ब्राह्मणाबाद : पाकिस्तानातलं हे शहर एकेकाळी हिंदू राजांचं केंद्र होतं

- Author, रियाज सुहैल
- Role, बीबीसी उर्दू, कराची
सिंध प्रांतात मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या ब्राह्मणाबादमधील मोडक्या वास्तूंमध्ये अरब योद्धा मोहम्मद बिन कासिमच्या आगमनापूर्वीचे पुरातत्त्वीय अवशेष सापडले.
ऐतिहासिक दस्तावेजांमध्ये याचे संदर्भ सापडतात. पण शाह अब्दुल लतीफ विद्यापीठातील पुरातत्त्व विभागाने अलीकडेच केलेल्या एका वैज्ञानिक संशोधनातून स्पष्ट झालं की, या ठिकाणी तिसऱ्या शतकातील लोकवस्तीचे अवशेष अस्तित्वात आहेत.
ब्राह्मणाबाद कुठे आहे?
तुम्ही कराचीहून लाहोरला जाणाऱ्या ट्रेनमध्ये चढलात, तर टंडो आदम रेल्वे स्थानकानंतर शाहदादपूर नावाचं स्थानक येतं. इथून सुमारे 18 किलोमीटर अंतरावर ब्राह्मणाबाद किंवा मंसुरा या जुन्या शहराच्या खुणा पाहायला मिळतात.
इथे एक स्तूपसुद्धा आहे. हा स्तूप बौद्ध धर्माशी निगडीत असल्याचं काही इतिहासकार म्हणतात. याच्या आसपास लाल विटांचे ढीग पडलेले आहेत. या अवशेषांनी सुमारे चार किलोमीटरचं क्षेत्र व्यापलेलं आहे.
पुरातत्त्व विभागाच्या म्हणण्यानुसार, या उपखंडामध्ये हेच मुसलमानांचा पहिला बालेकिल्ला ठरलं होतं. नदीमधील एका बेटाप्रमाणे या शहराचं स्थान होतं.
ब्राह्मणाबादमधील खोदकाम कधी झालं होतं?
1854 साली बेलासस आणि रिचर्डसन यांनी पहिल्यांदा इथल्या पुरातत्त्वीय स्थळांवर खोदकाम केलं. त्या नंतर हेन्री केजिन्ज यांनी हे काम पुढे नेलं.

पाकिस्तानची निर्मिती झाल्यानंतर, 1962 साली राष्ट्रीय पुरातत्त्व मंत्रालयाच्या वतीने इथे खोदकाम झालं. या कामाचा प्रारंभिक अहवाल प्रकाशित झाला होता, परंतु पूर्ण अहवाल आजतागायत प्रकाशित झालेला नाही.
हे अवशेष मंसुरा शहराचे आहेत आणि इथे मशिदीचे अवशेष सापडले आहेत. परंतु, इस्लामच्या आगमानपूर्वीचे इथले अवशेष उपलब्ध नाहीत, असं या अहवालात डॉक्टर एफ. ए. खान यांनी म्हटलं आहे.
शाह अब्दुल लतीफ विद्यापीठातील पुरातत्त्व विभागाचे प्रमुख डॉक्टर गुलाम मोहिउद्दीन वीसर यांच्या म्हणण्यानुसार, इमारतींच्या स्तराबद्दल किंवा कालावधीबद्दल सदर कोणतीही टिप्पणी करण्यात आलेली नाहीत.
अलीकडे करण्यात आलेल्या संशोधनामागील उद्देश काय आहे?
शाह अब्दुल लतीफ विद्यापीठातील पुरातत्त्व विभागाचे प्रमुख डॉक्टर गुलाम मोहिउद्दीन वीसर यांच्या नेतृत्वाखाली 20 शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या गटाने अलीकडेच ब्राह्मणाबाद पुरातत्त्वीय स्थळावर संशोधन सुरू केलं. सहा ठिकाणी संशोधनाला सुरुवात करण्यात आली, त्यानंतर हे संशोधन विस्तारण्यात येणार आहे.

डॉक्टर वीसर यांच्या म्हणण्यानुसार, "मोहम्मद बिन कासिम इथे आला होता तेव्हा इथे लोकवस्ती तयार झाली, ही धारणा योग्य आहे की नाही, हे आम्हाला तपासायचं आहे. इथे इमारतींचा स्तर काय आहे, कोणत्या मातीची भांडी इथे मिळतात आणि कोणत्या शतकाचा किंवा कालावधीचा निर्देश त्यातून होतो, याचा शोध आम्ही घेतो आहोत."
बगदादचा राजा हजाज बिन युसुफ याच्या आदेशावरून मोहम्मद बिन कासम सन 712 हिजरी या वर्षी सिंधवर आक्रमण करत आला, त्यावेळी इथे राजा दाहीरचं राज्य होतं, हे इथे लक्षात घ्यायला हवं.
मशिदीखाली प्राचीन लोकवस्तीचे संकेत
सुरुवातीच्या संशोधनामध्ये एका मशिदीचा उल्लेख सापडतो, असं डॉक्टर गुलाम मोहिउद्दीन वीसर म्हणतात. त्यामुळे इथे मशिदीच्या क्षेत्रामध्ये त्यांनी 15 फूट खोलीचे चार खड्डे खोदलेले आहेत. इथे शहर अस्तित्वात होतं आणि याआधीसुद्धा तिथे लोकवस्ती होती, हे यातून स्पष्ट झालं.
त्यांच्या म्हणण्यानुसार, इथे सापडणाऱ्या इमारतींचा स्तर व मातीची भांडी यात भराच भेद दिसतो आहे, आणि इस्लामी कालखंड आणि इस्लामपूर्व कालखंड, या दोन्हींचे संकेत त्यातून मिळतात.

ते म्हणाले, "इथे सापडलेल्या मातीच्या भांड्यांचं तिसऱ्या शतकातील भांड्यांशी साधर्म्य आहे. याचा संबंध ससानिद काळाशी (इस्लामपूर्व काळात इराणमधील हा अंतिम बादशाही कालखंड मानला जात होता) येतो. अशाच प्रकारची मातीची भांडी भांभूरमधील पुरातत्त्वस्थळीदेखील मिळाली आहेत."
"या आधारावर असं म्हणता येईल की, हे शहर तिसऱ्या शतकामध्ये उभारलं गेलं. त्याचा विस्तार लक्षात घेता मोहम्मद बिन कासिमने हे शहर जिंकलं असलं, तरी लोक आधीपासूनच इथे राहत होते, असं आपल्याला म्हणता येईल."
महागडे खडे आणि दागिने
ब्राह्मणाबादमधील संशोधनातून असंही स्पष्ट होतं की, हे शहर आर्थिक कामकाजाचंही केंद्र राहिलं असावं.
पाकिस्तानची निर्मिती होण्यापूर्वी केलेल्या एका अभ्यासामध्ये उत्खननस्थळावरून काही नाणी आणि इतर कलाकृती मिळाल्या. तेव्हा या वस्तू ब्रिटिश संग्रहालयाकडे आणि मुंबईला पाठवण्यात आल्या होत्या.

डॉक्टर वीसर यांच्या म्हणण्यानुसार, अलीकडे करण्यात आलेल्या संशोधनामध्ये मातीच्या भांड्यांसोबतच महागडे खडे, नीलम, रूबी आणि पाचू इत्यादीही आढळले. या व्यतिरिक्त पॉलिश करायची साधनं आणि साचेही मिळालेत.
"इथे या खड्यांशी निगडीत उद्योग अस्तित्वात होता, असं यातून सूचित होतं. शिवाय, हस्तिदंताचे दागिने, शेल (सहजपणे बारीक करता येतो असा स्लेटसारखा मऊ दगड) आणि नाणीही सापडली आहेत. नाणी स्वच्छ केल्यानंतर कोणत्या काळातील आहेत ते लक्षात येईल."
पाणी काढण्याची भूमिगत व्यवस्था
मोहनजोदाडो आणि भांभूर यांप्रमाणे ब्राह्मणाबादमध्येही पिण्याच्या पाण्याच्या विहिरी आहेत. पण इथली रचना त्याहून वेगळी आहे.

मातीच्या भांड्यांप्रमाणे भट्टीत तयार केलेला एक पाइप पंधरा फूट खाली जातो आहे. हे रंग मिसळून हा पाइप तयार करण्यात आला आहे. जमिनीखाली पाण्यासाठी हा पाइल लांबपर्यंत गेलेला आहे. हे एक विलक्षण तंत्र दिसतं आहे. आधीच्या अभ्यासांमध्ये याला ड्रेनेज लाइन म्हटलं आहे, असं डॉक्टर गुलाम मोहिउद्दीन सांगतात.
चार प्रवेशद्वारं असलेलं शहर
ब्राह्मणाबादविषयी अरबी आणि फार्सी भाषांसोबतच इतरही अनेक भाषांमध्ये ऐतिहासिक दस्तावेज उपलब्ध आहेत, त्यातून या शहराच्या अस्तित्वाविषयी माहिती मिळते.

सिंधी भाषेतील इतिहासकार आणि नाटककार मिर्झा कलीच बेग 'प्राचीन सिंध' या ग्रंथात लिहितात की, हिंदू राजांच्या सत्ताकाळात ब्राह्मणाबाद हे सात मोठ्या किल्ल्यांच्या शहरांपैकी एक होतं.
ब्राह्मण राजा चच याच्या सत्ताकाळात अघम लोहाना या राज्याचा प्रधान होता. त्याचप्रमाणे लाखा, समा आणि सहता या जाती सत्तेमध्ये सहभागी होत्या. या राजाचा हुकूम समुद्रापर्यंत, म्हणजे देबवल येथील बंदरापर्यंत मानला जात असे. चच राजाने अघमशी युद्ध केलं आणि त्याला हरवून या शहरावर ताबा मिळवला, त्यानंतर अघमच्या विधवा पत्नीशी विवाह केला.
चच राजाचा मुलगा राजा दाहीर याने सत्तेची सूत्रं हाती घेतल्यानंतर स्वतःचा भाऊ दाहीर सिंह याला प्रधान म्हणून नियुक्त केलं आणि मृत्यूनंतर त्याच्या मुलाकडे सत्ता जाईल अशी तजवीज केली.

मौलाई शैदाईने 'जन्नत-उल-सिंध'मध्ये असं लिहिलं आहे की, इथे बौद्धविचाराचं एक प्रार्थनास्थळ होतं आणि ज्योतिषातील कुशल लोक इथे अस्तित्वात होते. चच राजा कट्टर ब्राह्मण असूनदेखील त्याने इथलं बौद्ध धर्मस्थळ तसंच राहू दिलं.
इथे एक बौद्ध स्तूप असल्याचं सुरुवातीच्या अभ्यासांमध्ये नमूद केलेलं होतं, पण असं दाखवणारी कोणतीही प्रस्तुत ठरणारी सामग्री तिथे उपलब्ध झालेली नाही. बौद्ध स्तुपाची वैशिष्ट्यं निराळी असतात, पण इथे बुद्धाची अशी कोणतीही प्रतिमा किंवा मूर्ती मिळालेली नाही, असं डॉक्टर वीसर सांगतात.
मोहम्मद बिन कासिमचं आगमन
'जन्नत-उल-सिंध'मध्ये मौलाई शैदाई यांनी लिहिल्यानुसार, राजा दाहीरच्या हत्येनंतर त्याचा मुलगा जयसिंग याच्याकडे मोहम्मद अलाफीसह (मोहम्मद अलाफीने ओमानच्या खलिफाविरोधात बंड केलं होतं, आणि बंड अपयशी ठरल्यावर दाहीर राजाकडे त्याने आश्रय घेतला) पंधरा हजारांचं सैन्यदल होतं. या दोघांचेही मंत्री सियासगर याने ब्राह्मणाबादच्या दिशेने जाण्याचा सल्ला दिला. तिथे बराच खजिना गाडलेला होता.

ब्राह्मणाबादमधील किल्ल्याच्या चार प्रवेशद्वारांची नावं बेडी, साहतिया, मंहडो आणि सालबाह अशी होती. तिथे जय सिंहाने चार सेनापती सैनिकांसह तैनात होते. मौलाई शैदाईच्या म्हणण्यानुसार, मोहम्मद बिन कासिमविरोधातील सिंध्यांची ही शेवटची लढाई होती.
रजब (इस्लामी वर्षातील महिना) महिन्यामध्ये अरबांचं सैन्य ब्राह्मणाबादच्या जवळ पोहोचलं, तेव्हा मोहम्मद बिन कासिमच्या आदेशाने एक खंदक खोदण्यात आला. जय सिंहाने गनिमीयुद्ध सुरू केलं आणि सर्व परिसर उद्ध्वस्त करून टाकला, जेणेकरून इस्लामी सैन्याला सामानाची रसद आणि प्राण्यांसाठी चारा मिळणार नाही.

सहा महिने वेढा घालून राहिल्यानंतर जय सिंहाचा पराभव झाला आणि नागरिकांनी प्रवेशद्वारं उघडली. मोहम्मद बिन कासिमने त्यांच्यावर जिझिया कर लावला. हा विजय मुहर्रमच्या सन 94 मध्ये मिळाला.
इराणी बादशाहचं शहर
काही इतिहासकारांच्या मते, इराणी राजाने ब्राह्मणाबाद शहराची उभारणी केली. सिंधमधील एक विद्वान इतिहासकार गुलामी अली अलाना यांनी एक लेख लिहिला होता. 'मेहरान' या नियतकालिकात 'मंसुरामधील इस्लामी सत्ता' अशा शीर्षकाखाली हा लेख प्रकाशित झाला होता.
ससानिद परिवारातील राजा गुस्तस्पने सिंधू खोऱ्याची सत्ता त्याचा नातू बहमन याच्याकडे सोपवली. बहमन इराणच्या इतिहासामध्ये 'बहमन अर्देशिर दर्ज़ दास्त' या नावाने प्रसिद्ध होते, असं अलाना यांनी लिहिलं आहे.

बहमन याने सिंधमध्ये एक शहर उभारलं. या शहराचं नाव बहमनो असं होतं. यालाच पुढे ब्रह्मबाद असं संबोधलं जाऊ लागलं. काही अरब पर्यटकांनी ब्रह्मबाद आणि मंसुरा ही एकाच शहराची दोन नावं असल्याचं नमूद केलं आहे.
याकुत लहुमी, हमजा यांचा संदर्भ देत ते लिहितात की, अल-मंसुरा हे ब्राह्मणाबादचं दुसरं नाव आहे.
अरब पर्यटक अल-बेरूनीच्या म्हणण्यानुसार, ब्राह्मणाबादचं नाव बहमनवा आहे. मुसलमानांची सत्ता येण्यापूर्वी या शहराला ब्राह्मणाबाद असं संबोधलं जात होतं.
सिंधमधील संशोधक आणि इतिहासकार डॉक्टर नबी बख्श बलोचदेखील डॉक्टल अलाना यांच्या म्हणण्याचं समर्थन करतात.
बहमन अर्देशिर याच्या आदेशावरून ब्राह्मणाबादची उभारणी झाली आणि बहुधा बराच काळ गेल्यानंतर सिंध प्रांतामध्ये ब्राह्मणांचा प्रभाव वाढल्यानंतर बहमनाबादला ब्राह्मणाबाद असं संबोधलं जाऊ लागलं. हा बदल ब्राह्मणांच्या वर्चस्वामुळे किंवा सिंधीच्या स्थानिक बोलीमुळे झाला असावा, असं बलोच म्हणतात.
ब्राह्मणाबाद ते मंसुरा
संशोधकांच्या म्हणण्यानुसार, सैनिकी आणि राजकीय गरजांमुळे अरबांना सिंध प्रांतात स्वतःची शहरं वसवावी लागली, त्यापैकी महफूजा, बैजा आणि मंसुरा प्रसिद्ध आहेत.
इलियट यांनी ब्लाजरीचा संदर्भ देऊन असं म्हटलं आहे की, ब्रह्माबाद मंजुराहून दूर होतं. शिवाय, ब्रह्माबादचा मोठा भाग मंसुरामध्ये दाखल झाला होता आणि त्याच्या शेजारी महफूजा वसवण्यात आलं, असं ते सांगतात.

ऐतिहासिक पुराव्यांवरून लक्षात येतं की, ब्राह्मणाबाद आणि मंसुरा ही एकाच शहराची दोन नावं आहेत. यजीद अल-कल्बी याच्या काळात सिंधची राजधानी अलवरहून मंसुराकडे स्थलांतरित झाली, असं सिंधमधील इतिहासकार एम.एच. पनहूर लिहितात.
सन 961 मध्ये सिंधला जाऊन आलेले बशारी अल मुकद्दसी यांनी 'एहसन अल-तकसमी मारीफ अल-कलीम'मध्ये लिहिल्यानुसार, मंसुरा एक किलोमीटर लाब आणि दोन किलोमीटर रुंद शहर होतं, त्याच्या चारही बाजूंनी नदी वाहत होती आणि त्याला चार प्रवेशद्वारं होती.
मंसुराचं क्षेत्रफळ दमास्कसइतकं होतं. माती आणि लाकडांनी बनवलेली घरं होती. परंतु, जामा मशीद दगडांनी आणि विटांनी बनवलेली होती. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेली मोठी इमारतही अशीच आहे, असं ते सांगतात.
मोहम्मद गझनीचा हल्ला?
ब्राह्मणाबादवर मोहम्मद गझनीनेही हल्ला केला होता. सोमनाथ मंदिरावरील हल्ल्यानंतर मोहम्मद गझनीने मंसुरावर हल्ला चढवला, असं एम. एच. पनहूर लिहितात.
तेव्हा इथे खफीफ सुमरू याची सत्ता होती. तो हल्ल्याआधीच पळून गेला. इथे बऱ्याच मोठ्या प्रमाणात नरसंहार झाला आणि शहराचा काही भाग जाळण्यात आला.

पनहूर लिहितात त्यानुसार, मोहम्मद गझनीचे दरबारी शायर फरखी यांनी दहा ओळींच्या एका वेच्यामध्ये या हिंसाचारासंबंधी उल्लेख केला आहे. खफीफच्या खजुराच्या बागेत लपून बसलेले लोक, नदीत उडी मारून जीव देणारे लोक आणि नरसंहार, इत्यादींचा उल्लेख या ओळींमध्ये येतो.
हेन्री कॅनिज यांचा संदर्भ देऊन पनहूर लिहितात की, या गल्ल्यांमध्ये नाणी ज्या तऱ्हेने पडलेली मिळाली, त्यानुसार इथे लूटमार झाल्याचं सूचित होतं.
काही इतिहासकारांच्या म्हणण्यानुसार, भारतातील सध्याच्या गुजरातमधील सोमनाथवर हल्ला करून मोहम्मद गझनी परत मंसुरामध्ये आला होता आणि तिथे हल्ला करून झाल्यावर त्याने मुल्तानवर हल्ला चढवला. परंतु, एम. एच. पनहूर यांना हे मान्य नाही.
शिया आंदोलनाचे उद्गाते उपदेशक अल-अश्तर मंसुरामध्ये पहिल्यांदा पोहोचले. त्यावेळी अबू जाफर मंसूर अब्बासी खिलाफतचा काळ सुरू होता आणि उमर बिन हफ्स मंसुराचा प्रधान होता, असं डॉक्टर गुलाम अली अलाना लिहितात.
तो सआदातचा समर्थक होता, त्यानुसार त्याने त्याला निमंत्रितही केलं. त्याने शहरातील प्रभावशाली लोकांना एकत्र बोलावून खिलाफतीची घोषणा केली, पण ही बातमी बगदादपर्यंत पोहोचली आणि अल-अश्तरला पळून जावं लागलं.
ब्राह्मणाबादचं नामकरण मंसुरा असं कसं झालं?
बेलासस आणि रिचर्डसन यांनी इथे खोदकाम केलं होतं, त्यांच्या म्हणण्यानुसार, भूकंपामुळे हे शहर उद्ध्वस्त झालं होतं.
शाह अब्दुल लतीफ विद्यापीठातील पुरातत्त्व विभागाचे प्रमुख गुलाम मोहिउद्दीन तिथे भूकंप झाल्याचा सिद्धान्त नाकारतात.
ते म्हणतात, "तिथल्या भिंती धडधाकट होत्या आणि कुठेच त्या पडायला आलेल्या नव्हत्या." शिवाय, शहरावर हल्ला होऊन काही ठिकाणी आग लावण्यात आली होती, हे अनुमानदेखील त्यांना पटत नाही. "इथे आगीच्या खुणा किंवा जळालेली लाकडं, असं काहीच मिळालेलं नाही," असं ते म्हणतात.
ऐतिहासिक नोंदींनुसार हे स्पष्ट होतं की, हाकरा नदी सुकून गेली आणि सिंधू नदीने प्रवाहाची दिशा बदलली, हा बदल इथे दहाव्या शतकात झाला, हे ऐतिहासिक नोंदींवरून स्पष्ट होतं, असं एम.एच. पनहूर यांचं म्हणणं आहे.
सिंधू नदीने स्वतःच्या प्रवाहाची दिशा बदलली असणं शक्य आहे, आणि त्याचा परिणाम इथल्या प्रवासावर व सुविधांवर झाला, असं डॉक्टर वीसरही म्हणतात.
त्यांच्या म्हणण्यानुसार, इथे सापडणाऱ्या इमारतीची रचना नाही. आधी राहणाऱ्यांच्या इमारतींचे हे सांगाडे आहेत. नंतर घर उभारलेल्यांनी पुन्हा विटांचा वापर सुरू केला. मोहनजोदाडोमध्येही असंच घडलं होतं.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)








