भारत-पाकिस्तान फाळणीच्या निर्वासितांसाठी शहर वसवणाऱ्या कमलादेवी

फोटो स्रोत, BBC/GOPALSHUNYA
- Author, सुशीला सिंह
- Role, बीबीसी हिंदी प्रतिनिधी
बीबीसी घेऊन आलंय एक खास सीरिज 'सावित्रीच्या सोबतिणी'त्या महिलांच्या आयुष्यावर प्रकाश टाकायला ज्यांनी लोकशाही, मानवी हक्क आणि महिला सबलीकरण यासाठी मोठं काम केलं, पण ज्यांच्याविषयी आजही फारशी माहिती नाही.
'सावित्रीच्या सोबतिणी'हे खास नाव यासाठी कारण जसं सावित्रीबाई फुले यांनी महिलांना शिक्षणाची दारं उघडी करून दिली तसंच या सगळ्या स्त्रियांनी भारतातल्या महिलांच्या हक्कांसाठी प्रयत्न केले,लढा दिला. म्हणूनच या महिला, काही सावित्रीबाईंच्या काळाच्या आधीच्या तर काही नंतरच्या पण सर्वार्थाने 'सावित्रीच्या सोबतिणी'.

सन 1930 ची गोष्ट आहे. कमलादेवी चट्टोपाध्याय तेव्हा 27 वर्षांच्या होत्या. त्यांना बातमी कळाली की, गांधीजी दांडी यात्रेव्दारे मिठाच्या सत्याग्रहाची सुरुवात करणार आहेत. त्यानंतर देशभरातल्या समुद्रकिनाऱ्यांवर मीठ बनवलं जाईल, पण महिला या आंदोलनात सहभागी होणार नाहीत कारण गांधीजींनी या आंदोलनात महिलांची भूमिका चरखा चालवणं आणि दारूच्या दुकानांची घेराबंदी करणं इतकीच मर्यादित ठेवली होती. कमलादेवींना ही बाब खटकली.
त्यांच्या 'इनर रिसेस, आऊटर स्पेसेस' या आत्मचरित्रात कमसादेवींनी या गोष्टीचा उल्लेख केला आहे. त्या लिहितात, "मला वाटलं की महिलांनाही मिठाच्या सत्याग्रहात सहभागी होण्याची संधी मिळाली पाहिजे आणि मी थेट महात्मा गांधीशी चर्चा करण्याचं ठरवलं."
गांधीजी तेव्हा प्रवास करत होते, त्यामुळे कमलादेवी त्या ट्रेनमध्ये पोहचल्या आणि गांधीजींना भेटल्या. ही भेट खरतंर छोटी होती पण इतिहास बदलवणारी ठरली. सुरुवातीला गांधीजींनी महिलांनी या सत्याग्रहात सहभागी होऊ नये ही गोष्ट कमलादेवींच्या गळी उतरवण्याचा प्रयत्न केला, पण कमलादेवींचा युक्तिवाद ऐकून त्यांनी महिलांना या सत्याग्रहापासून लांब ठेवण्याचा आपला निर्णय बदलला आणि महिला तसंच पुरुष बरोबरीने या सत्याग्रहात सहभागी होतील याची ग्वाही दिली. महात्मा गांधींचा हा निर्णय ऐतिहासिक ठरला.
या निर्णयानंतर महात्मा गांधींनी मिठाच्या सत्याग्रहासाठी दांडी यात्रा केली आणि मुंबईमध्ये या सत्याग्रहाचं नेतृत्व करण्यासाठी सात सदस्यांची टीम बनवली, यात कमलादेवी आणि अवंतिकाबाई गोखले यांचा समावेश होता.
महिलांच्या दृष्टीने महत्त्वाचं पाऊल
या निर्णयानंतर महात्मा गांधींनी मिठाच्या सत्याग्रहासाठी दांडी यात्रा केली आणि मुंबईमध्ये या सत्याग्रहाचं नेतृत्व करण्यासाठी सात सदस्यांची टीम बनवली, यात कमलादेवी आणि अवंतिकाबाई गोखले यांचा समावेश होता.
या मालिकेतील इतर महिलांविषयी तुम्ही या ठिकाणी वाचू शकता

- रुकैया हुसैन : मुस्लीम मुलींच्या शिक्षणासाठी संघर्ष करणारी महिला
- आसाममधील पडद्याची प्रथा मोडून काढणारी रणरागिणी चंद्रप्रभा सैकियानी
- मुथुलक्ष्मी रेड्डी - बालविवाह, देवदासी प्रथेविरोधात लढा देणारी पहिली महिला
- 'मर्जीविरूद्ध झालेलं लग्न मला मान्य नाही, वाटल्यास जेलमध्ये जाईन'
- भारत-पाकिस्तान फाळणीनंतर शेकडो जणांचे पुनर्वसन करणाऱ्या इंदरजीत कौर
- सरकारी नोकरीत महिलांना आरक्षण मिळण्यासाठी लढा देणाऱ्या पहिल्या महिला न्यायाधीश
- सुगरा हुमायूँ मिर्झा यांनी बुरखा न वापरण्याचा निर्णय का घेतला?
- सरकारी नोकरीत महिलांना आरक्षण मिळण्यासाठी लढा देणाऱ्या पहिल्या महिला न्यायाधीश

न्यूयॉर्क विद्यापीठाच्या प्रोफेसर आणि महिलांसाठी काम करणाऱ्या सामाजिक संस्थेच्या संस्थापक रूचिरा गुप्तांच्या मते, "या घटनेने स्वातंत्र्य लढ्यात महिलांचा सहभाग लक्षणीयरित्या वाढला. त्यानंतर काँग्रेस पक्षात, राजकारणात आणि स्वातंत्र्यानंतरही महिलांचं योगदान उल्लेखनीय ठरलं."
मिठाच्या सत्याग्रहादरम्यान घडलेले कमलादेवींचे अनेक किस्से सांगितले जातात. पोलिसांशी संघर्ष करणाऱ्या कमलादेवींनी मिठाची पाकिटं बनवायला सुरुवात केली. एक दिवशी त्या मुंबई स्टॉक एक्सचेंजमध्ये दाखल झाल्या आणि तिथे या मिठाच्या पाकिटांचा लिलाव केला. कमलादेवींच्या निडर व्यक्तिमत्वामागे त्यांच्या आई आणि आजीची प्रेरणा होती.

फोटो स्रोत, BBC/GOPALSHUNYA
बालविवाह, वैधव्य आणि पुर्नविवाह
त्यांचा जन्म मंगळूरमध्ये एका गौड सारस्वत कुटुंबात झाला होता. त्यांचे वडील अनंतथैया धारेश्वर कलेक्टर होते आणि उदारमतवादी विचारांचे होते. पण कमलादेवींच्या लहानपणीच त्यांचा मृत्यू झाला. कमलादेवींच्या आईने कुटुंबाची सगळी जबाबदारी हाती घेतली. त्या काळात मुली शाळेत जात नव्हत्या, पण कमलादेवींच्या आई, गिरिजादेवींनी आपल्या मुलीला शिकवण्यासाठी घरी शिक्षक येतील अशी व्यवस्था केली.
पतीच्या मृत्यूनंतर सामाजिक दडपणाखाली गिरिजादेवींनी आपल्या मुलीचं लग्न वयाच्या 11 वर्षीच लावून दिलं. यानंतर दीड वर्षातच कमलादेवींच्या पतीचा मृत्यू झाला आणि त्या बालविधवा झाल्या. कमलादेवींच्या आईने भले त्या काळच्या चालीरितींप्रमाणे आपल्या मुलीचं लग्न लहान वयातच लावून दिलं होतं, पण त्यांनी आपल्या बालविधवा मुलीचं मुंडन करायला, तिला पांढरी साडी नेसून वैधव्याचं आयुष्य जगण्यास भाग पाडायला नकार दिला. इतकंच नाही तर गिरिजादेवींनी आपल्या मुलीला शाळेत जाण्याचा रस्ताही खुला करून दिला.

फोटो स्रोत, BBC/GOPALSHUNYA
गिरिजादेवी पंडिता रमाबाई आणि रमाबाई रानडेंच्या समर्थक होत्या. त्यांनी अॅनी बेझंट यांना कमलादेवींसमोर एक रोल मॉडेल म्हणून सादर केलं. या कर्तृत्ववान महिलांकडून कमलादेवी अनेक गोष्टी शिकल्या. चेन्नईतल्या क्वीन्स कॉलेजमध्ये शिकताना त्यांची भेट सरोजिनी नायडूंचे भाऊ हरिन्द्रनाथ चट्टोपाध्याय यांच्याशी झाली. हरिन्द्रनाथ त्या काळातले प्रसिद्ध कवी आणि नाटककार होते.
वयाच्या विसाव्या वर्षी कमलादेवींनी हरिन्द्रनाथ यांच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्याकाळी प्रतिगामी लोकांनी या लग्नावरून मोठा गहजब केला. कारण कमलादेवी बालविधवा होत्या. पुढे जेव्हा त्यांनी हरिन्द्रनाथ यांच्याशी घटस्फोट घ्यायचं ठरवलं तेव्हाही त्यांच्यावर बरीच टीका झाली. पण या सगळ्या टीकेला भीक न घालता कमलादेवींनी तत्कालिन महिलांपुढे निर्णयस्वातंत्र्याचं उदाहरण ठेवलं.
जेव्हा महिलांनी चित्रपटात काम करण्याला समाजमान्यता नव्हती, त्या काळात कमलादेवींनी कानडी भाषेतला पहिल्या 'मृच्छकटिक' नावाच्या मूकपटात भूमिका केली होता. हिंदी चित्रपट 'तानसेन' (1943), 'शंकर पार्वती' (1943) आणि 'धन्ना भगत' (1945) या चित्रपटांमध्येही भूमिका केल्या. पण याआधी त्या गांधीजींच्या विचारांनी प्रभावित झाल्या होत्या.
आंदोलनातला सहभाग
सन 1923 च्या सुमारास जेव्हा गांधीजींनी असहकार आंदोलनाची सुरुवात केली तेव्हा कमलादेवी आपल्या पतीसोबत लंडनमध्ये राहात होत्या. त्यांनी या आंदोलनासाठी भारतात परत येण्याचा निर्णय घेतला. सन 1926 मध्ये त्यांची भेट मार्गरेट कझिन्स यांच्याशी झाली. मार्गरेट आर्यलंडच्या स्त्रीवादी नेत्या होत्या. त्यांनी ऑल इंडिया विमेन्स कॉन्फरन्सची स्थापना केली आणि कमलादेवी या संस्थेच्या पहिल्या महासचिव बनल्या.
मार्गरेट कझिन्स यांनी प्रोत्साहन दिल्यामुळे कमलादेवींनी आणखी एक पाऊल उचललं. त्यांनी सन 1926 मध्ये मद्रास प्रोव्हिन्शिअल लेजिस्लेचरची (आजच्या विधानसभा निवडणुकांच्या समकक्ष) निवडणूक लढवली. या निवडणुकीत पहिल्यांदाच महिलांना उमेदवार म्हणून उभं राहाण्याची संधी मिळत होती.
लेखिका रिना नंदा आपल्या 'कमलादेवी चट्टोपाध्याय, अ बायोग्राफी' या पुस्तकात लिहितात की, 'या निवडणुकीची तयारी करायला कमलादेवींकडे फारच कमी वेळ शिल्लक होता. त्याची मतदार म्हणून नोंदणीही झाली नव्हती. या निवडणुकीची तयारी फारच घाईघाईत केली गेली. मार्गरेट कझिन्स यांनी महिला कार्यकर्त्यांचे गट बनवले आणि मोठ्या जोशात कमलादेवींचा प्रचार करायला सुरुवात केली.'

फोटो स्रोत, BBC/GOPALSHUNYA
अगदी शेवटच्या क्षणी निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या कमलादेवींचा फार कमी मतांनी पराभव झाला. पण तरीही त्या निवडणूक लढवणारी भारतातली पहिली महिला ठरल्या. याच्या या कृतीमुळे भारतातल्या महिलांचा राजकारणात प्रवेश करण्याचा मार्ग सुकर झाला.
पण कमलादेवींना मात्र कोणत्याही राजकीय पदाची कधीच अपेक्षा नव्हती. सन 1927-28 मध्ये त्या ऑल इंडिया काँग्रेसच्या सदस्य बनल्या. त्यांनी बालविवाह विरोधी कायदा, संमतीवयाचा कायदा आणि संस्थानांमध्ये होणारी आंदोलनं यावर काँग्रेसची धोरणं ठरवण्याबाबत महत्त्वाची भूमिका बजावली.
स्वातंत्र्यानंतर त्यांनी कोणतंही राजकीय पद स्वीकारायला नकार दिला. तत्कालीन मद्रास प्रांताचे मुख्यमंत्री के कामराज यांची इच्छा होती की, कमलादेवींनी राज्यपाल बनावं. तसा प्रस्ताव त्यांनी नेहरूंसमोर मांडला. पण नेहरू म्हणाले की, तुम्ही कमलादेवींना विचारा, त्या हो म्हणाल्या तर मग प्रश्नच नाही. यावरून कामराज समजले की कमलादेवींना कोणतंही राजकीय पद नकोय.
स्वातंत्र्यानंतर कमलादेवींनी आपलं लक्ष निर्वासितांच्या पुनर्वसनावर केंद्रीत केलं. सहकार चळवळीवर त्यांचा खूप विश्वास होता. त्यांनी इंडियन को-ऑपरेटिव्ह युनियनची स्थापना केली. कमलादेवींनी लोकसहभागातून निर्वासितांसाठी एक खास शहर वसवण्याचा प्लॅन नेहरूंसमोर ठेवला.

फोटो स्रोत, BBC/GOPALSHUNYA
सरकार या शहरासाठी कोणतंही आर्थिक सहाय्य करणार नाही या एका अटीवर जवाहरलाल नेहरूंनी हा प्लॅन स्वीकारला. कमलादेवींनी इंडियन को-ऑपरेटिव्ह युनियनच्या मार्फत भारत-पाकिस्तान फाळणीनंतर भारतात आलेल्या निर्वासितांचं दिल्लीजवळ पुर्नवसन केलं. आज ती जागा फरिदाबाद म्हणून ओळखली जाते.
1950 नंतर कमलादेवींनी आपलं लक्ष भारतीय लोकपरंपरा आणि शास्त्रीय कलांना पुनर्जीवित करण्यावर केंद्रीत केलं. भारतातल्या स्थानिक विणकाम, भरतकाम, कपडाउद्योग, लघूउद्योग यांना चालना देण्यासाठी त्यांनी सेंट्रल कॉटेज इंडस्ट्रीज एम्पोरियम आणि क्राफ्ट्स काउन्सिल ऑफ इंडियाची स्थापना केली.
भारतीय नाट्यपरंपरा आणि इतर लोककलांना वाव देण्यासाठी त्यांनी इंडियन नॅशनल थिएटरची स्थापना केली. पुढे जाऊन याचंच रुपांतर नॅशलन स्कूल ऑफ ड्रामामध्ये झालं. कमलादेवींच्या प्रयत्नांनी संगीत नाटक अकॅडमीची स्थापना झाली. ही संस्था पुढे जाऊन भारतीय गायन तसंच संगीताला पुढे नेणारी अग्रणी संस्था ठरली.
कमलादेवींच्या कार्याचा सन्मान भारताचे सर्वोच्च नागरी सन्मान पद्मभूषण तसंच पद्मविभूषण देऊन करण्यात आला. याशिवाय त्यांना रेमन मॅगसेसे पुरस्कारानेही गौरवण्यात आलं. 29 ऑक्टोबर 1988ला त्यांचं निधन झालं. पम कमलादेवींनी जो वारसा भारतीय महिलांसाठी ठेवलाय, तो विसरणं अशक्य आहे.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)









