हडप्पाकालीन महिला-पुरुष भारतीयांसारखेच दिसायचे?

फोटो स्रोत, Getty Images
हडप्पाकालीन महिला आणि पुरुष हे भारतीयांसारखेच दिसायचे की त्यांच्यापेक्षा वेगळे? त्यांचे चेहरे, शरीराचा बांधा कसा होता? याचा लवकरच उलगडा होणार आहे.
पुण्यातील डेक्कन कॉलेज अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू वसंत शिंदे आणि दक्षिण कोरियाचे पुरातत्व तज्ज्ञ अशी एकूण 25 जणांची टीम या प्रश्नांची उत्तरे शोधत आहेत.
हरियाणातल्या राखीगढी शहरापासून एक किलोमीटर दूर हडप्पाकालीन मानवांची दफनभूमी सापडली आहे. त्या ठिकाणी 70 कबरी सापडल्या आहेत.
"आतापर्यंत राखीगढी येथे 40 कबरींचं उत्खनन करण्यात आलं आहे. हजारो वर्षांपूर्वीच्या सांगाड्यांचे चेहरे आणि शरीराची ऑनलाईन प्रतिकृती तयार करण्यासाठी संपूर्ण सांगाड्याची गरज असते. आम्हाला 10 मानवांचे सांगाडे पूर्णस्थितीत मिळाले आहेत. त्यापैकी 5 सांगाड्यांचं मानवी चित्रण करायचं आम्ही ठरवलं. त्यापैकी 3 सांगाडे हे पुरुषांचे तर 2 सांगाडे हे महिलांचे आहेत," असं प्रा. वसंत शिंदे यांनी बीबीसीला सांगितलं.

फोटो स्रोत, VSASANT SHINDE
5 सांगाड्यांचं CT स्कॅन करून मिळालेली माहिती एका काँप्युटर प्रोग्रामला पुरवली जाणार आहे. त्याद्वारे हडप्पाकालीन मानवाच्या शरीराच्या शिरा, धमण्या, उती यांचं काँप्युटर प्रोग्रामद्वारे चित्रण केलं जाणार आहे.
तसंच चेहऱ्याची पुनर्रचना करण्यासाठी फॉरेन्सिक तंत्राचीही (forensic facial recreation technique) मदत घेतली जाणार आहे.
"जुन्या सांगाड्याच्या चेहऱ्याची पुनर्रचना व्यवस्थित होण्यासाठी कवटीचा भाग पूर्णपणे मिळणं अत्यंत महत्त्वाचं असतं. आम्हाला 10 सांगाडे पूर्णावस्थेत मिळाले. त्यापैकी 5 सांगाड्यांवर आम्ही संशोधन करायचं ठरवलं," असं प्रा. शिंदे यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं.
दक्षिण कोरियातल्या पुरातत्तव तज्ज्ञांनी या तंत्राचा वापर करून याआधी जुन्या सांगाड्याचे चेहरे आणि शरीराची रचना तयार केली आहे.
असं फॉरेन्सिक तंत्र याआधी इजिप्तमधल्या ममीच्या चेहऱ्यांची पुनरर्चना करण्यासाठी वापरण्यात आलं आहे.
पण, फॉरेन्सिक तंत्राच्या काही मर्यादा आहेत असं मुंबई विद्यापीठातील पुरातत्त्व शास्त्राचे प्राध्यापक कुरुष दलाल यांचं मत आहे. "प्राचीन सांगाड्यांचे ओठ, डोळे, कान याविषयी माहिती गोळा करणं अवघड आहे," असं प्रा. दलाल यांनी बीबीसीला सांगितलं.

फोटो स्रोत, MANOJ DHAKA/ BBC
प्राचीन सांगाड्यांच्या चेहऱ्याच्या पुनरर्चनाचं काम टप्प्याटप्प्याने पूर्ण केलं जात आहे. हे काम अंतिम टप्प्यात असून त्याविषयीचा रिसर्च पेपर तज्ज्ञांच्या पडताळणीसाठी (peer review) दिला असल्याचं शिंदे यांनी सांगितलं.
हडप्पाकालीन माणूस भारतीयांसारखा दिसायचा का?
"येत्या दोन महिन्यात हडप्पाकालीन मानवाचं चित्रण जगासमोर येणार आहे. गेल्या काही काळापासून आम्ही राखीगडी येथे मिळालेल्या पूर्ण सांगाड्यावर संशोधन करत आहोत. या संशोधनातून मिळालेल्या महत्त्वाच्या माहितीवरून हडप्पाकालीन माणूस आपल्यासारखा म्हणजे भारतीय लोकांसारखा दिसू शकतो, असा आमचा अंदाज आहे," अशी माहिती शिंदे यांनी बीबीसीशी बोलताना दिली.
हडप्पाकालीन मानवाचा चेहरा, शरिराचा बांधा आणि एकूणच शरीराची रचना ही भारतीय उपखंडातल्या लोकांसारखी असल्याचं स्पष्ट झालं तर त्याठिकाणचे लोक स्थानिकच होते, यावर शास्त्रीय पुरावा मिळेल असा शिंदे यांचा दावा आहे.
हडप्पाकालीन मानव आणि आताचे भारतीय लोक यांच्यामध्ये साम्य आढळलं तर हा मानव स्थानिकच होता याबाबत एक महत्त्वाचा पुरावा हाती लागेल.
पुरातत्त्वशास्त्र, DNA आणि जेनेटिक माहिती यावरून हडप्पाकालीन मानव हा स्थानिकच होता याविषयी भक्कम शास्त्रीय पुरावा हाती लागेल. त्यामुळे हडप्पाकालीन मानव स्थलांतरित होता या वादावर पडदा पडेल, असं प्रा. शिंदे सांगतात.
प्राचीन सांगाडा हा महिलेचा आहे की पुरुषाचा हे कसं ठरवलं जात?
"प्राचीन सांगाडा हा पुरुषाचा आहे की स्त्रीचा हे ठरवण्यात अनेक बाबींचा समावेश होतो. त्यापैकी सांगाड्याच्या मांडीचं हाड महत्त्वाची भूमिका बजावते. मांडीचं हाड X आकाराचं असेल तर तो सांगाडा महिलेचा असतो, तर V आकाराचे असेल तर तो सांगाडा पुरुषाचा असतो," असं प्रा. कुरुष दलाल यांनी बीबीसी सांगितलं.
बाळाच्या जन्मासाठी स्त्रीचं ओटीपोट पसरट असतं. तसंच कवटीचा आणि जबड्याच्या आकारावरूनही सांगाड्याचं लिंग समजू शकते, असंही प्रा. दलाल यांनी सांगितलं.
आतापर्यंत भारत आणि पाकिस्तानात ज्या 2000 हडप्पाकालीन वसाहती सापडल्या आहेत त्यापैकी राखीगढमधील ही वसाहत सर्वात मोठी आहे. पाकिस्तानातील मोहंजोदोडो शहरापेक्षाही ही वसाहत मोठी आहे. (1920 साली पाकिस्तानातील मोहंजोदोडोमध्ये प्राचीन संस्कृतीचा पहिल्यांदा शोध लागला होता.)
आताच्या भारत आणि पाकिस्तानच्या वायव्येस इसवीसनाच्या 2600 वर्षं ते 1900 वर्षांपूर्वी म्हणजे आजपासून 5,300 वर्षांपूर्वी ही सिंधू संस्कृती उदयास आली. या संस्कृतीच्या उदयाचं बरचसं श्रेय हिमालयात उगम पावणाऱ्या नद्यांमुळे इथं झालेल्या सुबत्तेला दिलं जातं किंवा तसं मानलं जातं.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








