कोरोना : होम क्वारंटाईन म्हणजे काय? कोरोना व्हायरसची लागण इतरांना होऊ नये म्हणून काय काळजी घ्यायची?

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, अमृता दुर्वे
    • Role, बीबीसी मराठी

कोरोनाची लक्षणं नसलेल्या आणि सौम्य लक्षणं असलेल्या रुग्णांना घरातच राहून संसर्ग जाईपर्यंत विलगीकरणात जाण्याची संधी 'होम क्वारंटाईन' मुळे मिळते. राज्य सरकार वेळोवेळी राज्यातल्या रुग्णस्थितीनुसार यासाठीच्या मार्गदर्शक सूचना जाहीर करतं.

होम क्वारंटाईन म्हणजे नक्की काय? आणि होम क्वारंटाईन झाल्यावर काय काळजी घ्यायची? हा प्रश्न प्रत्येकाला पडलाय. या प्रश्नांचीच उत्तरं जाणून घेऊयात.

'क्वारंटाईन' शब्द आला कुठून?

14व्या शतकात जगात अनेक ठिकाणी प्लेगची साथ होती. या काळात व्हेनिस शहराच्या बंदरात अनेक बोटी जगभरातून दाखल होत. पण या जहाजांमधून 40 दिवस कोणीही बाहेर पडू शकत नसे.

बोटीवरच्या कोणालाही प्लेग किंवा दुसरा संसर्गजन्य आजार नाही, याची खात्री या 40 दिवसांत केली जाई आणि मगच खलाशांना उतरण्याची परवानगी मिळे.

'क्वारंटिना' या मूळ इटालियन शब्दाचा अर्थ होतो - 40, आणि त्यावरूनच आला शब्द 'क्वारंटाईन'. हाच शब्द सध्या सतत आपल्या कानावर पडतोय. कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांना क्वारंटाईन केलं जातंय.

यासाठी सरकारने ठिकठिकाणी क्वारंटाईन सेंटर्स उभारलेली आहेत. पण यासोबतच आता होम आयसोलेशन किंवा होम क्वारंटाईनचा म्हणजेच घरच्या घरीच अलगीकरण किंवा विलगीकरणाचा पर्याय सरकारने द्यायला सुरुवात केलीय.

व्हीडिओ कॅप्शन, कोरोना नियम: होम क्वारंटाईन होताना काय काळजी घ्यायची? । #सोपीगोष्ट 107

पण नेमकं कोणाला घरी क्वारंटाईन किंवा आयसोलेट केलं जातं? हे करताना काय काळजी घ्यायला हवी? जर कोणी होम क्वारंटाईन झालं तर त्यामुळे घरातल्या इतरांना काही धोका आहे का? याचबद्दल आपण जाणून घेणार आहोत.

क्वारंटाईन आणि आयसोलेशन म्हणजे नेमकं काय?

मराठीत 'क्वारंटाईन'ला विलगीकरण म्हणतात आणि आयसोलेशनला अलगीकरण म्हणतात. क्वारंटाईन अशा व्यक्तींना केलं जातंय जे कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेत आणि ज्यांच्यात सौम्य किंवा अति-सौम्य लक्षणं दिसतायत.

तर ज्यांचे रिपोर्ट्स पॉझिटिव्ह आलेले आहेत, ज्या रुग्णांमध्ये सौम्य लक्षणं आढळतायत किंवा अजिबात लक्षणं न आढळणाऱ्या म्हणजेच असिम्प्टोमॅटिक रुग्णांना आयसोलेशन म्हणजेच अलगीकरणात ठेवलं जातं.

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

या लोकांना वेगळं का ठेवलं जातं?

त्यांच्यापासून इतर कुणालाही कोरोना व्हायरसची लागण होऊ नये, म्हणून या लोकांना वेगळं ठेवलं जातं. हा संसर्गजन्य आजार आहे. बोलताना, शिंकताना, खोकताना उडणाऱ्या सूक्ष्म तुषारांतून तो पसरू शकतो. म्हणूनच या कोव्हिड संशयित किंवा बाधित व्यक्तीने वेगळं राहणं गरजेचं आहे.

एकीकडे रुग्णांची संख्या वाढत जातेय, पण दुसरीकडे केंद्र सरकारनं क्वारंटाईनचे नियम बदललेत. अति सौम्य लक्षणं आढळणाऱ्या वा लक्षणं नसणाऱ्या रुग्णांना जर त्यांच्या घरी आवश्यक त्या सुविधा असतील - म्हणजे वेगळी खोली, स्वतंत्र टॉयलेट तर त्यांच्या घरीच विलगीकरणाचा पर्याय देण्यात येतोय. यासाठी रुग्णाच्या संमतीची गरज असते आणि तुम्हाला एक प्रतिज्ञापत्रं भरून द्यावं लागतं.

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

महाराष्ट्र सरकारचे होम आयसोलेशनसाठीचे नियम

एसिम्प्टमॅटिक म्हणजे लक्षणं नसणाऱ्या रुग्णांना, कोणतीही सहव्याधी नसणाऱ्या पण कोरोनाची सौम्य लक्षणं असणाऱ्यांनाही घरीच आयसोलेट होता येईल.

रुग्णाला अतिसौम्य लक्षणं आहेत किंवा लक्षणंच दिसत नसल्याचं वैद्यकीयदृष्ट्या प्रमाणित असणं गरजेचं आहे.

वयाने ज्येष्ठ असणाऱ्या, सहव्याधी असणाऱ्या व्यक्तींना कोरोनाची लक्षणं दिसत नसली, तरी त्या व्यक्तीच्या फॅमिली डॉक्टरसोबत चर्चा केल्यानंतर होम आयसोलेशनबद्दल निर्णय घेण्यात येईल.

या रुग्णाची घरी रात्रं-दिवस काळजी घेणारी व्यक्ती असणं आवश्यक आहे. काळजी घेणारी व्यक्ती आणि उपचार करणारं रुग्णालय यांच्यामध्ये संपर्क व्यवस्था (दूरध्वनी, मोबाईल) असावी.

कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीला महापालिका वा आरोग्य यंत्रणा, IVR कडून येणाऱ्या फोनला उत्तर द्यावं लागेल.

काळजी घेणारी व्यक्ती आणि त्या कुटुंबातल्या सगळ्या निकट संपर्कातील व्यक्तींनी प्रोटोकॉलनुसार वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनची मात्रा घ्यावी. मोबाईलवर आरोग्य सेतू डाऊनलोड करणं आवश्यक आहे. घरी सर्वेक्षणासाठी येणाऱ्या पथकाला रुग्णाची माहिती देणं अनिवार्य आहे.

आयसोलेट होणाऱ्या व्यक्तीकडे पल्स ऑक्सिमीटर, थर्मामीटर, फेस मास्क, ग्लव्हज, सॅनिटायझर या गोष्टी असाव्या.

होम क्वारंटाईन असणाऱ्या व्यक्तीने काय करायचं?

  • पूर्णवेळ खोलीत एकटं राहणं शक्य नसेल, तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे घरातल्या ज्येष्ठ नागरिकांपासून, गर्भवती महिलांपासून, लहान मुलं आणि इतर व्याधी - comorbidities असणाऱ्या व्यक्तींपासून दूर रहा.
  • वैयक्तिक हायजीन - स्वच्छता पाळा, आणि औषधं वेळेवर घ्या. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतीही औषधं घेऊ नका.
  • घरातला तुमचा वावर मर्यादित ठेवा. घरात वावरताना मास्क वापरा.
  • चुकूनही लोकांमध्ये मिसळू नका, घराबाहेर पडू नका.
  • एका खोलीत एकटे रहात असाल, तर तुमचं रूटीन पाळण्याचा प्रयत्न करा. आणि मन गुंतवून ठेवा.

यानंतर पाहूया की होम क्वारंटाईन असलेल्या व्यक्तीची काळजी घेणाऱ्याने किंवा घरच्यांनी काय करणं अपेक्षित आहे. भारत सरकारच्या आरोग्य खात्यानं यासंदर्भात काही मार्गदर्शक तत्त्वं प्रसिद्ध केली आहेत.

ज्या रुग्णांच्या घरी कोणी काळजी घेणारं आहे, त्यांनाच हा होम आयसोलेशनचा पर्याय दिला जातोय. म्हणूनच या काळजी घेणाऱ्याची भूमिका महत्त्वाची आहे.

  • रुग्णाच्या वापराच्या सगळ्या गोष्टी वेगळ्या असाव्यात. अगदी त्यांचं जेवणाचं ताट - पेलाही वेगळा ठेवा.
  • रुग्णाचे कपडे, ताटं-पेले-कप, बेडशीट्स, टॉवेल वेगळे धुवा.
  • रुग्णाला जेवण देताना, खोली स्वच्छ करताना मास्क आणि ग्लोव्हज वापरा. एका वापरानंतर त्याची योग्य विल्हेवाट लावा.
  • कुटुंबातल्या एकाच व्यक्तीने या रुग्णाची काळजी घ्यावी.
  • रुग्णाला सौम्य लक्षणं आढळत असतील, तर लक्षणं वाढतायत का, यावर लक्ष असूद्या.
  • रुग्णाला श्वास घ्यायला त्रास होत असेल, छातीत दुखत असेल, शुद्ध हरपणं, चेहरा किंवा ओठ निळे पडणं, अशी लक्षणं दिसल्यास ताबडतोब वैद्यकीय मदत घ्या, हॉस्पिटल गाठा.
  • वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन घ्यायला सुरुवात करा.
  • रुग्ण असणारी खोली दररोज 1% सोडियम हायपोक्लोराईटच्या सोल्यूशनने साफ करावी, टॉयलेट आणि इतर पृष्ठभाग ब्लीचच्या सोल्यूशनने साफ करावेत.
प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

होम क्वारंटाईनध्ये नेमकं किती दिवस राहायचं?

लक्षणं दिसणं सुरू झाल्यापासून 17 दिवस आपण होम क्वारंटाईन पाळणं गरजेचं आहे. चाचणीसाठी नमुना ज्या दिवशी घेतला गेला, तिथून 17 दिवस मोजावेत आणि मग सलग 10 दिवस जर ताप नसेल तर त्या व्यक्तीला होम विलगीकरणातून मुक्त करण्यात येतं.

होम क्वारंटाईनचा कालावधी संपल्यानंतर पुन्हा चाचणी करण्याची आवश्यकता नाही, असं महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेल्या गाईडलाईन्समध्ये म्हटलंय.

हॉस्पिटलमध्ये कधी जायचं?

घरामध्ये आयसोलेशनमध्ये असलेल्या व्यक्तीच्या तब्येतीवर लक्ष ठेवावं. या व्यक्तीला त्रास होऊ लागल्यास तातडीने डॉक्टरांना संपर्क करावा.

या गोष्टी आढळल्यास डॉक्टरांना संपर्क करा :

  • श्वास घ्यायला त्रास
  • पल्स ऑक्सिमीटर - बोटाला लावून शरीरातली ऑक्सिजनची पातळी तपासण्याचं यंत्र जर 95 पेक्षा कमी पातळी दाखवत असल्यास
  • 24 तास 100.40 फॅरहाईट (38 C) पेक्षा जास्त ताप
  • 6 मिनिटं चालल्यानंतर थकवा येणं
  • छातीत सतत दुखणं वा दडपण आल्यासारखं वाटणं
  • चेहरा किंवा हाता-पायाच्या संवेदना जाणं
  • गोंधळल्यासारखं वाटणं, बोलताना त्रास होणं
  • चेहरा किंवा ओठांवर निळे चट्टे

मानसिक आरोग्य कसं जपायचं?

होम क्वारंटाईन किंवा आयसोलेशनच्या काळात रुग्ण घरीच असला, तरी त्याला आणि घरातल्या इतरांना मानसिक ताण येऊ शकतो, असं तज्ज्ञ सांगतात. मनात भीती निर्माण होऊ शकते, दडपण येऊ शकतं, मनात अनेक विचार येऊ शकतात. पण अशावेळी आपलं मानसिक संतुलन नीट ठेवणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे.

प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ. मनोज भाटवडेकर यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं, "या काळामध्ये मनःस्वास्थ टिकवायचं असेल, तर मनाला वर्तमानकाळात शक्य तितका वेळ ठेवणं महत्त्वाचं आहे.

यासाठी एक चांगला दिनक्रम आखावा, यात पुरेसा आहार, पुरेशी झोप, पुरेसा व्यायाम असावा. व्यायाम प्रतिकारशक्तीसाठी आवश्यक असतो. योग - ध्यान यासारख्या गोष्टी, छंदांची जोपासना, करमणूक - विरंगुळा यासाठी ठेवलेला काळ, आपल्या आवडत्या व्यक्तींशी फोनवरून वा समाजमाध्यमांवरून संवाद साधणं महत्त्वाचं आहे.

पण यासोबतच काही गोष्टी टाळल्या पाहिजेत. नकारात्मक बातम्या, नकारात्मक संदेश किंवा आपल्याला नको ते अनाहूत सल्ले देणारी मंडळी, या सगळ्यागोष्टी टाळायला हव्यात."

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

सगळीकडे पसरलेलं आजारपणं हे टेन्शन वाढवणारं आहे, हे खरंय. पण म्हणून भीतीपोटी कोरोनाच्या रुग्णांना आपल्याकडून चुकीची वागणूक दिली जाणार नाही ना, याची काळजीही आपण घेणं तितकंच महत्त्वाचं आहे.

याविषयी डॉ. मनोज भाटवडेकरांनी सांगितलं, "जी व्यक्ती कोव्हिड पॉझिटिव्ह आहे, ही त्या व्यक्तीची शारीरिक अवस्था आहे. ही अवस्था या व्यक्तीने मुद्दामून, हौसेने, आपणहून ओढवून घेतलेली नाही. आणि म्हणूनच या व्यक्तीवर कलंक ठेवणं, दोषारोप करणं, सापत्न वागणूक देणं हे चुकीचं आहे.

"पॉझिटिव्ह व्यक्तींच्या मनामध्ये भीती असते, चिंता असते, आपल्यामुळे इतरांना संसर्ग होऊ शकतो, यामुळे अपराध्याची भावना असते. अशावेळी या व्यक्तीला बोलतं करणं महत्त्वाचं आहे. त्याच्या मनातली भीती, चिंता, दुःख, अपराधाची बोचणी यांना वाचा फोडणं महत्त्वाचं आहे. त्या व्यक्तीशी संवाद सांधणं, तिचं ऐकून घेणं महत्त्वाचं आहे. धीर देणं महत्त्वाचं आहे.

"आपण सगळे एकत्र आहोत, आपण सगळे मिळून या परिस्थितीचा सामना करू, अशा प्रकारचा सूर संपूर्ण कुटुंबाने आणि मित्रमंडळींनी आळवणं महत्त्वाचं आहे."

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)