2018 फुटबॉल विश्वचषक : इटलीविनवा वर्ल्डकप म्हणजे चीजविना पिझ्झा

इटली, स्वीडन, फुटबॉल वर्ल्डकप

फोटो स्रोत, Claudio Villa/GETTY IMAGES

फोटो कॅप्शन, इटलीचा गोलरक्षक जिआनल्युइगी बफनला स्वीडनविरुद्धच्या पराभवानंतर अश्रू आवरले नाहीत.
    • Author, पराग फाटक
    • Role, बीबीसी मराठी

एका फुटबॉल मॅचमधला पराजय अख्ख्या देशासाठी नामुष्की ठरू शकतो, याचा प्रत्यय सोमवारी इटलीच्या निमित्ताने तमाम जगाने घेतला.

गडद निळी जर्सी परिधान केलेले 'अझ्युरी' अर्थात इटलीचे शिलेदार वर्ल्डकपवर नाव कोरण्याच्या शर्यतीत होते. पण तब्बल 60 वर्षांनंतर प्रथमच इटलीचा संघ वर्ल्डकपसाठी पात्र होऊ शकला नाही.

म्हणूनच 2018 मध्ये रशियात होणाऱ्या फुटबॉल महासंग्रामात इटली आपल्यासारखाच निव्वळ प्रेक्षकाच्या भूमिकेत असेल!

फुटबॉलची क्रेझ जगभर पसरली आहे. 2018च्या वर्ल्डकप स्पर्धेसाठी पात्र ठरण्याची संधी 210 संघांना आहे,पण फक्त 32 संघच या स्पर्धेत खेळू शकतात. साहजिकच साभार परत जाणाऱ्यांचं पारडं कललेलं आहे.

पण सोमवारी रात्री या पारड्यात इटली हा पॉवरबाज भिडू दाखल झाला आणि फुटबॉलविश्वात खळबळ उडाली. स्वीडनविरुद्धच्या लढतीत 0-0 ने बरोबरी झाली पण कमी गोल सरासरीमुळे इटलीचं पॅकअप पक्कं झालं.

क्रिकेटवेड्या आपल्या देशातही इटलीच्या पराभवाचे पडसाद सोमवारी रात्री व्हॉट्सअॅप ग्रुप्स, ट्वीटर हॅशटॅग्स आणि फेसबुक पोस्ट्सच्या माध्यमातून उमटले.

2007मध्ये कॅरेबियन बेटांवर भरलेल्या वर्ल्डकपमध्ये भारतीय क्रिकेट संघाचं आव्हान प्राथमिक फेरीतच संपुष्टात आलं होतं. सख्खे शेजारी असणाऱ्या श्रीलंका आणि बांगलादेशकडून पराभूत झाल्यानंतर भारतीय संघ रित्याहाती माघारी परतणार, हे स्पष्ट झालं आणि देशभर कल्लोळ उडाला.

त्या संघात सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, सौरव गांगुली, युवराज सिंग, वीरेंद्र सेहवाग अशा दिग्गजांचा समावेश होता.

मग काय, देशात जणू शोककळाच पसरली. खेळाडूंच्या घरांवर हल्ले झाले. देशासमोरचे सगळे गंभीर प्रश्न बाजूला पडले आणि चॅनेलवरच्या चर्चांना तगडा खुराक मिळाला.

तेव्हा भारतात जे झालं ते सगळं आता इटलीत घडत आहे. भारतीय क्रिकेट संघ किमान त्या वर्ल्डकपमध्ये खेळून माघारी परतला होता. इटलीला तर पात्रतेची कवाडंही खुली होऊ शकली नाहीत. त्यामुळे इटलीच्या फुटबॉलरसिकांचं दु:ख अधिक गहिरं आहे.

इटली, स्वीडन, फुटबॉल वर्ल्डकप

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, स्वीडनविरुद्ध इटलीचा संघ.

आपला आणि इटलीचा संबंध विविधांगी आहे.

जिव्हा तृप्त करणारं चीज, पास्ता आणि पिझ्झा ही इटलीचीच देणगी. दिवसेंदिवस आपल्या देशात हे त्रिकुट घट्ट पकड घेत आहे. मध्यमवर्गातून अप्पर मध्यमवर्गाकडे संक्रमण करणाऱ्या मंडळींच्या घरात इटालियन मार्बल दिसू लागतं.

गावोगावच्या छोट्या दुकानांना मालपुरवठा करणारी 'पिआजिओ' ही गाडी म्हणजे अस्सल इटालियन ब्रँड. काही वर्षांपूर्वी चारचाकी गाडी म्हणजे 'फियाट' असं समीकरण होतं. ती 'फियाट'ही इटलीचीच.

बांधकाम व्यावसायिकांसाठी जिव्हाळ्याचं झुआरी सिमेंट ही इटलीतून जगभर पसरलेली बहुराष्ट्रीय कंपनी. फॅशनची मक्का मानल्या जाणाऱ्या मिलानला जगभरात फॉलो केलं जातं.

2018 फुटबॉल वर्ल्डकपसाठी पात्र ठरलेले संघ
फोटो कॅप्शन, 2018 फुटबॉल वर्ल्डकपसाठी पात्र ठरलेले संघ. इटली़सह नेदरलँड्स, अमेरिका, चिली, आयव्हरी कोस्ट आणि घाना अपात्र आहेत.

इतकंच काय, तर 1999 साली पवार साहेबांनी काँग्रेसमधून बाहेर पडत राष्ट्रवादी काँग्रेस नावाची स्वतंत्र चूल मांडली. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या विदेशत्वाच्या मुद्यामुळे तेव्हा राज्यातल्या तमाम जनतेची इटली उजळणी झाली होती.

आपलं हे इटली कनेक्शन दररोज वाढत आहे. त्यामुळेच परवा इटलीवर एवढी शोककळा का पसरली, हे समजून घेणं आवश्यक आहे.

इटलीच्या दु:खाला भावनिक किनार आहे. इटलीचा आधारवड आणि जगातल्या सर्वोत्तम गोलकिपर्सच्या मांदियाळीत समाविष्ट जिआनल्युइगी बफन पुढच्या वर्षी सहावा वर्ल्डकप खेळणार होता. भल्याभल्या स्ट्रायकर्सचं आक्रमण पहाडी शरीरासह थोपवणारा आणि संघाची यशस्वी मोट बांधणारा बफन इटलीवासियांसाठी नॅशनल हिरो आहे.

म्हणून इटलीला कप जिंकवून फुटबॉलला अलविदा करण्याचा बफनचा मानस होता. पण परवा इटलीवासियांनी या हिरोला रडताना पाहिलं. वर्ल्डकप तर दूर, इटलीला रशियाचं तिकीट मिळवून देऊ न शकल्यानं बफन गहिवरला.

"अनेक लहान मुलं फुटबॉलचा करिअर म्हणून विचार करतात. त्यांनी मला रडताना पाहिलं तर कदाचित त्यांचा विचार बदलू शकतो," असं बफन म्हणाला. पण हे म्हणतानाही त्याच्या डोळ्यातून अश्रूंचे ओघळ वाहतच होते.

इटली, स्वीडन, फुटबॉल वर्ल्डकप

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, इटलीच्या वर्तमानपत्रांनी कठोर शब्दांत स्वीडनविरुद्धच्या पराभवाचं वर्णन केलं.

इटलीचा पराभव हा एका मानसिकतेचा पराभव आहे.

"आक्रमण हाच सर्वोत्तम बचाव," हे सूत्र जवळपास प्रत्येक खेळात प्रमाण झालं आहे. इटली या सूत्राला स्पष्ट अपवाद आहे.

'टोटल फुटबॉल', 'टिकीटाका' असे फंडे रूढ होत असताना इटलीने 'कॅटनॅसिओ' हे बचाव आधारित तंत्रच अवलंबलं आहे.

कॅटनॅसिओ या इटालियन शब्दाचा अर्थ आहे 'डोअर बोल्ट'. बचाव अधिकाधिक घट्ट करत जाणं, हे या पद्धतीचं वैशिष्ट्य.

1930च्या दशकात ऑस्ट्रियन प्रशिक्षक कार्ल रापन यांनी हे तंत्र हुडकलं. प्रतिस्पर्ध्यांच्या स्ट्रायकर्सची कोंडी करून सामना जिंकता येतो, हे यातून सिद्ध केलं.

पण गेल्या काही वर्षांमध्ये धसमुसळ्या खेळासह झंझावाती आक्रमण, यावर बहुतांश संघाचा भर आहे.

जगभरातली सामान्य माणसंही दैनंदिन आयुष्यात हाच अनुभव घेत आहेत.

शांत, संयत आणि चिवटपणापेक्षा स्ट्रीटस्मार्ट होऊन चमकोगिरी प्रबळ होत आहे. बचावात्मक धोरण कालबाह्य ठरतं आहे, हे इटली फुटबॉल संबंधित मंडळींना लक्षात आलं होतं. मात्र अजूनही तो वाण खेळाडूंच्या धमन्यांमध्ये स्पष्ट जाणवतो.

प्रतिस्पर्धी चुका करेल, ही वाट पाहत बसलं तर वर्ल्डकपचं तिकीट गमवावं लागू शकतं, याची जाणीव आता इटलीचे खेळाडू आणि कोचिंग स्टाफला झाली असावी.

तीन संघांना अजूनही संधी
फोटो कॅप्शन, तीन संघांना अजूनही संधी

'टीजी' अर्थात 'टार्गेट ग्रुप' ही संकल्पना कंपन्या आणि वैयक्तिक पातळीवर सगळीकडे महत्त्वाची ठरू लागली आहे. रिक्रुटमेंट असो किंवा कामाचं वितरण असो, युवा वर्गाला पसंती दिली जात आहे.

इटलीचं फुटबॉल ज्यांच्या हाती आहे ती सगळी मंडळी सत्तरीत आहेत. युवा ऊर्जा USP असताना आयुष्याची संध्याकाळ गाठलेले गिआन पिअरो वेंचुरा इटलीचे प्रशिक्षक आहेत. इटलीच्या पराभवाचं खापर वेंचुरा यांच्या डोक्यावर फोडलं जात आहे.

एका छोट्या क्लबची धुरा सांभाळणाऱ्या 69 वर्षीय वेंचुरा यांना आंतरराष्ट्रीय संघ हाताळण्याचा अनुभव नाही. त्यांनी घेतलेले निर्णय चक्रावून टाकणारे आहेत.

स्टीफन इल शारवाय याला पात्रता स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात खेळवलंच नाही. स्वीडनविरुद्धच्या लढतीत तर भन्नाट फॉर्मात असलेल्या लोरेन्झो इनसिन्जला त्यांनी राखीवमध्येच ठेवणं पसंत केलं.

वयोमानापरत्वे येणारा कर्मठपणा वेंचुरा यांनी संघनिवडीत कायम राखला आणि त्याचा मोठा फटका इटलीला सोमवारी बसला.

तसंच इटली फुटबॉल महासंघाचे प्रमुख कार्लो टावेचिओ पुढच्या वर्षी पंच्याहत्तरी साजरी करणार आहेत.

इटली, स्वीडन, फुटबॉल वर्ल्डकप

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, इटलीचा कर्णधार आणि गोलरक्षक बफनचा हा शेवटचा सामना ठरला.

वयोवृद्ध खेळ प्रशासक ही तशी भारताची ओळख आहे. ऑलिम्पिकमध्ये एका हाताच्या बोटांवर मोजता येतील इतकी आपल्या पदकांची संख्या असते, जी या प्रशासकांचं फोलपण सिद्ध करते.

इटलीला मात्र हे परवडणारं नाही. स्वीडनविरुद्धच्या इटलीच्या संघात तिशी ओलांडलेले सहा खेळाडू होते. फुटबॉलसारख्या खेळात प्रचंड ऊर्जा, चपळाई आणि दमसास आवश्यक असतो. वाढत्या वयातही फिटनेस जपणारे खेळाडू आहेत, मात्र सगळ्यांनाच ही किमया साधता येत नाही.

मुळातच इटलीसाठी फुटबॉल हा फक्त खेळ नाही. या खेळाशी आणि खेळाडूंमध्ये त्यांची भावनिक गुंतवणूक आहे.

फुटबॉलवर आधारित अर्थकारण इटलीला बळ देणारं आहे. पण स्वीडनविरुद्धच्या अनपेक्षित पराभवानंतर इटलीला अंदाजे 1 अब्ज युरोचा फटका बसेल, असा अंदाज इटलीच्या ऑलिंपिक समितीचे माजी अध्यक्ष फ्रँको करारो यांनी व्यक्त केला आहे.

इटली, स्वीडन, फुटबॉल वर्ल्डकप

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, स्वीडनविरुद्धच्या पराभवानंतर इटलीचे खेळाडू नाराजी लपवू शकले नाहीत.

इंग्लिश प्रीमिअर लीग अर्थात EPL आणि ला लिगा यांच्याप्रमाणे इटलीत होणारी 'सीरी ए' लीग प्रचंड लोकप्रिय आहे.

इटलीच्या पराभवामुळे या लीगच्या टेलिव्हिजन राइट्सची पत आताच घटली आहे. 2006 मध्ये इटलीने वर्ल्डकप पटकावल्यानंतर बेरोजगारीचं प्रमाण लक्षणीयरीत्या कमी झालं होतं.

हा पराभव म्हणजे इटालियन समाजाचं आधुनिकतेकडे वाटचाल करण्यातलं अवघडलेपण आहे, असा सूर प्रकर्षाने उमटला आहे.

'सीरी ए' लीगला लागलेली फिक्सिंगची कीड इटली फुटबॉल महासंघाचं मोठं अपयश आहेच.

स्वीडनसारख्या सर्वसाधारण संघाविरुद्ध सुमार खेळून आलेला पराभव इटलीवासियांच्या जिव्हारी लागला आहे. म्हणूनच इटलीतल्या बहुतांशी वर्तमानपत्रांनी या घटनेचं 'राष्ट्रीय आपत्ती', 'मानहानी', 'नामुष्की' अशा शब्दांत या वर्णन केलं आहे.

क्रिकेट असो वा फुटबॉल, चार वर्षं चालणाऱ्या मेहनतीची परिणती वर्ल्डकपच्या निमित्ताने होते.

इटली फुटबॉल वर्ल्डकपचा अविभाज्य घटक असतो. ब्राझील, स्पेन, जर्मनीसारखे जरी ते चर्चेत नसतात, पण त्यांचं अस्तित्व ठोस असतं.

इटलीची विश्वचषकातली आतापर्यंतची कामगिरी
फोटो कॅप्शन, इटलीची विश्वचषकातली आतापर्यंतची कामगिरी

क्रिकेट वर्ल्डकपमध्ये न्यूझीलंडच्या संघाशी इटलीचं साधर्म्य आहे. न्यूझीलंडला कधीच क्रिकेटचा वर्ल्डकप जिंकता आला नाही. पण प्रत्येक स्पर्धेत जेतेपदाचे दावेदार असणाऱ्या इटलीने चारवेळा चषकावर नाव कोरलं आहे.

मितभाषी प्रवृत्तीच्या गुणी मुलासारखी प्रतिमा असणाऱ्या इटलीचं वर्ल्डकपमध्ये नसणं जगभरातल्या फुटबॉल चाहत्यांनाही चुटपूट लावणारं आहे.

खेळांचं विश्व स्वतंत्र असलं तरी जगण्याच्या बाकी दुव्यांशी ते घट्टपणे बांधलेलं असतं. 1958 ते 2017 या कालखंडात इटलीने देश म्हणून चढउतार झेलले. खेळाच्या निमित्ताने झुलणारे आशानिराशेचे हिंदोळे तूर्तास इटलीच्या बाजूने नाहीत.

60 वर्षांपूर्वी स्वीडननेच इटलीचा वर्ल्डकपचा मार्ग रोखला होता. मात्र त्यानंतर इटलीच्या फुटबॉलने घेतलेली झेप विलक्षण अशीच आहे.

2017 मधला स्वीडनविरुद्धचा पराभव इटलीचं खच्चीकरण करण्याऐवजी नवं बळ देईल, अशी आशा आहे. तसं झालं तर इटलीची किटली रटरटू लागेल.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)