली.

फोटो स्रोत, Seetu tewari/bbc
"त्याच बरोबर रेल्वेकडून आम्हाला काही सुविधा मिळतील असं म्हटलं जात होतं पण त्या देखील आम्हाला मिळाल्या नाही. आता तर लोक असं म्हणत आहेत की, हे काम पाहून आम्हाला इतर स्टेशनवर देखील चित्र काढण्याचं काम मिळणार आहे."
असाच सूर कलाकार सीमा निशांत यांच्या बोलण्यात जाणवला. त्या म्हणतात, "या लोकांनी आपला प्रचार-प्रसार तर केला, पण कलाकारांना काय मिळालं?"
काही कलाकारांनी आपल्या इच्छेनुसार काम केलं आहे. सर्वच जण तक्रार करत आहेत असं नाही. प्रियांशु आणि कल्पना झा अशा कलाकारांपैकी आहेत ज्यांची रेल्वेबद्दल काही तक्रार नाही.
ते म्हणतात, "आमच्यावर कुणी दबाव टाकला नाही. आम्ही या ठिकाणी आमच्या मर्जीनं आलो आहोत. काही मिळालं तर ठीक. नाही मिळालं तरी काही तक्रार नाही."

फोटो स्रोत, Seetu tewari/bbc
दरम्यान, स्थानिक लोक आणि प्रवासी मात्र या बदलांमुळे आनंदी झालेले दिसत आहेत. मधुबनी स्टेशनवर आल्यावर लोक सेल्फी घेत आहेत, आपल्या स्मार्टफोननं व्हीडिओ काढत आहेत.
"2016 मध्ये एका सर्व्हेनुसार मधुबनी स्टेशन हे अस्वच्छ स्टेशन आहे असं म्हटलं होतं. आता याचं रुप पूर्ण पालटून गेलं आहे", असं बिस्फीचे राम नारायण महतो यांनी बीबीसीला सांगितलं.
"हा बदल निश्चितच चांगला आहे. महिलांनी एकत्र येऊन हे काम केल्यामुळं अधिक आनंद होतो. प्रत्येक स्टेशन असं सुंदर झालं तर किती छान वाटेल..." ते सांगतात.
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








