'आनंद'साठी राजेश खन्ना नाही, तर ‘हा’ अभिनेता होता ऋषिकेश मुखर्जींची पहिली पसंती

अमिताभ बच्चन आणि राजेश खन्ना

फोटो स्रोत, NN SIPPI

फोटो कॅप्शन, अमिताभ बच्चन आणि राजेश खन्ना
    • Author, रेहान फझल
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

तो दिवस होता एक जानेवारी 1971चा. त्या दिवशी शुक्रवार होता आणि मुंबईचं एक प्रसिद्ध कॉलेज विद्यार्थ्यांविना ओस पडलं होतं. विद्यार्थी नेमके गेले कुठं अशी चर्चा सुरू झाली. कारण त्या दिवशी ना राष्ट्रीय सुट्टी होती ना कोणता सण. मग सगळे विद्यार्थी नेमके गेले कुठे अशी चर्चा कॉलेजच्या स्टाफरूम मध्ये सुरू झाली.

त्यादिवशी त्या स्टाफरूम मध्ये एक कॅन्टीन बॉय चहा घेऊन दाखल झाला. त्याने सांगितलं की, आज राजेश खन्नाचा 'आनंद' नावाचा चित्रपट रिलीज झालीय आणि सगळेच विद्यार्थी तो चित्रपट बघायला गेलेत.

आता हे फक्त त्याच कॉलेज मध्ये घडलं होतं का? तर नाही...मुंबईच्या बऱ्याच कॉलेजमधले विद्यार्थी आपला क्लास बंक करून राजेश खन्नाचा 'आनंद' चित्रपट पाहायला गेले होते आणि यात आघाडीवर होत्या मुली.

राजेश खन्नाच्या मागे बऱ्याच मुली वेड्या व्हायच्या. साहजिकच यातली एखादी पटली तर पटली म्हणून मुलं सुद्धा राजेश खन्ना स्टाईल कुर्ता घालून, डोळ्यांवर गॉगल लावून चित्रपट बघायला थेटरात पोचले होते.

चित्रपटाचे दिग्दर्शक असलेल्या ऋषिकेश मुखर्जींनी आनंद चित्रपटाची कथा हसू आणि आसू या दोन्ही भावनांमध्ये गुंफली होती. यामुळे चित्रपट बघून थिएटर बाहेर निघणाऱ्या प्रत्येकाचे डोळे त्यादिवशी पाणावले होते.

राजेश खन्नाच्या 'राजेश खन्ना द अनटोल्ड स्टोरी ऑफ इंडियाज फर्स्ट सुपरस्टार' बायोग्राफीचे लेखक यासिर उस्मान लिहितात," राजेश खन्नाने चित्रपटातल्या आनंद सहगल या भूमिकेत जीव ओतला होता. राजेशने ती भूमिका अशी वठवली होती की थिएटरमधून बाहेर पडणाऱ्या प्रत्येकाच्या तोंडी 'जिंदगी बडी होनी चाहिये बाबूमोशाय लंबी नही' हा डायलॉग होता.

राजेश खन्नाने अभिनयात जीव ओतला

आनंद चित्रपटाचे निर्माते होते एन एन सिप्पी. हा चित्रपट आनंद सेहगल या पात्राभोवती फिरत असतो. आनंदला कॅन्सरचं निदान झालेलं असतं. तो दिल्लीहून मुंबईला उपचारासाठी येतो. तिथं त्याची भेट होते डॉ. कुलकर्णी (रमेश देव) यांच्याशी.

तो कॅन्सरच्या शेवटच्या स्टेजला असतो मात्र तरीही आपल्या मिश्किल स्वाभावाप्रमाणे तो मृत्यूचीही चेष्टा करत असतो. असहाय होऊन अंथरुणाला खिळून राहण्यापेक्षा इतरांच्या जीवनात आनंद यावा यासाठी तो सतत प्रयत्नशील असतो.

राजेश खन्नाने त्याच्या कारकिर्दीत 'खामोशी' आणि 'सफर' या चित्रपटांमध्ये भावनांचा जो मिलाफ साधलाय त्याला एक उंचीवर नेऊन ठेवण्याचं काम 'आनंद' चित्रपटाने केलं.

आनंद चित्रपट

फोटो स्रोत, NN SIPPI

या चित्रपटातील कलाकार त्यांच्या भूमिकेशी कसे एकरूप झाले होते याबद्दल सीमा देव सांगतात, "चित्रपटात माझ्या लग्नाच्या वाढदिवसाचा एक सीन होता.

राजेश खन्ना मला आशीर्वाद देण्यासाठी येतात आणि म्हणतात, 'मैं तुझे क्या आशीर्वाद दूँ बहन. ये भी तो नहीं कह सकता कि मेरी उमर तुझे लग जाए.' राजेश खन्नाने हा शॉट इतका भारी दिला होता की, शॉट संपताच मी बाहेर जाऊन रडायला लागले."

मुंबई आणि राज कपूर यांना समर्पित केला होता चित्रपट

हृषिकेश मुखर्जी यांनी 'आनंद'ची व्यक्तिरेखा अशा पद्धतीने लिहिली होती की, हा सिनेमा सिनेरसिकांच्या मनात कायमचा अजरामर झाला. त्यांनी हा चित्रपट तत्कालीन मुंबई शहराला समर्पित केला.

मुंबईसोबतच राज कपूर यांना सुद्धा हा चित्रपट समर्पित करण्यात आला होता. राज कपूर आणि हृषीकेश मुखर्जी यांचं मैत्रीचं नात तसं घट्ट होतं. त्यांचा असा एकही दिवस गेला नसेल की, ते दोघे एकमेकांना भेटले नसतील. त्या दोघांनी 'नोकरी' नावाचा चित्रपट केला मात्र तो चित्रपट इतका काही चालला नाही.

राजेश खन्ना यांच्यावरील पुस्तक

फोटो स्रोत, HARPER COLLINS

गौतम चिंतामणी त्यांच्या 'राजेश खन्ना - डार्क स्टार' या पुस्तकात लिहितात, "राज कपूर आणि हृषिकेश मुखर्जी यांची मैत्री तशी जुनी होती. 'एक आजारी माणूस त्याला हवं असलेलं संपूर्ण आयुष्य जगतो' ही कल्पना त्यांना सुचली राज कपूर यांच्याकडे बघून.

राज कपूर त्यावेळी खूप आजारी होते. एकवेळ अशी आली की, मुखर्जींना असं वाटलं की, राज कपूर कदाचित जिवंत राहणार नाहीत. पण घडलं अगदी उलट मृत्यूशी झुंज देण्यात ते यशस्वी ठरले होते.

'आनंद'साठी किशोर कुमार होते पहिली पसंती

कथा लिहून तयार होती मात्र बरेच दिवस उलटले तरी हृषीकेश मुखर्जीना त्यावर चित्रपट काही बनवता आला नव्हता. कारण चित्रपटात रोमान्स नसल्यामुळे वितरक चित्रपटाबद्दल फारसे उत्सुक नव्हते.

आता आनंदच्या भूमिकेत कोण? म्हणून किशोर कुमार ही पहिली पसंती होती. मात्र काम काही बनलं नाही. किशोर कुमारसोबत हृषीकेश मुखर्जींच वाजल्याच्या चर्चा त्यावेळी होत्या. यानंतर या भूमिकेसाठी शशी कपूर यांचा विचार करण्यात आला मात्र त्यांच्याकडे तारखा नव्हत्या.

अमिताभ बच्चन आणि राजेश खन्ना

फोटो स्रोत, HARPER COLLINS

फोटो कॅप्शन, अमिताभ बच्चन आणि राजेश खन्ना

हृषिकेश मुखर्जी यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं की, "मी त्यादरम्यान शांत होतो. एके दिवशी राजेश खन्ना सहज आला आणि मला म्हणाला 'ऋषीदा असं कानावर आलंय की तुम्ही एक भारी चित्रपट बनवताय. मला जरा त्याची कथा ऐकवा.' यावर मी म्हणालो, 'तुला तुझ्या तारखा द्याव्या लागतील या एका अटीवरच मी कथा सांगीन.'

राजेश म्हणाला की 'मला कथा आवडली तर मी कोणतीही अट मान्य करेन.' मी राजेशला कथा ऐकवली आणि त्याने लगेचचं होकार दिला."

या चित्रपटाचं मानधन म्हणून राजेश खन्नाने चित्रपटाचे मुंबईतील वितरणाचे हक्क घेतले. चित्रपट चाललाचं इतका की, राजेश खन्नाने मानधनापेक्षा जास्त पैसे कमावले.

मागे एका मुलाखतीत धर्मेंद्र म्हणाले होते की, ही भूमिका मला न देता राजेश खन्ना यांना देण्यात आलीय हे कळल्यावर मी हृषिकेश मुखर्जींवर खूप रागावलो होतो.

धर्मेंद्र यांनी दारू पिऊन ऋषिकेश मुखर्जींना रात्रभर फोन लावून हैराण केलं. नंतर हृषिकेश मुखर्जी यांनी सुद्धा 'गुड्डी' आणि 'चुपके चुपके' मध्ये धर्मेंद्रना रोल ऑफर करून त्याची भरपाई केली.

बाबू मोशायच्या भूमिकेसाठी अमिताभ बच्चनची निवड

आनंदचा शोध संपला होता आणि आता त्याच्या डॉक्टरसाठी शोधमोहीम सुरू झाली होती. यासाठी ख्वाजा अहमद अब्बास साहेब यांनी मदत केली.

अमिताभ बच्चनचे चरित्र लिहिणाऱ्या सौम्या बंदोपाध्याय यांनी हृषीकेश मुखर्जीना विचारलं होतं की, "तुम्ही अमिताभ बच्चन यांना पाहताक्षणी हा रोल ऑफर केला होता का?"

यावर हृषीकेश मुखर्जी म्हणाले, "तसं नव्हतं. पण मला वाटलं की तो या भूमिकेला न्याय देईल. त्यादिवशी मी त्याला काही होकार दिला नाही मी फक्त नंतर ये असं म्हणालो. मी त्याचा 'सात हिंदुस्तानी' मधील अभिनय पाहिला होता, तो मला इतका खास वाटला नव्हता. मात्र हळूहळू गाठीभेटी वाढत गेल्या आणि मला जाणवलं की, बाबू मोशायच्या अंतर्मुख व्यक्तिरेखेसाठीचं अमिताभचा जन्म झालाय."

अमिताभ बच्चन आणि राजेश खन्ना

फोटो स्रोत, HARPER COLLINS

विशेष म्हणजे 'बाबू मोशाय' हा शब्द खऱ्या आयुष्यातून प्रेरित होता. राज कपूर बऱ्याचदा हृषिकेश मुखर्जीना याच नावाने हाक मारायचे.

आनंद चित्रपटाचं शूटिंग सुरू झाल्यानंतर ऋषिकेश अमिताभ बच्चन यांना 'महाराज' म्हणू लागले. कवी हरिवंशराय बच्चन यांचा मुलगा अमिताभचं मूळ नाव अमिताभ श्रीवास्तव असं होतं.

कलकत्त्याची नोकरी सोडताना त्यांनी आपल्या नावापुढे वडिलांचं बच्चन हे आडनाव लावलं.

सुरुवातीला अमिताभ बच्चन मृणाल सेनच्या 'भुवन शोम' या चित्रपटात नरेशनचं काम केलं होतं.

यानंतर ख्वाजा अहमद अब्बास यांनी त्यांच्या 'सात हिंदुस्तानी' चित्रपटात अमिताभ यांना रोल ऑफर केला. या चित्रपटातील भूमिकेसाठी अमिताभ बच्चन यांना राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला पण हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस काही उतरला नाही.

मेहमूद यांनी दिला होता सल्ला...

हा तो काळ होता ज्यावेळी राजेश खन्ना रुपेरी पडद्याचा बेताज बादशाहा होता. पण दोन चित्रपटात काम करणाऱ्या तुलनेने नवख्या असलेल्या अमिताभ बच्चनने ही लोकांचं लक्ष वेधून घेतलं होतं. त्यांनी आनंद या चित्रपटात भास्कर बॅनर्जी या डॉक्टरची भूमिका साकारली होती. आनंद सहगल या भास्करला 'बाबू मोशाय' म्हणायचा. 'आनंद'चा क्लायमॅक्स हा राजेश खन्ना यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा क्षण होता. आनंद त्याच्या आयुष्यातील शेवटच्या घटका मोजत असतो.

डॉक्टर बॅनर्जी काही औषध विकत घेण्यासाठी बाहेर जातो. औषध घेऊन परतल्यावर बघतो तर आनंदने या जगाचा निरोप घेतलेला असतो. डॉक्टर बॅनर्जी आनंद जवळ जाऊन त्याला म्हणत असतो, "माझ्याशी बोल."

अमिताभ बच्चन आणि राजेश खन्ना

फोटो स्रोत, HARPER COLLINS

तेवढ्यात टेपरेकॉर्डरवर आनंदचा आवाज घुमतो, "बाबू मोशाय, जिंदगी और मौत तो ईश्वर के हाथो में है. हम लोग तो उसके हाथ की कठपुतलीया है" हा सीन संपल्यावर थिएटरमध्ये प्रेक्षकांचे डोळे पाणावलेले असतात.

अमिताभ बच्चन त्यांच्या बॅरिटोन आवाजात म्हणतात, 'आनंद मरा नही... आनंद मरते नही.'

या चित्रपटाचे डायलॉग लिहिले होते गुलजार यांनी. या सीनविषयी सांगताना अमिताभ बच्चन म्हणाले होते की, "मला समजत नव्हतं की मी हा शेवटचा सीन कसा करू? मी त्या काळात मेहमूद भाईंच्या घरी राहायचो. मी त्यांनाच विचारलं तेव्हा ते म्हणाले, राजेश खन्ना खरंच मेलाय असं समज आणि सीन शूट कर."

राजेश खन्नाच्या 'मृत्यू'च्या सीनवर अमिताभ भडकले

सौम्या बंदोपाध्याय अमिताभ बच्चन यांच्या बायोग्राफीमध्ये लिहितात, 'राजेश खन्नाच्या मृत्यूचं शूटिंग ज्या दिवशी होणार होत त्याच्या काही दिवस आधी अमिताभ बच्चन यांनी ऋषिकेश मुखर्जींच्या मागे तगादा लावला होता की, मला डायलॉग सांगा. यावर मुखर्जी म्हणाले की, तू इतका घाबरतोयस का? तू इकडे ये सगळं नीट होईल. पण अमिताभ त्यांच्या म्हणण्यावर अडून बसले होते.

शेवटी ऋषीदा म्हणाले की, कलाकार जास्तीची तयारी करून आले की दिग्दर्शकांची अडचण होते. तुम्ही जर आधीच चूक करून बसलात तर चूक सुधारायलाच वेळ जाईल. सीनपूर्वी अमिताभ यांनी रिहर्सल केलेली ऋषी दांना आवडलं नव्हतं.

अमिताभ बच्चन

फोटो स्रोत, FILM HERITAGE FOUNDATION

फोटो कॅप्शन, अमिताभ बच्चन

ते अमिताभला म्हणाले, "राजेशच्या मृत शरीराच्या बाजूला बसून रडलेला सीन मला चालणार नाही. तुला राग आला पाहिजे. रागाच्या भरात जे काही बोलायचं असेल ते बोल. इतके दिवस बडबड करून तू माझं जसं डोकं फिरवलं आहेस तसा सीन शूट कर."

शेवटी दिग्दर्शक असलेल्या ऋषीदांच्या सांगण्यावरून अमिताभने तो सीन रागाच्या भरात शूट केला.

त्या 'लंबू' सोबत पुन्हा काम करू नकोस

'आनंद' रिलीज झाल्यावर राजेश खन्ना या चित्रपटाबद्दल खूप उत्सुक होते. त्यांना हा चित्रपट संपूर्ण मीडियाला दाखवायचा होता. यासाठी व्हिक्टोरिया टर्मिनसजवळील 'एक्सेलसियर' थिएटरमध्ये या चित्रपटाचा खास शो ठेवण्यात आला होता.

चित्रपट संपल्या संपल्या प्रसिद्ध पत्रकार देवयानी चौबळ सुधीर गाडगीळ यांच्याकडे आल्या आणि त्यांना जेवण सोडून बाहेर उभ्या असलेल्या कारजवळ यायला सांगितलं. सुधीर खाली आल्यावर त्यांना तिथं राजेश खन्नाची गाडी दिसली. थोड्या वेळाने देवयानी राजेश खन्नासोबत तिथं आल्या.

राजेश खन्ना आणि अमिताभ बच्चन यांच्यासोबत ऋषिकेश मुखर्जी

फोटो स्रोत, TWITTER/@INDIANHISTORYPICS

फोटो कॅप्शन, राजेश खन्ना आणि अमिताभ बच्चन यांच्यासोबत ऋषिकेश मुखर्जी

यासिर उस्मान लिहितात, "कारमध्ये बसतानाच राजेश खन्ना यांनी देवयानीला विचारलं की, तुला चित्रपट आवडला का? यावर देवयानीने काही क्षण त्याच्याकडे पाहिलं आणि म्हणाल्या, 'त्या लंबूसोबत पुन्हा काम करू नकोस. तो तुझा पत्ता कट करेल.' लंबू म्हणजे अमिताभ बच्चन हे एव्हाना राजेश खन्नाला समजलं होतं. हे ऐकून राजेश खन्ना थोडे आश्चर्यचकित झाले. मग त्यांनी देवयानीला विचारलं की, त्या लंबूमध्ये असं काय आहे ? यावर देवयानी म्हणाल्या, 'तू त्याचे डोळे पाहिलेस का? त्याचा आवाज ऐकलास का ?

यावर राजेश खन्ना हसले. साहजिकच त्यांनी देवयानीचं बोलणं मनावर घेतलं नव्हतं. एवढंच काय तर, 'आनंद'च्या आधी राजेशच्या नजरेत अमिताभ बच्चनचं महत्त्व इतकं नगण्य होतं की त्यांनी दिग्दर्शक मुखर्जींना त्याचं नाव विचारण्याची तसदीही घेतली नव्हती.

'आनंद' फिल्मफेअर सोबतच राष्ट्रीय पुरस्कारचाही मानकरी

आनंद चित्रपटातील प्रत्येक गाणं क्लासिक हिट होतं. या चित्रपटात एकही गाणं किशोर कुमारांच्या आवाजात रेकॉर्ड झालं नाही.

राजेश खन्नाच्या जवळपास प्रत्येक चित्रपटात गाणं कोणाचं, तर किशोर कुमारचं हे ठरलेलं होतं. पण आनंदच्या व्यक्तिरेखेचा विचार करता मुकेशचा आवाज परफेक्ट जाईल असं संगीतकार सलील चौधरी यांचं मत पडलं.

राजेश खन्ना यांच्यावरील पुस्तक

फोटो स्रोत, PENGUIN

शेवटी ते म्हणत होते ते खरं ठरलं. मुकेशने 'मैंने तेरे लिए ही सात रंग के सपने चुने' आणि 'कहीं दूर जब दिन ढल जाए' ही गाणी आपल्या आवाजात अजरामर केली.

मन्ना डे यांनी 'जिंदगी कैसी है पहेली' हे एक गाणं गाऊन लोकांची मन जिंकली. 'आनंद'ला त्यावर्षी सर्वाधिक फिल्मफेअर अवॉर्डस मिळाले.

राजेश खन्ना यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा तर अमिताभ बच्चन यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. शिवाय सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कारही 'आनंद'नेचं पटकावला.

हृषीकेश मुखर्जी यांना सर्वोत्कृष्ट कथा आणि संपादनाचा पुरस्कार मिळाला. त्याच वर्षी 'आनंद'ला सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला.

'आनंद' चं शूटिंग अवघ्या महिन्याभरात पार पडलं आणि तेही अगदी कमी बजेटमध्ये. हा चित्रपट त्यात काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी मैलाचा दगड ठरला.

गायक मुकेश
फोटो कॅप्शन, गायक मुकेश

आनंद त्या वर्षात सर्वाधिक कमाई करणारा तिसरा चित्रपट ठरला होता.

सत्तरच्या दशकात हिंदी चित्रपटसृष्टीत एक चळवळ उभी राहत होती ज्याचं नामकरण 'मिडल सिनेमा' असं करण्यात आलं होतं.

मेन्स्ट्रीम सिनेमा आणि पॅरललं सिनेमा यांच्यातील मध्यममार्गी अशी ही मिडल सिनेमाची चळवळ होती.

राजेश खन्ना

फोटो स्रोत, HARPER COLLINS

फोटो कॅप्शन, राजेश खन्ना

हृषिकेश मुखर्जी या चळवळीचे प्रणेते होते. त्यांचे चित्रपट मनोरंजन तर करायचेच पण सोबतच त्यांच्या चित्रपटातून सामाजिक मुद्द्यांनाही हात घातला जायचा.

आनंद या चित्रपटाने अशाच पठडीतला चित्रपटांचं प्रतिनिधीत्व केलं होतं. आनंद चित्रपटाविषयी अजून काही सांगायचं असेल तर त्याचा एक डायलॉगच पुरेसा आहे - दुख अपने लिए रख, सुख सबके लिए....

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)