इजिप्तच्या कबरीमध्ये सापडलेल्या हिंदू देवी-देवतांच्या मूर्तींमागंचं सत्य

इजिप्त.

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन, त्याकाळात इजिप्तमध्ये कबरींवर किंवा मंदिराच्या भिंतीवर मूर्ती कोरलेल्या असत.

इजिप्तमध्ये उत्खननादरम्यान हिंदू देवी-देवतांच्या मूर्ती सापडल्याचा एक फोटो सध्या उजव्या विचारसरणीच्या सोशल मीडिया पेजेसवर पसरवला जात आहे.

या फोटोखाली लिहिलं आहे : 'मुस्लीम राष्ट्र असलेल्या इजिप्तमध्ये एका कबरीखाली हिंदू मंदिर सापडलं आहे.' तसंच जगात कुठेही उत्खनन केल्यास अशाच प्रकारच्या हिंदू मूर्ती सापडतील आणि यावरून संपूर्ण जगात एकेकाळी हिंदूंचं साम्राज्य होतं, हे सिद्ध होतं, असंही या पोस्टमध्ये लिहिलं आहे.

हा फोटो उत्खनन सुरू असलेल्या ठिकाणाचाच असल्याचं दिसतं. यात एक व्यक्तीसुद्धा दिसतेय आणि या व्यक्तीच्या मागे हिंदू मूर्तीसुद्धा दिसतात.

या फोटोचा धांडोळा घेतला असता हा फोटो खरा असल्याचं आढळलं. मात्र त्यातून खोटा संदेश देण्यासाठी तो वेगळ्या संदर्भात सादर करण्यात आला आहे. फोटोत दाखवलेलं ठिकाण इजिप्तमधलंच असल्याचं आमच्या तपासात सिद्ध झालं.

सोशल मीडियावर ही पोस्ट फिरवली जात आहे.

फोटो स्रोत, Social Media

फोटो कॅप्शन, सोशल मीडियावर ही पोस्ट फिरवली जात आहे.

मात्र इजिप्तमधल्या उत्खननात हिंदू देवी-देवतांच्या मूर्ती सापडल्याचा कुठलाच पुरावा नाही. या ठिकाणी इजिप्तवर इ.स.पूर्व 2,500 ते 2,350 मध्ये राज्य करणाऱ्या पाचव्या राजवंशाच्या काळातल्या कलाकृती सापडल्या आहेत.

पुरातत्त्व शास्त्रज्ञांना इजिप्तमध्ये गेल्या आठवड्यात उत्खननादरम्यान एक कबर सापडली. धर्मगुरुंमध्येसुद्धा ज्यांना अत्यंत वरचं स्थान आहे, अशांना या ठिकाणी दफन केलं जायचं. जवळपास 4,400 वर्षांपूर्वीची ही कबर आहे.

इजिप्तच्या सुप्रीम काउंसील ऑफ अॅन्टीक्विटीज (पुरातन वस्तुंविषयीची सर्वोच्च परिषद) या परिषदेचे सरचिटणीस मोस्तफा वझिरी यांनी या उत्खननाचा उल्लेख, "गेल्या दशकातील सर्वोत्तम शोध" असा केला आहे. व्हायरल झालेल्या खोट्या फोटोमध्ये दिसणारी व्यक्ती मोस्तफा वझिरीच आहेत.

कैरोजवळच्या सकारा पिरॅमिड कॉम्प्लेक्सजवळ ही कबर सापडली आहे. यात इजिप्तच्या प्राचीन ग्रंथांमध्ये आढळणारी चित्रलिपी आणि त्याकाळच्या शासकांच्या मूर्ती कोरल्या आहे.

इजिप्त

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन, मुस्तफा आब्दो हे या कबरीचं संशोधनाचं करणाऱ्यांचे प्रमुख आहेत. ही कबर १० मीटर लांब, ३ मीटर रुंद आणि ३ मीटरपेक्षा कमी उंचीची आहे.

ही कबर राजदरबारातील धर्मगुरू 'वाहेती' यांची आहे. यात वाहेती त्यांची आई, पत्नी आणि इतर नातेवाईकांच्या मूर्ती कारलेल्या आहेत.

ही बातमी बीबीसी, न्यू यॉर्क टाइम्स आणि सीएनएन यासारख्या जगभरातल्या प्रसार माध्यमांनी दाखवली आहे. भारतात व्हायरल झालेल्या खोट्या पोस्टमध्ये जो फोटो टाकला आहे, तोदेखील या प्रसार माध्यमांनी प्रसिद्ध केला आहे.

इजिप्तच्या पुरातत्त्व मंत्रालयाने या ट्विटर हँडलवरून या कबरीचे काही फोटो ट्वीट केले आहेत. त्यातही व्हायरल झालेला फोटो दिसतो.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

ही कबर सकारा शहरातल्या प्राचीन आणि भव्य अशा दफनभूमीचा एक भाग आहे. याच ठिकाणी इजिप्तमधले सर्वांत अलिकडच्या काळातील पिरॅमीड आहेत.

जमिनीखाली गाडल्या गेलेल्या ठिकाणावर ही कबर सापडली आहे. कदाचित त्यामुळेच इथला खजिना दरोडेखोरांपासून सुरक्षित राहिला आहे. कबरीच्या भितींवर प्राचीन इजिप्तच्या ग्रंथांमधली चित्रलिपी कोरली आहे.

त्याकाळी देवांची आराधना करण्याला सर्वाधिक महत्त्व होतं. त्यामुळे या कबरीच्या भितींवर काढलेल्या नक्षीकामावरून धर्मगुरूंना प्राचीन इजिप्त समाजात महत्त्वाचं स्थान असल्याचं स्पष्ट होतं.

अयोध्येतल्या वादग्रस्त जागेवर राम मंदिर उभारण्यासाठी उजव्या विचारसरणीच्या गटांनी नव्याने प्रयत्न सुरू केले आहेत. अशावेळी हे खोटे फोटो पसरवले जात आहेत. राम मंदिराच्या मुद्द्यावरूनही अशाच प्रकारच्या खोट्या बातम्या पसरवल्या जात असल्याचे पुरावे बीबीसी फॅक्ट चेक टीमला मिळाले आहेत.

25 नोव्हेंबर रोजी अयोध्येत राम मंदिर उभारण्याच्या मागणीसाठी अनेक गट जमले होते. त्यावेळी अयोध्येत किती मोठ्या संख्येने लोक जमले आहेत, हे दाखवण्यासाठी उजव्या विचारसरणीच्या सोशल मीडिया पेजेसवर गर्दीचेही खोटे फोटो टाकण्यात आले होते.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)