ममी कसे तयार करतात, याची इजिप्शियन रेसिपी अखेर सापडली

- Author, व्हिक्टोरिया गिल
- Role, विज्ञान प्रतिनिधी
प्राचीन इजिप्तमध्ये मृतदेहांचं जतन करून ममी तयार करण्याची पद्धत होती, हे आपल्याला माहिती आहेच. याबद्दल जगभरात अनेक संशोधनं होतंच असतात आणि त्यांची माहिती आपल्याला वेळोवेळी मिळत असते. पण त्याबद्दलचं कुतूहल काही कमी होताना दिसत नाही.
आता हेच कुतूहल शमवण्यासाठी आणखी काही नवीन माहिती समोर आली आहे. ज्यानुसार हे ममी तयार कसे केले जातात, याची गूढ 'रेसिपी' अखेर उलगडली आहे.
ख्रिस्तपूर्व 3,700-3,500 या काळातल्या ममींवर संशोधन केल्यानंतर काही नवीन तथ्यं उजेडात आली आहेत. गंमत म्हणजे या काळापूर्वी इजिप्तच्या लोकांना ममी बनवण्याची पद्धत माहीत होती.
ज्या ममीमुळे ही सर्व चर्चा होत आहे, ती ममी इटलीमधल्या टुरीन संग्रहालयात आहे.

फोटो स्रोत, dr stephen buckley
'जर्नल ऑफ आर्किओलॉजिकल सायन्सेस'मध्ये ममींना जतन करून ठेवण्याची पद्धत काय होती, याबाबत संशोधन प्रसिद्ध करण्यात आलं आहे. यॉर्क विद्यापीठातील संशोधक स्टीफन बकले यांनी बीबीसीला सांगितलं, "आम्ही ज्या ममीवर संशोधन केलं त्यामुळे अनेक गोष्टींचा उलगडा झाला. अभ्यासासाठी ही ममी आदर्श स्थितीत होती. 4,000 वर्षांपूर्वी ममी बनवण्याची पद्धत कशी होती, हे आपल्याला या ममीच्या आधारे समजून घेता आलं."
बकले आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या ममीचा बारकाईने अभ्यास केला आणि ममीचे 'केमिकल फिंगरप्रिंट' तयार केलं, म्हणजेच ममी तयार करताना प्रत्येक टप्प्यावर कोणत्या रसायनांचा वापर करण्यात आला, याचं रहस्य त्यांनी शोधून काढलं.

ममी तयार करण्यासाठी आधी विशिष्ट प्रकारचा लेप तयार करावा लागतो. त्या मिश्रणासाठी लागणारं साहित्य -
- तिळाचं तेल
- एका विशिष्ट जातीच्या सुगंधी झाडाच्या किंवा बुलरशेसच्या (भरपूर पाणी असलेल्या ठिकाणी येणारी गवतासारखी वनस्पती) मुळांचा अर्क
- अकाशियापासून काढण्यात आलेली नैसर्गिक साखर किंवा वनस्पतीपासून मिळालेला डिंक
- रेजिन - देवदार झाडापासून मिळालेला एक ज्वालाग्रही चिकट पदार्थ
तिळाच्या तेलात रेजिनला एकजीव केलं जातं. त्यामुळे या मिश्रणात जिवाणूविरोधी तत्त्व निर्माण होतं, ज्यामुळे मृतदेह कुजत नाही.

"याआधी आमच्या हातात अतिप्राचीन काळातली ममी नव्हती. जर तसं झालं असतं तर आम्ही त्या ममीचं रासायनिक विश्लेषण करून अभ्यास केला असता. जेणेकरून ममींचं मूळ काय, या रहस्याचा उलगडा याआधीच झाला असता," असे हे शास्त्रज्ञ म्हणाले.
या मिश्रणाचा शोध कसा लागला?
ममी बनवण्याची योग्य पद्धत काय आहे, याचा अभ्यास बकले यांनी करण्यास सुरुवात खूप वर्षांपूर्वी केली होती. ममींभोवती जे कापड गुंडाळलं जातं त्याचं रासायनिक विश्लेषण बकले आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सुरू केलं.
ममींसाठी लागणारं कापड इंग्लंडच्या बोल्टन वस्तू संग्रहालयात मिळालं. हे कापड ख्रिस्तपूर्व 4,000 वर्षांपूर्वीचं असावं. या कापडाची निर्मिती ही ममी तयार करण्यापूर्वीच्या काळातली असावी.
"याआधीच्या संशोधनावर आधारित माहितीनुसार, ख्रिस्तपूर्व 2,600 मध्ये ममींचा शोध लागला होता आणि याच काळात पिरॅमिड बांधण्यात आले होते," बकले सांगतात.
"पण आमचं असं निरीक्षण आहे की ममी बनवण्याचं ज्ञान त्याआधी अस्तित्वात असावं."

फोटो स्रोत, Stephan buckely/ university of york
या शोधानंतर बकलेंच्या टीमनं अतिप्राचीन काळातल्या ममींचा अभ्यास करण्यासाठी इटलीतलं टुरीन संग्रहालय गाठलं. विशेष बाब म्हणजे इथल्या ममी पूर्वी जशा होत्या तशाच आहेत. अलीकडच्या काळात त्यांच्यावर काही रासायनिक प्रक्रिया करण्यात आलेली नाही. त्यामुळे प्राचीन इजिप्तमध्ये रासायनिक विज्ञान कसं होतं, याचा अभ्यास करण्याची संधी शास्त्रज्ञांना मिळाली.
डॉ. जाना जोन्स या इजिप्टॉलॉजिस्ट आहेत. त्यांचा इजिप्तच्या प्राचीन संस्कृतीचा अभ्यास असून त्या सिडनीतील मॅक्वेरी विद्यापीठात शिकवतात. त्या सांगतात, "टूरीन म्युजियममध्ये सापडलेल्या ममींमुळं आपल्या ज्ञानात मोलाची भर पडली आहे. रासायनिक विश्लेषण, प्रत्यक्ष निरीक्षण, जनुकीय तपासणी, रेडिओकार्बन डेटिंग आणि त्या काळातल्या कपड्यांचं सूक्ष्म विश्लेषण या पद्धतींचा वापर करून या ममींचा अभ्यास करण्यात आला. त्यावरून आम्ही हे सांगू शकतो की ही ममी ख्रिस्तपूर्व 3,600 या काळातील असावी. मृत्यूच्या वेळी ही व्यक्ती 20 ते 30 वयाची असावी."
हा शोध महत्त्वपूर्ण का आहे?
"याच पद्धतीचा वापर 2,000 वर्षानंतर करून फॅरोहची ममी बनवण्यात आली होती, असं बकले सांगतात. असं मानलं जातं की पहिलं राष्ट्र ख्रिस्तपूर्व 3,100 मध्ये स्थापित झालं असावं. त्याआधी इजिप्त अस्मिता ही संकल्पना रूजलेली होती. याचं मूळ याआधी असावं," बकले सांगतात.
"महत्त्वाची गोष्ट म्हणजे इतक्या पुरातन काळात इजिप्तनं अॅंटिबॅक्टेरिअल लेपनाची पद्धत तयार कशी केली होती, याचं ज्ञान आपल्याला झालं. मृतदेह जतन करून ठेवण्यासाठी लेपन केलं जायची."

ममी बनवण्याची पद्धत
- ब्रशसारख्या वस्तूचा वापर करून कवटीतून मेंदू काढला जायचा
- मृताचे अंतर्गत अवयव काढले जायचं
- मृतदेह पूर्ण वाळेपर्यंत त्याला मीठात ठेवलं जायचं
- त्या शरीरावर अॅंटिबॅक्टेरिअल मिश्रणाचं लेपन केलं जायचं
- लिनेनच्या वस्त्रानं शरीराला गुंडाळलं जायचं

या पूर्ण पद्धतीमध्ये शरीराला वाळवणं आणि मिश्रणानं लेपन करणं हे महत्त्वपूर्ण होतं. ममी बनवणं किंवा मृतदेह जतन करून ठेवणं हा इजिप्तच्या संस्कृतीचा केंद्रबिंदू होता.
"मृत्यूनंतर जीवन आहे अशी त्यांची धारणा होती आणि मृत्यूनंतर आयुष्य जगायचं असेल तर त्यासाठी देहाचं जतन करणं आवश्यक आहे, असं त्या काळातल्या लोकांना वाटत होतं," असं बकले सांगतात.
हे वाचलं का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








