श्रीदेवींनी जेव्हा पाकिस्तानातल्या हुकूमशाहीविरुद्ध लढण्याची प्रेरणा दिली होती... - ब्लॉग

फोटो स्रोत, Getty Images
- Author, वुसअतुल्लाह खान
- Role, पाकिस्तानहून, बीबीसी हिंदीसाठी
श्रीदेवी यांच्या चित्रपटांनी पाकिस्तानात वेगळीच भूमिका निभावली. ही गोष्ट आहे जेव्हा कराची विद्यापीठात मला प्रवेश मिळाला. अॅडमिशन मिळाल्यानंतर जवळपास वर्षभरानंतर मला विद्यापीठाच्या वसतिगृहात खोली मिळाली.
खोलीरूपी घर मिळताच सगळी साफसफाई केली. बाजारात जाऊन श्रीदेवी यांचं पोस्टर खरेदी केलं आणि खोलीच्या भिंतीवर डकवलं. ही तेव्हाची गोष्ट जेव्हा भारतीय चित्रपट VCRवर पाहणं बेकायदेशीर होतं. असं बेकायदेशीर चित्रपट पाहताना आढळल्यास तीन ते सहा महिन्यांची शिक्षा होऊ शकायची.
पण मित्र ऐकायला तयार नसायचे. आम्ही थोडे-थोडे पैसे गोळा करून VCR भाड्याने आणायचो. त्याबरोबर सहा चित्रपटांच्या कॅसेटही असायच्या. यांपैकी एक-दोन चित्रपट श्रीदेवी यांचे असायचे.
जस्टीस चौधरी, जानी दोस्त, नया कदम, आग और शोला, बलिदान, सल्तनत, मास्टरजी, जाग उठा इंसान, इन्कलाब, अक्लमंद, नजराना, आखिरी रास्ता, कर्मा, मकसद, सुहागन, निगाहें, जांबाज, तोहफा, घर संसार, औलाद, सदमा, हिम्मतवाला, नगीना, मिस्टर इंडिया, चांदनी असे अनेक त्यांचे चित्रपट आम्ही यादरम्यान पाहिले.
जनरल झिया यांचा कालखंड
श्रीदेवी यांचे चित्रपट तेव्हा पाकिस्तानात पाहणं बेकायदेशीर होतं तरीही आम्ही हॉस्टेलच्या हॉलमध्ये सगळे दरवाजे-खिडक्या सताड उघडं ठेवून मोठ्या आवाजात हे सिनेमे पाहायचो. चित्रपटाचा आवाज वसतिगृहाच्या बाहेर असलेल्या पोलीस स्टेशनपर्यंत जायचा.

फोटो स्रोत, Sridevi/instagram
तो काळ होता जनरल झिया-उल-हक यांच्या हुकूमशाहीचा. त्या वर्चस्ववादाला प्राथमिक पातळीवर विरोधाचं प्रतीक म्हणजे मोकळपणाने हे चित्रपट पाहणं.
कधीकधी पोलीसही येऊन दबक्या आवाजात आम्हाला सांगत, "आम्हाला तुमचं म्हणणं कळतं. पण चित्रपट पाहताना आवाज कमी ठेवा. कोणी एखादा कडक अधिकारी आला तर आमची नोकरी जाईल. मग ते पाहताना तुम्हाला मजा येईल का?"
'श्रीदेवी यांचा चित्रपट दाखवा'
पोलीस शिपाई दर तीन महिन्यांनी बदलायचे. यांपैकी एक शिपाई मला आजही लक्षात आहे. त्यांचं नाव कदाचित जमील होतं. स्पेशल ब्रँचचे असल्यानं ते वर्दीत नसायचे. वसतिगृहाच्या चौकीवर जवळपास वर्षभर त्यांची नियुक्ती होती.

फोटो स्रोत, Sadma Film Poster
जेव्हा त्यांनी आपल्या बदलीचं सांगितलं तेव्हा वसतिगृहातल्या मुलांनी त्यांना कँटीनमध्ये पार्टी देण्याची मागणी केली. त्यावर तेच म्हणाले, "मेजवानीचं सोडा. श्रीदेवीचा एखादा चित्रपट दाखवा."
त्या रात्री जमील यांच्या निरोप समारंभाप्रसंगी 'जस्टीस चौधरी' चित्रपट आणण्यात आला. सगळ्यांनी समरसून हा चित्रपट पाहिला.
आज 30-35 वर्षांनंतर मागे वळून पाहताना मला असं वाटतं की श्रीदेवी नसत्या तर जनरल झिया-उल-हक यांच्या दशकभराहून अधिक काळाच्या हुकूमशाहीविरुद्ध आम्ही कसे लढलो असतो?
नव्वदीच्या दशकात
मी श्रीदेवी यांचा पाहिलेला शेवटचा चित्रपट 'चांदनी' होता. त्यानंतर माझं आयुष्यच बदलून गेलं.
श्रीदेवी यांनाही कदाचित ते कळून चुकलं होतं. म्हणूनच नव्वदीच्या दशकानंतर मावळत्या सूर्याप्रमाणे त्यांचा रूपेरी पडद्यावरचा वावर कमी होत गेला. कामं कमी होत गेली. चाहत्यांच्या नजरेसमोरून त्यांची प्रतिमा विरळ होत गेली.

फोटो स्रोत, AFP
'इंग्लिश विंग्लिश' खूप चांगला चित्रपट होता, असं मी ऐकलं होतं. त्यानंतर 'मॉम' नावाचा त्यांचा चित्रपटही गाजला.
पण परवा त्यांनी धक्काच दिला. मला त्याचं दु:ख नाही किंवा मी हैराण झालो नाही.
प्रसिद्ध चित्रकार व्हॅन गॉग यांच्याबाबत एक आख्यायिका सांगितली जाते. जेव्हा त्यांना स्वत:चं एखादं चित्र प्रचंड आवडू लागायचं, तेव्हा ते चित्र फाडून टाकायचे.
श्रीदेवी यांच्या बाबतीतही असंच झालं बहुधा. श्रीदेवी यांचं पेंटिंग तयार करणाऱ्यालाही बहुतेक व्हॅन गॉग यांच्यासारखं वाटलं असावं.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








