अमिताभ बच्चन यांचा कधीही न प्रदर्शित झालेला 'तो' सिनेमा आणि त्यातील लूक

1979 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'काला पत्थर'च्या प्रमोशनसाठी काढलेला फोटो
फोटो कॅप्शन, 1979 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'काला पत्थर'च्या प्रमोशनसाठी काढलेला फोटो

अनेक पुरस्कारप्राप्त चित्रपटांचे निर्माते, संग्राहक आणि जतनकर्ते शिवेंद्र सिंह डुंगरपूर यांच्या नेतृत्वाखाली या संस्थेने मुंबईत अमिताभ बच्चन यांच्या 60 चित्रपटांना जतन करण्यासाठी महत्त्वाची भूमिका निभावली आहे.

चित्रपट दिग्दर्शक ख्रिस्तोफर नोलान यांच्यानुसार या अर्काइव्हने आपल्या गुणवत्तेसाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर आपली ओळख निर्माण केली आहे.

चित्रपट प्रदर्शनादरम्यान अमिताभ बच्चन यांची 50 छायाचित्रेसुद्धा दाखविण्यात येणार आहेत. ही छायाचित्रे लेखक आणि चित्रपट इतिहासकार एसएमएम अहुजा यांच्या संग्रहात आहेत.

अहुजा गेल्या तीन दशकांपासून चित्रपटांशी संबंधित संस्मरणीय वस्तूंचे जतन करत आहेत. त्यांनी अनेक पुस्तकेही लिहिली आहेत, ज्यात 'लुकिंग अॅट बॉलिवूड थ्रू पोस्टर्स' या पुस्तकाचाही समावेश आहे.

प्रदर्शनातील काही दुर्मिळ फोटोंवर एक नजर -

अमिताभ आणि जया

अमिताभ बच्चन आणि जया भादुरी

फोटो स्रोत, SMM Ausaja archive

 अमिताभ बच्चन आणि त्यांची पत्नी जया भादुरी यांचा हा फोटो 'अभिमान' या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यानचा आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसिद्ध चित्रपटकर्ते हृषिकेश मुखर्जी यांनी केलं होतं.

या चित्रपटात अमिताभ बच्चन यांनी अशी व्यक्तिरेखा साकारली होती, जो आपल्या पत्नीचे यश सहन करू शकत नाही. चित्रपटात एक गायिका म्हणून पत्नीला तिच्या पतीपेक्षा जास्त प्रसिद्धी मिळू लागते.

या चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्या पत्नीची भूमिका त्यांच्या खऱ्या आयुष्यातील पत्नी जया भादुरी यांनी साकारली होती.

हा चित्रपट 1973 मध्ये बच्चन आणि भादुरी यांच्या लग्नाच्या एका महिन्यानंतर प्रदर्शित झाला होता आणि बॉक्स ऑफिसवर यशस्वी झाला होता.

चित्रपट समीक्षक जय अर्जुन सिंह या चित्रपटाला बच्चन आणि भादुरी यांच्या सर्वाधिक यशस्वी चित्रपटांपैकी एक मानतात. या चित्रपटातील गाणीही श्रवणीय होती.

'अभिमान' हा चित्रपट अमिताभ बच्चनच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या चित्रपटांपैकी एक आहे.

सुभाष घई यांच्यासमवेत अमिताभ

बॉलिवूडमधील दिग्गज दिग्दर्शक सुभाष घई यांनी 'देवा' या चित्रपटासाठी अमिताभ बच्चन यांचं नाव निश्चित केलं होतं. पण हा चित्रपट नंतर होऊ शकला नाही आणि याची कारणंही कधी समजली नाहीत.

असे म्हणतात की, अमिताभ बच्चन या चित्रपटात एका गुन्हेगाराची भूमिका करणार होते. अनेक रिपोर्ट्समधून असंही कळलं होतं की, या चित्रपटाची अनेक दृश्यं आणि एका डान्स नंबरचंही चित्रीकरण झालं होतं. पण त्यानंतर हा चित्रपट बंद करण्यात आला.

1980 च्या दशकात या चित्रपटाचं चित्रीकरण झालं होतं. हे छायाचित्र तेव्हाचं आहे.

अमिताभ बच्चन

फोटो स्रोत, SMM Ausaja archive

या अयशस्वी प्रयोगानंतर अमिताभ बच्चन आणि सुभाष घई यांनी कधीही एकत्र काम केलं नाही.

त्यानंतर एकदा घई यांनी म्हटलं होतं, "मी अमिताभ बच्चन यांच्यासोबत एकही चित्रपट केला नाही, याचं मला दुःख आहे. मी त्यांच्याकडे देवा हा चित्रपट घेऊन गेलो होतो. पण तो चित्रपट पूर्ण होऊ शकला नाही, ही माझी चूक होती. यानतर त्यांच्यासोबत पुन्हा काम करण्याची संधी मला मिळाली नाही."

घई म्हणाले होते, "त्यांच्यासोबत चित्रपट करण्याचा विचार अनेकदा माझ्या मनात आला. पण अमिताभ बच्चन यांच्याकडे जाण्यासाठी चित्रपटही त्यांच्यासारख्या कलाकाराला साजेसा असा असला पाहिजे आणि त्यांची भूमिकाही त्याच पातळीची हवी."

अमिताभ बच्चन

फोटो स्रोत, SMM Ausaja archive

व्हिलनची भूमिका साकारलेल्या रणजीत यांच्यावर बसलेल्या अमिताभ बच्चन यांचे हे छायाचित्र 1973 मधील चित्रपट 'बंधे हाथ' या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान काढलेलं आहे. मागील बाजूस दिग्दर्शक ओ. पी. गोयल उभे आहेत.

अमिताभ बच्चन यांनी या थ्रिलर चित्रपटात एका चोराची दुहेरी भूमिका निभावली होती. हा त्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या चित्रपटांमधील एक चित्रपट होता आणि या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर फार दमदार कामगिरी केली नव्हती.

 हृषिकेश मुखर्जी यांच्यासोबत जमली होती भट्टी

अमिताभ बच्चन आणि राखीचं हे छायाचित्र 1979 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'जुर्माना' या चित्रपटातील आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन हृषिकेश मुखर्जी यांनी केलं होतं. दोन्ही कलाकारांसमवेत या छायाचित्रात निर्माते देबेश घोषसुद्धा दिसत आहेत.

चित्रपट समीक्षक जय अर्जुन सिंह म्हणतात की, या चित्रपटात अमिताभ बच्चन यांनी एका प्लेबॉयची भूमिका साकारली होती. हा चित्रपट थोडासा वेगळा होता आणि या चित्रपट तयार होण्यास बराच कालावधी लागला होता.

अमिताभ बच्चन आणि हृषिकेश मुखर्जी यांनी एकत्र काम केलेल्या आठ चित्रपटांपैकी 'जुर्माना' हा एक चित्रपट आहे.

अमिताभ बच्चन आणि राखी

फोटो स्रोत, SMM Ausaja archive

सिंह यांच्यानुसार अमिताभ बच्चन म्हणाले होते की, मुखर्जी यांच्या चित्रपटांमध्ये त्यांना आपल्या कामाचं क्रेडिटही घ्यायचं नव्हतं. कारण त्यांच्या चित्रपटांमध्ये दिग्दर्शक मुखर्जी यांनी त्यांना जे करायला सांगितलं होतं तेवढेच त्यांनी केलं.

'मर्द'चा 'सुपरमॅन'

प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर जाल मिस्त्री (डावीकडील) आणि अमिताभ बच्चन यांचे हे छायाचित्र 'मर्द' या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यानचे आहे. 1985 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचं दिग्दर्शन मनमोहन देसाई यांनी केलं होतं.

अमिताभ बच्चन यांना चित्रपटजगतात एक यशस्वी अभिनेत्याच्या रुपात ठसा उमटविण्यात दिग्दर्शक मनमोहन देसाई यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.

'मर्द'मध्ये अमिताभ बच्चन यांनी स्वातंत्र्यसैनिकाच्या मुलाची भूमिका साकारली होती, जो पुढे जाऊन साम्राज्यवादाविरुद्ध लढा देतो.

अमिताभ बच्चन

फोटो स्रोत, SMM Ausaja archive

एका चित्रपट समीक्षकाने त्यावेळी या चित्रपटातील अमिताभच्या भूमिकेविषयी लिहिले होते की, "संपूर्ण चित्रपटभर अमिताभचा एकछत्री प्रभाव निर्विवाद आहे. ते एक सुपरमॅन आहेत, ज्यांच्यासमोर कोणत्याही स्त्रीचे किंवा पुरुषाचे पात्र टिकत नाही."

पण असे अनेक लोक होते, ज्यांना या चित्रपटाच्या यशाबद्दल शंका होती.

एका चित्रपट नियतकालिकात समीक्षकाने लिहिलं होतं, "मर्दसारखा चित्रपटही हिट होऊ शकतो, हे चित्रपट पाहणाऱ्यांच्या आवडीविषयी बरेच काही सांगून जातो. पण या वर्षातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांपैकी हा एक चित्रपट आहे."

 अमिताभ पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत

1988 मध्ये केतन मेहता दिग्दर्शित हिरो हिरालाच्या सेटवर घेण्यात आलेले अमिताभ बच्चन यांचं हे दुर्मीळ छायाचित्र आहे.

या छायाचित्रात मेहता (सर्वांत डावीकडे) अभिनेत्री संजना कपूर (उजवीकडून तिसरी), जॉनी लिव्हर आणि निर्माता गुल आनंद (सर्वांत उजवीकडे) हेसुद्धा आहेत.

अमिताभ बच्चन

फोटो स्रोत, SMM Ausaja archive

या चित्रपटाचे नायक नसीरुद्दीन शाह होते. त्यांनी एका ऑटो रिक्षाचालकाची भूमिका साकारली होती. त्यांचे अभिनेत्री होण्यास आलेल्या राणीवर (संजना कपूर) प्रेम जडते.

बच्चन या चित्रपटात एका लहानशा भूमिकेत होते. मेहता आणि बच्चन आणि याच चित्रपटात एकत्र काम केलं होतं.

ही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)