2000 वर्षांपूर्वीची कबर उघडली आणि अफवांचं पेव फुटलं

या कबरीचं वजन 30 टन आहे.

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन, या कबरीचं वजन 30 टन आहे.

तीन आठवड्यांपूर्वी इजिप्तमधल्या अलेक्झांड्रिया शहरात जवळपास 2,000 वर्षांपूर्वीची कबर सापडली. काळ्या ग्रॅनाईटच्या या कबरीमध्ये तीन सांगाडे आणि तपकिरी रंगाचं सांडपाणी असल्यामुळे घाणेरडा वास येत होता.

त्यामुळे जणू काही अफवांचं पेव फुटलं - 'या कबरीत प्राचीन ग्रीक नेते अलेक्झांडर द ग्रेट यांचे अवशेष आहेत का? ही कबर एखादा जीवघेणा शाप तर देणार नाही ना? असे विविध प्रश्न अफवांच्या माध्यमातून विचारले जात आहेत.

तज्ज्ञांनी ही कबर उघडून पाहिली आणि वरील अफवांमध्ये काहीही तथ्य नसल्याचं म्हटलं आहे.

ही कबर एका बांधकाम साईटवर सापडली आहे. या कबरीमधील अवशेषांचा अभ्यास करण्यासाठी इजिप्तच्या पुरातत्व विभागानं एक समिती नेमली आहे.

इजिप्तमधील EY-वॅटॅन या वृत्तसंस्थेनुसार, "तज्ज्ञांनी ही कबर सुरुवातीला 5 सेंटीमीटर वर उचलली. त्यानंतर आलेल्या वासामुळे त्यांनी संपूर्ण जागेची तपासणी केली. नंतर इजिप्तच्या मिलिटरी इंजिनीयर्सच्या सहाय्यानं त्यांनी ती कबर उघडून पाहिली."

कबरीत डोकावून पाहिलं तर...

अलेक्झँड्रियामधल्या कबरीत आढलेले तीन सांगाडे हे फेरो यांच्या काळातील सैनिकांचे असू शकतात, अशी शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. यातल्या एकाच्या कवटीवर खाचा पडल्या आहेत, असं सांगितलं जात आहे.

ही कबर दोन मीटर उंच आणि तीन मीटर लांब आहे.

आतापर्यंत सापडलेली ही सर्वांत मोठी अखंड कबर आहे. तिचं वजन 27 टन इतकं आहे. प्टोलेमिक साम्राज्याच्या काळातली ही कबर असल्याचं बोललं जात आहे. अलेक्झांडर द ग्रेट यांच्या मृत्यूनंतर इसवी इ.स.पू. 323चा हा काळ होता.

"आम्हाला तीन जणांची हाडं सापडली, ज्यावरून तिथे एखाद्या कुटुंबाला दफन केलं असावं, असं वाटत होतं. दुर्दैवानं त्यातील मृतदेह चांगल्या स्थितीत नव्हते. त्यांची हाडंच तेवढी शिल्लक होती," असं Supreme Council of Antiquities च्या सचिव मोस्तफा वझिरी यांनी सांगितलं.

या कबरीमध्ये 3 सांगाडे सापडले आहेत.

फोटो स्रोत, AFP/GETTY IMAGES

पुरातत्वज्ञ आता या कबरीतल्या अवशेषांचा अभ्यास करणार आहेत. यात सापडलेले अवशेष कोणत्या काळातील आहेत आणि त्यांचा मृत्यू कसा झाला, हे शोधण्याचा ते प्रयत्न करणार आहेत.

कबरी धोकादायक असतात का?

"कबरीला हात लावल्यास फॅरोचा (राजाचा) शाप लागू शकतो, अशी भीती माध्यमांमधून व्यक्त केली जात होती. पण आम्ही ही कबर उघडली आणि देवाचे आभार मानतो की त्यामुळे जगात अंधार वगैरे काही पसरला नाही," असं वझिरी यांनी पुढे म्हटलं.

"मी प्रथम त्या कबरीमध्ये गेलो आणि आज तरीही मी तुमच्यासमोर एकदम सुस्थितीत उभा आहे."

कबरीतून जीवघेणा विषारी वायू बाहेर येण्याची शक्यता असल्यानं बांधकाम स्थळावरून लोकांना हटवण्यात आलं आहे, असं इजिप्तमधील अल्-अहराम या वृत्तपत्रानं म्हटलं आहे.

शास्त्रज्ञांनी ममीच्या शापाचा फोलपणा सिद्ध केला आहे. पण यात आणखी काही धोके आहेत का?

तत्ज्ञ कबरीतल्या अवशेषांचा अभ्यास करणार आहेत.

फोटो स्रोत, EPA

1923मध्ये तुतनखामेनच्या दफनभूमीच्या उत्खननादरम्यान एक चेंबर उघडल्यानंतर तिथले डास चावल्यामुळे लॉर्ड कर्नार्वोन यांचा मृत्यू झाला होता. कर्नावोन हे या मोहीमेचे आर्थिक सहाय्यक होते.

तेव्हापासून अफवा पसरल्या आहेत की जीवाणू कबरीच्या सीलंबद भागात टिकून राहिले आणि कर्नोवोन यांच्या मृत्यूसाठी कारणीभूत ठरले.

पण यापासून काहीही धोका नाही, असं हवाई विद्यापीठातील एपिडेमॉलॉजीचे प्राध्यापक एफ डिवॉल्फ मिलर यांचं म्हणणं आहे.

"कबरीतील जीवाणू अथवा कबरीवरच्या बुरशीमुळे एखाद्या पुरातत्वशास्त्रज्ञाचा अथवा पर्यटकाचा मृत्यू झाला आहे, अशी एकही घटना आमच्या ऐकिवात नाही," असं त्यांनी माध्यमांना सांगितलं.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)