पाहा व्हीडिओ : बिबट्याच्या हरवलेल्या बछड्यांना जेव्हा आई भेटते...
- Author, आरती कुलकर्णी
- Role, बीबीसी मराठी
नाशिक जिल्ह्यातल्या निफाड तालुक्यातलं ब्राह्मणवाडा गाव. आठ नोव्हेंबरच्या दुपारी गावकऱ्यांना उसाच्या शेतात बिबट्याचे तीन बछडे सापडले. गावकऱ्यांनी या अनाथ बछड्यांना वनविभागाकडे आणून दिलं.
वनाधिकाऱ्यांनी या बछड्यांना पुन्हा एकदा त्यांच्या आईला भेटवण्याचा प्रयत्न केला. पण चार दिवस त्यांना यश आलं नाही.
मग मात्र त्यांनी एसओएस या वन्यजीव संवर्धन संस्थेचे वरिष्ठ पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अजय देशमुख यांना पाचारण केलं. डॉ. अजय देशमुख यांनी उसाच्या शेतामध्ये चाचपणी केली. एका शेतात त्यांना मादी बिबट्याच्या पायांचे ठसे उमटलेले दिसले.
जिथे पायांचे ठसे उमटले होते त्याच ठिकाणी मादी बिबट्यानं बछड्यांना जन्म दिला असणार, असा अंदाज त्यांनी बांधला. त्याचाच आधार घेत त्यांनी या बछड्यांना पुन्हा उसाच्या शेतात आईला भेटवण्यासाठी ठेवून दिलं.

फोटो स्रोत, SOS
"12 नोव्हेंबरच्या संध्याकाळी साडेपाच वाजता आम्ही या बछड्यांना त्या जागी ठेवलं आणि बरोबर एक तासानं मादी त्यांना घेऊन गेली." डॉ. अजय देशमुख सांगत होते.
राज्यात ऑक्टोबर ते जानेवारी हा ऊसतोडणीचा काळ असतो. नेमके हेच दिवस बिबट्याच्या प्रजननाचेही असतात. आतापर्यंत या काळात पोरक्या झालेल्या अशा 40 बछड्यांना त्यांनी पुन्हा त्यांच्या आईला भेटवून दिलं आहे.

फोटो स्रोत, SOS
बछड्यांना जन्म दिल्यानंतर बिबट्याच्या मादीला भक्ष्याच्या शोधात जावं लागतं. त्यामुळे मादी आणि बछड्यांची चुकामूक होते. आणि मग बरेचदा ऊस तोडताना हे बछडे शेतकऱ्यांना सापडतात.
बरेचदा मग असे एकटे पडलेले बछडे शेतकरी वनविभागाकडे आणून देतात. त्यांचा सांभाळ करण्यासाठी जुन्नर जवळच्या माणिकडोह धरणाजवळ वनखात्यानं अनाथालय उभारलं आहे.
एसओएस या संस्थेकडे हे अनाथालय चालवण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. या अनाथालयात आता सध्या 35 बिबटे आहेत. पण आता या अनाथालयाची क्षमताही अपुरी पडते. त्यामुळेच डॉ़. अजय देशमुख यांनी बघड्यांना पुन्हा त्यांच्या आईला भेटवून देण्याचा हा उपक्रम सुरू केला.
ते सांगतात, "आपल्या बछड्यांचा माणसांशी संपर्क आला तर बिबट्याची मादी त्यांना स्पर्शही करत नाही हा आपला गैरसमज आहे."

फोटो स्रोत, SOS
"असे बछडे सापडले की, त्यांना तगवणं हे मोठं आव्हान असतं. त्यांचा पूर्ण चेकअप केल्यानंतर त्यांना कोणता आजार तर नाही ना किंवा कुठे जखम झालेली तर नाही ना हे कळतं. त्यांच्या हृदयाच्या ठोक्यांवरूनही त्यांच्या तब्येतीचा अंदाज येतो."
"या बछड्यांना पुन्हा आईकडे सोपवण्याआधी त्यांचा सांभाळ करणं ही कसोटी असते. अशा वेळी त्यांना शेळीचं दूध पाजून जगवलं जातं. बिबट्याचे बछडे दोन महिन्यांचे झाल्यानंतर त्यांना घनपदार्थ खाऊ घालता येतात. पण तोपर्यंत शेळीच्या दुधात पाणी मिसळून त्यांना बाटलीनं पाजत राहावं लागतं."
नाशिकचे वनाधिकारी संजय भंडारी यांच्या पथकानं याआधीही या कार्यकर्त्यांच्या मदतीनं बिबट्याच्या बछड्यांची अशी सुटका केली आहे.

फोटो स्रोत, SOS
"बिबट्याची मादी आणि बछड्यांची ताटातूट झाली तर मादी आक्रमक होते. अशा वेळी ती हल्ले करण्याचा धोका असतो. पण, तिचे बछडे तिला पुन्हा मिळाले तर हा धोका कमी होतो," असं निरीक्षणही संजय भंडारी यांनी नोंदवलं आहे.
"नाशिकमध्ये निफाड, पुणे जिल्ह्यातलं जुन्नर आणि शिरूर या भागात उसाच्या शेतीचे पट्टेच्या पट्टे तयार झाले आहेत. ही उसाची शेती बिबट्यांचा नवा अधिवास बनली आहेत."
"त्यामुळे या भागात नेहमीच बिबट्या विरुद्ध माणूस हा संघर्ष पाहायला मिळतो. पण अशा उपक्रमांमुळे इथले गावकरीही बिबट्यांच्या सोबत राहायला शिकले आहेत," डॉ. अजय देशमुख आशेच्या सूरात सांगतात.
हे पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)










