जेव्हा डॉक्टरांनी अमिताभ बच्चन यांना शेवटचं बघून घ्या असं जया बच्चन यांना सांगितलं

अमिताभ बच्चन

फोटो स्रोत, DIBYANGSHU SARKAR/AFP VIA GETTY IMAGES

    • Author, प्रदीप सरदाना
    • Role, ज्येष्ठ पत्रकार

"चिरंजीव अमिताभ की दशा में पर्याप्त सुधार, पर अभी उन्हें इंटेंसिव केयर यूनिट में ही रखा जा रहा है और शायद 15 दिन और रखना पड़ेगा. सामान्य होने में शायद महीनों लगें. चिंता, शुभकामना, प्रार्थना के लिए आभारी."- बच्चन

हा हिंदीतील मजकूर हरिवंशराय बच्चन यांनी उत्तरादाखल लिहिलेल्या एका पत्रातील आहे. सुमारे 40 वर्षांपूर्वीची ही गोष्ट असेल, कुलीच्या सेटवर त्यांचा मुलगा अमिताभ जबर जखमी झाला होता.

अमिताभ मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये जगण्यामरण्याची लढाई लढत होते. तेव्हा 10 ऑगस्ट 1982 रोजी त्यांच्या तब्येतीची विचारपूस करणारं पत्र मी त्यांचे वडील हरिवंशराय बच्चन यांना पाठवलं होतं. त्यावर त्यांनी पत्र लिहून अमिताभ बच्चन यांच्या तब्येतीची खुशाली कळवली होती.

अमिताभ बच्चन आज 81 वर्षांचे झाले आहेत. मागे वळून पाहिलं तर त्यांच्या या संपूर्ण 81 वर्षांच्या आयुष्यात त्यांना आजारपणामुळे अनेक कठीण प्रसंगांना सामोरं जावं लागलंय. अगदी मृत्यूलाही जवळून पाहिलेला हा माणूस मरणाच्या दाढेतून बाहेर आलाय.

बरोबर 41 वर्षांपूर्वी म्हणजे 1982 साली कुली चित्रपटाच्या सेटवर हा अपघात घडला होता. या अपघातावेळी अमिताभ बच्चन यांचं वय 40 होतं.

आज ज्यांनी वयाची चाळीशी पार केली असेल त्यांना कदाचित ही घटना माहीत असण्याची शक्यता आहे. पण सरसकट सगळ्यांनाच अमिताभ बच्चन यांच्या या अपघाताविषयी माहीत असण्याची शक्यता खूप कमी.

त्यांची या अपघातातून वाचण्याची शक्यता फारच कमी होती. देशातल्या बड्या बड्या डॉक्टरांनी आपले हात वर केले होते. अमिताभची प्रकृती चिंताजनक असल्याची बातमी देशभर वायूच्या वेगाने पसरली होती.

अमिताभ बच्चन

फोटो स्रोत, EPA/DIVYAKANT SOLANKI

तेव्हा आजच्यासारखा सोशल मीडिया नव्हता, न्यूज चॅनेल्सवर ब्रेकिंग द्यायचा जमानाही अजून आला नव्हता. पण तरीही अमिताभ बच्चनची प्रकृती सबंध देशासाठी महत्त्वाचा विषय ठरली होती.

त्यादिवशी अमिताभ बच्चनचा जीव वाचावा म्हणून संपूर्ण देश चिंतेत होता. त्यांना दीर्घायुष्य लाभावं म्हणून लोकांनी देव पाण्यात ठेवले होते. कोण नवग्रहांची पूजा करत होतं, कोण चर्च, मंदिर, मशिदींच्या पायऱ्या चढत होतं, तर कोण पीर फकिरांच्या मजारीवर जाऊन अमिताभच्या आयुष्यासाठी प्रार्थना करत होतं.

नेमकं काय घडलं होतं कुलीच्या सेटवर?

तर 1982 च्या जुलै महिन्यात बंगळुरूमध्ये अमिताभ बच्चन यांच्या 'कुली' चित्रपटाचं शुटिंग सुरू होतं. बंगळुरूमध्ये शूटिंग करण्यामागचं मुख्य कारण तिथलं रेल्वे स्टेशन होतं.

मुंबईच्या रेल्वे स्टेशनवर शूटिंग करायला परवानगी मिळणं अवघड असायचं. त्यामुळे बंगळुरू स्टेशनचा ऑप्शन खुला होताच चित्रपटाचे दिग्दर्शक मनमोहन देसाई यांनी आपल्या चित्रपटाच्या युनिटसह बंगळूरू गाठलं.

शूटिंग वैगरे सर्व गोष्टी व्यवस्थित सुरू होत्या. अमिताभ बच्चन यांनी 24 जुलै रोजी आपली पत्नी जया आणि अभिषेक, श्वेता या त्यांच्या दोन्ही मुलांना बंगळूरला बोलावून घेतलं.

अमिताभ बच्चन आणि त्यांचं कुटुंब बंगळुरूच्या रेसकोर्स रोडवरील ब्रिटिशकालीन पंचतारांकित हॉटेल 'वेस्ट एंड'मध्ये थांबले होते.

रोजच्याप्रमाणे आवरून अमिताभ बच्चन शुटिंगसाठी रवाना झाले. तो दिवस होता 26 जुलैचा. अगदी कोणाच्या ध्यानी मनीही नसेल की आजचा दिवस सर्वार्थाने झोप उडवून टाकणारा ठरेल. या दिवसाने अमिताभ बच्चन यांच्यासाठी खरंतर नवा इतिहास लिहिला.

त्यादिवशी बंगळुरू विद्यापीठाच्या ज्ञान भारती कॅम्पसमध्ये शूटिंगचा सेटअप लावला होता. सेटवर पोहोचल्यानंतर अमिताभ कुलीच्या गेटअपमध्ये रेडी झाले.

त्या दिवशी फाईटचा सीन होता. या सीनमध्ये चित्रपटाचा खलनायक अमिताभच्या पोटात जोरदार ठोसा लगावणार होता.

रिहर्सलमध्ये करताना तर हा सीन एकदम ओके झाला. पण शूटिंगचा टेक जेव्हा घेतला तेव्हा मात्र गोष्टी बदलल्या. फायनल टेक घेताना अमिताभच्या मागे एक बोर्ड होता. खलनायक असलेल्या पुनितने अमिताभ यांना पोटात ठोसा लगावला तेव्हा अमिताभ त्या बोर्डवर आदळले. सीन पूर्ण झाला पण पुनितचा ठोसा अमिताभच्या पोटात इतक्या जोरकसपणे बसला की अमिताभ तिथंच कळवळू लागले.

अमिताभ बच्चन

फोटो स्रोत, REUTERS/FRANCIS MASCARENHAS

सीन एकदम ओके झाला होता. अमिताभ यांना मात्र पोटात दुखू लागलं होतं. तिथं जवळच असलेल्या खुर्चीपर्यंत जाणंही त्यांच्यासाठी मुश्किल होतं. दुखायचं कमी होईना म्हणून ते एका ठिकाणी जाऊन झोपले. एव्हाना कोणालाही समजलं नव्हतं की अमिताभ यांना मोठी दुखापत झालीय.

अमिताभ बच्चन यांनी या घटनेचा उल्लेख त्यांच्या ब्लॉगवर तीन-चार प्रकारे केलाय.

ऑगस्ट 2009 मध्येही अमिताभ यांनी या घटनेवर एक ब्लॉग लिहिला होता. ते लिहितात की, "सीन कट झाल्याबरोबर मला पोटात तीव्र वेदना जाणवू लागल्या. शाळेत असताना बॉक्सिंग दरम्यान मला पोटात बरेच पंचेस बसले होते, त्याचा त्रास व्हायचा पण थोड्या वेळाने ते दुखणं बरंही व्हायचं. पण सेटवर झालेली दुखापत सहन करण्यापलीकडे होती. दुखायचं काही थांबेना म्हटल्यावर मी मनमोहनजींना सांगितलं की, मला बरं वाटेना, आजचा दिवस मला सुट्टी द्या. त्यानंतर कार घेऊन मी हॉटेलच्या दिशेने रवाना झालो. स्टेशन पासून हॉटेलपर्यंतचा रस्ता अगदी कच्चा होता. हॉटेलपर्यंत पोहोचण्यासाठी 45 मिनिटं लागणार होती, त्यामुळे पोट अजूनच दुखू लागलं."

"हॉटेलवर पोहोचताच मी पलंगावर जाऊन पडलो. माझ्यात त्राण राहिले नव्हते. पण सगळा जीव एकवटून मी जयाला सांगितलं की, मुंबईहून ताबडतोब माझे पर्सनल डॉक्टर शहा यांना बोलावून घे आणि मुलांना घरी पाठव."

अमिताभ यांची अशी अवस्था पाहून जया बच्चनही अस्वस्थ झाल्या. त्यांनी आपल्या स्टाफ सोबत मुलांना मुंबईला पाठवलं. दीर अजिताभ यांना फोन करून सर्व परिस्थिती सांगितली आणि लवकरात लवकर डॉक्टरांना घेऊन यायला सांगितलं.

तोपर्यंत काहीतरी उपचार करावेत म्हणून मनमोहन देसाई यांनी दोन डॉक्टरांना बोलावून घेतलं. या डॉक्टरांनी दुखणं थांबावं म्हणून काही गोळ्या आणि इंजेक्शन्स दिले. पण त्या रात्रीत अमिताभ यांचं दुखणं काही थांबलं नाही, ते अंथरुणावर तसेच विव्हळत पडले होते.

नेमकं काय झालंय याचा पत्ताच लागत नव्हता.

27 जुलैच्या सकाळी अजिताभ आणि डॉ. शाह बंगळूरला पोहोचले. शाह यांनी सोबत एक पोर्टेबल एक्स-रे मशीनही आणलं होतं. त्यांनी अमिताभच्या पोटाचे एक्स-रे काढले.

पण अमिताभ यांना हालचाल करणंही कठीण झालं होतं. शेवटी डॉक्टर शाह यांनी स्थानिक डॉक्टरांशी सल्लामसलत करून अमिताभ यांना बंगळूरच्या सेंट फिलोमिना हॉस्पिटलमध्ये दाखल करायचं ठरवलं.

अमिताभ यांची प्रकृती ठीक नसल्याच्या बातम्या आता देशभरात पसरल्या होत्या. सकाळी आणि संध्याकाळी येणाऱ्या अशा दोन्ही वृत्तपत्रात या बातम्या अगदी फ्रंटपेजवर छापून आल्या होत्या. एवढंच नाही तर रेडिओवरसुद्धा या बातम्या देण्यात आल्या होत्या.

फिलोमिना हॉस्पिटलमध्ये अमिताभ बच्चन यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टर जोसेफ अँथनी यांनी 2012 मध्ये टीव्हीवर एक मुलाखत दिली होती. ते म्हणाले होते की, "मी तोपर्यंत तरी अमिताभ बच्चन यांना ओळखत नव्हतो. पण हॉस्पिटलच्या बाहेर एवढी गर्दी जमा झाली होती की, मग मला समजलं ते कोणीतरी फिल्मस्टार आहेत. त्यांना जिथं ऍडमिट केलं होतं तो संपूर्ण कॉरिडॉर फक्त अमिताभ यांच्यासाठी रिजर्व करून ठेवण्यात आला होता."

त्यांना ऍडमिट तर केलं पण नेमकं झालंय काय याची कोणालाच कल्पना नव्हती. तोपर्यंत देशभरात बातमी पसरली होती. लोक बेचैन झाले होते. काही जण तर अक्षरशः रडत होते.

जुलै 1982 पर्यंत अमिताभ बच्चन यांनी जंजीर, अभिमान, चुपके चुपके, हेराफेरी, दीवार, शोले, दो अंजाने, कभी कभी, अमर अकबर अँथनी, परवरिश, डॉन, त्रिशूल, मुकद्दर का सिकंदर, लावरिस, नसीब, सत्ता पे सत्ता, नमक हलाल सारखे सुपरडुपर हिट सिनेमे दिले होते. त्यामुळे ते देशातील सर्वांत मोठा सुपरस्टार बनले होते.

इकडे फिलोमिना हॉस्पिटलमध्ये अमिताभ यांची बिघडलेली प्रकृती पाहून सगळेच अस्वस्थ झाले होते. हॉस्पिटलच्या सात नंबरच्या खोलीत अमिताभ बेशुद्ध अवस्थेतच होते. त्यांना आता श्वास घ्यायलाही त्रास होत होता. ते कधीही कोमात जातील अशी परिस्थिती निर्माण झाली होती.

इकडे जया, अजिताभ आणि अमिताभचे मित्र हबीब नाडियादवाला पुढं काय करायचं म्हणून चिंतेत होते. अशा कठीण प्रसंगात त्यांचे मित्र आणि चित्रपट निर्माते यश जोहरही धीर द्यायला बंगळूरमध्ये पोहोचले.

पुनित इस्सर अभिनेत्री करिष्मा तन्नासोबत

फोटो स्रोत, COLORS

फोटो कॅप्शन, पुनित इस्सर अभिनेत्री करिष्मा तन्नासोबत

दुखणं काही कमी होईना म्हटल्यावर सगळ्यांनी ठरवलं की आता अमिताभ यांना संध्याकाळच्या फ्लाईटने मुंबईला घेऊन जावं. पण तिथंच हॉस्पिटलमध्ये डॉ. हट्टंगडी शशिधर भट्ट हे प्रख्यात यूरोलॉजिस्ट आल्याचं जयाला समजलं.

ते प्रसिद्ध आणि त्यांच्या क्षेत्रात आदरणीय व्यक्तिमत्त्व होतं. त्यांना 'फादर ऑफ यूरोलॉजी इन इंडिया' असंही म्हटलं जायचं.

डॉ. भट्ट ऑपरेशन थिएटरमध्ये जाण्याआधी जयाने त्यांना गाठलं आणि अमिताभला एकदा येऊन पाहावं अशी विनंती केली. त्यांनीही ती विनंती लगेच मान्य केली. ते अमिताभच्या खोलीत आले, त्यांनी अमिताभच्या पोटावरची सूज पाहिली. तिथं एक्सरे होता, तोही पाहिला. आणि मोठ्याने म्हणाले, "यांना आत्ताच्या आत्ता ऑपरेटिंग टेबलवर आणा. नाहीतर संध्याकाळच्या फ्लाईटने त्यांचा मृतदेह घेऊन जावं लागेल."

खुद्द अमिताभ बच्चन यांनी एकेठिकाणी या घटनेचा उल्लेख केला होता.

अमिताभ बच्चन यांच्या पहिल्या सर्जरीनंतर समजलं की, त्यांचं आतड फाटलं होतं. त्यातलं विष संपूर्ण पोटात पसरलं होतं आणि आता ते शरीराच्या इतर अवयवांवर हल्ला करीत होतं.

या सर्जरीमुळे मृत्यूची जी टांगती तलवार अमिताभ यांच्या डोक्यावर होती ती काही वेळासाठी टळली होती. पण फिलोमिना हॉस्पिटलमध्ये अद्ययावत अशा सुविधा नव्हत्या. त्यामुळे डॉ. भट्ट, डॉ. अँथनी आणि डॉ. शाह यांनी अमिताभ यांना मुंबईतील ब्रीच कॅंडी रुग्णालयात हलवण्याचा निर्णय घेतला.

व्हीडिओ कॅप्शन, अमिताभ बच्चन ते चंद्रकांत पाटील का होत आहेत ट्रोल?

पण आता त्यांची अवस्था बघता त्यांना मुंबईत हलवणं महाकठीण काम होतं. त्याकाळी एअर अॅम्ब्युलन्स अशी काही सिस्टीम नव्हती. चार्टर्ड प्लेन घेऊन जातानाही अनेक अडचणी समोर होत्या.

त्यामुळे यश जोहर आणि जया बच्चन यांनी इंडियन एअरलाइन्सच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली. अगदी मंत्रालयातही संपर्क केला.

यानंतर इंडियन एअरलाइन्सने त्यांच्या एका विमानातील समोरच्या बाजूच्या बिझनेस क्लास सीटच्या तीन रांगा काढल्या. त्या ठिकाणी मिनी आयसीयू सारखी व्यवस्था केली. त्यानंतर अमिताभ यांना स्ट्रेचरवरून या विमानात हलवण्यात आलं.

विमानात अमिताभ यांच्यासोबत जया, अजिताभ, हबीब, मनमोहन देसाई, यश जोहर होतेच. सोबतच डॉक्टर शाह आणि कमांडिंग नर्स अमारिया आपल्या टीमसोबत होते. जावेद अख्तर आणि त्यांची पहिली पत्नी हनी इराणीही तिथ आले होते.

अमिताभ यांच्या प्रकृतीसाठी देशभरातून प्रार्थना

31 जुलै रोजी रात्री एक वाजता विमानाने बंगळूरहून मुंबईला येण्यासाठी टेक ऑफ केलं. पहाटेच्या 3 वाजून 15 मिनिटांनी विमान मुंबईत पोहोचलं. बाहेर धो धो पाऊस पडत होता. पण अमिताभ यांची एक झलक पाहण्यासाठी विमानतळाबाहेर लोकांची गर्दी जमली होती.

अमिताभ बच्चन

फोटो स्रोत, AMITABH BACHCHAN/TWITTER

विमानतळाबाहेर जमलेली गर्दी पाहून अमिताभ बच्चन यांना बाहेर काढणं जिकिरीचं काम होतं. त्यामुळे बच्चन यांना फूड सर्व्हिस कॅरियरमध्ये ठेऊन गुपचूप बाहेर काढण्यात आलं. भल्या पहाटे एक ऍम्ब्युलन्स अमिताभ यांना घेऊन ब्रीच कँडी रुग्णालयात पोहोचली.

अमिताभ बच्चन यांच्या या अपघातामुळे देशभरात शोककळा पसरली होती. तेव्हाची परिस्थिती मी माझ्या डोळ्यांनी पाहिली होती. त्यावेळी लोकांच्या तोंडात फक्त अमितजींचं नाव असायचं.

काही लोकांना माहिती होतं की मी बच्चन कुटुंबियांना ओळखतो. ते लोक माझ्याजवळ येऊन त्यांच्यासाठी कार्ड्स, फुलं देऊन जायचे. आणि या वस्तू अमितजी किंवा त्यांच्या वडिलांना पाठवाव्यात असं सांगायचे.

दरम्यानच्या काळातलीचं घटना आहे. मला आठवतंय आमच्या शेजारी राहणारी चार मुलं माझ्याकडे रडत रडत आली आणि म्हणाली - "खरं सांगा अमिताभ अंकल ठीक आहेत ना..."

एक दिवस सहजच मी जया बच्चन यांना फोन केला. दिल्ली, उत्तरप्रदेश, हरियाणा, राजस्थान, पंजाब, हिमाचलमध्ये अमितजींच्या प्रकृतीसाठी प्रार्थना केली जातेय, असं सांगितल्याबरोबर त्या अतिशय भावूक झाल्या.

त्या म्हणाल्या की, "आमच्या घरी दररोज शेकड्याने पत्र येतायत. प्रत्येकजण त्यांच्यासाठी प्रार्थना करतोय. अगदी 'प्रतिक्षा'च्या बाहेर आणि हॉस्पिटलमध्येही लोक फुलं, पूजेचे धागे, तावीज ठेऊन जात आहेत."

त्यावेळी मुंबईत जी परिस्थिती होती त्यावर 'इंडिया टुडे' च्या 31 ऑगस्ट 1982 च्या अंकात एक लेख छापून आला होता. त्यात लिहिलं होतं की, "संपूर्ण मुंबईत अमिताभजींना शुभेच्छा देणारे बॅनर्स आणि पोस्टर्स लागले होते. वृत्तपत्रांमध्ये जाहिरातीही येत होत्या. त्यांची तब्येत सुधारावी म्हणून दररोज कित्येक लोक सिद्धिविनायक मंदिरात येऊन अमिताभसाठी पूजा करत होते."

ब्रीच कँडीत मृत्यूशी झुंज

अमिताभ ब्रीच कँडी रुग्णालयात आल्याबरोबर त्यांचे वडील हरिवंशराय बच्चन आणि आई तेजी बच्चन आपल्या मुलाला बघण्यासाठी हॉस्पिटलमध्ये पोहोचले.

जया बच्चन

फोटो स्रोत, Getty Images

त्यांच्यासोबत यश चोप्रा, प्रकाश मेहरा, रमेश सिप्पी, संगीतकार कल्याणजी हे लोकही आले होते. मनमोहन देसाई आणि यश जोहर बंगळूरपासूनचं सोबत होते. बच्चन यांना पाहण्यासाठी अनेक स्टार्सची ये जा सुरू होती.

अमिताभ तेव्हा आयसीयूमध्ये होते. लोकांची गर्दी कमीच होत नव्हती त्यामुळे त्यांच्या आई तेजी बच्चन चिडल्या होत्या. रागाच्या भरात त्यांनी दिलीप कुमार यांनाही भेटायला जाण्यापासून रोखलं. त्यानंतर मात्र तिथली गर्दी कमी व्हायला लागली.

हॉस्पिटलमध्ये असताना अमिताभ बच्चन यांना दोन भेटवस्तू मिळाल्या होत्या. त्याचा उल्लेख ते नेहमीच करतात. त्यातली एक गोष्ट म्हणजे एमएफ हुसेन यांनी त्यांच्यासाठी बनवलेलं पेंटिंग. या पेंटिंगमध्ये हनुमानजी संजीवनी बूटी घेऊन आल्याचं दृश्य होतं. तर दुसरी भेट होती बाळासाहेब ठाकरेंनी दिलेलं व्यंगचित्र. या व्यंगचित्रात अमिताभ यमराजाला मारताना दिसत होते.

दुसरीकडे अमिताभ यांच्यावर बंगळुरूमध्ये जी सर्जरी झाली होती तिथून रक्तस्त्राव सुरूच होता. त्यानंतर ब्रीच कँडीमध्ये डॉ. एफ. उडवाडिया आणि त्यांच्या टीमने हा रक्तस्राव थांबावा म्हणून आणखीन एक सर्जरी केली. पण रक्तस्त्राव काही थांबेना. त्यांच्या शरीरात रक्ताची कमतरता भासू लागली.

त्यामुळे जवळपास 60 युनिट रक्त चढवण्यात आलं.

एवढे प्रयत्न करूनही डॉक्टरांच्या हाती काही यश येत नव्हतं. सरतेशेवटी 2 ऑगस्टला अमिताभ यांचा पल्स रेट 0 झाला. हे बघून तिथल्या डॉक्टरांनी त्यांच्या जगण्याच्या आशा सोडून दिल्या. त्यांनी जयाला बोलावून घेतलं आणि अमिताभला शेवटचं बघून घे असं सांगितलं.

लवकरच त्यांना 'क्लिनिकली डेड' ठरवलं जाणार होतं. पण शेवटचा प्रयत्न म्हणून डॉ. उडवाडिया यांनी अमिताभला एका औषधाचा ओव्हरडोस दिला होता.

काही वेळाने अमिताभ यांच्या पायाचा अंगठा हलत असल्याचं जयाच्या लक्षात आलं. ती हालचाल पाहून ती जोराने किंचाळली. डॉक्टरांची टीम पुन्हा कामाला लागली.

काही वेळाने अमिताभ यांनी डोळे उघडले. त्यांनी आपली नजर चोहोवार टाकली. सर्वांचे रडवेले झालेले चेहरे आनंदाने फुलले होते.

2 ऑगस्टचा तो क्षण

त्या दिवशी म्हणजेच 2 ऑगस्टला अमिताभ बच्चन 11 मिनिटांसाठी 'क्लिनिकली डेड' झाले होते. पण त्यानंतर त्यांच्या श्वासाची गती पुन्हा सुरू झाली. त्यामुळे हा दिवस अमिताभ यांचा पुनर्जन्माचा दिवस मानला जातो.

अमिताभ बच्चन

फोटो स्रोत, EPA/DIVYAKANT SOLANKI

अमिताभ यांनी त्या दिवशी डोळे उघडले असले तरी त्यांच्या जखमेतून अजूनही रक्तस्राव होतच होता.

त्यामुळे पुढं काहीतरी उपचार करावे यादृष्टीने यश जोहर लंडनला गेले. त्यांनी लंडनचे प्रसिद्ध सर्जन डॉ. पीटर कॉटन यांना आपल्यासोबत मुंबईत आणलं. डॉ. पीटर कॉटन यांनी एका नवीन टेक्निकचा वापर करून अमिताभ यांच्यावर सर्जरी केली आणि तो रक्तस्राव थांबवला.

इंदिरा गांधींनाही अमिताभ यांची काळजी लागून राहिली होती.

अमिताभ यांच्या या अपघाताने संपूर्ण देश चिंतेत होताच. पण सोबतच देशाच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी आणि त्यांचे पुत्र राजीव गांधी आणि सून सोनिया गांधी हेसुद्धा काळजीत पडले होते.

योगायोग असा की अमिताभच्या अपघाताची बातमी आली तेव्हा इंदिरा गांधी आणि राजीव गांधी अमेरिकेच्या दौऱ्यावर गेले होते. पण राजीव गांधी अर्ध्यातूनच परत आले. आणि अमिताभला भेटण्यासाठी त्यांनी 4 ऑगस्टला मुंबई गाठली.

इंदिरा गांधी 8 ऑगस्ट रोजी दौरा संपवून भारतात परतल्या. त्यांनी सोनिया गांधींना आपल्या सोबत घेतलं आणि थेट मुंबईत ब्रीच कॅंडी रुग्णालयात आल्या. त्यांना पाहून अमितजींना रडू कोसळलं. इंदिरा गांधी त्यांना धीर देत म्हटल्या की, "बेटा, काळजी करू नकोस तू लवकरच बरा होशील."

व्हीडिओ कॅप्शन, अमिताभ बच्चन कौन बनेगा करोडपतीमध्ये पुण्याच्या आकाशसाठी चक्क डिलिव्हरी बॉय बनले?

या घटनेचा उल्लेख माखनलाल फोतेदार यांनी आपल्या 'द चिनार लीव्हज - अ पॉलिटिकल मेमोयर' या पुस्तकात केला आहे. फोतेदार इंदिरा गांधींचे जवळचे सहकारी होते. ते लिहितात, "इंदिराजी अमेरिकेहून आल्याबरोबर, अमिताभच्या तब्येतीसाठी पूजा करावी म्हणून पंडित हरसुख यांना हॉस्पिटलमध्ये पाठवायला सांगितलं."

फोतेदार पुढे लिहितात की, दुसऱ्या दिवशी इंदिराजी थोड्या भावुक झाल्या होत्या. त्यांनी एक तावीज, प्रसाद अशा काही गोष्टी एका पांढऱ्या कपड्यात बांधून हॉस्पिटलमध्ये पाठवून द्यायला सांगितल्या. त्या म्हणाल्या की, "हे सगळं अमितचं आयुष्य वाढावं यासाठी आहे नाहीतर राजीव एकटा पडेल."

पंडित हरसुख यांनी या वस्तू अमिताभच्या उशीखाली ठेवल्या. आणि सलग दहा दिवस पूजा सुरू ठेवली.

दुसरीकडे तेजी बच्चन यांचीसुद्धा पूजापाठ सुरूच होती. जयाही रोज सिद्धिविनायकाला जात होत्या. अमिताभने मृत्युशी झुंज देऊन पुन्हा एकदा नव्याने उभारी घेणं हे कोणत्याही चमत्कारापेक्षा कमी नव्हतं.

हॉस्पिटलमध्ये असताना अमिताभ यांच्या शरीरात जवळपास 10 ट्यूब-पाईप होत्या. फूड पाईपमधून त्यांना अन्न दिलं जायचं. श्वास घेण्यासाठी त्यांच्या गळ्यातून एक पाईप टाकण्यात आली होती.

आयसीयूमधून बाहेर आल्यानंतर अमिताभ यांना रूम नंबर 316 मध्ये हलवण्यात आलं. ब्रीच कँडी रुग्णालयातील ती रूम आजही प्रसिद्ध आहे, कारण याच खोलीत बच्चन यांनी मृत्यूवर विजय मिळवला होता.

24 सप्टेंबरच्या दुपारी ते आपल्या घरी जाण्यासाठी निघाले. जवळपास दोन महिने ते या खोलीत होते.

अमिताभ हॉस्पिटलमधून बाहेर आले तेव्हा त्यांचे चाहते हॉस्पिटलबाहेर गर्दी करून उभे होते. रस्त्यारस्त्यावर लोक स्वागतासाठी उभे होते. पण त्यांच्या घराबाहेर एवढी गर्दी जमली होती की अक्षरशः त्यांना घरात जाणं अवघड झालं होतं.

इंदिरा गांधी

फोटो स्रोत, Getty Images

लोकांच्या हातात फुलांचे गुच्छ, वेलकमचे बोर्ड होते. ती गर्दी 'अमिताभ-अमिताभ' 'लॉन्ग लिव अमिताभ' अशा घोषणा देत होती. हे दृश्य पाहून अमिताभ बच्चन भारावून गेले. त्यांनी तिथं उपस्थित असणाऱ्या गर्दीला हात जोडून त्यांचे आभार मानले.

घरात प्रवेश केल्यावर त्यांची आरती ओवाळण्यात आली. त्यानंतर बच्चन यांनी आपले वडील हरिवंशराय बच्चन यांचे पाय धरून आशीर्वाद घेतले. आपल्याला मुलाला इतक्या दिवसांनी बघून हरिवंशराय सुद्धा भावूक झाले त्यांनी आपल्याला मुलाला मिठी मारली.

यावर अमिताभ म्हणाले होते- "मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच बाबूजींच्या डोळ्यात अश्रू पाहिले होते."

डिसेंबर अखेरपर्यंत अमिताभच्या तब्येतीत सुधारणा

या मोठ्या प्रसंगातून तरून निघालेल्या अमिताभ बच्चन यांनी 7 जानेवारी 1983 रोजी 'कुली' चित्रपटाच्या शूटिंगला पुन्हा नव्याने सुरुवात केली. या चित्रपटाचा सेट आता मुंबईतील चांदीवाली स्टुडिओमध्ये लावण्यात आला होता.

अमिताभ पुन्हा कामावर जातानाचा हा क्षण टिपण्यासाठी कित्येक फोटोग्राफर्स बेचैन झाले होते. अमिताभने पहिला शॉट दिल्याबरोबर सर्व कॅमेऱ्यांचे फ्लॅश लाइट चमकले.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)