कोरोना व्हायरस: कोव्हिडमधून बरं झाल्यावरही काळजी घेणं का गरजेचं आहे?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, मयांक भागवत
- Role, बीबीसी मराठी
आतापर्यंत भारतात लाखो लोकांनी कोव्हिड-19 वर यशस्वीरित्या मात केली आहे. योग्यवेळी निदान, औषधोपचार आणि सकारात्मक दृष्टिकोनाच्या बळावर लोकांनी कोरोनावर विजय मिळवलाय.
कोव्हिड-19 विरोधातील युद्ध जिंकल्यानंतर, खरी लढाई सुरू होते पूर्ववत आयुष्य जगण्याची. पुन्हा नव्या उमेदीने उभं राहण्याची. म्हणूनच शारीरिक आरोग्यासोबत मानसिक आरोग्य चांगलं ठेवणं महत्त्वाचं आहे.
ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरवर अधिक काळ राहून कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांच्या फुफ्फुसांना इजा होण्याची प्रकरणं वाढली आहेत. या रुग्णांना दम लागणे, श्वास घेण्यास अडथळा यांसारखे त्रास सुरू झाले आहेत. त्यामुळे मुंबईतील काही कोव्हिडमुक्त रुग्णांना पुन्हा ऑक्सिजनवर ठेवावं लागलं होतं.
डॉक्टरांच्या मते, कोरोनामुक्त झालो म्हणजे गाफिल राहून चालणार नाही. कोरोनामुक्त झालेल्यांनी स्वत:ची विशेष काळजी घेतली पाहिजे.
कोव्हिडमुक्त रुग्णांनी काय काळजी घ्यावी?
जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, रुग्णालयात राहिल्यानंतर श्वास घेण्यास अडथळा निर्माण होणं आणि आजारामुळे शरीरातील ताकद कमी होणं साहजिक आहे. त्यामुळे श्वास घ्यायला खूप त्रास होतो.
त्यामुळे खालील गोष्टी करणं आवश्यक आहे-
1) झोपताना डाव्या कुशीवर झोपावं. डोकं आणि मानेला आधारासाठी डोक्याखाली उशी घ्यावी. पाय गुडघ्यातून थोडे दुमडून घ्यावेत.
2) टेबलवर बसून काम करत असताना श्वास घेण्यास त्रास झाला, तर कमरेतून पुढे वाकून डोकं आणि मान टेबलवर ठेवलेल्या उशीवर ठेवावेत. हात टेबलवर आरामात ठेवावेत. उशी घेतली नाही तरी चालेल.
3) खुर्चीवर बसल्यावर त्रास झाल्यास, थोडं पुढे वाकावं आणि हात मांड्यांवर ठेवावेत
श्वास कसा घ्यावा?
एका ठिकाणी शांत बसावं. एक हात छातीवर आणि दुसरा पोटावर ठेवून डोळे बंद करून शांत बसावं. हळूवर नाकाने श्वास घ्यावा आणि तोंडाने सोडावा. नाकाने श्वास घेण्यास अडथळा होत असेल तर तोंडाने श्वास घ्यावा. शक्यतो श्वास हळूवार घेण्याचा प्रयत्न करावा.

फोटो स्रोत, EPA/IAN LANGSDON
रुग्णालयातून घरी आल्यानंतर करण्याचे व्यायाम
व्यायामामुळे श्वास घेण्यास होणारा अडथळा कमी होतो. स्नायू मजबूत होण्यास मदत होते. मानसिक ताण कमी होतो. आत्मविश्वास वाढतो. रुग्णालयात ऑक्सिजनवर ठेवण्यात आलं असेल, तर व्यायाम करताना कोणालातरी सोबत ठेवावं. व्यायाम करताना त्रास झाला तर तात्काळ डॉक्टरांना माहिती द्यावी.
सोपे व्यायाम - खांदे पुढे-मागे रोल करावेत. उभं राहून किंवा खुर्चीवर बसून डाव्या आणि उजव्या बाजूस थोडं वाकावं. पाय गुडघ्यात वाकवून उचलण्याचा प्रयत्न करावा. याला 'वॉर्मअप' असं म्हणतात.
थोडे कठीण व्यायाम- जागच्या जागी चालण्याचा प्रयत्न करावा. बाहेर चालताना शक्यतो सपाट जमीन असेल त्याठिकाणी चालावं. हळूहळू चालण्याचा वेग आणि अंतर वाढवावं.

फोटो स्रोत, PA Media
रुग्णालयांमध्ये पोस्ट-कोव्हिड ओपीडी
दीर्घकाळ ऑक्सिजन आणि व्हेन्टिलेटरवर राहून कोव्हिड-19 मुक्त झालेल्या रुग्णांमध्ये फुफ्फुसांचे आजार होण्याचं प्रमाण वाढलं आहे. अशा रुग्णांसाठी मुंबईतील केईएम, फोर्टिस, सेंट जॉर्ज आणि इतर रुग्णालयात पोस्ट-कोव्हिड ओपीडी सुरु करण्यात आलीये.
कोव्हिडमुक्त झालेल्यांनी काय काळजी घ्यावी याबाबत बीबीसीशी बोलताना सेंट जॉर्ज रुग्णालयाचे जनरल फिजिशिअन डॉ. राहुल दारनुले सांगतात, "कोरोना व्हायरसमुळे फुफ्फुसांची कार्यक्षमता कमी होते. त्यामुळे कोव्हिडमुक्त रुग्णांच्या फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी ब्रिदिंग एक्सरसाइज, प्राणायाम, शॉर्ट ब्रिस्क वॉकिंग फार महत्त्वाचं आहे. रुग्णालयातून घरी गेल्यानंतर सेल्फ मॉनिटरिंग वेळोवेळी करणं गरजेचं आहे. चालताना, काम करताना श्वास घेण्यास अडथळा निर्माण झाला तर त्वरित डॉक्टरांशी संपर्क करावा."
कोरोनामुक्त झालेल्यांमध्ये फुफ्फुसांना स्कारिंग (इजा) होण्याचं प्रमाण वाढलंय. त्यामुळे या पुढे कोरोनासोबत बरे झाल्यानंतर फुफ्फुसांना इजा झालेल्या रुग्णांसाठी पुनर्वसन कार्यक्रम फार महत्त्वाचा असल्याचं डॉ. राहुल यांचं मत आहे.

फोटो स्रोत, EPA
"सेंट जॉर्ज रुग्णालयात पोस्ट कोव्हिड ओपीडी सुरू करण्यात आली आहे. या ओपीडीत रुग्णांना फॉलोअपसाठी बोलावून त्यांच्या छातीचं सीटी-स्कॅन करण्यात येतं. त्यांना श्वास घेण्याचे व्यायाम शिकवले जातात आणि घरी गेल्यानंतर हे व्यायाम रोज करण्यासाठी रुग्णांना सांगण्यात येतं," असं डॉ. राहुल पुढे म्हणाले.
कोव्हिडमुक्त झाल्यावरही शक्यतो बाहेर पडू नये
बीबीसीशी बोलताना मुंबईच्या झेन मल्टिस्पेशालिटी रुग्णालयाचे छातीरोग आणि फुफ्फुसविकार तज्ज्ञ डॉ. अरविंद काटे यांनी म्हटलं, "कोव्हिडमुक्त झालेल्या रुग्णांनी घरी गेल्यानंतरही काळजी घेणं महत्त्वाचं आहे. कोरोनामुक्त रुग्णांना पुन्हा संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशी प्रकरणं समोर आली आहेत. त्यामुळे बरे झालेल्यांनी शक्यतो घराबाहेर पडणं टाळावं. नियमित श्वसानाचे व्यायाम करावेत. योग अत्यंत फायदेशीर ठरू शकतो. त्याशिवाय व्हिटॅमीन-सीच्या गोळ्या घेणं गरजेच आहे."

"जेवताना गरम पाणी प्यावं. पौष्टिक आहार घ्यावा. शरीरातील ऑक्सिजनची पातळी नियमित तपासावी. कुठलाही त्रास जाणवल्यास तात्काळ डॉक्टरांशी संपर्क करावा," असं डॉ. काटे यांनी म्हटलं.
कोव्हिड-19 आणि परिणाम
कोरोनामुक्त झालेल्यांसाठी पुनर्वसनाच्या महत्त्वाबाबत बीबीसीशी बोलताना फोर्टिस हॉस्पिटल, मुलुंडच्या क्रिटिकल-केअर विभागाचे संचालक आणि महाराष्ट्राच्या कोव्हिड टास्कफोर्सचे सदस्य डॉ. राहुल पंडित म्हणतात, ''कोविड-19 शी झुंज दिलेल्या रुग्णांमध्ये व्यायामाचा ताण सहन न होणे, झोपेचं वेळापत्रक बिघडणे, स्नायूंची हानी, भूक न लागणे असे लक्षणीय बदल आढळून आले आहे. नैराश्य, निद्रानाश यासारखे न्यूरोसायकियॅट्रिक परिणाम गंभीर आहेत."
"आधीपासून असलेल्या आजारांच पुनर्मूल्यांकन फार महत्त्वाचं आहे. कोव्हिड-19 होण्यापूर्वी या आजारांची तीव्रता काय होती आणि कोव्हिड-19 नंतर त्यावर काय परिणाम झाला. उदाहरणार्थ-एखाद्या मधुमेही व्यक्तीला कोव्हिड होण्याआधी 'क्ष' मात्रेमध्ये इन्सुलिनची गरज होती, पण त्याला आता तेच इन्सुलिन अधिक किंवा उण्या मात्रेमध्ये आवश्यक असू शकेल, हीच गोष्ट उच्च रक्तदाबालाही लागू आहे. यावर लक्ष ठेवणं गरजेचं आहे." असं डॉ. पंडीत म्हणाले.
स्ट्रेस, चिंता आणि डिप्रेशन कसं करावं दूर
तज्ज्ञांच्या माहितीप्रमाणे, रुग्ण कोव्हिडमुक्त झाला तरी त्याला सतत भीती वाटत राहते. समाज काय म्हणेल, कशी वागणूक देईल याचा स्ट्रेस त्या व्यक्तीवर खूप जास्त असतो. त्यामुळे शारीरीक आरोग्याप्रमाणे मानसिक आरोग्याकडेही लोकांनी लक्ष द्यायला हवं.

फोटो स्रोत, Getty Images
याबाबत बीबीसीशी बोलताना मानसोपचारतज्ज्ञ डॉ. सागर मुंदडा म्हणतात, "अनेकवेळा कोव्हिडमुक्त झालेल्या रुग्णाला समाजाकडून चुकीची वागणूक मिळाल्यामुळे मानसिक धक्का बसतो. रागाची भावना निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे कोरोनामुक्त रुग्णांनी सकारात्मक विचार केला पाहिजे. लोकं बोलतील याची मानसिक तयारी केली पाहिजे. माझं चुकलं नाहीये, लोकं भीतीपोटी असं बोलतात हा विचार केला पाहिजे. ही मानसिक तयारी असली तर पोस्ट कोव्हिड केअर फार कठिण नाही."
"कोव्हिडनंतर बहुधा रुग्ण घरी एकटेच असतात. अशावेळी मनात उलटे-सुलटे विचार येतात. त्यामुळे लोकांनी 10 मिनिटं माइंडफुल मेडिटेशन करावं. यामुळे मानसिक खच्चीकरण होणार नाही. काही रुग्णांना झोप येत नाही, सतत बेचैनी असते, दिवसभर मनात विचार येत असतात. अशावेळी डॉक्टरांना जावून भेटावं. औषधांनी ही चिंता दूर होण्यास मदत होईल," असं डॉ. मुंदडा म्हणतात.
मानसिक आरोग्य कसं चांगलं ठेवावं?
जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार आजारानंतरचा स्ट्रेस, चिंता आणि डिप्रेशन मॅनेज करणं हा देखील आजारातून बरं झाल्यानंतर पुन्हा उभं राहण्यासाठी महत्त्वाचा टप्पा आहे. यासाठी,
कोव्हिडमुक्त रुग्णांनी पुरेशी झोप घ्यावी. सकस, योग्य आणि पौष्टीक आहार घ्यावा. अॅक्टिव्ह राहावं ज्यामुळे स्ट्रेस कमी होण्यास मदत होते. लोकांशी बोलावं, मन शांत होण्यासाठी गाणी ऐकावीत, वाचन करावं.
ब्रेन एक्सरसाइज करावेत जेणेकरून स्मृती वाढवण्यास मदत होईल.
कोव्हिडनंतर फिजिओथेरपीचं महत्त्वं
कोव्हिड-19 संसर्गामुळे काही व्यक्ती खासकरून वयोवृद्ध लोकांची हालचाल कमी होते. अशा रुग्णांच्या पुनर्वसनात फिजीओथेरपी फार महत्त्वाची ठरते.
याबाबत बीबीसीशी बोलताना पुण्यातील फिजिओथेरपीस्ट डॉ. मानसी पवार सांगतात, "दीर्घकाळ व्हॅन्टिलेटर किंवा ऑक्सिजनवर राहून कोव्हिड-19 मुक्त झालेल्या रुग्णांसाठी चेस्ट फिजिओथेरपी ही फार महत्त्वाची ठरते. या रुग्णांची आजारात हालचाल फार कमी झाल्याने बरं झाल्यांनंतर लगेचच व्यायाम करता येत नाही. चेस्ट फिजीओथेरपीने फुफ्फुसं क्लिअर होण्यास मदत होते. फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढते. फिजिओथेरपीने स्नायू हळूहळू मजबूत होतात."
"त्यामुळे कोव्हिड-19 मुक्त रुग्णांनी आधी श्वसनाचे व्यायाम करावेत. फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढल्यानंतर हळूहळू व्यायाम सुरू करावा. पण, व्यायाम करताना कोणालातरी सोबत घ्यावं किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्यावा," असं डॉ. मानसी सांगतात.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








