शर्मिला टागोर यांना प्रपोज करताना मन्सूर अली खान पटौदींनी दिली होती 'ही' भेट

फोटो स्रोत, Getty Images
27 डिसेंबर 1969...भारतीय क्रिकेट टीमचे तेव्हाचे कर्णधार नवाब मन्सूर अली खान पटौदी अभिनेत्री शर्मिला टागोर यांच्याशी विवाहबद्ध झाले.
आपापल्या क्षेत्रात त्यावेळी गाजत असलेली ही दोन नावं होती. त्यामुळे त्यांच्या नात्याची आणि लग्नाची तेव्हा खूप चर्चाही झाली होती.
पटौदी घराण्याचे शेवटचे 'नवाब' आणि त्याकाळी प्रसिद्धीच्या शिखरावर असलेल्या अभिनेत्री शर्मिला टागोर यांच्या नात्याची सुरूवात चार वर्षांपूर्वी म्हणजेच 1965 साली झाली होती. मन्सूर अली खान पटौदी यांच्या टीमचा सामना पाहण्यासाठी शर्मिला टागोर दिल्लीतल्या स्टेडिअममध्ये आल्या होत्या.
5 जानेवारी 1941 साली भोपाळ इथे जन्मलेल्या नवाब मन्सूर अली खान पटौदी यांना क्रिकेट वारशामध्येच मिळालं होतं. त्यांचे वडील नवाब मोहम्मद इफ्तिखार अली खान पटौदी यांनी कसोटी क्रिकेटमध्ये इंग्लंड आणि भारत दोन्ही देशांचं प्रतिनिधीत्व केलं होतं.
मन्सूर अली खान पटौदी यांचा अकरावा वाढदिवस होता, जेव्हा त्यांचे वडील इफ्तिखार अली खान पटौदी यांचा पोलो खेळताना मृत्यू झाला.
फर्स्ट क्लास क्रिकेट
मन्सूर अली खान पटौदी यांच्या खांद्यावर फार कमी वयात पटौदी संस्थानाची जबाबदारी आली. पण क्रिकेटमधला त्यांचा रस कमी झाला नाही.
मन्सूर अली खान पटौदी उत्तम फलंदाज होतेच, पण अतिशय चपळ फिल्डरही होते. त्यांच्या या चपळाईमुळेच त्यांना 'टायगर' म्हटलं जायचं.

फोटो स्रोत, Getty Images
वयाच्या सोळाव्या वर्षी त्यांनी फर्स्ट क्लास क्रिकेट खेळायला सुरूवात केली.
त्यांनी इंग्लंडमधील ससेक्स आणि ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीचं प्रतिनिधीत्व केलं होतं. इंग्लिश काउंटीचे कर्णधार म्हणून निवडले गेलेले ते पहिले भारतीय होते.
1961 साली जेव्हा ते अवघ्या 20 वर्षांचे होते, तेव्हा एका कार दुर्घटनेत त्यांच्या एका डोळ्याला दुखापत झाली.
सर्वांत लहान वयात कर्णधारपद
मात्र तरीही त्यांनी कसोटी क्रिकेट खेळणं सोडलं नाही आणि 21 वर्षे 70 दिवस एवढं वय असतानाच ते भारतीय क्रिकेट संघाचे कर्णधार झाले. ते सर्वांत कमी वयाचे कर्णधार ठरले होते.
1965 साली त्यांची ओळख अभिनेत्री शर्मिला टागोर यांच्याशी झाली. त्या दिल्लीमध्ये सुरू असलेला क्रिकेटचा सामना पाहण्यासाठी आल्या होत्या.

फोटो स्रोत, Getty Images
मन्सूर अली खान पटौदी ऑक्सफर्ड विद्यापीठात शिकले होते, एका संस्थानाचे नवाब होते आणि भारतीय क्रिकेट संघाचे कर्णधार होते.
त्यांना उर्दू येत नव्हती आणि शर्मिला टागोर यांचे चित्रपटही त्यांनी पाहिले नव्हते.
शर्मिला यांच्या चित्रपट कारकिर्दीची सुरूवात
शर्मिला त्यावेळी आपल्या करिअरच्या शिखरावर होत्या. आपल्या बोल्ड फोटोशूटमुळेही त्यावेळी शर्मिला चर्चेत होत्या.
मन्सूर अली खान यांना पहिल्यांदा भेटल्यानंतर शर्मिला यांची प्रतिक्रिया काय होती, हे माहीत नाही. पण मन्सूर अली खान पटौदी हे शर्मिला यांच्या सौंदर्यावर फिदा झाले होते.
शर्मिला टागोर यांचा जन्म 8 डिसेंबर 1944 साली बंगाली कुटुंबात झाला. त्यांचे वडील प्रसिद्ध दिग्दर्शक सत्यजित रे यांचे मित्र होते.

फोटो स्रोत, Getty Images
जेव्हा सत्यजित रे यांनी शर्मिला यांना पाहिलं, तेव्हा त्यांच्या वडिलांना सांगितलं की ते 'अपूर संसार' या चित्रपटासाठी कास्ट करू इच्छितात.
त्यांचे वडील रे यांना नकार देऊ शकले नाहीत. 12-13 वर्षांच्या शर्मिला टागोर यांनी सत्यजित रे यांच्या दिग्दर्शनाखाली चित्रपटात मुख्य भूमिका पार निभावली.
'काश्मीर की कली'
'अपूर संसार' नंतर शर्मिला यांनी सत्यजित रे आणि अन्य बंगाली दिग्दर्शकांसोबत काम केलं.
बंगालमधीलच एक चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक शक्ती सामंत हे 'काश्मीर की कली' नावाचा एक चित्रपट बनवत होते.

फोटो स्रोत, Getty Images
त्यांनी या चित्रपटात शर्मिला टागोर यांना मुख्य भूमिका ऑफर केली. शर्मिला यांनीही ही ऑफर मान्य केली. त्यानंतर त्यांना हिंदी चित्रपटसृष्टीचे दरवाजे खुले झाले आणि त्या लवकरच एक व्यस्त अभिनेत्री बनल्या.
1960 च्या दशकात शर्मिला यांच्या 'वक्त', 'अन इव्हिनिंग इन पॅरिस', 'आराधना', 'सफर' असे चित्रपट केले.
शर्मिला यांना लग्नाची मागणी
मन्सूर अली खान पटौदी आणि शर्मिला टागोर यांची पुढची भेट ही पॅरिसमध्ये झाली. तिथेच मन्सूर अली खान पटौदी यांनी शर्मिला यांना लग्नाची मागणी घातली. त्यांना एक फ्रीजसुद्धा भेट म्हणून दिला.
अर्थात, या भेटीचा शर्मिला यांच्यावर फार परिणाम झाला नाही. पण शर्मिला यांच्या मनात मन्सूर अली खान पटौदी यांच्याबद्दल भावना निर्माण होऊ लागल्या.
तीन-चार वर्षांत भेटीगाठी वाढल्या. एकमेकांना समजून घेण्यात आणि कुटुंबीयांचं मन वळवण्यात काही काळ गेला. 27 डिसेंबर 1969 साली दोघांनी लग्न केलं.

फोटो स्रोत, Getty Images
मन्सूर अली खान पटौदी क्रिकेट खेळत राहिले आणि शर्मिला चित्रपटात काम करत राहिल्या.
मन्सूर अली खान पटौदींनी आपल्या कारकिर्दीत 46 कसोटी सामने खेळले. त्यांपैकी 40 सामने हे त्यांच्या नेतृत्वाखाली खेळले गेले होते.
शर्मिला यांचं करिअर
1970 च्या दशकात शर्मिला टागोर यांनी अमर प्रेम, दाग, मौसम, चुपके-चुपके, नमकीन, दूरियां यांसारखे चित्रपट केले.
2010 पर्यंत त्या चित्रपट क्षेत्रात सक्रीय होत्या. शर्मिला टागोर यांना अभिनयासाठी दोन राष्ट्रीय पुरस्कार आणि एक फिल्म फेअर पुरस्कारही मिळाला होता.
भारत सरकारनं त्यांना पद्म भूषणनं सन्मानित केलं आहे.
2004 ते 2011 पर्यंत त्या केंद्रीय फिल्म प्रमाणन बोर्डाच्या अध्यक्षा होत्या. 2005 साली त्यांना युनिसेफनं सदिच्छादूत म्हणून नेमलं.
22 सप्टेंबर 2011 रोजी नवाब मन्सूर अली खान पटौदी यांचं निधन झालं.
मन्सूर अली खान पटौदी आणि शर्मिला टागोर यांना तीन मुलं आहेत. मुलगा सैफ अली खान आणि मुलगी सोहा अली खान यांनी चित्रपटसृष्टीत करिअर केलं, तर त्यांची तिसरी मुलगी सबा अली खान ही ज्वेलरी डिझायनर आहे.
क्रिकेट आणि बॉलिवूड
क्रिकेट आणि चित्रपटसृष्टीतील जोडी एकत्र आलेलं मन्सूर अली खान पटौदी आणि शर्मिला टागोर हे पहिलं उदाहरण नव्हतं.
पाकिस्तानी कसोटीपटू वकार हसन हे अभिनेत्री जमीला रज्जाकसोबत विवाहबद्ध झाले होते.

फोटो स्रोत, Reuters
त्यांच्या आधी नजर मोहम्मद आणि नूरजहां यांचंही प्रेमप्रकरण गाजलं होतं.
मन्सूर अली खान पटौदी आणि शर्मिला टागोर यांच्यानंतरही मोहसिन हसन खान-रिना रॉय, सरफराज नवाझ-राणी अशा क्रिक्रेट आणि चित्रपटसृष्टीशी संबंधित जोड्या जुळल्या.
मोहम्मद अझरुद्दीन आणि संगीता बिजलानी, हरभजन सिंह आणि गीता बसरा, युवराज सिंह आणि हेजल केच, झहीर खान आणि सागरिका, विराट कोहली आणि अनुष्का शर्मा ही अलीकडच्या काळातली उदाहरणं आहेत.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)








