मेघालयन एज : पृथ्वीच्या इतिहासातील एक महत्त्वाचा कालखंड जो भारतात सुरू झाला

गुहा
फोटो कॅप्शन, मेघालयातील गुहेत मिळणाऱ्या चुनखडीच्या अवशेषात इतिहासाचं गुपित आहे.
    • Author, जोनाथन अॅमोस
    • Role, बीबीसी विज्ञान प्रतिनिधी

पृथ्वीच्या आजवरच्या इतिहासात एक नवे पर्व सुरू झालं आहे आणि या कालखंडाचा आपण भाग आहोत.

भूगर्भशास्त्रज्ञांनी गेल्या 4,200 वर्षांचा कालावधी एक वेगळा कालखंड असल्याचं म्हटलं आहे. मेघालयातील गुहांमध्ये या इतिहासाच्या पाऊलखुणा सापडल्यामुळे या काळाला मेघालयन कालखंड असं नाव पडलं आहे.

अनेक शतकांपूर्वी आलेल्या एका भयंकर दुष्काळामुळे अनेक संस्कृतींचा ऱ्हास झाला होता. तेव्हापासून या कालखंडाची सुरुवात झाली होती.

हा कालखंड आता सामावून घेण्यासाठी 'द इंटरनॅशनल क्रोनोस्ट्रॅटिग्राफिक चार्ट' म्हणजेच पृथ्वीचं वय दाखवणारी आकृती अपडेट केली जाणार आहे.

पण ज्या पद्धतीनं हे बदल झाल्याचं जाहीर करण्यात आलं, त्यावरबन वैज्ञानिकांमध्ये असंतोष पसरला आहे. या विषयावर अर्धवट चर्चा झाल्याचं काही वैज्ञानिकांचं मत आहे, कारण हा कालखंड केवळ एक संकल्पना म्हणून सहा वर्षांपूर्वी पुढे मांडण्यात आला होता. त्यानंतर यावर चर्चा होणं अपेक्षित होतं. पण तसं झालं नाही.

पृथ्वीचं वय निर्मितीपासून आतापर्यंत एकूण 4.5 अब्ज वर्षं आहे. त्या कालखंडाचं वर्गीकरण भूगर्भशास्त्रज्ञांनी वेगवेगळ्या कालावधीत केलं आहे.

याचे काही टप्पे ठरवून दिले आहेत. प्रत्येक टप्प्यावर काही ना काही घडलं आहे. उदाहरणार्थ, जेव्हाही खंडांचं विभाजन, वातावरणात अमूलाग्र बदल आणि एखादी प्राण्यांच्या किंवा झाडांच्या प्रजातीची नव्याने उत्पत्ती झाली आहे, एक नवा टप्प्याची नोंद झाली आहेय

आपण सध्या होलोसिन नावाच्या कालखंडात राहत आहोत. 11,700 वर्षांपूर्वी हा कालखंड सुरू झाला होता. हिमयुग संपून आपण सध्याच्या उष्ण वातावरणात राहू लागलो ते याच कालखंडात.

इंटरनॅशनल कमिशन फॉर स्ट्रॅटिग्राफी (ICS) या संस्थेनं या कालखंडाची विभागणी अनेक उपकालखंडांमध्ये केली आहे. ICSने होलोसिन कालखंडाची विभागणी अप्पर, मिडल आणि लोवर तीन उपकालखंडात केली आहे.

मेघालयन

फोटो स्रोत, IUGS

फोटो कॅप्शन, कालगणनेचा तक्ता

सर्वांत अलीकडचा काळ हा मेघालयन काळ आहे. या काळातील महत्त्वपूर्ण हवामान बदलाच्या घटनांची नोंद घेण्यात आली आहे. या कालखंडाच्या सुरुवातीला एक मोठा दुष्काळ पडला होता. या दुष्काळाचा परिणाम दोन शतक राहिला. हा दुष्काळ इतका मोठा होता की यामुळं इजिप्त, ग्रीस, सीरिया, पॅलेस्टाइन, मेसोपोटामिया, सिंधू आणि यांगत्से नद्यांच्या खोऱ्यांमधली संस्कृती लोप पावली.

वातावरणातील बदल आणि महासागरात होणाऱ्या परिवर्तनामुळं या दुष्काळाची सुरुवात झाली असावी, असा अंदाज आहे.

"भूगर्भशास्त्राच्या एकूण कालखंडाशी तुलना केली असता मेघालयन कालखंड अनेक अर्थांनी विशेष असल्याचं आपल्या लक्षात येतं. या काळाच्या सुरुवातीलाच जागतिक हवामान बदलाने जागतिक सांस्कृतिक जीवन प्रभावित केलं," असं लाँग बीच स्टेट युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक आणि International Union of Geological Sciences किंवा IUGSचे सरचिटणीस स्टॅनली फिनै यांनी म्हटलं. IUGS या संस्थेनीच ICUच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे.

होलोसिनच्या मध्ययुगीन काळाला नॉर्थग्रिपियन असं म्हटलं जातं. मेघालयन कालखंड सुरू होण्याआधीचे 8,300 वर्षं हा कालखंड होता. या कालखंडाची सुरुवात कॅनडातील हिमनग वितळल्याने झाली. वितळलेला हिमनग उत्तर अंटलांटिकमध्ये गेला आणि त्याने महासागराच्या प्रवाहाला प्रभावित केलं.

होलोसिन या कालखंडाची सुर्वांत जुना टप्पा ग्रीनलॅंडियन उपकालखंडाचा आहे. हिमयुग संपल्यानंतर हे युग सुरू झालं.

वर्गीकरणाला मान्यता मिळण्यासाठी काही मानकांची पूर्तता होणं आवश्यक असतं. भूगर्भशास्त्रीय कालगणनेत हे दिसायला हवं की या कालखंडात झालेल्या घटनांचा परिणाम हा वैश्विक आहे. कालखंडांच्या वर्गीकरणात त्या-त्या काळातील खडक आणि वालुकाष्माची महत्त्वाची भूमिका असते. त्या काळातील घटनांचा परिणाम त्या वेळेतील खडकांवर होतो. त्याचे पुरावे सापडणं आवश्यक आहे. ते मिळाली की तो कालखंड निश्चित केला जातो.

याचं सोपं उदाहरण म्हणजे क्रेटाशिअस आणि पॅलेओजिन या कालखंडातील फरक. या फरकाला गोल्डन स्पाइक असं म्हटलं जातं. हा कालखंड वेगळा आहे याचं निदर्शक म्हणजे इरिडिअम या तत्त्वाचे त्या काळातील वालुकाष्मात आढळलेले नमुने.

6.6 कोटी वर्षांपूर्वी एक लघुग्रह पृथ्वीवर आदळला आणि त्यानंतर डायनासोर नष्ट झाले. त्यावेळी इरिडियम हे तत्त्व पृथ्वीवर अवशेषाच्या रुपानं राहिलं होतं.

स्टॅलगमाइट

फोटो स्रोत, IUGS

फोटो कॅप्शन, मेघालयातील गुहेत सापडलेला स्टॅलगमाइटचा एक भाग

मेघालयन काळाबाबत असा ठळक भेद त्या विशिष्ट कालखंडातील प्रकारांमध्ये असलेल्या वैविध्यातून दिसून येतो अथवा ऑक्सिजनमध्ये असलेल्या आयसोटोपमुळे दिसून येतो. (आयसोटोप म्हणजे एकाच तत्त्वाची दोन भिन्न रूपं, त्यांना समस्थानिक असंही म्हणतात. एकच अणुक्रमांक असलेल्या घटकात प्रोटॉनची संख्या समान असते पण न्यूट्रॉनची संख्या भिन्न असते. त्यामुळे त्याचे अणुभार भिन्न होतो, त्याला समस्थानिक म्हणतात.)

भारतातील मेघालयात मॉम्लूह या गुहेत स्टॅलगमाइटचे जे थर आढळले आहेत, त्या थरात सापडलेल्या ऑक्सिजनच्या आयसोटोपवरून आपल्याला हे समजतं की मेघालयन काळ केव्हा सुरू झाला. (गुहेच्या तळाशी असलेल्या भागावर शंकूच्या आकाराचा चुनखडीचा थर तयार होतो त्याला स्टॅलगमाइट म्हणतात.)

हा कालखंड सुरू झाल्यानंतर भारतातील मान्सूनची स्थिती बदलून कमकुवत झाली.

या समस्थानिकांतील बदलामुळे भारतातील मान्सूनच्या स्थितीत बदल होऊन अंदाजे 20-30 टक्के पाऊस कमी झाला, असं प्रा. माइक वॉकर यांनी सांगितलं. वॉकर हे युनिव्हर्सिटी ऑफ वेल्समध्ये शिकवतात तसेच ते होलोसिन या कालखंडावर काम करणाऱ्या वैज्ञानिकांचं नेतृत्व करत आहेत.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

आजपासून 4,300 ते 4,100 वर्षांपूर्वी दोन प्रमुख घटना घडल्या. त्यांचा मध्यबिंदू हा आजपासून 4,200 वर्षांपूर्वी होतो. याचाच अर्थ 4,200 वर्षांपूर्वी मेघालयीन कालखंड सुरू झाला, असं वॉकर यांनी बीबीसीला सांगितलं.

पुढं कोणते बदल होणार?

होलोसिन या कालखंडाचं वर्गीकरण करणं हे अनेक वैज्ञानिकांना मान्य नाही. ते म्हणतात असं करणं हे घाईचं ठरू शकतं. त्या वैज्ञानिकांचं असा सवाल आहे की कालखंड बदलला हे दाखवण्यासाठी ज्या निकषांचा उल्लेख केला जात आहे, त्या घटना खरोखरच जगाला प्रभावित करतील इतक्या मोठ्या स्वरुपाच्या होत्या का? भूगर्भशास्त्रीय कालगणनेनुसार पृथ्वीवर मानवाचा प्रभाव कोणत्या काळात कसा होता यावर सध्या वादविवाद सुरू आहेत, त्याच काळात या नव्या कालखंडाला मान्यता देण्याबाबत त्या वैज्ञानिकांनी चिंता व्यक्त केली आहे.

होलोसिन या कालखंडालाच अॅंथ्रोपोसिन म्हणणाऱ्यांचा एक गट आहे. कालखंडामध्येच मानवी हालचालीमुळे हवामानावर आणि जगावर परिणाम होण्यास सुरुवात झाली त्यामुळे या कालखंडाला अॅंथ्रोपोसिन हे नाव उचित आहे, असं त्यांना वाटतं. याबाबत संशोधन सुरू आहे.

"एक प्रबंध प्रकाशित झाल्यानंतर आणि सध्या विविध समित्या याबाबत संशोधन करत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांनी अचानकपणे मेघालयन कालखंडाची घोषणा केली आणि त्यांनी कागदावरच्या आकृती दाखवली. आपण नव्या कालखंडात आलो. कुणाला माहीत आहे? आपल्याकडे आता बऱ्याच नव्या व्याख्या आहेत ज्या अॅंथ्रोपोसिन वर्किंग ग्रुप आणि वैज्ञानिकांच्या ज्या मान्यता आहेत त्यांना आव्हान देऊ शकतील. गेल्या 10,000 वर्षांपूर्वीच महत्त्वपूर्ण बदल घडलं आहेत, असं ज्या वैज्ञानिकांना वाटतं त्यांच्या धारणांनाच हे आव्हान असेल, असं युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन येथील भूगोलाचे प्राध्यापक मार्क मासलिन यांना वाटतं.

पण प्रा. वॉकर यांचं मत काहीसं भिन्न आहे. त्यांना दोन भिन्न विचारधारेच्या वैज्ञानिकांमध्ये काही मतभेद आहेत, असं वाटत नाही. ते म्हणतात, "मला तर दोन गटांत काही संघर्ष असल्याचं वाटत नाही. आता पाहा ना, जर आपण एका मोठ्या कालखंडाची विभागणी उपकालखंडात केली आणि भविष्यकाळात अॅंथ्रोपोसिन हे नाव देण्याची दोन्ही संकल्पना भिन्न आहेत."

त्यांचं मत आहे, होलोसिनचं वर्गीकरण हे पूर्णतः भौतिक घटकांवर जसं की हवामान बदल आणि वातावरणातील बदल यांच्यावर अवलंबून आहे. तर अॅंथ्रोपोसिन हे भूगर्भशास्त्रीय कालगणनेमध्ये एक नवं एकक निर्माण केलं जाणार आहे. ज्यामध्ये मानवाच्या हालचालीमुळे जगावर काय परिणाम झाला याची तपासणी पुराव्याआधारे केली जाणार आहे.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)