तुमच्याकडे 3000 कोटी रुपये असतील, तर हे पेंटिंग विकत घ्या!

फोटो स्रोत, CHRISTIE'S
लिओनार्डो दा विंची यांनी 500 वर्षांपूर्वी चितारलेलं ख्रिस्ताच्या एका चित्राचा तब्बल 45 कोटी डॉलरमध्ये लिलाव झाला आहे. 'सॅल्व्हेटर मंडी' अर्थात जगाचा रक्षणकर्ता, असं या चित्राचं नाव आहे.
कोणत्याही चित्राला आणि पर्यायाने कलाकृतीला मिळालेली ही सर्वाधिक रक्कम आहे.
पेंटिंग कधी समोर आलं?
दा विंची यांचं 1519 मध्ये निधन झालं. त्यांनी काढलेल्या चित्रांपैकी जेमतेम 20 चित्रं शाबूत आहेत.

फोटो स्रोत, Hulton Archive
साधारण 1505 मध्ये लिओनार्डो दा विंची यांनी 'सॅल्व्हेटर मंडी' हे चित्र काढल्याचं मानलं जातं. आजवर हे चित्र खाजगी मालमत्ता होती.
या चित्रात ख्रिस्ताने एक हात वर केला आहे तर दुसऱ्या हातात काचेचा गोळा आहे.
टेलिफोनवर 20 मिनिटं चाललेल्या या लिलाव प्रक्रियेत एका अज्ञात व्यक्तीने बाजी मारली. या चित्रासाठी त्या व्यक्तीने 45 कोटी डॉलर, म्हणजेच जवळजवळ 3,000 कोटी रुपये मोजले.

फोटो स्रोत, AFP
17व्या शतकात हे चित्र किंग्स चार्ल्स यांच्याकडे होतं आणि मग ते हरवलं. पण 2005 साली ते सापडलं, असं म्हणतात.
1958 साली लंडनमध्ये झालेल्या लिलावात 60 डॉलर्सला हे चित्र खरेदी करण्यात आलं होतं.
काहींचं असं म्हणणं आहे की हे चित्र लिओनार्डो यांनी नव्हे तर त्यांच्या एका शिष्याने काढलं आहे.
19व्या शतकातील जुन्या कलाकृतींचे तज्ज्ञ डॉ टीम हंटर यांनी बीबीसीला सांगितलं की, "हा 21व्या शतकातील सगळ्यांत महत्त्वाचा शोध आहे."
"जुन्या पेटिंगच्या लिलावाच्या किंमती लक्षात घेता वॅन गॉग यांचं "सनफ्लॉवर्स" पेंटिंग 1988 साली सगळ्यांत महागडं ठरलं होतं. वेळोवेळी विक्रम मोडले गेले आहेत पण आजच्यासारखं नक्कीच कधी झालं नव्हतं"

फोटो स्रोत, Hulton Archive
ते पुढे सांगतात, "दा विंची यांनी 20 पेक्षा कमी तैलचित्रं काढली होती. त्यातली अनेक अपूर्ण होती. त्यामुळे हे अतिशय दुर्मिळ पेंटिंग आहे आणि कलाक्षेत्रात आम्हाला हेच आवडतं."
लिलावापूर्वी हे पेंटिंग रशियन अब्जाधीश संग्राहक दिमित्री रायबोलोवलीव यांच्याकडे होतं. त्यांनी हे चित्र मे 2013 मध्ये एका खाजगी लिलावात 12.75 कोटी डॉलरला विकत घेतलं होत, असं सांगितलं जातं.
पेंटिंग खरं आहे का ?
या पेंटिंगच्या वॉलनट पॅनेल बेसमध्ये अनेक बदल झाले आहेत. त्याला वाळवी लागली असावी, असं म्हणतात, ज्यामुळं ते कधीतरी अर्ध्यातून तुटलं असेल.
ते पुन्हा एकत्र आणताना चित्रावरही काही ओरखडे आले आहेत.
बीबीसीच्या कलाविषयक प्रतिनिधी विन्सेट दौड यांनी सांगितलं की हे चित्र लिओनार्डोने काढल्याचं जगमान्य नाही.
एका समीक्षकाने सांगितलं की या चित्राला अनेकदा मुलामा देण्यात आला आहे, घासून पुसून रंगाचा साज देण्यात आला आहे, म्हणून हे चित्र एकाचवेळी नवं आणि जुनं वाटतं.
जो माणूस हे चित्र विकत घेईल त्याला दिवाणखान्यात काहीतरी दर्जेदार असल्याचं समाधान मिळेल, असं 'व्हल्चर.कॉमच्या' जेरी सॉल्ट्झ सांगतात.
3000 कोटीत भारतात काय होऊ शकतं?
45 कोटी डॉलर, म्हणजेच जवळजवळ 3,000 कोटी रुपयांमध्ये हे पेंटिंग विकलं गेलं. इतक्या पैशात भारतात काय काय होऊ शकतं, याची कल्पनाही थोडी अवघड आहे.
सांगायचं झालं तर, बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या 2017-18चं बजेट आहे 25,141 कोटी रुपये. म्हणजे दा विंची यांच्या दहा पेंटींगचा लिलाव झाल्यावर जी रक्कम मिळेल, त्यातून एक वर्ष मुंबई चालू शकते.
आणि सुमारे चार अशा चित्रांच्या किमतीत अख्ख्या पुणे मेट्रोचा प्रकल्प पूर्ण (ज्याचा अंदाजे खर्च 11,522 कोटी रुपये आहे) होऊ शकेल, बरं का! म्हणजे नाही काहीतर, एक अख्खी मेट्रो तर नक्कीच या पेंटिंगच्या किमतीत बसेल.
भारत सरकारने काही प्रकल्पांसाठी दिलेला निधीही या चित्राच्या किमतीपेक्षाही कमी आहे. सरकारच्या एका माहितीपत्रानुसार या पेंटिंगच्या तुलनेत ही आकडेवारी:
- भुवनेश्वर येथे मल्टी मॉडेल हबसाठी 845 कोटी रुपये
- पायाभूत सुविधांच्या विकासासाठी 679 कोटीं रुपयांची तरतूद
- आसाम येथील ब्रह्मपुत्रा रिव्हर फ्रंट डेव्हलपमेंटसाठी 532 कोटीं रुपयांची घोषणा
- रायपूर येथील मार्केटच्या विकासासाठी 1026 कोटी रुपयांची घोषणा
या सगळ्या प्रकल्पांची एकूण किंमत 3000 कोटींच्या घरात जाते. पण जगात काही लोक इतक्या किंमतीचं एक पेंटिंग आपल्या भिंतीसाठी घेतात. नवलच, नाही का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








