पाहा व्हीडिओ : बुधियाला प्रशिक्षकांचं पाठबळ; मॅरेथॉन शर्यतीत धावणार
- Author, सलमान रावी
- Role, बीबीसी प्रतिनिधी, भुवनेश्वर
काही वर्षांपूर्वी चार वर्षांच्या बुधियाने 65 किलोमीटरच्या मॅरेथॉन शर्यतीत धावण्याचा पराक्रम केला होता. चिमुकल्या बुधियाच्या या किमयेने क्रीडाक्षेत्रात खळबळ उडवून दिली. पुरी ते भुवनेश्वर हे अंतर त्याने सात तासांत गाठलं.
इतक्या लहान वयात व्यावसायिक धावपटूला साजेशा या पराक्रमाने बुधिया एका दिवसात सेलिब्रेटी झाला होता. मात्र अचानक मिळालेल्या या प्रसिद्धीनंतर बुधिया विजनवासात गेला. त्यातून सावरण्याची त्याची धडपड आजही सुरू आहे.

फोटो स्रोत, DEBALIN ROY/BBC
ओडिशाची राजधानी असलेल्या भुवनेश्वर शहरात बुधिया राहतो. बुधिया आता 15 वर्षांचा आहे.
2006 नंतर बुधिया कोणत्याही शर्यतीत सहभागी झालेला नाही. बुधियाचे प्रशिक्षक बिरंची दास यांच्या हत्येमुळे बुधियाच्या आयुष्यात पोकळी निर्माण झाली.
मॅरेथॉनमध्ये सहभागी झाल्यानंतर बुधिया ऑलिम्पिकचं स्वप्न पाहू लागला होता. मात्र या प्रवासात अडथळा निर्माण झाला. भुवनेश्वर शहरातल्या सलिया साई भागात बुधियाची आणि माझी भेट झाली.

फोटो स्रोत, PURUSHOTTAM THAKUR/BBC
याच झोपडपट्टीतून प्रशिक्षक बिरंची दास यांनी बुधियाला हेरलं होतं. बुधियाच्या कौशल्याला पारखण्याचं काम करण्याचं बिरंची यांनी केलं होतं.
ऑलिम्पिक पदकाचं स्वप्न
बुधिया आणि त्याच्या घरच्यांना बाहेरच्या कोणालाही भेटण्यात स्वारस्य नाही. काही दिवसांपूर्वी प्रसारमाध्यमांनी बुधियाविषयी दिलेल्या बातम्यांमुळे त्याचे कुटुंबीय नाराज आहेत.

फोटो स्रोत, DEBALIN ROY/BBC
खूप प्रयत्नपूर्वक आम्ही त्याला शोधून काढलं. सुरुवातीला बोलताना अवघडलेल्या बुधियाने हळूहळू स्वत:च्या प्रवासाबद्दल सांगितलं. लहानपणापासून एकच स्वप्न आहे.
ऑलिम्पिकमध्ये देशाचं प्रतिनिधित्व करायचं आहे आणि देशासाठी पदक जिंकायचं आहे.
बुधियाच्या कुटुंबीयांनी अनेक चढउतार पाहिले आहेत. आजही ते कशीबशी गुजराण करतात.
खडतर वाटचाल
बुधियाची आई सुकांती सिंह यांच्या कमाईतून घर चालतं. बुधियाला तीन बहिणी आहेत आणि त्या शिकत आहेत. तुटपुंज्या पगारात सुकांती पाच जणांचं कुटुंब कसंबसं चालवतात.

फोटो स्रोत, DEBALIN ROY/BBC
बुधिया, त्याच्या बहिणी यांच्यासमवेत वावरताना सुकांती यांनी आपल्या पतीच्या आठवणींना उजाळा दिला.
कोणीही मदत केली नाही
सुकांती यांनी सांगितलं, 'मला दर महिन्याला 8000 रुपये मिळतात. महागाईच्या काळातही इतक्या कमी रकमेवर आम्ही घर चालवतो. याच कमाईतून घरभाडं देतो. याच पैशातून दोन वेळच्या जेवणाची सोय होते.'

फोटो स्रोत, PURUSHOTTAM THAKUR/BBC
"गाडीचं भाडंही यातूनच द्यावं लागतं. कमीत कमी गरजा ठेऊन आम्ही गुजराण करतो. बुधियाने मॅरेथॉन शर्यतीत पराक्रम केल्यानंतर अनेकांनी आश्वासनं दिली होती. बुधियासाठी अमुक करू, तमुक करू. पण कोणीही दिलेला शब्द पाळला नाही. सगळं बोलाची कढी बोलाचा भात असंच झालं", त्या सांगतात.
सरकारी उदासीनतेचा शिकार ठरलेला बुधिया दु:खातून सावरत कारकीर्द घडवण्यासाठी धडपडतो आहे. असंख्य आश्वासनं देऊनही ओडिशा राज्य सरकारनं त्याला कोणत्याही स्वरुपाची मदत पुरवलेली नाही. कोणतीही संघटना मदतीसाठी पुढे सरसावली नाही.
बुधियाचे नवे प्रशिक्षक
"भुवनेश्वरच्या क्रीडा हॉस्टेलमध्ये मी दहा वर्ष होतो. तुला बाहेर जाऊन खेळण्याची संधी मिळेल असं त्यांनी सांगितलं होतं. मला स्पर्धांमध्ये खेळता येईल असंही सांगण्यात आलं होतं. मात्र काहीच झालं नाही", बुधिया हळूहळू सांगत होता.
"सरकारतर्फे मदत मिळेल अशी आशा होती. डीएव्ही शाळेत आल्यानंतर मला आनंद चंद्र दास सरांचं मार्गदर्शन मिळालं. त्यांनी मला व्यावसायिक स्पर्धांसाठी तयार केलं. माझी धावण्याची तंत्रकौशल्यं त्यांनीच गिरवून घेतली."

फोटो स्रोत, DEBALIN ROY/BBC
बुधियाच्या यशात मोलाचा वाटा उचलणारे बिरंची दास यांची हत्या झाली होती. त्यामुळे बुधिया पोरका झाला. अनेक वर्ष तो प्रशिक्षकांविनाच होता. याच कारणांमुळे त्याचं प्रशिक्षण थांबलं आणि कुठल्याही स्पर्धेत तो सहभागी होऊ शकला नाही.
डीएव्ही शाळेमुळे बदल
क्रीडा क्षेत्रातल्या नवनव्या गोष्टींबद्दल बुधिया अनभिज्ञ होता. त्यामुळेच त्याला यश मिळू शकले नाही. डीएव्ही शाळेत प्रवेश घेतल्यानंतर बुधियाच्या आयुष्यात बदल घडू लागला.
या शाळेतले शारीरिक शिक्षणाचे शिक्षक आनंद चंद्र दास यांच्याशी त्याची भेट झाली. खूप वर्षांच्या कालावधीनंतर बुधियाला प्रशिक्षक मिळाले.

फोटो स्रोत, DEBALIN ROY/BBC
आनंद चंद्र दास यांनी सांगितलं, 'बुधिया प्रतिभाशाली खेळाडू आहे. त्याच्याकडे खूप सारा उत्साह आहे. त्याच्याकडून मॅरेथॉन शर्यतीचा सराव मी करून घेतो. रस्त्यावर धावण्याचा सरावही होतो. दररोज 15 ते 20 किलोमीटरचा पल्ला गाठतो. त्याची प्रतिकारक्षमता वाढवण्यासाठी आवश्यक सल्ला देतो."
खूप दिवस शास्त्रोक्त प्रशिक्षणापासून दूर राहिल्यानं आनंद चंद्र दास यांना बुधियाच्या तंत्रकौशल्यावर खूप मेहनत घ्यावी लागत आहे.
बिरंची यांची आठवण
चार वर्षांचा असताना केलेला पराक्रम पुन्हा साकारण्यासाठी बुधियाने कसून मेहनत सुरू केली आहे.
"मला आताही कोणी मॅरेथॉनमध्ये धावण्याची संधी दिली तर मी जाईन. सध्या छोट्या शर्यतींमध्ये सहभागी होतो आहे. आईच्या पगारावर आमचं घर चालतं. मात्र एका खेळाडूचा खर्च खूप असतो."

फोटो स्रोत, DEBALIN ROY/BBC
"पौष्टिक खाणं-पिणं, कपडे, शूज यासाठी प्रत्येक महिन्याला लाखभर रूपये खर्च येतो. आजही बिरंची सरांची आठवण येते. बिरंची सर हवे होते."
"मी आज जे काही आहे त्यांच्यामुळेच आहे. माझ्यासारख्या सामान्य घरातल्या मुलाला ऑलिम्पिकमध्ये नेण्याचं स्वप्न त्यांनी पाहिलं होतं. मला त्यांचं स्वप्न प्रत्यक्षात साकारायचं आहे", बुधिया सांगतो.
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)









