हडप्पा स्मशानभूमीतील जोडप्याच्या कबरीचं रहस्य

सांगाडा

फोटो स्रोत, Vsasant Shinde

    • Author, सौतिक बिश्वास
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

पुरातत्त्व शास्त्रज्ञांना खोदकामादरम्यान साडेचार हजार वर्षांपूर्वीची एक कबर सापडली आहे. ही कबर आहे एका जोडप्याची. जगातील सर्वात जुन्या संस्कृतीपैकी एक असलेल्या हडप्पामधील एका विस्तीर्ण अशा स्मशानभूमीत ही कबर सापडली आहे.

2016 साली भारत आणि दक्षिण कोरियाच्या संशोधनकर्त्यांना हरियाणामधली राखीगढी गावात अतिशय दुर्मिळ अशी ही 'जोडप्याची कबर' सापडली. जवळपास दोन वर्षं या जोडप्याच्या मृत्यूच्या कारणांचा शोध घेण्याचे काम सुरू होते.

संशोधकांच्या या पथकाचे नेतृत्त्व करणारे पुरातत्त्व शास्त्रज्ञ वसंत शिंदे सांगतात, "कबरीतील स्त्री आणि पुरूष एकमेकांकडे तोंड करून आहेत. ते जोडपं असावं, असा आमचा अंदाज आहे आणि दोघांचाही मृत्यू एकाचवेळी झाला असावा. मात्र त्यांचा मृत्यू कसा झाला, हे गूढ कायम आहे."

अर्धा मीटर खोल वाळूच्या पेटीत त्यांना पुरण्यात आलं आहे. मृत्यूच्यावेळी पुरूषाचे वय 38 तर स्त्रीचे वय 35 होते. दोघेही बरेच उंच होते. पुरूषाची उंची 5.8 फूट तर स्त्रीची उंची 5.6 फूट होती. संशोधनकर्त्यांना सांगाड्यांवर कुठेही जखम, हाडांवर कसल्याही प्रकारच्या रेषा किंवा कवटीच्या हाडावर कुठेही असामान्य फुगवटा किंवा जाडी दिसली नाही. त्यामुळे दोघांना जखम किंवा मेंदूतापासारखा काही आजार झाला असण्याची शक्यता नाही. यावरून मृत्यूच्यावेळी दोघेही सुदृढ होते, असा अंदाज शास्त्रज्ञांनी बांधला आहे.

त्याकाळी ज्या पद्धतीने अंत्यसंस्कार करण्याची प्रथा होती, तसा हा प्रकार नाही, असं पुरातत्व शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. दोघांचाही 'मृत्यू एकाचवेळी झाला असावा आणि म्हणून त्यांना एकत्रच एका कबरीत पुरलं असावं', असं त्यांना वाटतं.

पुरातत्त्व शास्त्रज्ञांना कायमच प्राचीन काळातील एकत्र कबरींचं आकर्षण राहिलं आहे. इटलीमध्ये एकमेकांना आलिंगन दिलेल्या अवस्थेतील अश्मयुगातील एका जोडप्याची कबर सापडली होती. रशियातही अशीच एका जोडप्याची कबर सापडली होती. त्यात दोघांनी एकमेकांकडे बघत एकमेकांचे हाथ धरले होते. ग्रीसमध्येही सहा हजार वर्षांपूर्वीची आलिंगन दिलेल्या जोडप्याची कबर सापडली होती.

कबरी

फोटो स्रोत, MANOJ DHAKA

फोटो कॅप्शन, 40 कबरी शोधण्यात संशोधकांना यश आलं आहे

त्याकाळी अंत्यसंस्कारावेळी ज्या काही वस्तू ठेवल्या जायच्या तशाच या जोडप्याच्या कबरीतही सापडल्या आहेत. काही भांडी आणि मौल्यवान खड्यांचे काही दागिने, साधारण हेच सर्व हडप्पा काळातील कबरींमध्ये आढळायचं. Early Indians : The Story of Our Ancestors And Where We Come From या पुस्तकाचे लेखक टोनी जोसेफ सांगतात, "हडप्पा संस्कृतीमध्ये अतिशय साधेपणाने अंत्यसंस्कार केले जायचे. पश्चिम आशियातील राजा-महाराजांवर व्हायचे तसे भव्यदिव्य अंत्यसंस्कार नसायचे."

उदाहरणार्थ त्या काळच्या मेसोपोटॅमिया सभ्यतेत राजाच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करताना मौल्यवान दागिने आणि कलाकुसर केलेल्या वस्तू राजाच्या कबरीसोबत पुरल्या जायच्या. विशेष म्हणजे या कबरींमध्ये जे मौल्यवान दागिने सापडले आहेत ते हडप्पामधून आयात केले असावे, असा अंदाज आहे.

हडप्पा सभ्यतेत मृत्यूनंतरच्या जीवनावर लोकांचा विश्वास होता. त्यामुळेच अंत्यसंस्कारावेळी काही भांडी, अन्नधान्य आणि काही दागिने कबरीला अर्पण केले जायचे. या कबरीमध्ये बरीच भांडी आहेत. मोठी पातेली आणि रंगवलेल्या डिश आहेत. टोनी जोसेफ म्हणतात, "त्यामुळे कुठल्या राजघराण्यातील व्यक्तीवर अंत्यविधी करण्यात आले असण्याची तिळमात्र शक्यता नाही."

हजारो माणसं असलेल्या बाराशे एकर जागेत पसरलेल्या विस्तीर्ण अशा वसाहतीत हे 'गूढ जोडपं' राहत असावं, असा संशोधनकर्त्यांचा अंदाज आहे. आतापर्यंत भारत आणि पाकिस्तानात ज्या 2000 हडप्पा वसाहती सापडल्या आहेत त्यापैकी राखीगढमधील ही वसाहत सर्वात मोठी आहे. पाकिस्तानातील मोहंजोदाडो शहरापेक्षाही मोठी वसाहत. (1920 साली पाकिस्तानातील मोहंजोदाडोमध्ये प्राचीन संस्कृतीचा पहिल्यांदा शोध लागला होता.)

कबर

फोटो स्रोत, MANOJ DHAKA

हडप्पाकालीन कबरींमध्ये जोडप्याची कबर सापडण्याची ही पहिलीच वेळ नाही. आज गुजरात म्हणून ओळखल्या जाणाऱ्या त्या काळच्या लोथल भागात 1950 साली अशीच एका जोडप्याची कबर सापडली होती. त्यातील स्त्रीच्या कवटीवर जखमा होत्या. पतीच्या निधनाचं अतिव दुःख झालेल्या पत्नीने स्वतःचं आयुष्य संपवून घेतलं असावं, असा दावा उत्खनन करणाऱ्या संशोधनकर्त्यांनी केला आहे. मात्र हा दावा अजूनतरी सप्रमाण सिद्ध झालेला नाही.

राखीगढमध्ये शहरापासून जवळपास एक किलोमीटर अंतरावर असलेल्या स्मशानभूमीत पुरातत्वशास्त्रज्ञांना जवळपास 70 कबरी सापडल्या आहेत. त्यातील 40 कबरींमध्ये उत्खनन करण्यात आलं. मात्र त्या सर्वांपैकी या 'गूढ जोडप्याच्या' कबरीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

हे वाचलं का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)