गुलाबो सिताबो : अमिताभ बच्चन आणि आयुष्मान खुराना यांचा सिनेमा कसा आहे?

गुलाबो सिताबो

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, वंदना
    • Role, बीबीसी टीव्ही संपादक (भारतीय भाषा)

"मैंने बच्चे इसलिए पैदा नहीं किए कि हवेली मेरी ही रहे",('ही हवेली फक्त माझी आणि माझीच राहावी, म्हणून तर मी मूलबाळ जन्माला घातलं नाही.)

जेव्हा 78 वर्षांचे मिर्झा आजोबा (अमिताभ बच्चन) त्यांच्या वकिलांना असं सांगतात, तेव्हाच त्यांच्या लोभी मनाचं दर्शन होतं. पण सध्या ती 'फातिमा मंझिल' हवेली त्यांच्याच म्हाताऱ्या बेगमच्या नावावर आहे. आता मात्र ते इतके आसुसलेले आहेत की कधी ही म्हातारी जगाचा निरोप घेते अन् कधी ती हवेली आपली होते, असं त्यांना झालंय.

त्यांच्या याच हवेलीत सहकुटुंब राहतो बांके रस्तोगी (आयुष्मान खुराना), जो त्या खोलीचं फक्त 30 रुपये भाडं देतो, तेही जमेल तसं. पीठाची गिरणी चालवून स्वतःचं आणि कुटुंबाचं पोट भरतो. त्याच्यावर तीन बहिणी आणि एका आईची जबाबदारीसुद्धा आहे.

एवढा सगळा व्याप असताना जेव्हा त्याची प्रेयसी फौजिया लग्नाचं विचारते, तेव्हा तो बोलतो - "10 बाई 10 के कमरे में पाँच लोग हैं सोने वाले, कोने में पर्दे के पीछे लोटा और बाल्टी पड़ी रहती है, जिससे सब नहाते हैं, लैट्रिन जाना हो तो मिश्रा जी की फ़ैमिली के साथ ज्वाइंट टॉयलेट. तुम्हीं बताओ कैसे कर लें शादी."

आयुष्मान त्याच्या पात्रात इतका सेट झालेला दिसतो की त्याचा हा डायलॉग थेट हृदयाला जाऊन भिडतो... हे आपलंही दुःख आहे, असं कुठेतरी वाटतं.

कोरोना
लाईन

मात्र मिर्झा आणि बांके यांच्यातलं वैर हे कट्टर शत्रूंनाही लाजवेल आणि याच शत्रुत्वाची कहाणी आहे 'गुलाबो-सिताबो.'

'गुलाबो-सिताबो' ही कहाणी फक्त या दोन पात्रांपुरती, त्यांच्यातल्या शत्रुत्वापुरती मर्यादित नाही. ही कहाणी आहे लखनौची, तिथल्या चिंचोळ्या गल्ल्यांची आणि जुन्या वाड्या-हवेलींची ज्यांना सिनेमॅटोग्राफर अविक मुखोपाध्याय यांनी खूपच मस्स्तपैकी कॅमेऱ्यात कैद केलंय.

वेगळं काय आहे सिनेमात?

अमिताभ आणि आयुष्मान यांच्यात सतत उडणारे खटके, त्यांनी एकमेकांसाठी ठेवलेली काही टोपणनावं - चूसी हुई गुठली का चेहरा, दीमक, लीचड़; आणि एकंदरच लखनौच्या अस्सल बोलीभाषेतला त्यांच्यातला संवाद या कहाणीला उत्तमरीत्या रंगवतो.

एकीकडे हा त्रस्त आणि जबाबदारीच्या ओझ्याखाली दबलेला बांके आयुष्मान अतिशय प्रामाणिकपणे साकारताना दिसतो. तिकडे दुसरीकडे अत्यंत खडूस, लोभी आणि भांडकुदळ असा म्हातारा मिर्झा अमिताभने आजवर केलेल्या सर्व पात्रांना मागे टाकतो. मिर्झाची सतत बडबड सुरू असते, तो सापडेल त्याच्या वाटी जातो. हे पात्र तुम्ही-आम्ही आपल्या शेजारी कुठे ना कुठे नक्कीच पाहिलं असेल.

गुलाबो सिताबो

फोटो स्रोत, Gulabo sitabo poster

अनेकांना अमिताभच्या चेहऱ्यावरील प्रॉस्थेटिक्स आणि मेकअप आवडलेला दिसतोय, पण मला तो फार असा खास वाटला नाही. पण त्यामुळे काही कमी राहतं अशातला भाग नाही, आणि राहतही असेल, तर ती उणीव अमिताभ त्या मेकअपआडून आपल्या सहज अभिनयाने भरून काढतो.

त्यांची पत्नी बेगम फातिमा त्यांच्यापेक्षा 15 वर्ष मोठी आहे, त्यामुळे ती कधी अल्लाहला प्यारी होते नि कधी आपल्याला 'फातिमा मंझिल'ची मालकी मिळते, याची लालसा मिर्झाला कायम राहते, अगदी वयवर्षं 78 मध्येही.

ही धुसफूस त्याची कायम असतानाच, मात्र त्याचा वैरी बांके या हवेलीत खूश आहे, कारण लखनौमध्ये आणखी कुठे त्याला फक्त 30 रुपय भाडं देऊन राहता येईल.

या दोघांमधल्या तणावात येतो एक पुरातत्व विभागाचा अधिकारी (विजय राज) आणि एक वकील (बृजेंद्र काला). कोण कुणाच्या बाजूने, हे तर गुलाबो सिताबो पाहूनच तुम्हाला कळेल.

'सामान्यातील सामान्यांची विशेष गोष्ट'

'पीकू', 'विकी डोनर' आणि 'ऑक्टोबर'सारख्या सिनेमांमधून शूजीत सरकार यांनी मध्यम वर्गाच्या काही कहाण्या लोकांपुढे आणल्या आहेत. तशीच काहीशी शैली 'गोलमाल'सारख्या सिनेमांचे दिग्दर्शक ऋषिकेश मुखर्जी यांची होती.

गुलाबो सिताबो

फोटो स्रोत, Gulabo sitabo

पण आता या सिनेमात सरकार हे आपल्या कंफर्ट झोनबाहेर आले आहेत. यावेळी शूजित सरकारने कनिष्ट मध्यमवर्गातल्या लोकांच्या आयुष्यावर प्रकाश टाकला आहे. काही प्रेक्षकांना हा सिनेमा जरा संथ वाटू शकतो, कारण प्रत्येक पात्र रंगवण्यात दिग्दर्शकाने जरा वेळ घेतला आहे. म्हणून जर तुम्हीही धीर धरून चित्रपट पाहिला तर पात्रातले रंग तुम्हाला कळू लागतील.

'गुलाबो-सिताबो'मधले इतर पात्रही कमाल करतात, विशेषतः सृष्टी श्रीवास्तव.

आणि ज्या 95 वर्षांच्या आज्जीची ही फातिमा मंजिल, त्या फातिमाचं पात्र रंगवणाऱ्या फारूख जफर यांनीही मार्मिक अभिनयातून मनं जिंकली आहेत. त्यांना ठाऊक असतं की त्यांचा पती मिर्झा त्यांच्यापेक्षा हवेलीवर जास्त प्रेम करतो, पण त्याही आपला हातचा एक राखूनच असतात.

काही असेही क्षण आहेत, जेव्हा फारूख एक शब्दही न उच्चारता त्या सीनमध्ये असं काही करतात, की प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर आपोआप स्मित उमटतं. उदाहरणार्थ, जेव्हा फातिमा बेगम यांना कळतं की मिर्झा घराच्या कागदपत्रांवर त्यांच्या अंगठ्याचा ठसा घेण्याचा प्रयत्न करतोय, तेव्हा त्याच आपल्या बोटांना ईजा झाल्याचं नाटक करत पट्टी बांधून घेतात. त्यांची ही गंमत त्यांच्या डोळ्यातच व्यक्त होते.

अखेरीस काय होतं?

बांके आणि मिर्झा यांच्यातल्या या सिनेमात अचानक अनेक पात्रं येतात, त्यामुळे जरा गर्दी झाल्यासारखंही वाटू शकतं. मात्र क्लायमॅक्सच्या वेळी जेव्हा ही गर्दी कमी होते, तेव्हा या दोन जणांमधलं नातं अधिक स्पष्ट दिसू लागतं, आणि एकवेळ असंही वाटतं की हे दोघं खरंच फक्त वैरी होते का? या दोघांमध्ये घरमालक आणि भाडेकरू याव्यतिरिक्त आणखी काही नातं असू शकलं असतं का?

पिकू

फोटो स्रोत, Raindrop media

लोभ, मोह यांनी कधीच कुणाचंच भलं केलं नाही. लखनौच्या 'फातिमा मंजिल'मधली ही कहाणी लोभाचीच आहे. पण बांके आणि मिर्झासाठी यातल्या काही गोष्टी बदलतील का? सिनेमाचा क्लायमॅक्स पाहून तुम्हाला जरा धक्का बसू शकतो, कदाचित तुम्हाला जरा हसूसुद्धा येईल आणि जरा निराशाही होईल.

त्यामुळे प्रत्येक बॉलिवुड सिनेमाकडून 'हॅपी एंडिंग'ची अपेक्षा तुमची असेल तर तुम्हाला कदाचित हा या कहाणीचा सारांश पटणार नाही. पण ही भावना स्क्रीनप्लेमधून आणि संवादांमधून व्यक्त करणाऱ्या जूही चतुर्वेदीने लय भारी काम केलंय.

घरबसल्या फर्स्ट शो

आजवर मी अनेक सिनेमांचे रिव्ह्यू केलेत... रिलीजच्या एक दिवसापूर्वीच येणारे प्रेस प्रिव्ह्यू शो पाहिलेत, त्यादरम्यान काही जोरदार डायलॉग लक्षात ठेवावे लागतात, एखादा मुद्दा फोनच्या मंद लाईटमध्ये टाईप करून किंवा डायरीत लिहून ठेवावा लागतो, जेणेकरून काही मिस नको व्हायला.

आपल्यापैकी अनेकांनी अमिताभच्या चित्रपटांचे किस्से ऐकले आहेत, की कशी त्यांच्या पहिल्या काही शोसाठी बॉक्सऑफिसबाहेर रांगाच रांगा लागायच्या, कशा त्यांच्या सिनेमाच्या तिकीट ब्लॅकमध्ये विकल्या जायच्या वगैरे.

पण 'गुलाबो-सिताबो' पाहणं, त्यावर आता लिहिणं हा जरा न भूतो असा अनुभव होता माझ्यासाठी. कुठे बाहेर पडून सिनेमागृहात जायची गरज नाही, फक्त रात्री 12 वाजले रे वाजले की इंटरनेट कनेक्ट करायचं नि घ्या! घरबसल्या पाहा फर्स्ट शो.

आणि इथे काही लक्षात ठेवण्याची घाई किंवा काळजी नव्हती. जर एखादा डायलॉग लिहायचा असेल तर रिवाइंड करून पुन्हा पाहून घ्या. एवढं आत्मनिर्भर होण्याची कल्पना तर गेल्या वर्षीसुद्धा केली नव्हती कदाचित.

कुणी कधी विचारलं की भारतातला पहिला बोलपट कोणता तर 1931च्या 'आलम आरा'चं नाव लगेचच आठवतं. तुम्हाला माहितीय 'गुलाबो-सिताबो'सुद्धा तसाच ऐतिहासिक सिनेमा म्हणून नोंदवला जाईल. कारण हा पहिलाच असा मुख्य प्रवाहातला सिनेमा आहे, जो बनला तर सिनेमागृहांसाठीच होता, पण रिलीज OTT प्लॅटफॉर्मवर झाला.

तुम्ही कधी हा विचार नक्की केला असेल की आता सिनेमे थेट फोनवर रिलीज होतील. घ्या, अख्खं कल्पनाविश्व आता सत्यात उतरतंय. या कोरोना व्हायरसमुळे आणखी काय काय पाहायला मिळेल, कुणास ठाऊक.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)