'गुजरातमध्ये फक्त नावापुरती निवडणूक'

फोटो स्रोत, AFP/Getty Images
- Author, प्रा. शिव विश्वनाथन
- Role, समाजशास्त्रज्ञ
मी माझ्या एका निवडणूक विश्लेषक मित्राला विचारलं, 'तुला गुजरात निवडणुकीबद्दल काय वाटतं?'
माझा प्रश्न ऐकून तो हसायला लागला आणि म्हणाला, "अरे ही निवडणूक थोडीचं आहे. ही तर 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकांची सराव परीक्षा आहे."
"2019 मध्ये त्यांची खरी परीक्षा आहे. त्या परीक्षेची तयारी म्हणून भाजप अध्यक्ष अमित शहा गुजरात निवडणुकांकडे पाहत आहेत. ही तर त्यांच्यासाठी एक पायलट स्टडी आहे असं म्हणा हवं तर," असं तो म्हणाला.
"या निवडणुकीत जर काही चुका झाल्या तर त्या सुधारून 2019 ला परत निवडून येता येण्याच्या दृष्टीतून भाजप या निवडणुकांकडे पाहत आहे," असं तो म्हणाला.
निवडणुका शंका-कुशंका, तर्क-वितर्क, स्पर्धा, अनिश्चितता आणि धक्कातंत्राच्या जोरावर लढवल्या जातात. पण, या निवडणुकांमध्ये हे कुठंच दिसत नाही. सध्या जे काही सुरू आहे ते सर्व स्क्रिप्टेड वाटत आहे.
भाजप तर प्रचाराच्या लाटेवर स्वार झाला आहे. सध्या जो काही थोडा-फार संघर्ष आणि एकमेकांची टर उडवलेली दिसत आहे ते निव्वळ मनोरंजन आहे.
लोकशाही शाबूत आहे हे दाखवण्यासाठी हे सर्व सुरू आहे असं आपण म्हणू शकतो. भाजपची खरी नजर तर 2019 च्या लोकसभा निवडणुकांवर आहे. आज सुरू असलेला संघर्ष हा केवळ टाईमपास आहे.
मोदींची जादू
माझा मित्र पुढं म्हणतो, "गेल्या काही निवडणुकांचे निकाल पाहिले तर पंतप्रधान मोदी हे लोकांच्या हृदयावर राज्य करतात असं दिसून येतं."

फोटो स्रोत, Getty Images
"भले ही मोदींच्या भाषणात मोठ्या-मोठ्या घोषणा असतात. पण, त्यांचं भाषण ऐकलं की लोकांना स्फूर्ती येते," असं तो म्हणतो.
"मोदींचं भाषण ऐकलं की त्यांना असं वाटतं की मोदींना खरचं काही तरी करून दाखवण्याची इच्छा आहे. एक खास उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेऊन मोदी आपली पूर्ण शक्ती पणाला लावत आहे असा भास लोकांना होतो," असं तो म्हणतो.
तर दुसऱ्या बाजूला विरोधी पक्ष आहे ज्यांच्या हाती ना कुठला मुद्दा आहे ना कुठला कार्यक्रम. विरोधी पक्ष पूर्णपणे विखुरलेला दिसत आहे.
मोरारी बापू, स्वामीनारायण पंथाचे प्रमुख, जग्गी वासुदेव यांच्या सारख्या अनेक धार्मिक गुरुंनी मोदींना चांगल्या कामाचं प्रामाणपत्र दिलं आहे.
दुसरीकडे राहुल गांधी यांना असं प्रमाणपत्र फक्त त्यांच्या मार्शल आर्ट्सच्या गुरुकडूनच मिळालं आहे.

फोटो स्रोत, TWITTER/BHARAD
राहुल गांधी आयकिडो नावाचं जे मार्शल आर्ट शिकत आहेत, त्याचा राजकारणाशी काही संबंध नाही.
मोदींना अमित शहांची साथ आहे. तसंच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पूर्ण शक्ती मोदींच्या पाठीशी आहे.
निष्क्रिय विरोधक
भाजपच्या निवडणूक प्रचारात असलेला सुसज्जपणा लोकांना भावतो. विरोधी पक्ष मात्र अद्यापही वेगवेगळ्या शक्यता तपासताना दिसत आहे.
त्यांच्याकडे काही चांगले नेते नक्कीच आहेत. राजस्थानमध्ये सचिन पायलट, बंगालमध्ये ममता बॅनर्जी आहेत. पण, त्यांच्यात कुठेही एकी दिसत नाही.
विरोधकांकडे सध्या ना कुठला चेहरा आहे, ना कुठली ओळख, ना कुठला कार्यक्रम.
तात्पर्य काय तर नशीब भाजपच्या बाजूनं आहे. विकासासाठी प्रयत्नशील असलेला पक्ष असाच लोकांचा त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन आहे.
नोटाबंदीचंच उदाहरण घ्या. खरंतर नोटाबंदी ही असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी एक सामाजिक आपत्तीच होती. असं असलं तरी, नोटाबंदीच्या निकालांवर लक्ष न देता हेतूंवर लक्ष केंद्रित करण्यात आलं.
नोटाबंदीकडे नैतिकतेचा खेळ म्हणून पाहण्यात आलं, जो काही अंशी अयशस्वी झाला. पण, खूप कमी लोकांनी यासाठी नरेंद्र मोदींना जबाबदार धरलं.
दोन वर्षी कधी जातील याची लोक वाट पाहत आहेत, असं वाटतं. सध्याचा काळ ते 2019 ची निवडणूक ही एक निर्वात पोकळी आहे. कदाचित त्यामुळंच 2019 सालच्या निवडणुकांची लोक आतुरतेने वाट पाहत आहेत.
भाजप चुका केल्या नाहीत असं अजिबात नाही. त्यांची शेती आणि रोजगाराबाबतची धोरणं म्हणजे तर संकटच आहेत. त्याच्या विपरीत परिणामांनंतरही लोक त्याबाबत सवाल उपस्थित करत नाहीत.
राजकारणाचा पोकळ अध्याय
एक मात्र नक्की आहे की राजकारणात एवढी शांतता योग्य नाही. निवडणुकांमध्ये जे रंगबिरंगी वातावरण पाहिजे तसं दिसत नाही.
खरंतर हा राजकारणाचा एक पोकळ अध्याय आहे. ज्यामध्ये सत्तेत असलेल्यांचं प्रसारमाध्यमांशी संगनमत आहे आणि मनमानी कारभार सुरू आहे. आणि दुसरीकडं विरोधी पक्ष आहे ज्यांचा कशातच ताळमेळ नाही.

फोटो स्रोत, Getty Images
सध्या आवश्यकता आहे ती सशक्त विरोधी पक्षाची. भाजप पूर्णपणे यशस्वी झाला आहे असं नाही. पण, त्यांच्या राजकारणापुढं विरोधकांच्या राजकारणाला मरगळ आल्यासारखं वाटत आहे.
मोदी आणि शहा यांच्या मोठमोठ्या होर्डिंग्जमुळे या निवडणुका मूक चित्रपटांप्रमाणे वाटत आहेत. लोकशाहीचा आवाजच कुठे ऐकू येत नाही.
त्रिकूटाचं भविष्य काय?
गुजरातमध्ये हार्दिक पटेल, अल्पेश ठाकूर आणि जिग्नेश मेवाणी हे त्रिकूट लक्ष वेधून घेत असलं, तरी अमित शहा यांच्यासारख्या बलाढ्य नेत्यांसमोर ते लहान मुलांप्रमाणं वाटत आहेत.

फोटो स्रोत, Getty Images
भाजप आपल्या चांगल्या कामांमुळे जनतेच्या मनावर राज्य करत आहे असंही नाही. पण, विरोधकांकडं मुद्दे नसल्यामुळं ते भरकटलेले दिसत आहे. नवीन पटनाईक, लालूप्रसाद यादव, ममता बॅनर्जी यांच्या सारख्या नेत्यांचा हा पराभव आहे.
या सर्वांना एकत्र येऊन रणनीती आखणं शक्य होतं. पण, तसं होताना दिसत नाही. राज्य पातळीवर हे नेते मोठे आहेत. पण, राष्ट्रीय पातळीवर त्यांचा फारसा प्रभाव दिसत नाही.
सध्याच्या घडीला भारतीय राजकारण या नेत्यांकडून फार अपेक्षा ठेवून नाही.
लोकशाहीमध्ये चुका सुधारणं, लोकांच्या म्हणण्याकडं लक्ष देणं, वादग्रस्त मुद्यांवर चर्चा होणं अपेक्षित आहे. पण, या गोष्टींचा अभाव जाणवत आहे.
लोकशाही काय गमावत आहे?
कधीकाळी चेन्नई हे शहर राजकीय विचारांचं आणि आंदोलनाचं केंद्रबिंदू होतं. सध्या हे शहर भकास वाटत आहे.
कमल हासन आपलं राजकीय अस्तित्व शोधण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे, तर रजनीकांत यांनी मौन धारण केलं आहे. राजकारणाचं हे दुबळेपण चिंतेचा विषय आहे.
माध्यमं आधीच भाजपचा 2019 चा विजयोत्सव साजरा करत आहेत.
आम्हाला तर केवळ हीच अपेक्षा आहे की समाजातील काही लोक या परिस्थितीविरोधात आवाज उठवतील आणि लोकशाहीला पूरक असणारी चर्चा करतील.
सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारतील, केलेल्या कामाचा जाब विचारतील आणि देशहितासाठी एक चळवळ उभी करतील. कारण 2019 ची निवडणूक झोपेतच पार पडायला नको.
लेखक शिव विश्वनाथन हे ओ.पी. जिंदाल विद्यापीठात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








