जगातल्या सर्वाधिक उंचीवरच्या एटीएमविषयी तुम्हाला माहितेय का?

फोटो स्रोत, Aysha Imtiaz
- Author, आयेशा इम्तियाझ
- Role, बीबीसी फ्युचर
मी माझ्या मुलांच्या अंगावर कपड्यांचे थर चढवत त्यांना सांगत होते की, "आता आपण पाकिस्तानच्या शेवटच्या टोकावर जाणार आहोत."
मग भूगोलाविषयी आम्हाला थोडं समजतं असा आव आणत माझी मुलं मला विचारतात "आपण वर जाणार आहोत की खाली"
मी लगेचच उत्तरले "वर, अगदी उंचावर"
पाकिस्तानच्या उत्तर गिलगिट-बाल्टिस्तान प्रांतातील चीन आणि पाकिस्तान यांच्या खुंजेरब पास सीमेवर एक एटीएम मशीन आहे. हे मशीन जगातील सर्वात उंचावर असणारं मशीन आहे. आम्ही तिकडेच निघालो होतो. आपल्या देशाने कशाप्रकारे या आश्चर्याची निर्मिती केलीय हे मला माझ्या मुलांना दाखवायचं होतं.
खुंजेरब पास समुद्रसपाटीपासून 4,693 मीटर इतक्या उंचावर वसलंय. ही जगातील सर्वात उंचीवरील सीमा आहे. इथं जाणं एखाद्या नाट्यमय घटनेपेक्षा काही वेगळं नाही. बर्फाने आच्छादलेल्या टेकड्या आणि खुंजेरब नॅशनल पार्क बघणं स्वर्गीय सुखच म्हणावं लागेल. या पार्कमध्ये स्नो लेपर्ड, पाकिस्तानचा राष्ट्रीय प्राणी मारखोर (जंगली प्रजातीचा बकरा) आढळतात.
आमचा प्रवास आमच्या घरापासून सुरू झाला. आम्ही पाकिस्तानच्या समुद्रकिनारी वसलेल्या कराचीत राहतो. आधी आम्ही विमानाने नंतर ट्रेनने असा प्रवास करत गिलगिटपर्यंत पोहोचलो. तिथून नंतर 6 तासांपेक्षा जास्तीचा प्रवास केला. खुंजेरब पासकडे जाण्यासाठी आम्ही एक सेदान कार भाड्याने घेतली.
नंतर 2000 किलोमीटरचं अंतर कापून आम्ही तिथपर्यंत पोहोचलो. पण उंचावर असलेल्या खुंजेरब पासकडे जाणं वाटतं तितकं सोपं नाहीये. या प्रवासादरम्यान आमच्या ड्रायव्हर-कम-टूर-गाईडने आम्हाला बऱ्याच सूचना दिल्या. हुंजा खोऱ्याजवळ आल्यावर त्याने आम्हाला आमच्या जिभेखाली सुके जर्दाळू ठेवायला सांगितले. कारण जसजसं आम्ही वरच्या दिशेने जाऊ तसतसं हवामान बदलत होतं. हाडं गोठवणारी थंडी होती. इथं उन्हाळ्यातही -5C पर्यंत तापमान असतं.
आम्ही वर पोहोचलो तेव्हा सूर्य मावळला होता. माझ्या दोन्ही मुलांचे गाल थंडीने टोमॅटो सारखे लाल झाले होते. विंडस्वेप्ट व्हॅली चित्तथरारक आणि सुंदर होती. स्थानिक लोक या भागाचं वर्णन वर आकाश आणि खाली ढग अशा पध्दतीने करतात.
आता या दुर्गम डोंगराळ प्रदेशाच्या मधोमध एटीएम का आहे? असा प्रश्न तुम्हाला पडेल.

फोटो स्रोत, Getty Images
तर गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नाव असलेलं हे मशीन इतर एटीएम मशीन सारखंच काम करतं. याचा वापर पैसे काढण्यासाठी, युटिलिटी बिलं भरण्यासाठी आणि इंटरबँक फंड ट्रान्सफर करण्यासाठी केला जातो. पण इथं उत्सव भरल्यासारखं वातावरण होतं. लोक या एटीएम मशीन जवळ येऊन सेल्फी घेत होते, कोणी फॅमिली फोटो शूट करत होते.
इथं कराचीतल्या एका माध्यमिक शाळेची मुलंही आली होती. एकूण 39 मुलांसोबत त्यांची शिक्षिका अतिया सईद होती. ती सांगत होती, "बऱ्याच दिवसांनंतर पाकिस्तानमध्ये प्रवास करण्याची ही पहिलीच वेळ आहे."
फक्त एटीएम मशीन बघण्यासाठीच नाही तर सोबत त्याचा भूगोल, इतिहास, अर्थशास्त्र असे सगळेच धडे या भेटीतून मिळणार होते.
हे एटीएम मशीन पाकिस्तानच्या नॅशनल बँक ऑफ पाकिस्तानने (NBP) 2016 साली बांधले. हे मशीन सोलर आणि विंड पॉवरवर चालते. हे मशीन इथं राहणाऱ्या रहिवाशांसाठी आणि कर्मचार्यांसाठी सुरू करण्यात आलंय. आणि हे त्यांच्यासाठी कोणत्याही मोठ्या सन्मान पदकाप्रमाणे आहे. इथं मशीनमधून पैसे काढताना मला "कोल्ड, हार्ड कॅश" असं एक नवीन कॅप्शन सुचलं.
तिथं दक्षिण आफ्रिकेतील निवृत्त प्राचार्य आयेशा बायत त्यांच्या पतीसोबत आल्या होत्या. त्यांनी मध्येच एक जोक करत म्हटलं "माझं अकाऊंट गोठवलंय." त्या सांगत होत्या, आमच्याही देशात पर्वत रांगा आहेत...पण इतक्या सुंदर तर अजिबातच नाहीत."
यावर आयेशा यांचे पती फारूक म्हणाले की, "देशाचं सौंदर्य उठून दिसेल अशी एखादी खूण असायलाचं हवी... जसा की आयफेल टॉवर."
पण अशा पद्धतीने एवढ्या उंचावर एटीएम मशीन सुरू करणं हा काही साधासुधा पराक्रम नव्हता. किंबहुना त्याची देखभाल करणं ही सुद्धा साधी गोष्ट नाहीये.
या प्रोजेक्टचे मॉनिटरिंग ऑफिसर शाह बीबी सांगतात, हा प्रोजेक्ट पूर्ण करायला चार महिने लागले. इथून सर्वात जवळची नॅशनल बँक ऑफ पाकिस्तानची शाखा 87 किलोमीटर अंतरावर आहे. आता एटीएम सुरू केलं आहे म्हटल्यावर त्यात पैसे भरले पाहिजेत. यासाठी शाखा व्यवस्थापक जाहिद हुसेन एवढं अंतर कापून वारा वादळ यांना तोंड देत इथपर्यंत येतात. 15 दिवसात नाही म्हटलं तरी 4 ते 5 लाख रुपये या एटीएम मशीन मधून काढले जातात.
शाह बीबी पुढे सांगतात, आता एवढंच नसतं तर 87 किमीवर जी बँकेची शाखा आहे त्याला रिअल-टाइम डेटा मॉनिटर करावा लागतो. तसेच सॅटेलाइट कनेक्टिव्हिटी, सोलर-पॉवर बॅकअप, कॅश रिट्रॅक्शन अशा सगळ्या गोष्टी बघाव्या लागतात. मशीन बिघडलं की सुमारे दोन अडीच तासांच्या मेहनतीनंतर ते दुरुस्त होतं.

फोटो स्रोत, Getty Images
पण इतक्या दूरवर एटीएमची खरंच गरज आहे का? बरेच लोक यावर प्रश्नचिन्ह उभारतात. यावर हुसेन सांगतात, "आपण चोवीस तास देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांना विसरून जातो. भले ही त्यांची संख्या कमी आहे मात्र त्यांचा पगार त्यांच्या कुटुंबियांना पोहोचावा यासाठी दुसरं कुठलं माध्यम त्यांच्याजवळ नसतं."
आता फक्त इथं सैनिकच आहेत का? तर नाही. बख्तावर हुसेन यांनी आपल्या आयुष्याचा बराचसा काळ इथल्या नॅशनल पार्क मध्ये घालवलाय. ते इथं येणाऱ्या वैज्ञानिकांना मदत करतात. जेव्हा कोव्हीडची साथ सुरू होती तेव्हा त्यांनी इथं एटीएमजवळ एक लहान कॅन्टीन चालवलं. ते सांगतात, "मी चहा, कॉफी आणि बिर्याणी बनवायचो."
त्यांनी आता खुंजेरब पास इथं एक पोर्टेबल बाथरूम सुरू केलं आहे. सोबतच इथं येणाऱ्या पर्यटकांसाठी मोफत प्राथमिक उपचार उपलब्ध व्हावे म्हणून त्यांनी त्यांच्या कारमध्ये ऑक्सिजनची सोय केलीय. ते सांगतात, "लोक इथं येण्याआधी तेलकट जड अन्न खाऊन येतात, मग त्यांना त्रास सुरू होतो. मागच्या तीन तासात मी तीन महिलांना ऑक्सिजन दिलाय. काल तर सात लोकांना श्वास घ्यायला त्रास होत होता."
हे सोडून पर्यटकांना आणखीन बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागतो. यात महत्वाचं म्हणजे बँकेच्या एटीएम मशीन मध्ये त्यांचे कार्ड्स अडकतात. असं फार क्वचित वेळेस घडतं. पण इथलं वातावरण बघता ते कार्ड पुन्हा मिळवण्यासाठी जवळपास दोन तास तरी वाट बघावी लागते. किंवा मग दुसऱ्या दिवशी परत यावं लागतं. म्हणजे ते मिळवणं सोपं काम नाहीये असं बख्तावर हसत हसत सांगतात.
इथं असणारे बँक मॅनेजर जाहिद यांच्यासाठी खुंजेरब पास एटीएमची काळजी घेणं मोठं आव्हानचं आहे. ते सांगतात, "प्रचंड उंचीवरचं ठिकाण, विरळ होत जाणारा ऑक्सिजन, कामातली जोखीम असं सगळं असूनही विलक्षण अशा निसर्गसान्निध्यात मला तांत्रिक आविष्काराचं काम करायला मिळतंय याचं समाधान आहे."
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








